Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन

कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन


नवी दिल्‍ली, 20 एप्रिल 2026

माननीय राष्ट्राध्यक्ष ली महोदय,

दोन्ही देशातील मान्यवर प्रतिनिधी,

माध्यम क्षेत्रातील मित्रांनो,

नमस्कार !

राष्ट्राध्यक्ष ली यांच्या भारताच्या पहिल्या भेटीचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. त्यांचे जीवन हे चिकाटी, सेवा आणि समर्पणाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी प्रत्येक आव्हानाचा सामना करताना जनतेची सेवा करण्याचा आपला निर्धार अधिकच दृढ केला आहे. जरी हा त्यांचा भारताचा पहिलाच दौरा असला तरी, आपल्या पहिल्या भेटीपासूनच भारताबद्दलचा त्यांचा स्नेह आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून आली आहे.

मित्रांनो,

आठ वर्षांच्या कालावधीनंतर कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा हा भारत दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लोकशाही मूल्ये, बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था आणि कायद्याच्या राज्याचा आदर ही समान तत्वे आपल्या दोन्ही राष्ट्रांच्या मूलभूत विचारात खोलवर रुजलेली आहेत. हिंद-प्रशांत महासागर प्रदेशाबाबतही आपला दृष्टिकोन समान आहे. या समान तत्त्वांच्या आधारावर गेल्या दशकात आपल्या द्विपक्षीय संबंधांना अधिक गतिमान आणि व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

आणि आज, राष्ट्राध्यक्ष ली यांच्या भेटीने आपण या विश्वासार्ह भागीदारीला एका भविष्यवेधी भागीदारीत रूपांतरित करण्यास सज्ज आहोत. चिप्सपासून जहाजांपर्यंत, कौशल्यापासून तंत्रज्ञानापर्यंत, आणि पर्यावरणापासून ऊर्जेपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी आपण निर्माण करू. दोन्ही राष्ट्रांची प्रगती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू.

मित्रांनो,

भारत आणि कोरिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आज 27 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. 2030 पर्यंत हा व्यापार 50 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी आपण भारत-कोरिया वित्तीय मंच सुरू केला आहे. व्यावसायिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी औद्योगिक सहकार्य समितीची स्थापना करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीमधील सहकार्य वाढवण्यासाठी आर्थिक सुरक्षा संवाद सुरू केला जात आहे.

कोरियन कंपन्यांना, विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांचा (SMEs) भारतात प्रवेश सुलभ करण्यासाठी कोरियन औद्योगिक टाउनशिपची स्थापना देखील केली जात आहे. याव्यतिरिक्त, पुढील एका वर्षाच्या आत भारत-कोरिया व्यापार कराराचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे.

मित्रांनो,

आज आपण पुढील दशकातील यशोगाथांचा पाया रचत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील आपली भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी, आपण भारत-कोरिया डिजिटल सेतू  सुरू करत आहोत. त्याचप्रमाणे, जहाजबांधणी, शाश्वत विकास, पोलाद आणि बंदरे यांसारख्या क्षेत्रांमध्येही आपण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करत आहोत.

संस्कृती आणि सर्जनशील उद्योगांमधील परस्पर सहकार्याद्वारे, आपण चित्रपट, ॲनिमेशन आणि गेमिंग या क्षेत्रांमध्येही नवीन मापदंड प्रस्थापित करू. आजचे व्यापार मंच या संधींचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करेल.

मित्रांनो,

भारत आणि कोरिया यांचे सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांपासूनचे आहेत. दोन सहस्रकांपूर्वीचा, अयोध्येची राजकुमारी सुरिरत्ना आणि कोरियाचे राजे किम सुरो यांची कथा आपल्या सामायिक वारशाचा एक भाग आहे.

आज, के-पॉप, कोरियन पॉप संगीत आणि के-ड्रामा अर्थात कोरियन कथा  भारतात अत्यंत लोकप्रिय होत आहेत. त्याचप्रमाणे, कोरियामध्येही भारतीय चित्रपटसृष्टी आणि संस्कृतीची ओळख आणि लोकप्रियता वाढत आहे. खुद्द राष्ट्रपती ली हे देखील भारतीय चित्रपटसृष्टीचे एक मोठे चाहते आहेत, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. हा सांस्कृतिक दुवा अधिक बळकट करण्यासाठी, आपण 2028 मध्ये भारत-कोरिया मैत्री महोत्सवाचे आयोजन करणार आहोत. याच बरोबर, दोन्ही देशांतील लोकांचे एकमेकांशी असलेले परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी, आपण शिक्षण, संशोधन आणि पर्यटन या क्षेत्रांमधील सहकार्यालाही चालना देणार आहोत.

मित्रांनो,

जागतिक स्तरावरील तणावाच्या या काळात, भारत आणि कोरिया एकत्रितपणे शांतता व स्थैर्याचा संदेश देतात. आपल्याला हे सांगताना आनंद होत आहे की, आज कोरिया आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रम यामध्ये सहभागी होत आहे. आपल्या सामायिक प्रयत्नांद्वारे, आपण शांततापूर्ण, प्रगतीशील आणि सर्वसमावेशक अशा हिंद-प्रशांत क्षेत्राच्या उभारणीत योगदान देत राहू.

सध्याच्या काळातील जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे, या मुद्द्यावरही आपले एकमत आहे.

माननीय महोदय,

सुमारे शंभर वर्षांपूर्वी, भारताचे महान कवी रवींद्रनाथ टागोर यांनी कोरियाचा उल्लेख पूर्वेचा दिवा (लँप ऑफ द इस्ट ) असा केला होता. आज, 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करताना या प्रवासात कोरिया एक महत्त्वाचा भागीदार म्हणून आपल्यासोबत आहे.

चला, आपल्या भागीदारीच्या माध्यमातून केवळ आपल्या दोन राष्ट्रांच्याच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा मार्ग आपण अधिक प्रशस्त करूया.

खूप खूप धन्यवाद !

* * *

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai