Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केनियात नैरोबीमध्ये भारतीय समुदायाने केलेल्या स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

केनियात नैरोबीमध्ये भारतीय समुदायाने केलेल्या स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

केनियात नैरोबीमध्ये भारतीय समुदायाने केलेल्या स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नमस्कार, केमछो, सत श्री अकाल, नमस्कारम, अबारिगानी,

माझ्या सर्व मित्रांनो, बंधु आणि भगिनींनो, आम्हा सर्वांसाठी हा आमचा अतिशय मोठा सन्मान करणारा आणि आदर देणारा प्रसंग आहे. केनियाचे अध्यक्ष महामहीम श्रीयुत ऊहूरू केन्याटा हे देखील या समारंभाला उपस्थित आहेत. माझ्यासाठी, भारतासाठी आणि सर्व भारतीयांसाठी हा एक अतिशय मोठा सन्मान आहे. हे प्रेमाचे प्रतीक आहे, हे आपुलकीचे आणि भारतीयांसाठी असलेल्या प्रेमाचे व आपुलकीचे प्रतीक आहे. महामहीम अध्यक्षांचा मी अत्यंत आभारी आहे.

मी गेल्या चार दिवसांपासून आफ्रिकेच्या मुख्य भूमीचा दौरा करत आहे. मोझांबिकपासून सुरुवात झाली होती. मी दक्षिण आफ्रिकेला गेलो, टांझानियाला गेलो आणि आता तुमच्याकडे आलो आहे. मी यापूर्वी देखील तुमच्यात उपस्थित झालो आहे. तुमच्यापैकी अनेकांशी माझे खूप जवळचे संबंध राहिले आहेत, माझी जुनी ओळख आहे. पण आज मला समोर जे दृश्य दिसत आहे, भारतातही जे लोक हे पाहत असतील, त्यांना सुद्धा असे वाटत असेल की काही असेल ते असेल पण कार्यक्रम तर भारतात असल्यासारखे वाटत आहे. हे दृश्य पाहून त्यांना असे वाटणार नाही की आपण आफ्रिकेच्या भूमीवर असा नजारा सादर करत आहोत आणि कार्यक्रम आम्ही भारतात देखील पाहिले आहेत. मला जगातील इतर देशात जाण्याचेही भाग्य लाभले आहे. पण इतक्या तपशीलवार तुम्ही लोकांनी ज्या प्रकारे बारकाईने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याबद्दल मी तुम्हाला शेकडो सलाम करतो.

जेव्हा मी आणि राष्ट्राध्यक्ष महोदय या ठिकाणी येत होतो तेव्हा सर्व कलाकार दोन्ही बाजूंना उभे होते आणि मी या कलाकारांकडे पाहात असताना असे वाटत होते की जणू काही संपूर्ण भारतच या ठिकाणी हजर झाला आहे. भारताच्या प्रत्येक कोप-याची ओळख, प्रत्येक कोप-याचा गंध मला जाणवत आहे. ही बाब लहान नाही आहे. अनेक शतकांपूर्वी आपले पूर्वज येथे आले, मजुरांच्या स्थितीत आले, कोणी घेऊन आले, मोलमजुरी करण्यासाठी कोणी आले, कोणाची तिसरी पिढी असेल, कोणाची चौथी पिढी असेल. असे अनेक लोक या ठिकाणी असतील ज्यांना आतापर्यंत भारताच्या भूमीवर पाऊल ठेवण्याचे भाग्य लाभले नसेल. ते केवळ ऐकून असतील की गंगा नावाची नदी आहे, हिमालय पर्वत आहे, आसाम आहे, नागालँड आहे, मिझोराम आहे, असे केवळ ऐकून असतील. पण त्यांना तिथे जाण्याचे भाग्य लाभले नसेल. काही लोक असेही असतील ज्यांचे भारतात नातेवाईक आहेत की नाहीत हे देखील त्यांना माहीत नसेल. कोणत्या गावातून आपण आलो होतो, कोणत्या भागातून आलो होतो याविषयी काहीच माहिती नसेल. पण तरीही इतक्या प्रदीर्घ काळानंतरही त्यांनी स्वतःला आपल्या मूळांशी जोडून ठेवलेले आहे, ही बाब असामान्य म्हणावी लागेल.

आपल्या पूर्वजांचा वारसा, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गाथा, आपल्या पूर्वजांचा मानवतेचा संदेश हजारो मैल दूर राहिल्यानंतरही तुम्ही तुमच्या आचरणात टिकवून दाखवला आहे. प्रत्येक भारतीयाला तुमचा अभिमान आहे. मला तुमचा अभिमान वाटतो, मी तुमचे अभिनंदन करतो.

