Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

छत्तीसगढ येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामांच्या पायाभरणी सोहळ्यावेळी पंतप्रधानांचे भाषण

छत्तीसगढ येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामांच्या पायाभरणी सोहळ्यावेळी पंतप्रधानांचे भाषण


व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधु आणि भगिनिंनो, साई राम वैकैंया जी यांनी माझे काम सोपे केले आहे, आता कोणाचेही नाव घेण्याची आवश्यकता नाही. कोणाचे नाव घेण्यास विसरतो की काय ही काळजी असायची. वेंकैयाजींनी सुपर फास्ट एक्सप्रेस प्रमाणे भाषण केलेले तुम्ही ऐकले.

आता रमण सिंह सांगत होते की, मोदीजी सहा वाजता निघाले आहेत, रविवार सुट्टीचा दिवस असतो. पण माझ्यासाठी खऱ्या अर्थाने तो होली डे म्हणजे पवित्र दिवस असतो. त्यादिवशी शक्य होईल तेवढी कामं मी करतो. जेंव्हा मी संध्याकाळी अंथरुणाकडे जाईन तोपर्यंत माझा पाच राज्याचा दौरा संपलेला असेल. दिल्लीहून छत्तीसगढला आलो आहे, येथून ओडिशाला जाईन, ओडिशाहून पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालहून उत्तर प्रदेशला जाईल.

जनता जनार्दन जेंव्हा एखादी जबाबदारी सोपवते तेंव्हा ती पूर्णपणे मन लावून पार पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकानेच असे प्रयत्न केले पाहिजेत. आज याठिकाणी मला साईबाबांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याची संधी मिळाली. हे रुग्णालय गरीबांसाठी निःशुल्क सेवा प्रदान करते, विशेषतः बालकांच्या ह्रदय शस्त्रक्रिया, जे लोक पुट्टपुर्तीला गेले असतील त्यांनी पाहिले असेल त्याठिकाणी एक मोठे रुग्णालय आहे आणि साईबाबांचे जे सामाजिक कार्य आहे त्याकडे फार कमी लोकांचे लक्ष जाते. चमत्कारांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. पण, त्यांनी पाण्यासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यक्षेत्रात जे कार्य केले आहे, खरोखरीच ते प्रेरणादायी आहे. एकाही चमत्काराची चर्चा केली नाही तरी हा एक स्वतःच मोठा चमत्कार आहे. मी बाबांच्या या महान सामाजिक कार्याला प्रणाम करतो. आज याठिकाणी एका नव्या योजनेचा आराखडा तुमच्यासमोर सादर करण्यात आला. कल्पना आणि उद्योजकतेसंबंधी. मी रमणसिंहजी आणि त्यांच्या सरकारला शुभेच्छा देतो की त्यांनी या दिशेने विचार केला आणि सरकारला काय करता येईल, काय करायला पाहिजे, सरकार आणि लोक मिळून काय करु शकतात, यात त्यांची विशेषता आहे. जगात गेल्या 50 वर्षांत ज्या देशांनी प्रगती केली आहे. जर त्याकडे आम्ही पाहिले तर एक बाब लक्षात येते. त्या देशांच्या प्रगतीच्या मुळाशी एक बाब आहे. नवकल्पना, अनेक नव्या गोष्टी ते घेऊन आले. या नवकल्पना समाजहिताच्या ठरल्या, ज्या जगाने स्वीकारल्या. या नवकल्पना समाजहितकारी ठरल्या तसेच त्या राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी पूरक ठरल्या. जर नवकल्पना नसतील तर एकप्रकारे खिळ बसल्यासारखे वाटते. अडथळा आल्यासारखा वाटतो. समाजाचा एक पैलू असला पाहिजे तो म्हणजे कालानुरुप परिवर्तन. संशोधनाची परंपरा कायम ठेवली पाहिजे. नवनवीन संशोधनाचा समाजासाठी, देशासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या देशात 65 टक्के युवक आहेत. जग याकडे भारताची एक मोठी शक्ती या रुपाने पाहते. जर आम्ही नुसताच जप करत बसू की, आमच्याकडे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षापेक्षा कमी वयोगटातील आहे, तर काहीही साध्य होणार नाही. या 65 टक्के लोकसंख्येच्या हाती कौशल्य असले पाहिजे. आपले कौशल्य दाखवण्यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे. अशा छोट्या-छोट्या उद्योजकांना प्रोत्साहीत करणारी सरकारची धोरणे असावयास हवी. आमचा युवक जॉब सीकर (रोजगार मागणारा) नाही तर जॉब क्रिएटर (रोजगार निर्माता) झाला पाहिजे. तो स्वतः नोकरी शोधत बसण्यापेक्षा दोघा चौघांना नोकरी देणारा झाला पाहिजे. हे स्वप्न उराशी बाळगून काम करायला पाहिजे. देशात अशाप्रकारचे वातावरण तयार होऊ शकते. सरकारने ही जी योजना तयार केली आहे, ती योजना या सर्व प्रकारांना बळ देते. पदवीधारक होणे, प्रमाणपत्र हाती घेऊन दारोदार भटकत राहणे, हे माझ्या देशातील युवकांचे आयुष्य असू शकत नाही. माझ्या देशातील युवकाचे आयुष्य त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करुन त्या स्वप्नांना पूर्ण करणारे असले पाहिजे. त्यादिशेने सरकारने एकापाठोपाठ एक असे निर्णय घेतले आहेत.

