Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील केवडीया येथे जाहीर सभेत पंतप्रधानांनी केलेले भाषण


माझ्या बरोबर म्हणा, दोन्ही हात उंचावून म्हणा … नर्मदे…. नर्मदे… नर्मदे… सर्वदे … नर्मदे…. नर्मदे… नर्मदे…

गुजरातचे राज्‍यपाल आचार्य देवव्रत जी, इथले मुख्‍यमंत्री विजयभाई रूपाणी, उपमुख्‍यमंत्री नितिन भाई … मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेले माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,

एकेकाळी मला छायाचित्रणाची सवय लागली होती. फोटो काढावेत असे मनात यायचे … नंतर सगळे संपलं, मात्र आज इथे बसलो असताना माझ्या मनात आले आज माझ्या हातात कॅमेरा असायला हवा होता. वरून मी जे दृश्य पाहत आहे, खाली जनसागर, मागे जलसागर आणि मी या सर्व छायाचित्रकारांना देखील विनंती करेन कि आमचे फोटो बरेच काढलेत, आता जरा त्या बाजूला कॅमेरा वळवा … जनसागर आणि जलसागराचे कसे मिलन झाले आहे पहा. छायाचित्रणाच्या जगात बहुधा असे दृश्य पाहायला मिळणे खूप दुर्मिळ आहे. आणि मी इथल्या व्यवस्थापकांना देखील हे ठिकाण निवडल्याबद्दल त्यांच्या सौंदर्यदृष्टीचे विशेष अभिनंदन करतो.

आजच्या दिवशी नर्मदा मातेचे दर्शन होणे, पूजा-अर्चनेची संधी मिळणे याहून मोठे सौभाग्य काय असू शकते? मी गुजरात सरकारचा, तुम्हा सर्वांचा आभारी आहे की तुम्ही मला नमामी देवी नर्मदा समारंभाला येण्याचे निमंत्रण दिले आणि त्याचा भाग बनवले. मी सगळ्या गुजरातवासियांना देखील या उत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज हा असा प्रसंग आहे ज्याचा लाभ मध्‍यप्रदेश, महाराष्‍ट्र, राजस्‍थान आणि गुजरात. या चार राज्यांच्या जनतेला, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

मित्रांनो, आपल्या संस्कृतीत नेहमीच असे म्हटले आहे की पर्यावरणाचे रक्षण करत विकास शक्य आहे. निसर्ग आपल्यासाठी आराध्य आहे, निसर्ग आपले आभूषण आहे, निसर्ग आपला दागिना आहे. पर्यावरणाचे रक्षण करून विकास कसा करता येऊ शकतो याचे जिवंत उदाहरण आता केवडीया येथे पाहायला मिळत आहे.

आज सकाळपासून मला अनेक ठिकाणी जायची संधी मिळाली. आणि प्रत्येक ठिकाणी मी निसर्ग आणि विकासाचा अद्भुत मेळ अनुभवला. एकीकडे सरदार सरोवर धरण आहे, वीज निर्मितीची यंत्रे आहेत, तर दुसरीकडे एकता नर्सरी, फुलपाखरू उद्यान, कैक्टस गार्डन यांसारख्या पर्यावरणाशी संबंधित पर्यटनाच्या खूप सुंदर व्यवस्था आहेत. या सगळ्यांच्या मधोमध सरदार वल्‍लभ भाई पटेल यांचा भव्य पुतळा जणू आपल्याला आशीर्वाद देताना दिसत आहे. मला वाटते की केवडियामध्ये प्रगति, निसर्ग, पर्यावरण आणि पर्यटन यांचा अदभुत संगम होत आहे आणि ही सगळ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे.

मित्रांनो, आजच निर्माण आणि सर्जनशीलतेची देवता विश्वकर्मा यांची जयंती देखील आहे. नवीन भारताच्या निर्मितीचा जो संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत त्यासाठी भगवान विश्वकर्मा यांच्यासारखी सर्जनशीलता आणि मोठी उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ति खूप आवश्यक आहे. भगवान विश्‍वकर्मा यांची भारतावर कायम कृपादृष्टी राहो हीच आपणा सर्वांची प्रार्थना आहे.