नाहीतर आज घरात बालकाने मातृभाषेशिवाय दुस-या कोणत्या भाषेतून शिकण्यास सुरुवात केली की हळूहळू संपूर्ण कुटुंब देखील मातृभाषेचा त्याग करू लागते. पण तुम्ही ना ती सोडली आहे, ना सोडू दिली आहे. हीच तर परंपरा आहे, भाषेचेच तर बंधन आहे. जी आपल्या भावना व्यक्त करते. आपले खाणे-पिणे, आपले राहणीमान आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाविषयी आपला स्वाभिमान, हेच आपल्याला पुढे जगण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि म्हणूनच जेव्हा आम्ही या ठिकाणी येतो तेव्हा वाटते की हा लघु भारतच आहे आणि तुम्ही ते लोक आहात ज्यांचे पूर्वज ज्या संस्कारांना घेऊन या भागात आले. येथे येण्याचे कारण काहीही असू शकेल. काही समस्या असू शकतील, कितीही तक्रारी असू शकतील. पण तुम्ही या भूमीला आपले केले आहे आणि या भूमीच्या विकासासाठी देखील तुम्ही अगदी मनापासून स्वतःला वाहून घेतले. या ठिकाणचा प्रत्येक मूळ नागरिक तुम्हाला आपले मानतो. तुमच्या खांद्याला खांदा लावून ते या देशाच्या प्रगतीमध्ये तुमचे योगदान अतिशय गौरवाने स्वीकारतात. अभिनंदन करतात. काही दिवसांपूर्वी भारतात इंडो- आफ्रिका शिखर परिषद झाली. आफ्रिकेतील सर्व देश तिथे आले. स्वतः राष्ट्राध्यक्ष तिथे आले होते आणि त्यावेळी त्यांनी मला अतिशय आग्रह केला होता की मोदी जी या कॅलेंडर वर्षात तुम्हाला आमच्याकडे आलेच पाहिजे. हे प्रेम देखील होते, अधिकार देखील होता आणि हा अधिकार ते दाखवत होते त्याचे कारण होता तुम्ही लोक. त्यामुळेच मी आज तुमच्या मध्ये आहे. भारतासाठी आफ्रिकेतील हे देश अतिशय महत्त्वाचे आहेत. एका प्रकारे आफ्रिकी देश आणि भारताच्या सुख-दुःखाच्या वाटचाल बरोबरीने सुरू राहिली आहे. एकमेकांशी संबंध प्रस्थापित करताना ही सुख-दुःखाची वाटचाल नवी ऊर्जा प्रदान करत असते, नवे सामर्थ्य देत असते आणि भारताचा देखील हा प्रयत्न आहे की आफ्रिकेतील सर्व देशांशी भारताचे घनिष्ठ संबंध असले पाहिजेत, अतूट नाते असले पाहिजे आणि भारत आणि आफ्रिकी देशांनी परस्परांची ताकद ओळखावी, एकमेकांच्या गरजा ओळखाव्यात, एकमेकांना मदत करण्याचे मार्ग शोधावेत आणि खांद्याला खांदा लावून नवी उंची गाठण्यासाठी कोणतीही कसर बाकी सोडू नये या उद्देशाने आम्ही पुढे चालत आहोत. पण आम्ही तिथे केवळ या ठिकाणी थांबून राहणार नाही. माझे काय आहे? मला काय करायचे आहे? इतक्या संकुचित विचारांनी भारताने ना कधी वाटचाल केली आहे आणि ना कधी अशा प्रकारे चालण्याचा विचार करू शकेल. भारत केवळ माझे काय आहे, मला काय त्याचे ही संकुचित भावना घेऊन या जागतिक व्यासपीठावर उपस्थित झालेला नाही. भारत तर “वसुधैव कुटुंबकम्” ही भावना घेऊन वाढला आहे, ज्याने संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानले आहे. आम्ही ते लोक आहोत ज्यांनी मानवतेला आपल्या नसानसांमध्ये भिनवून पाहिले आहे आणि त्यामुळेच जेव्हा भारत- आफ्रिका संबंधांना बळकट करण्याची चर्चा केली जाते तेव्हा केवळ आपले भले करण्याचा नव्हे तर जगाच्या भल्यासाठी देखील काही केले पाहिजे हा उद्देश ठेवून पुढे चालत आहोत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो तुम्ही सर्व कितीही दूर का असेनात, पण भारतात जर काही वाईट झाले, काही त्रास झाला तर तुम्हालाही वेदना होतात की नाही. तुम्ही अस्वस्थ होता की नाही. रात्री जागून त्याची माहिती घेत राहता की नाही. ज्यांना तुम्ही कधी भेटलात देखील नाही त्यांना जर त्रास झाला तर तुम्ही झोपू शकत नाहीत. हेच तर मानवतेचे बाळकडू आपल्याला पाजण्यात आले आहे आणि आपण त्यासाठीच जगत आहोत.