कौशल्य विकास देशातील तरुणांना आपल्या प्रतिभेसाठी संधी देत आहे. मुद्रा योजना ही नव उद्योजकांसाठी आहे, तसेच जे जुने उद्योजक आपल्या व्यवसायाचा विस्तार करु इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा विनातारण, जे सामान्य नागरिक कधी बँकेपर्यंत पोहचले नाहीत. सावकार ज्यांना लुटत होते. बेसुमार व्याजाची आकारणी होत होती. कधी कधी त्या नागरिकाला गाव सोडून जाण्याची वेळ येत होती, किंवा आयुष्य संपवण्याची वेळ येत होती. यापासून वाचवण्यासठी छोटे छोटे व्यावसायिक, धोबी, न्हावी, भांडी विकणारी, कपडे विकणारे, मेणबत्ती, अगरबत्ती विकणारे, पूजेचे साहित्य विकणारे सामान्य लोक. त्यांना पाच, दहा हजार रुपये पाहिजे असतील तर ते सावकाराकडे जाऊन एकप्रकारे स्वतःला गहाण ठेवत असत. मुद्रा योजनेअंतर्गत 50 हजार ते दहा लाखापर्यंत अशा व्यक्तींना विनातारण कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत दोन कोटी नागरिकांना या योजनेअंतर्गत रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सुमारे एक लाख कोटीपेक्षाही जास्त रक्कम वितरीत करण्यात आली आहे. कसल्याही प्रकारचे तारण न घेता ही रक्कम देण्यात आली आहे. यामागे एकच निर्धार आहे तो म्हणजे या लोकांचा व्यापार वाढला पाहिजे. त्यापासून गरीबांना रोजगार मिळाला पाहिजे. एकाला मिळेल, दोघांना मिळेल, तिघांना मिळेल, चौघांना मिळेल. याच कामातून रोजगार वाढणार आहे. म्हणून जगात प्रचलित पद्धत होती की, आर्थिक विकासासाठी एक खासगी क्षेत्र, दुसरे सार्वजनिक क्षेत्र, म्हणजे सरकारी यात पीएसयु अथवा कॉर्पोरेट हाऊसेस असतील. भारतासारख्या देशात तिसऱ्या शाखेची आवश्यकता आहे. त्या तिसऱ्या शाखेवर मी जोर देत आहे, ती म्हणजे पर्सनल सेक्टर (वैयक्तिक क्षेत्र) खासगी क्षेत्राचे स्वतःचे वेगळेपण आहे, सार्वजनिक क्षेत्राचेही तसेच, पण पर्सनल सेक्टर (वैयक्तिक क्षेत्र) ज्याठिकाणी प्रत्येक व्यक्ती उद्योजक बनेल. आज छत्तीसगढमध्ये हे धोरण घेऊन आलो आहे, त्यामध्ये याचे प्रतिबिंब आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून याला आर्थिक मदत मिळेल. कौशल्य विकास अंतर्गत कौशल्य मिळेल. बाजारपेठ मिळेल, सकारात्मक बाजारपेठेचे वातावरण तयार होईल. मला आनंद आहे की, ही जी दोन कोटी लोकांना मदत मिळाली आहे, त्यामध्ये जवळपास 70 टक्के अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग यातील लोक आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात महिला उद्योजक पुढे आल्या आहेत. ही जी ताकद उभारी घेत आहे, ते जे या धोरणांना घेऊन छत्तीसगढमध्ये आले आहेत. मला वाटते की, यासोबत जोडून या दोन्ही शक्ती कामी येतील. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या शक्तीचा मिलाफ झाल्यास गती प्रदान होते. मला विश्वास आहे की, छत्तीसगढच्या युवकांना याचा लाभ मिळेल.

आज प्रधानमंत्री आवास योजनेचाही शुभारंभ होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाल्यानंतरही पाच कोटी कुटुंब अशी आहेत, ज्यांच्यासाठी घर बांधण्याची गरज आहे.

सुमारे दोन कोटी शहरामध्ये आहेत, तीन कोटी गावांमध्ये आहेत, आणि या लोकांना आपल्या स्वतःच्या ताकदीने घर बांधणे शक्य नाही. त्यांच्याकडे ना जमीन आहे ना पैसा. विकासकामात कधी कधी व्यवस्था फार मोठी भूमिका निभावू शकते. अतिशय गरीब व्यक्ती असेल, झोपडपट्टीत राहत असेल, तर तो जगण्याच्या पद्धती अशा शोधून काढतो की, रात्री झोपण्यासाठी येतो आणि दिवसा निघून जातो. त्याच्याकडे कौटुंबिक वातावरण तयार होत नाही तसेच त्याची स्वप्नेही साकार होत नाहीत. पण, त्याला छोटे घर दिले तर तो पैसे भरण्यासाठी तयार होतो. सरकारने मदत केली, बँकांनी मदत केली, सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या प्रारुपातून पुढे जाता येईल.

