Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय अर्थसंकल्प 2020 चा सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर-पंतप्रधान


केंद्रीय अर्थसंकल्प 2020 हा दूरदृष्टी असलेला कृतीशील अर्थसंकल्प आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. या अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेल्या सुधारणा केवळ अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या नाहीत तर एकूणच सर्व नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या आहेत असे पंतप्रधान म्हणाले. नव्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात दिसते.

कृषी, पायाभूत सुविधा, वस्त्रोद्योग आणि तंत्रज्ञान अशा क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी या अर्थसंकल्पामुळे निर्माण झाल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या 14 कलमी कृती आराखड्यांवर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल तसेच ग्रामीण भागात रोजगारही वाढेल.

तंत्रआधारित वस्त्रोद्योग क्षेत्रात नवी यंत्रे घेण्याचा निर्णय या क्षेत्रात मोठी सुधारणा आणणारा ठरेल. गेल्या तीन दशकांपासूनची मागणी या अर्थसंकल्पात पूर्ण झाली आहे.

आरोग्य क्षेत्रातली क्रांतिकारक योजना आयुष्मान भारत अधिक व्यापक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढावी यासाठी सरकारने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात अनेक धोरणात्मक उपक्रमांचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. या निर्णयांमुळे जागतिक मूल्य साखळीचा भारत अविभाज्य भाग बनेल, असे ते म्हणाले.

पायाभूत सुविधा क्षेत्रात सरकारने 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे रोजगारांच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. 100 नव्या विमानतळांची उभारणी करण्याच्या घोषणेमुळे रोजगारासोबतच पर्यटनातही वाढ होईल, असे ते म्हणाले.

देशात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक पावले उचलण्यात आली आहेत. थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी कर सवलत देण्यात आली आहे.

करदात्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. लवकरच करदात्यांसाठीची नवी नियमावली सरकार आणणार असून त्यामुळे कर रचना अधिक सुलभ होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/R.Aghor/P.Kor