माझ्या देशाचा गौरव, माझ्या देशाचा मान-सन्मान, अभिमान या ठिकाणी आज माझ्या समोर बसले आहेत. सरकार एक परराष्ट्र विभाग चालवत आहे. परराष्ट्र विभागात मोठे मोठे अधिकारी, नोकरशहा असतात. वेगवेगळ्या देशांची उच्चायुक्त कार्यालये असतात. ते जगाला भारताशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा प्रयत्न असतो की जगाने भारताचा स्वीकार करावा, त्याचा सन्मान करावा. ते प्रयत्न करत असतात की जग भारताशी जोडले जावे. पण त्यांची ताकद मर्यादित आहे. पाच, पंचवीस, पन्नास लोक असतात त्या मिशनमध्ये. पण जगाला जोडण्याची जर खरी ताकद कोणामध्ये असेल तर ती प्रत्येक भारतीयामध्ये आहे. जो माझ्या समोर बसलेला आहे. भारताचे खरे राजदूत, भारताचे पक्के राजदूत जर कोणी असतील तर ते आहेत जगभरात पसरलेले माझे सर्व भारतीय. आज जगातील कोणत्याही भागातून, जगाच्या कोणत्याही कोप-यात असलेल्या कोणत्याही देशाच्या वतीने मी जगातील अनेक देशांच्या आदरणीय व्यक्तींना भेटलो आहे. पण आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाच्या प्रमुखाने त्यांच्या देशात जे भारतीय राहातात त्यांच्या बद्दल एक अक्षर देखील तक्रार केलेली नाही. उलटपक्षी त्यांच्या देशात जो भारतीय समुदाय राहतो, त्यांच्या विषयी सातत्याने कौतुक करत असतात. कधीच विसरत नाहीत प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो.

तुम्ही कल्पना करा की भारताच्या एखाद्या पंतप्रधानाला भेटायला जगातील एखादा नेता आला असेल आणि तो त्यांच्या देशात राहणा-या भारतीयांचे कौतुक करत असेल तर माझा उर अभिमानाने किती भरून येत असेल, माझे शिर किती उंच होत असेल. हा सन्मान आम्हाला तुमच्यामुळे मिळत आहे. तुमच्या आचरणामुळे मिळत आहे. तुम्ही भारताच्या उच्च मूल्यांना जगाच्या समोर आचरणात आणून दाखवले आहे आणि त्यामुळे जगातील लोकांच्या मनात भारताकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आम्हाला सर्वांना आनंददायी वाटतो, तो दृष्टिकोन तयार होतो. भारतात काही चांगले झाले की, तुमच्या आनंदाला पारावार उरत नाही असे होते की नाही.

मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा एकदा केरळमध्ये गेलो होतो, त्यावेळी केरळमध्ये एका चांगल्या कुटुंबासोबत माझा भोजनाचा कार्यक्रम होता. त्या वेळी केरळमध्ये पावसाचे दिवस सुरू होते म्हणून पावसावर चर्चा करत होतो. तेव्हा बोलता बोलता मी असेच म्हणालो पाऊस पडतो आहे त्यामुळे खूप चांगले वाटत आहे. पण त्यांनी मला कुठलाच प्रतिसाद दिला नाही किंवा माझ्या आनंदात ते सहभागी देखील झाले नाही. मी दोन चार दिवस तिथे राहणार होतो. ज्या दिवशी मी निघणार होतो, त्या दिवशी त्यांनी विशेष खाद्यपदार्थ मागवले, मिठाया मागवल्या आणि थोडे आनंदाचे वातावरण तयार झाले होते. ते पाहून मी त्यांना विचारले की, आज तुम्ही एवढे आनंदी दिसत आहात त्याचे काय कारण आहे. ते म्हणाले तुम्हाला माहीत नाही का? मी म्हणालो नाही. तर ते म्हणाले आताच बातमी आली आहे की कच्छमध्ये चांगला पाऊस पडला आहे. म्हणजेच ते केरळमध्ये राहत होते, भरपूर पाऊस पडत होता पण जोपर्यंत कच्छमध्ये पाऊस पडण्याची बातमी येत नव्हती तोपर्यंत त्यांच्या चेह-यावर आनंद नव्हता. हा मानवाचा स्वभाव आहे. भारताविषयीच्या चांगल्या बातम्या जेव्हा तुमच्या कानावर येतात तेव्हा तुम्हाला आनंद होतो की नाही, आनंद होतो की नाही? माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे बंधुंनो 2014 मध्ये भारतात जेव्हा लोकसभा निवडणुका सुरू होत्या, त्यावेळी त्यांचे निकाल भारतात जाहीर होत होते. पण तुम्ही लोक टीव्ही रेडियो यांच्या समोरून बाजूला होत नव्हता. निवडणुकांचे निकाल भारतातून येत होते. पंतप्रधान भारताचा बनणार होता, पण या ठिकाणी मिठायांचे वाटप होत होते.