आज तुमच्याशी बोलत असतांना सरदार सरोवर धरण आणि सरदार साहेबांचा जगातील सर्वात उंच पुतळा हे दोन्ही त्या इच्छाशक्तिचे, त्या संकल्पशक्तिचे प्रतीक आहेत.

मला विश्वास आहे की त्यांच्या प्रेरणेमुळे आपण नवीन भारताशी संबंधित प्रत्येक संकल्प सिद्धत्वाला नेऊ, प्रत्येक उद्दिष्ट साध्य करू.

मित्रांनो, आजचा हा प्रसंग खूप भावनात्मक देखील आहे. सरदार पटेल यांनी जे स्वप्न पाहिले होते ते दशकांनंतर पूर्ण होत आहे. आणि ते देखील सरदार साहेबांच्या भव्य पुतळ्याच्या त्यांच्या डोळ्यांसमोर पूर्ण होत आहे.

आपण प्रथमच सरदार सरोवर धरण पूर्णपणे भरलेले पाहिले आहे. एक काळ होता जेव्हा 122 मीटरच्या लक्ष्यापर्यंत पोहोचणे हेच खूप मोठे यश मानले जायचे. मात्र आज पाच वर्षांच्या आत 138 मीटर पर्यंत सरदार सरोवर भरणे अद्‌भुत आहे, अविस्मरणीय आहे.

मित्रांनो, आजच्या स्थितीपर्यंत आपल्यला पोहचवण्यात लाखों लोकांनी योगदान दिले आहे. सामान्यातील सामान्‍य नागरिकाचे योगदान आहे. साधू-संतांची भूमिका आहे. अनेक सामाजिक संघटनांचे योगदान आहे. आजचा दिवस त्या लाखों सहकाऱ्यांचे आभार व्‍यक्‍त करण्याचा दिवस आहे, ज्यांनी या सरदार सरोवर प्रकल्पासाठी आपले योगदान दिले आहे. त्या प्रत्येक सहकाऱ्याला मी नमन करतो.

मित्रांनो, आज केवडियामध्ये जितका उत्साह आहे तेवढाच जोश आणि उत्साह संपूर्ण गुजरातमध्ये आहे. आज नाले, तलाव, सरोवर, नद्यांची साफसफाई करण्याचे काम केले जात आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात, व्यापक स्तरावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील होणार आहे. हे निश्चितपणे अभिनंदनीय आणि स्तुत्य कार्य आहे. हीच ती प्रेरणा आहे ज्याच्या जोरावर जल-जीवन अभियान पुढे मार्गक्रमण करणार आहे. आणि देशात जल संवर्धनाचे आंदोलन यशस्वी होणार आहे. गुजरातमध्ये होत असलेल्या यशस्वी प्रयोगांना, लोकसहभागाच्या प्रयोगांना, लोकसहभागाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण कामे आपल्याला पुढे न्यायची आहेत. गुजरातमधल्या गावागावात अशा प्रकारच्या लोकसहभागचे, लोकसमर्थनाचे अभियान गेली अनेक दशके सुरु आहेत. या अभियानांमधील सहकाऱ्यांना मी आवाहन करतो कि त्यांनी आपले अनुभव सांगावेत.

मित्रांनो, आज कच्‍छ आणि सौराष्‍ट्राच्या त्या क्षेत्रातही नर्मदामातेची कृपा आहे जिथे कधीकाळी कित्येक आठवडे पाणी पोहचत नव्हते. गुजरातमध्ये अनेक दशकांपूर्वी पाण्याच्या संघर्षात गोळीबार देखील झाला आहे. माता-भगिनींना पिण्याचे पाणी आणण्यासाठी 5-5, 10-10 किलोमीटर अंतर पायी चालावे लागत असे. उन्हाळा सुरु होताच सौराष्‍ट्र आणि उत्‍तर गुजरातचे लोक आपापले पशुधन घेऊन शेकडो किलोमीटर दूर जिथे पाणी मिळण्याची शक्यता असेल अशा ठिकाणी घर, गाव, शेत सोडून जायचे. मला आठवतंय 2000 साली प्रचंड उन्हाळा होता आणि ही स्थिती इतकी गंभीर होती की राजकोटच्या सूर्य नगर, जाम नगर भागात पाणी पोहचवण्यासाठी भारतात प्रथमच विशेष रेल्वे गाडीने पाणी आणावे लागत होते.

