Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जपानमध्ये कोबे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायासमोर केलेले भाषण

जपानमध्ये कोबे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायासमोर केलेले भाषण


नमस्कार,
कोबेमध्ये यापूर्वी देखील तुमच्यासमोर येण्याचे तुमच्यात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. तेंव्हा तर कोणाला वाटलेही नसेल की अशी कोणी व्यक्ती पंतप्रधान बनेल. त्यावेळी देखील तुम्ही लोकांनी मला इतके प्रेम दिले होते की मी ते कधीही विसरू शकणार नाही. कोबेमध्ये मी आलो आहे आणि तुम्हाला न भेटता तसाच निघून जाईन, अशी कल्पना देखील मला करता येणार नाही.
मी, काल पंतप्रधान अबे यांच्यासोबत चर्चा करत होतो. कोबेशी असलेल्या माझ्या संबंधांबाबत मी त्यांना सांगितले. मी त्यांना सांगितले की 2001 मध्ये जेव्हा गुजरातमध्ये विनाशकारी भूकंप झाला तेव्हा गुजरातला सर्वात आधी कोणी मदत केली असेल तर ती कोबे या शहराने आणि त्यापूर्वी या ठिकाणी देखील भूकंप झाला होता. तरीदेखील जेव्हा सुखात असताना कोणी येवो न येवो पण असे म्हटले जाते की आले तर चांगले झाले असते. मात्र, दुःखाच्या वेळी कोणी आले नाही तर ती गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते आणि जे कोणी दुःखाच्या वेळी येतात ते आयुष्यभर पूजनीय ठरतात. या दृष्टिकोनातून कोबे संकटाच्या काळात मदत करणा-यांमध्ये सर्वात पहिले होते. त्यामुळे त्या मदतीची आठवण राहणे, त्यांच्या विषयी आदरभाव निर्माण होणे नैसर्गिक आहे. तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटत असेल की भारताविषयीची प्रत्येक बातमी तुमचे शिर अभिमानाने उंचावत ठेवते. उंचावते की नाही? छाती पुढे काढून, नजरेला नजर भिडवून मोठ्या हिंमतीने तुम्ही बोलू शकत असाल आणि त्याचे कारण, त्याचे कारण मोदी नाही…. त्याचे कारण सव्वाशे कोटी हिंदुस्तानी आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी जे मनापासून प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामध्ये विशेषत्वाने भारताच्या तरुण पिढीने मनामध्ये जो निर्धार केला आहे आणि ज्या प्रकारे ते पुरुषार्थ दाखवत आहेत ते पाहून कोणालाही अभिमान वाटेल.
दोन वर्षे भयंकर दुष्काळाची होती. पाऊस अतिशय कमी झाला होता आणि भारताची अर्थव्यवस्था अशी आहे की दुष्काळामुळे सर्व काही कोलमडून पडते. असे असूनदेखील दोन वर्षे दुष्काळाची राहिल्यानंतरही, टंचाई असूनदेखील संपूर्ण जग आज एका सुरात बोलत आहे की मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था कोणाची असेल तर ती भारताची आहे. जागतिक नाणेनिधी असो, जागतिक बँक असो, सर्वच लोक एका सुरात सांगत आहेत. जागतिक नाणेनिधीने सांगितले की भारत एक चमकता तारा आहे.
भारत अतिशय वेगाने प्रगती करत असल्याची जगभरातील अर्थतज्ञांची धारणा आहे. एफडीआय म्हणजे थेट परदेशी गुंतवणूक, पण माझा एक वेगळा शब्दकोष देखील आहे. याबाबतीत माझी पहिली परिभाषा आहे- एफडीआय म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया आणि दुसरी आहे फॉरिन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि सध्याच्या काळात भारताच्या इतिहासात सर्वात जास्त एफडीआय भारताला प्राप्त होत आहे आणि एफडीआय प्राप्त करणा-याचा विकासदर जो आहे तो ऐतिहासिक दृष्ट्या सर्वोच्च आहे. तर या सर्व बाबी हे उघड करत आहेत की देश आर्थिक विकासाच्या मार्गावर अतिशय जलद गतीने वाटचाल करत आहे.
आपल्या देशात गरीबी हा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे. मी आल्यामुळे या विषयावर चर्चा सुरू झाली असे काही नाही आहे. यावर यापूर्वी देखील चर्चा झालेली आहे. पण बहुतेक वेळा ही चर्चा निवडणुकीच्या तोंडावरच झाली आहे. त्यानंतर सगळ्याचा विसर पडतो. मी मात्र ही चर्चा निवडणुकीच्या नंतर सुरू केली आणि देशाला गरिबीतून मुक्त केले पाहिजे आणि करू शकतो ही बाब मी अतिशय गतिमान पद्धतीने पुढे रेटत आहे आपल्या देशात 40 टक्के लोक असे होते ज्यांच्या नशिबात बँकेचे दरवाजे कधीच खुले नव्हते. त्यांच्या मनात असा विचारही कधीच येत नव्हता की एवढ्या भव्य इमारतीमध्ये, ज्या इमारतीला इतक्या काचा लावलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला कधीतरी प्रवेश मिळेल की मिळणार नाही. आम्ही सत्तेवर आल्याबरोबर एक मोहीम सुरू केली ती म्हणजे सर्वप्रथम सर्वांची बँक खाती सुरू करण्याची. आता पैसे तर नव्हते. स्टेशनरीचा सुद्धा खर्च असतो. अर्जाचा खर्च देखील आठ आणे, रुपया होतच असतो. आम्ही सरकारच्या वतीने सांगितले की एकही पैसा घेऊ नका मोफत खाते उघडा. तेव्हा काही दिवस काय परिस्थिती झाली असेल हे तुम्हाला माहित आहेच. पण सरकारमधील सर्व लोक सहमत झाले आणि आम्ही गरिबांना सांगितले की तुमच्याकडे एक नवा पैसा नसला तरीही तुमचे बँक खाते उघडता येईल आणि देशातल्या जवळ जवळ सर्व गरीब कुटुंबांची बँक खाती उघडली गेली आहेत आणि आम्ही तर गरिबांना सांगितले होते की एक रुपया नसला तरीही बँक खाते उघडता येईल. पण आपल्या देशाचे हे वैशिष्ट्य आहे की देशातील गरिबांनीच श्रीमंती दाखवली आहे. ब-याचदा आपल्याला श्रीमंतांमधील गरिबीचे दर्शन होत असते पण गरिबांमधील श्रीमंती पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्यांना मी सांगितले होते की एक रुपया नाही दिला तरी चालेल. त्यानंतरही ज्यांच्या आयुष्यात कधीही बँकेचे खाते उघडले गेले नव्हते, बँकेचा दरवाजाही पाहिलेला नव्हता, केवळ या एका शब्दावर, या गरिबांनी बँकांमध्ये सुमारे 45 हजार कोटी रुपये जमा केले. “45000 क्रोर रुपीस….”
या गरिबांची ही श्रीमंती आणि हेच आमच्या देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य. जो देश आम्हाला हवा आहे तो बनवण्याचे सामर्थ्य यात आहे.