माझ्या प्रिय बंधु भगिनींनो आज मी अतिशय अभिमानाने, अतिशय नम्रपणे नतमस्तक होऊन तुमच्या समोर एक निवेदन देत आहे की या सरकारने एकापाठोपाठ एक जी पावले उचलली आहेत, त्याबाबत जगभरात विविध भागात राहणा-या भारतीयांना अभिमान वाटू शकेल. या सरकारने दोन वर्षात असे कोणतेही काम केले नाही ज्यामुळे कुठल्याही भारतीयाला आपली मान शरमेने झुकवावी लागेल असे कोणतेही काम केले नाही.

प्रत्येक भारतीय आपली मान अभिमानाने उंचावून जगासमोर दुस-याच्या नजरेला नजर भिडवून बोलू शकेल हे सामर्थ्य आज भारतामध्ये निर्माण झाले आहे. आज संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटातून वाटचाल करत आहे. चहु बाजूंनी आर्थिक मंदीच्या बातम्या येत आहेत. प्रत्येकाला वाटते की काही करणे शक्य होणार नाही. काहीतरी शिथिल वाटत आहे. माझ्या प्रिय साथीदारांनो संपूर्ण जग आर्थिक मंदीची झळ सोसत आहे. सातत्याने स्थिती कमकुवत होत जात आहे. अशा परिस्थितीत एकटा भारत जगातील जलद गतीने पुढे वाटचाल करणारी आर्थिक स्थिती प्राप्त करू शकतो. जागतिक बँक असो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असो, जगातील कोणत्या पतसंस्था असोत, या सर्व एका सूरात सांगत आहेत की आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जर कोणता आशेचा तेजस्वी किरण दिसत असेल तर त्याचे नाव भारत आहे. हे सर्व अचानक झालेले नाही. जगात सर्वत्र मंदीची लाट आहे आणि दुसरीकडे भारतात एक तर नवीन सरकार आलेले आहे तुम्हाला तर ठाऊकच आहे 2014 मध्ये मोदींच्या बाबतीत काय बोलले जात होते की या व्यक्तीला कोणताही अनुभव नाही आहे. हा माणूस तर लहानशा गुजरात राज्याची हाताळणी करत होता. या माणसाला परराष्ट्र विभाग काय असतो? परराष्ट्र धोरण काय असते? या व्यक्तीला कशाचीच समज नाही आहे. हा माणूस पंतप्रधान बनून काय करणार? कसे करणार? अनेक प्रश्न होते आणि हे खरे होते की मी पंतप्रधान बनल्यावरच संसद पाहिली. माझे सर्व आयुष्य जनसभेत गेले. लोकसभा माझ्यासाठी नवीन होती. घेतल्या जाणा-या शंका स्वाभाविक होत्या. जे माझ्याविषयी प्रश्न उपस्थित करत होते, त्यांच्या विषयी माझी कोणतीही तक्रार नाही कारण ते स्वाभाविक होते. दुसरीकडे भारताला लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाची झळ पोहोचली होती. अतिशय कमी पाऊस झाला होता. काही भागात तर पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वे गाडीची व्यवस्था करावी लागली. देवसुद्धा माझी प्रत्येक बाबतीत परीक्षा घेत होता आणि त्यालाही असे वाटत असेल की हे ठीक आहे हे सुद्धा ठीक आहे आणि आता जरा ही गोष्ट नीट कर. दोन वर्षे सलग दुष्काळ पडलेला आहे, जगात मंदीची लाट आहे, मोदींसाठी नवे क्षेत्र आहे, नवा अनुभव आहे. त्यानंतरही 7.6 टक्के विकासदर ज्या लोकांना अर्थशास्त्र समजते ते याचा अभिमान बाळगू शकतात.

पण आम्ही येथेच थांबणार नाही आहोत आता आणखी पुढे जायचे आहे आणि देशाला मोठ्या उंचीवर न्यायचे आहे आणि लक्षात ठेवा 8 टक्क्यांपर्यंत पोहोचायचे आहे त्यासाठी योग्य विचार करून नियोजित पद्धतीने एका पाठोपाठ एक योजना तयार करण्यात आल्या. कधी कधी भारतात सरकारची ओळख काही नव्या गोष्टींची घोषणा केल्यावर त्यांच्याशी जोडली जाते. ज्याची घोषणा केली त्याचे काय झाले? काही फायदा झाला की नाही झाला? ज्या गोष्टींची घोषणा झाली होती त्या लागू झाल्या की नाही झाल्या? या पाहायला कोणालाही वेळ नसतो. एकदा घोषणा झाली की झाले. मग जयजयकारांच्या निनादात गाडी निघून जायची आणि तोपर्यंत पुढील निवडणूक यायची. आम्ही भर दिला गुड गव्हर्नन्स म्हणजेच सुशासनावर भर दिला. त्यामुळे सामान्य मानवाच्या जीवनात बदल घडून आले. जेव्हा मी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून बोलताना शौचालयं बनवण्याच्या आवश्यकतेचा उल्लेख केला, स्वच्छतेबाबत बोलू लागलो तर लोक थट्टा करू लागले. या ठिकाणी लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला बोलण्याची इतकी चांगली संधी मिळाली आहे या माणसाला आणि बघा हे पंतप्रधान शौचालयांबाबत बोलत आहेत, स्वच्छतेबाबत बोलत आहेत.