मित्रांनो, आज ते जुने दिवस आठवतात, तेव्हा वाटते की गुजरात आज इतका पुढे गेला आहे. तुम्हाला अभिमान वाटतो कि नाही , तुम्हाला आनंद होतो . तुम्ही जेव्हा मला इथली जबाबदारी सोपवलीत तेव्हा आमच्यासमोर दुहेरी आव्हाने होती. सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी धरणाचे काम वेगाने करायचे तर दुसरीकडे नर्मदा कालव्याचे जाळे विस्तारणे आणि पर्यायी सिंचन व्यवस्था वाढवणे. तुम्ही विचार करा, वर्ष 2001 पर्यंत मुख्य कालव्याचे काम केवळ 150 किलोमीटर पर्यंतच झाले होते. सिंचन व्यवस्था आणि कालव्यांचे जाळे अपूर्ण होते, रखडलेले होते. मात्र तुम्ही सर्वांनी, गुजरातच्या लोकांनी कधीही हिंमत हरली नाही.

आज सिंचन योजनांचे व्यापक जाळे गुजरातमध्ये उभे राहिले आहे. गेल्या 17-18 वर्षात जवळपास दुप्पट क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले आहे.

बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कल्पना करू शकता ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वर्ष 2001 मध्ये केवळ 14 हज़ार हेक्टर होते, आणि सुमारे 8 हजार शेतकऱ्यांनाच याचा लाभ होत होता. per drop more drop अभियान राबवले, पाणी वाचवण्याचे अभियान राबवले , सूक्ष्म सिंचनावर भर दिला, ठिबक सिंचनावर भर दिला. आणि एकेकाळी केवळ 12-14 हजार हेक्टर असलेले क्षेत्र आज 19 लाख हेक्टरपर्यंत विस्तारले आहे. मी गुजरातबाबत बोलत आहे. आज 19 लाख हेक्टर क्षेत्र इतकी सूक्ष्म सिंचनाची व्याप्ती आहे. आणि सुमारे 12 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे. हे तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हते. गुजरातमधील गावातील शेतकऱ्यांच्या संवेदनशीलतेशिवाय हे शक्य नव्हते. नवीन विज्ञान, तंत्रज्ञान स्विकारण्याच्या गुजरातच्या शेतकऱ्यांच्या स्वभावामुळे आपण एवढे मोठे स्वप्न साकार करू शकलो. per drop more drop गुजरातच्या प्रत्येक शेतापर्यंत पोहचले. अलिकडेच काही दिवसांपूर्वी आयआयएम अहमदाबादने यासंबंधी अभ्यास केला होता. मला तुम्हाला आणि देशाला यासंबंधी सांगायचे आहे.

मित्रांनो, या अभ्यासातून हे समोर आले आहे की सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलरमुळे गुजरातमध्ये 50 टक्के पाण्याची बचत झाली आहे. 25 टक्के खतांचा वापर कमी झाला. 40 टक्के मजुरीचा खर्च कमी झाला आणि विजेची बचत झाली ती वेगळीच. एवढेच नाही, एकीकडे बचत झाली तर दुसरीकडे पिकांच्या उत्पादनात 30 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर प्रति हेक्टर प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नात सुमारे साडे पंधरा हजार रुपये वाढ झाली आहे.

