Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

छत्तीसगड इथल्या नया रायपूर इथे पंतप्रधानांच्या हस्ते एकिकृत निर्देश आणि नियंत्रण केंद्राचे उद्‌घाटन, भिलाई पोलाद प्रकल्पाचे राष्ट्रार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्या हस्ते नया रायपूर इथे उभारण्यात आलेल्या एकिकृत निर्देश आणि नियंत्रण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली.

त्यानंतर पंतप्रधानांनी भिलाई पोलाद प्रकल्पाच्या ब्लास्ट फर्नेस-8 केंद्रालाही भेट दिली. या प्रकल्पाची कार्यपद्धती त्यांनी जाणून घेतली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

या उद्‌घाटन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी अत्याधुनिक आणि विस्तारीत भिलाई पोलाद प्रकल्पाचे राष्ट्रार्पण केले. तसेच आयआयटी भिलाई भूमीपूजनही त्यांच्या हस्ते झाले. भारत नेट या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. तसेच जगदलपूर आणि रायपूर दरम्यानच्या विमान सेवेचेही त्यांनी उद्‌घाटन केले. राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते लॅपटॉप, धनादेश आणि प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

कुठल्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच एकमेव उत्तर आहे, असे मत पंतप्रधानांनी या सभेत बोलतांना व्यक्त केले.

राष्ट्र बांधणीत भिलाई पोलाद प्रकल्पाचा मोठा वाटा असल्याचे सांगत, या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणामुळे आणि विस्तारीकरणामुळे नव भारताच्या उभारणीत त्याची भूमिका महत्वाची ठरले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या विविध विकास प्रकल्पांचीही त्यांनी माहिती दिली.

गेल्या दोन महिन्यात ग्राम स्वराज्य अभियानाचे अनेक सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत, असे ते म्हणाले. देशातल्या 115 मागास जिल्ह्यांमध्ये हे अभियान जोरकसपणे राबवले जात आहे, त्यातले 12 जिल्हे छत्तीसगडमध्ये आहेत, असे ते म्हणाले. जनधन योजना, मुद्रा योजना, उज्‍ज्वला योजना, फसल विमा योजना आणि सौभाग्य योजनेमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आलेले बदल त्यांनी सांगितले.

आदिवासी जनतेचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकार वन हक्क कायद्याची कठोर अंमलबजावणी करत आहे, असे मोदी यांनी सांगितले. आदिवासींच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असून, त्यांच्यासाठी देशभरात एकलव्य विद्यालये स्थापन केली जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/R.Aghor/D.Rane