माझ्या प्रिय बंधु भगिनींनो मोठ्या-मोठ्या गोष्टी बोलण्यासाठी लाल किल्ल्याचा उपयोग अनेकदा झाला असेल.पण माझे अंतर्मन मला असे सांगत होते की भारतातील लहान-लहान लोकांची स्वप्ने मग ती लहान का असेनात पण ती त्यांची स्वतःची स्वप्ने आहेत. लाल किल्ल्याच्या चबुत-यावरून कधी तरी त्यांचा आवाज देखील ऐकू गेला पाहिजे. आणि मी माझा पवित्रा बदलला, मित्रांनो मी माझा मार्ग बदलला. मोठ्या-मोठ्या वार्ता खूप झाल्या. लहान लहान लोकांच्या लहान-लहान गोष्टींना महत्त्व देणारा कोणीतरी असला पाहिजे आणि मी पाहिले आहे. सव्वाशे कोटी देशवासींयाच्या सामर्थ्याचा मी चांगल्या प्रकारे अनुभव घेत होतो आणि आज जो देश बदलत आहे, आज जो देश पुढे वाटचाल करत आहे त्याचे कारण हे सव्वाशे कोटी भारतीय आहेत. सव्वाशे कोटी भारतीयांचा हा निर्धार आहे आणि पुढे वाटचाल करत राहण्याचा सव्वाशे कोटी भारतीयांचा उद्देश आहे. हेच तर सामर्थ्य आहे आणि जनता जनार्दन तर ईश्वराचे दुसरे रूप असते आणि एक वेळा या जनता जनार्दनाने मनाशी ठामपणे ठरवले की पुढे जायचे आहे तर त्यांना जगातील कोणतीही शक्ती अडवू शकत नाही. सध्याचा भारतीय नागरिक संकटांची मोजणी करत राहात कपाळाला हात लावून बसणा-यातला नाही. सध्याचा भारतीय संकंटांचा सामना करत यशाची नवी शिखरे सर करण्याचा संकल्प करून पुढे वाटचाल करण्यासाठी आपल्या जबाबदा-या अतिशय उत्तम प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि हेच माझे भाग्य आहे. आता जेव्हा देशाची जनता इतके काम करत असेल तर मला सुद्धा धावपळ करण्यामध्ये आनंद वाटू लागतो. मला सुद्धा जास्त काम करण्यामध्ये आनंद मिळत राहतो.

बंधु-भगिनींनो निश्चित कालमर्यादेत शौचालये बनवायची आहेत म्हणजे आहेत. असे चालणार नाही की तुम्ही योजना तयार करा आणि मग बघुया किती काळात ती पूर्ण होईल ते. कसे होईल, नाही होणार. जर हे काम शंभर दिवसात पूर्ण करायचे आहे तर ते झालेच पाहिजे. होत आहे, चालेल, येतील, बघूया, करुया, ऐकले आहे, ऐकेन, ऐकवेन हेच सुरू राहून चालेल काय. सर्वात मोठा बदल आहे तो निर्धारित काळात काम पूर्ण करणे आणि त्याचा हिशोब या जनताजनार्दनाला देणे. मी एक लहानशी गोष्ट तुम्हाला सांगतो. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांनी मोबाईल फोनमध्ये नरेंद्रमोदी ऐप डाऊनलोड केले आहे ते. केले आहे? तुम्ही नरेंद्र मोदी ऐप डाऊनलोड करून तुमच्या फोन वर मोदींचा प्रत्येक क्षणाचा हिशोब, प्रत्येक क्षणाचा हिशोब पाहू शकता. आमचे एक दुसरे ऐप आहे GARV. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, मी एक दिवस अधिका-यांसोबत बसलो होतो तेव्हा लक्षात आले की 18 हजार गावे अशी आढळली की जिथे स्वातंत्र्यानंतर 70 वर्षे उलटून जात असतानाही विजेचा एक खांब पोहोचलेला नाही, विजेची एक तार पोहोचलेली नाही. विजेचा पंखा तर कोणी पाहिलेलाही नाही, त्यांना माहितच नाही वीज काय असते ते. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की ते 18व्या शतकात जगत आहेत. 21व्या शतकात जर कोणी विजेशिवाय जीवन जगत असेल तर त्याची स्थिती 18व्या शतकापेक्षा वाईट नाही तर काय म्हणायचे. मी अधिका-यांना विचारले की सांगा बघू ही 18 हजार गावे बाकी राहिली, का बाकी राहिली, कोणामुळे बाकी राहिली, हे तू-तू, मी-मी करण्यामध्ये मला वेळ फुकट घालवायचा नाही. मला हे सांगा आपण कधीपर्यंत हे करू शकतो. माझ्या अधिका-यांनी मला सांगितले की सहा-सात वर्षे लागतील. सहा-सात वर्षे ऐकल्यावर मी विचारले की हा कालावधी कमी होऊ शकतो की नाही तर त्यांच्याकडून उत्तरच आले नाही. मी लाल किल्ल्यावरून घोषणा केली की आम्ही 1000 दिवसात 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवणार. लोक माझ्या घोषणेबाबत शंका उपस्थित करू लागले की जे काम 70 वर्षांमध्ये होऊ शकले नाही ते काम मोदी हजार दिवसात कसे करून दाखवणार. त्यांचे म्हणणे बरोबर होते. जे काम 70 वर्षे बाकी राहिले त्याबाबत मोदी म्हणतात की 1000 दिवसात हे काम करू याचा अर्थ काय. पण जर तुम्ही GARV नावाच्या ऐपवर गेलात तर दर दिवशी कोणत्या गावात विजेचा खांब पोहोचला , कोणत्या गावात तार पोहोचली, कोणत्या गावात विजेचा प्रवाह सुरू झाला याचा दर दिवसाचा हिशोब मिळतो. आता तर केवळ 400 दिवसांचा काळ उलटून गेला आहे आणि 60 टक्के गावांमध्ये विजेचे काम पूर्ण झाले आहे. जेव्हा हजार दिवस होतील त्याआधीच हे काम पूर्ण झालेले असेल, असा आमचा ठाम विश्वास आहे.