मित्रांनो, मला आठवतंय की जेव्हा कच्छमध्ये नर्मदेचे पाणी पोहचले होते तेव्हा मी म्हटले होते कि पाणी कच्छसाठी परीस सिद्ध होईल. आज मला आनंद आहे की नर्मदा मातेचे पाणी केवळ कच्छच नाही , सौराष्ट्रच नाही तर गुजरातच्या एका मोठ्या भागासाठी परीस सिद्ध झाले आहे. नर्मदेचे पाणी केवळ पाणी नाही ते तर परीस आहे, जे मातीला स्पर्श करताक्षणी मातीला सोने बनवतो. नर्मदेच्या पाण्यामुळे सिंचन सुविधेत वाढ झाली आहे, नळाद्वारे पाणीपुरवठ्याची व्याप्तीही गेल्या दोन दशकांमध्ये अंदाजे तीन पटीने वाढली आहे. 2001 मध्ये गुजरातच्या केवळ 26 टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी येत होते. म्हणजे जेव्हापासून देशात घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठ्याचे काम सुरु झाले आहे तेव्हापासून 2001 पर्यंत म्हणजेच जवळजवळ 5 दशकांपर्यंत केवळ 26 टक्के घरांमध्ये ही सोया आहे. आज तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांचा परिणाम आहे, गुजरातच्या योजनांचा प्रभाव आहे की राज्याच्या 78 टक्के घरांमध्ये नळातून पाणीपुरवठा होतो. आता याच प्रेरणेतून आपल्याला देशातील प्रत्येक घरात पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य साध्य करायचे आहे.

बंधू-भगिनींनो, आज सोनी योजना असेल, सुजलाम-सुभलाम योजना असेल, आज गुजरातची गावे आणि शहर वेगाने पाण्याच्या जाळ्याशी जोडले जात आहेत. मी गुजरात सरकारचे माजी मुख्‍यमंत्री आनंदीबेन यांच्या नेतृत्वाखाली आणि आता रूपानी यांच्या नेतृत्त्वाखाली प्रत्येक घराला, प्रत्येक शेताला, पाण्याशी जोडण्याचे अभियान पुढे नेल्याबद्दल मी सर्व सरकारांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो, सिंचन सुविधा मिळाल्यामुळे गुजरातच्या शेतकऱ्यांचा आणखी एक फायदा झाला आहे. यापूर्वी शेतकरी पारंपरिक पिके घ्यायचे. मात्र सिंचन सुविधा मिळाल्यानंतर नगदी पिकांचे उत्पादन घ्यायला सुरुवात झाली, फलोत्पादनाकडे अनेकजण वळले. रोख कामे व्हायला लागली. अलिकडेच आणखी एक निरीक्षण समोर आले आहे ज्यात आढळून आले आहे की या परिवर्तनामुळे अनेक शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न वाढले आहे.

बंधू आणि भगिनींनो, गुजरात सह देशातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढवण्यासाठी विविध दिशांकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. नवीन सरकार बनल्यानंतर गेल्या 100 दिवसांत या दिशेने अनेक पावले उचलली गेली. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ आता गुजरातच्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी छोटे शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी, छोट्या व्यापाऱ्यांसाठी निवृत्तीवेतन योजना सुरु करण्यात आली. याचा लाभ देखील गुजरातच्या आणि देशाच्या शेतकरी कुटुंबांना होणार आहे.

मित्रांनो, गुजरातचे शेतकरी, व्यापारी आणि अन्य नागरिकांसाठी पाण्याच्या माध्यमातून वाहतुकीची एक व्यापक व्यवस्था तयार केली जात आहे. घोघा-दहेज रो-रो फेरी सेवा, याचा प्रारंभ करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. मला सांगण्यात आले आहे की आतापर्यंत या फेरी सुविधेंचा वापर सव्वा तीन लाख पेक्षा अधिक प्रवाशांनी केला आहे. एवढेच नाही सुमारे 70 हजार गाडयांची वाहतूक याद्वारे झाली आहे. विचार करा, याआधी रस्तेमार्ग साडेतीनशे किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. आता समुद्रमार्गे केवळ 31 किलोमीटर अंतर प्रवास करावा लागतो. कुठे साडेतीनशे किलोमीटर आणि कुठे 31 किलोमीटरचा प्रवास. या सुविधेने लोकांची सोय तर केलीच आहे, त्यांचा वेळ देखील वाचवला आहे. पर्यावरणाचे रक्षण देखील केले आहे. आर्थिक दृष्ट्या देखील मदत झाली आहे.