एकदा घर झाले की, मनात येते की पाहुणे आल्यानंतर घरात प्रवेश करताना पाय पुसण्यासाठी काय तरी ठेवले पाहिजे. तर तो विचार करतो की, दहा रुपयांची बचत करुन काही घेता येईल. पुन्हा त्याला वाटते की, झोपडपट्टीत लोक आल्यानंतर कसेही चालत होते, पण आता एखादी सतरंजी घेतली पाहिजे. तो पुढच्या महिन्यात सतरंजी घेतो. पुढे थोड्या दिवसानंतर त्याला वाटते की, मुलांना शिक्षण दिले पाहिजे. मग तो मुलांना शिकवण्यासाठी विचार करतो.

एकदा भिंत झाली की मग छत येते, त्यावेळी त्याच्या स्वप्नांमध्ये जीव येतो आणि मग तो नवनवीन गोष्टी करण्यास लागतो.

म्हणून ही प्रधानमंत्री आवास योजना, ही पायाभूत सुविधा नाही. ही प्रधानमंत्री आवास योजना, ही भिंती उभ्या करण्यासाठी नाही. एखाद्याला जागा दिली तर तो आपल्या स्वप्नांमध्ये जीव ओतेल त्यासाठी हा फार मोठा कार्यक्रम आहे. जो देशातील अतिशय गरीब व्यक्तीला देखील आपला वाटला पाहिजे, आणि सामान्य व्यक्तीची इच्छा असते की, आपले घर पाहिजे. पण त्या गरीब व्यक्तीची इच्छा पूर्ण होत नाही. एखादा गरीब व्यक्ती मृत्यूनंतर आपल्या मुलांना गरीबीचा वारसा देऊ इच्छित नाही. तोसुद्धा मुलांना काहीतरी देऊन जाऊ इच्छितो. सरकारने एक स्वप्न पाहिले आहे.

2022 साली देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील. आतापासूनच देशातील प्रत्येक नागरिक, सर्व सरकारे, देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्याप्रती विचार करणारे सर्व लोक, त्या सर्वांनी संकल्प केला पाहिजे की, 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील, तेंव्हा ज्या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आपले तारुण्य तुरुंगात घालवले, फासावर गेले, पाठीवर पोलिसी दंडुके झेलले, त्या व्यक्तींसाठी ज्यांनी एवढा मोठा त्याग केला, तपश्चर्या केली आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांना आम्ही स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी काय देऊ शकतो याचा संकल्प प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. आम्ही त्यांना कशाप्रकारचा भारत देऊ. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्यांना स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी आम्ही कशाप्रकारचा भारत देऊ, याचे स्वप्न पाहिले पाहिजे. आम्ही हे स्वप्न पाहिले आहे की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये देशातील अतिशय गरीब व्यक्तीला देखील स्वतःचे घर मिळाले पाहिजे.

2022 पर्यंत पाच कोटी घरांचे निर्माण करावयाचे आहे. मला माहित आहे, हे काम फार मोठे आहे. यासाठी मोठे मनुष्यबळ लागणार आहे. पण यामुळे रोजगारनिर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होईल. सिमेंटची विक्री वाढेल, लोखंडाचा खप वाढेल, गवंडीकाम करणाऱ्यांना रोजगार मिळेल. वीट-माती, भट्टा-चूना सर्वांना रोजगार मिळेल. देशातील मोठी आर्थिक प्रवृत्ती युवा पिढीसाठी उपयुक्त ठरेल. आयुष्य बदलून टाकणाऱ्या या कार्यक्रमाचा आज याठिकाणी शुभारंभ होत आहे. देशभर सर्व सरकारांनी पुढे येऊन लवकरात लवकर जमीन निश्चित केली पाहिजे. केंद्र सरकार हे कार्य पुढे नेण्यासाठी तयार आहे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून हे काम करतील आणि देशातील गरीब व्यक्तीला आम्ही निवारा देऊ शकू. या निवाऱ्यामुळे त्याच्या स्वप्नांना बळ मिळेल. या स्वप्नांच्या जोरावर तो 2022 मध्ये नवीन शिखर गाठेल. याच विश्वासाने मी पुन्हा एकदा रमणसिंह आणि त्यांच्या चमूला खूप-खूप शुभेच्छा देतो. श्री वेंकैया जी, या खात्याचे मंत्री आहेत, ते दिवसरात्र याकामी मेहनत घेत आहेत आणि मला विश्वास आहे की, हे स्वप्न पूर्ण होणार. खूप-खूप आभार.

S.Thakur / S. Tupe / M. Desai