मला गावात रस्ते बनवायचे आहेत. प्रत्येक गावाला पक्क्या रस्त्यांनी जोडायचे आहे. पूर्वी एका दिवसात जेवढा रस्ता बनायचा, गेल्या दोन वर्षात अथक प्रयत्नांनंतर आम्ही आज अशा स्थितीमध्ये पोहोचलो आहोत की पूर्वी एका दिवसात जितका रस्ता तयार व्हायचा आज एका दिवसात त्याच्या दुपटीपेक्षाही जास्त लांबीचा रस्ता तयार होतो. सांगायचे तात्पर्य हे आहे की सर्वसामान्य मानवाला सुखकारी आयुष्य देण्यासाठी, सर्वसामान्य माणसाच्या गरजा त्याच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यामध्ये बदल करण्याच्या दिशेने एकामागोमाग एक अतिशय तपशीलवार पद्धतीने कामे सुरू आहेत.

त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश असे आहेत जे तरुण आहेत. 35 वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेली लोकसंख्या आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आज भारत जगातील सर्वात मोठा भाग्यवान देश आहे, इतका मोठा देश जिथे 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेले 800 दशलक्ष तरुण आहेत. भारताची 65 टक्के लोकसंख्या आज 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. ज्या देशाकडे इतके तरुण असतात त्या देशाची स्वप्ने देखील तरुण असतात आणि त्यासाठी कौशल्य विकास, या तरुणांच्या अंगी काही कौशल्य असले पाहिजे. कोणती ना कोणती गोष्ट माहित करून घेण्याची, शिकण्याची त्यांची इच्छा, आकांक्षा यानुसार संधी मिळाली पाहिजे आणि मला असे अजिबात वाटत नाही की माझ्या देशातील तरुण नोकरीच्या शोधात हातात कागदपत्रे घेऊन इथून तिथे भटकत राहावेत.

मला असे वाटते की माझ्या देशातील तरुण स्वतःच्या पायावर उभे राहावेत त्यांनी आपले लक्ष्य स्वतः निर्धारित करावे आणि आपल्या लक्ष्याच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करावी, असे वातावरण तयार करू जेणेकरून ते स्वाभिमानाने आपले आयुष्य जगू शकतील.