मित्रांनो, अशाच प्रकारची सेवा मुंबई ते हजीरा दरम्यान सुरु करण्याबाबत देखील विचार केला जात आहे. गुजरात सरकारने याला घटनात्मक सहमती दर्शवली आहे. लवकरच यावर काम सुरु होईल. रो-रो फेरी सारख्या प्रकल्पामुळे गुजरातच्या जल पर्यटनाला देखील प्रोत्साहन मिळत आहे.

मित्रांनो, पर्यटनाचा विषय जेव्हा निघतो तेव्हा स्टॅच्यु ऑफ यूनिटीची चर्चा होणे स्वाभाविक आहे. यामुळेच केवडीया आणि गुजरात संपूर्ण जगाच्या पर्यटन नकाशावर प्रामुख्याने दिसत आहे. याचे लोकार्पण होऊन केवळ 11 महिनेच झाले आहेत, एक वर्ष देखील झालेले नाही, मात्र ११ महिन्यात आतापर्यंत 23 लाखहून अधिक देशातील आणि परदेशातील पर्यटक आपल्या सरदार पटेलांचा स्टॅच्यु ऑफ यूनिटी पाहायला आले.

दररोज सरासरी साडेआठ हजार पर्यटक इथे येतात. मला सांगण्यात आले आहे की गेल्या वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी तर विक्रमी 34 हज़ारपेक्षा अधिक पर्यटक इथे या भूमीवर आले होते. जेव्हा एवढे मोठे यश मिळते तेव्हा याचे अनुमान तुम्ही या गोष्टीवरून काढू शकता की अमेरिकेच्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी पाहायला दररोज सरासरी 10 हजार लोक येतात, स्टॅच्यु ऑफ लिबर्टीला १३३ वर्ष झाली आहेत आणि स्टेच्यु ऑफ यूनिटीला केवळ 11 महिने आणि दररोज साडेआठ लाख लोक येणे, 11 महिन्यात 23 लाख लोक येणे हेच खूप मोठे आश्चर्य आहे.

बंधू आणि भगिनींनो, स्टॅच्यु ऑफ यूनिटी आज इथले आदिवासी बंधू आणि भगिनी आणि युवा मित्रांसाठी रोजगाराचे माध्यम देखील बनत आहे. आगामी काळात जेव्हा इथले रस्ते, इथले पर्यटनाशी संबंधित अन्य प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा रोजगाराच्या संधी आणखी वाढतील. आज मी पूर्ण वेळ इथे जे जे प्रकल्प सुरु आहेत ते पाहायला गेलो होतो. इथे यायला मला उशीर त्याचमुळे झाला, आणि माझ्यासाठी तर अजिबात वाहतूक कोंडी नव्हती , वेगाने जात होतो तरी चार तास लागले आणि अजूनही मी पूर्ण पाहिलेले नाही. इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे … जेव्हा भविष्यात इथे पर्यटक येतील, दोन-दोन, चार-चार दिवस राहायची त्यांची इच्छा होईल. भाजीपाला, फळे-फुले, दूध उत्पादन करणाऱ्या आदिवासी मित्रांना इथेच खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे या क्षेत्राला प्लॅस्टिकपासून वाचवायचे आहे. एकदा वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्ती साठी संपूर्ण देश प्रयत्न करत आहे. मला माहित आहे कि तुम्ही सर्वजण स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत या कामात सहभागी आहात. मात्र आपण हे विसरू नये की आपले पाणी, आपले जंगल आणि आपली भूमी प्लॅस्टिकपासून मुक्त राहावी यासाठी आपले प्रयत्न अधिक वेगाने व्हायला हवे आहेत, प्रत्येक नागरिकाने शपथ घ्यायला हवी, संकल्प करायला हवा.