आम्ही एक योजना तयार केली. मुद्रा योजना. ही मुद्रा योजना अशी आहे की जे लहान लहान स्तरातील लोक आहेत, तरुण आहेत, ज्यांना काही करण्याची इच्छा आहे पण त्यासाठी पैसे नाहीत. एखाद्याला चहाचे दुकान उघडण्याची इच्छा असेल, पण इच्छा असली तरी पैसे नाहीत आणि एखाद्या सावकाराकडून घ्यायला गेला तर भरमसाठ व्याज असेल. आम्हाला कल्पना आहे सावकारांचे काय असते त्याची. आम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही हमीविना अशा प्रकारे जे व्यवसायाचे धाडस करणारे लोक आहेत त्यांना पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि हे लोक हे पैसे वेळेवर करतील या विश्वासाने हा निर्णय घेतला. माझ्या प्रिय युवकांनो ही योजना नुकतीच सुरू झाली आहे, सहा महिने झाले आहेत. आतापर्यंत साडेतीन कोटी लोकांना सुमारे सव्वा लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. कोणत्याही हमी विना दिले आहेत आणि मला हा विश्वास आहे तो पैशाची गुंतवणूक करेल, कष्ट करेल, तो स्वतः तर रोजगार मिळवेल पण आणखी एका युवकाला रोजगार देण्याची ताकद निर्माण करेल, अशा प्रकारचा बदल मी पाहात आहे. भारताचा युवक बुद्धिमान आहे, आहे ना? म्हणून तर इतके लोक या ठिकाणी बसले आहेत. जगातल्या अनोळखी भूमीवर येऊन मातीचे सोने करण्याची ताकद तुम्हा लोकांमध्ये आहे. तिथे काय होईल याची कल्पना देखील नव्हती, सरळ निघून आलात आणि येऊन आपले एक जग निर्माण केले. ही ताकद भारतीयांमध्ये आहे. भारताचे युवक देखील नवनिर्मितीक्षम आहेत, बुद्धिमान आहेत आणि साहसी आहेत. एकदा का एखादी गोष्ट मनात आली तर आयुष्य त्यासाठी खर्ची घालणारे लोक आहेत आणि यासाठी आम्ही स्टार्ट अप मुव्हमेंट सुरू केली. स्टार्ट अप मुव्हमेंट आणि आज जगात भारत स्टार्ट अपच्या विश्वात चौथ्या स्थानावर आहे आणि मी जलद गतीने त्याला दुस-या क्रमांकावर आणण्याच्या प्रयत्नात आहे. आमचे युवक, त्यांच्याकडे कल्पना आहेत, कल्पनाशक्ती आहे, तंत्रज्ञान आहे, नवनिर्मिती आहे, कोणीतरी हात देणारा हवा आहे. दिल्लीमध्ये असे सरकार बसले आहे ज्यांनी युवकांना हात दिला आहे आणि स्टार्ट अपला बळ दिले आहे. स्टार्ट अपचे एक नवे जग उभे राहत आहे आणि स्टार्ट अप कोणा एका व्यक्तीचा खिसा भरतो असे नाही आहे, स्टार्ट अपची ताकद म्हणजे एक नवे विश्व उभारण्याची ताकद असते. एखाद्या विषयात नवीन बदल घडवून आणण्याची ताकद असते.

एक स्टार्ट अप जर अशा प्रकारे चमकून गेला तर जगातील आचारविचार बदलून जातात आणि आज आपण पाहत आहोत की गेल्या 30 वर्षातील तंत्रज्ञानात जी नवनिर्मिती झाली, जे अशा प्रकारचे चमकणारे स्पार्किंग पॉइंट आले त्यांनी संपूर्ण जगाची दिशा बदलली आहे. भारताचे लोक हे करू शकतात आणि देशवासीयांचे जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे, त्याला बळ देणे देशवासीयांच्या शक्तीच्या आधारे देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणे, गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील, गरिबीच्या विरोधात लढण्यासाठी, गरिबांना ताकद देणे जेणेकरून गरीब गरिबीला पराभूत करतील, या मार्गावर आम्ही वाटचाल करत आहोत.

त्याबरोबरच जग आधुनिकही असले पाहिजे. नुकतेच भारताने एकाच वेळी 20 उपग्रह अवकाशात सोडले, 20 उपग्रह एकाच वेळी आणि दोन उपग्रह तर महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी बनवले होते, ते आता आधीपासूनच कार्यरत आहेत, त्यांना जे काम देण्यात आले होते ते भारतात त्यांचे सिग्नल पाठवायला लागले आहेत आणि बाकी जे उपग्रह पाठवण्यात आले त्यापैकी काही अमेरिकेचे होते, काही सिंगापूरचे होते. जगातील संपन्न देशही आपले उपग्रह पाठवण्यासाठी भारताच्या शास्त्रज्ञांच्या सामर्थ्याला अतिशय विश्वासार्ह समजू लागले आहेत. म्हणजे आम्ही उपनिषदांपासून उपग्रहांपर्यंत भारताचा जो विशाल शक्ती समुच्चय आहे त्या पूर्ण शक्ती समुच्चयाला घेऊन जगाच्या नव्या उंचीवर भारताचा तारा चमकत राहील या दिशेने प्रयत्नशील आहोत.

बंधुंनो, मी तुम्हाला ही हमी देतो की तुम्हाला भारत जसा हवा आहे अगदी तसाच भारत, भारताचे सव्वाशे कोटी देशवासी निर्माण करतील, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. देशाला जाग आली आहे, देश वाटचाल करू लागला आहे, देश आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या सीमेवर आहे, देशाने स्वप्ने उराशी बाळगली आहेत, ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी देशाने संकल्प केला आहे आणि पूर्ण देश कष्ट करण्यासाठी सव्वाशे कोटी देशवासी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले आहेत. तसेच भव्य भारताच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, दिव्य भारताच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी ही शक्ती आमच्या सोबत आली आहे आणि हीच शक्ती आहे जी जगाच्या आशा, आकांक्षांना पूर्ण करणार आहे बंधु भगिनींनो.

जग दोन प्रकारच्या समस्यांना तोंड देत वाटचाल करत आहे. एका बाजूला दहशतवाद आहे तर दुस-या बाजूला ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढीचे संकट आहे. संपूर्ण मानवजाती समोर आव्हाने आहेत, मानवते समोर आव्हान आहे आणि म्हणूनच भूतकाळात कधीही मानवतावादी शक्तींना जितक्या प्रमाणात एकत्र येण्याची गरज निर्माण झाली होती त्यापेक्षा कोटी-कोटी जास्त पटीने मानवतावादी शक्तींना एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. आम्ही सर्व भारतीयांनी संपूर्ण जगभर पूर्ण विश्वासाने, मोठ्या श्रद्धेने जगातील सर्वांच्या गळी ही बाब उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत की जर तुम्ही मानवतेवर विश्वास ठेवत असाल तर आपण सर्व एकत्र येऊया. जितक्या मानवतावादी शक्ती एकत्र येतील, मानवतावादी शक्तींची जितक्या लवकर एकजूट होईल तितक्याच लवकर अमानवी ताकदींचा नायनाट होईल. अमानवी शक्तींचा संघर्ष मानवी शक्तींबरोबर होणार आहे आणि यासाठीच मानवतावादी शक्तींनी एकत्र येणे आवश्यक आहे आणि भारताचा संपूर्ण जगासाठी एकच संदेश आहे, मानवतावादी शक्तींनी एकत्र आले पाहिजे, मानवतावादी शक्तींनो एक व्हा, मानवतावादी शक्तींनो एकत्र येऊन, मानवतावादाच्या शत्रूंना, त्या शक्तींना आपण पराभूत करुया, हे मानवतेसाठी आवश्यक आहे, कोणत्याही देशासाठी नाही आणि आपण या संकल्पाला पुढे नेले पाहिजे.

त्याच प्रकारे जागतिक तापमानवाढ, जागतिक तापमानवाढीचे जनक, असे अजिबात नाही की हजारो वर्षांपूर्वी सूर्य कमी उष्ण होता आणि आता जास्त उष्ण झाला आहे, त्याने आपल्यात कोणताही बदल केलेला नाही, जर हानी केली असेल तर ती आपल्या मानवजमातीने.
जागतिक तापमानवाढीचे कारण आपण ज्या प्रकारे निसर्गाचे शोषण केले आहे, त्याचा बेसुमार वापर केला आहे त्याचेच हे परिणाम आहेत ज्यामुळे मानवाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, पृथ्वी संकटात सापडली आहे. जगाला या संकटातून वाचवण्याचा मार्ग भारताचा मूळ विचार दाखवू शकतो. आमच्या पूर्वजांनी नेहमीच सांगितले की परमात्म्याने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व काही पुरेशा प्रमाणात दिले आहे. पण आपली हाव पूर्ण करण्यासाठी हे संपूर्ण जग देखील कमी पडेल आणि म्हणूनच आपल्या संकटाचे मूळ आपल्या हावेमध्ये आहे. गरजेतून संकट निर्माण झालेले नाही. निसर्गाचे रक्षण करणे, निसर्गावर प्रेम करणे, निसर्गाशी संघर्ष करण्याच्या मार्गाचा त्याग करणे ही जागतिक तापमानवाढीपासून भावी पिढीचे रक्षण करण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

आज जर आपण पाणी पिऊ शकतो, शुद्ध हवेत श्वास घेऊ शकतो, जर आज आपण हिरवळ पाहू शकतो तर त्याचे कारण आहे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी मागे काही तरी शिल्लक ठेवले होते, जे आपल्याला मिळाले आहे. जर आपल्या भावी पिढीसाठी आपण काहीच मागे ठेवणार नसू तर त्यांच्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही. जर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काही शिल्लक ठेवले होते तर आपली देखील ही जबाबदारी आहे की आपण आपल्या पिढीसाठी काहीतरी वाचवून शिल्लक ठेवावे. या दोन वैश्विक गोष्टींच्या आधारे आपण पुढे चाललो पाहिजे. याच अपेक्षेने, या विशाल जनसागराला मी नमन करतो. तुम्ही जे प्रेम दिले, जे स्वागत केले, सन्मान दिला आणि अतिशय बारकाव्याने या प्रसंगाला अनेक रंगांनी रंगवले आहे, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. मी तुमचे खूप खूप आभार मानतो, अनेक अनेक धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद. नमस्कार, वणक्कम, आवजो

BG/SP/AK