मित्रांनो, विश्‍वकर्मा दिवस जसे मी सुरुवातीला म्हटले, 17 सप्टेंबर हा दिवस विश्‍वकर्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र 17 सप्टेंबर बरोबरच आजच्या दिवसाचे आणखी एक महत्व आहे , आजच्या दिवशी सरदार साहेब आणि भारताच्या अखंडतेसाठी जे प्रयत्न करण्यात आले, त्या प्रयत्नांचे एक सोनेरी पान 17 सप्टेंबरला लिहिण्यात आले. आज हैदराबाद मुक्ति दिन देखील आहे. आजच्याच दिवशी 1948 मध्ये हैदराबादचे भारतात विलीनीकरण झाले होते. आणि आज हैदराबाद देशाच्या उन्नति आणि प्रगतीत मजबूत योगदान देत आहे.

कल्पना करा, जर सरदार वल्लभ भाई, त्यांचा तो दूरदर्शीपणा जर तेव्हा नसता, सरदार साहेबांकडे हे काम नसते, तर आज भारताचा नकाशा कसा असता आणि भारताच्या समस्या किती वाढल्या असत्या.

बंधू आणि भगिनींनो, एक भारत, श्रेष्ठ भारताचे सरदार पटेलांचे स्वप्न आज साकार होताना देशातील सर्वजण पाहत आहेत. स्वातंत्र्यादरम्यान, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी कामे अपूर्ण राहिली होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आज भारत करत आहे.

जम्मू-कश्मीर आणि लडाखच्या लोकांना 70 वर्षे भेदभावाचा सामना करावा लागला. याचे दुष्परिणाम, हिंसा आणि फुटीरतावादाच्या स्वरूपात, अपूर्ण इच्छा आणि आकांक्षांच्या स्वरूपात संपूर्ण जगाने सोसले आहे.

सरदार साहेबांच्या प्रेरणेमुळे एक महत्वपूर्ण निर्णय देशाने घेतला आहे. कित्येक दशके जुन्या समस्या सोडवण्यासाठी नव्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मला पूर्ण विश्वास आहे कि जम्मू-कश्मीर, लडाख आणि कारगिलच्या लाखों सहकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून आपण विकास आणि विश्‍वासाचा नवा प्रवाह सुरु करण्यात यशस्वी होणार आहोत.

मित्रांनो, भारताची एकता आणि भारताची श्रेष्‍ठता यासाठी आपला हा सेवक पूर्णपणे कटिबद्ध आहे. गेल्या शंभर दिवसात एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणापसून पायाभूत विकास आणि अर्थव्यवस्था सशक्त करण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे.

मी निवडणुकीदरम्यान देखील तुम्हाला म्हटले होते, आज पुन्हा सांगतो. आमचे नवीन सरकार पूर्वीपेक्षा अधिक वेगाने काम करेल, पूर्वीपेक्षा अधिक मोठी उद्दिष्टे साध्य करेल.

पुन्हा एकदा मी संपूर्ण गुजरातचे सरदार साहेबांच्या भावना साकार झाल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन करतो. तुम्ही मला यात सहभागी करून घेतलेत त्याबद्दल खूप-खूप आभार. तुम्ही सर्वानी आज माझ्यावर जो आशीर्वादांचा वर्षाव केला आहे, गुजरातच्या जनतेने, देशातील जनतेने, जगभरात वसलेल्या सर्वानी, मी आज नर्मदा मातेच्या साक्षीने उभे राहून नतमस्तक होत त्यांनाही नमन करतो, त्यांचे देखील आभार मानतो. पुन्हा एकदा दोन्ही हात उंचावून माझ्याबरोबर म्हणा .. … नर्मदे….आवाज कच्‍छ पर्यंत पोहचायला हवा, नर्मदे… नर्मदे… नर्मदे…

भारत माता की जय,

भारत माता की जय

सर्वांचे खूप-खूप धन्‍यवाद.

B.Gokhale/S.Kane/D.Rane