2011 मध्ये जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती आली. तुमच्याकडे भूकंप झाला, सुनामी आली, त्याचवेळी तुमच्याकडे फुकुशिमाची दुर्घटना झाली. 2011 चे दिवस आठवतात, वीजेमध्ये कपात, पाणीसुद्धा जर चार बाटल्यांची गरज असेल तर एका बाटलीत भागवायचे, दही आणायचे असेल तर नको राहू दे आणू नका, कमी आणा आणि केवळ त्या भागातच नाही ज्या भागात आपत्ती आली.संपूर्ण जपानमध्ये सरकारने इच्छा व्यक्त केली की सरकारी कार्यालयांसाठी. पण या देशाच्या जनतेने ही आपली जबाबदारी मानली आणि

प्रत्येकाने कोट-पँट-टाय वापरायची नाही म्हटल्यावर, वापर थांबवला. एसी बंद करा म्हटल्यावर बंद केला. पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका सांगितल्यावर नाही घेतले. कमी पदार्थांच्या साहाय्याने घरात जेवण बनवले. तीन भाज्या बनवत असाल तर एकच बनवायला लागलात. हे तुम्ही लोकांनी केले आहे, जपानच्या लोकांनी केले. जेव्हा मी या सर्व गोष्टींविषयी वाचत होतो आणि जेव्हा मी नंतर लोकांकडून ऐकत होतो, तेव्हा मला देखील असे वाटू लागले की हे लोक किती महान आहेत आणि देशासाठी किती त्रास सहन करायची यांची तयारी आहे. नाही कधी-कधी मनात येत होते की आपल्या देशात कधी असे होऊ शकते का? हे शक्य आहे का? पण आज मोठ्या विश्वासाने मी हे सांगू शकतो की भारताचा सर्वसामान्य मानवही जर त्याला संधी मिळाली, जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली तर जसे तुम्ही करून दाखवले तसेच तोही करून दाखवेल, मागे राहणार नाही, हे मी माझ्या अनुभवातून सांगत आहे.

अगदी आता-आताचा माझा ताजा अनुभव आहे- कोणता अनुभव? तुम्हाला माहित आहे का अचानक आठ तारखेला रात्री आठ वाजता पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द… मी सव्वाशे कोटी देशवासीयांना नमन करतो, सलाम करतो. घरात लग्न आहे, पैसे नाही आहेत, आई आजारी आहे, पण नोटांच्या थप्प्या आहेत, पण अवघड आहे. या सर्वांनंतरही, त्रास होत आहे हे माहित आहे, हे स्वतःला माहित आहे, शेजा-या-पाजा-यांना माहित आहे. तरीही लोक तोंडात बोटे घालून-घालून विचारत राहातात की मोदींना काही बोला, मोदींच्या विरोधात काही तरी बोला. असेही सुरू आहे. पण मी देशातील लोकांना शंभर-शंभर सलाम करतो की कोणी चार तास रांगेत उभे राहिले, कोणी सहा तास राहिले. त्रास सहन केला पण देशाच्या हिताच्या या निर्णयाला अगदी त्याच प्रकारे स्वीकारले आणि स्वागत केले, ज्या प्रकारे 2011मध्ये जपानच्या प्रत्येक नागरिकाने करून दाखवले होते. काही ठिकाणी तर लोक पाच-पाच तास उभे होते आणि अचानक एटीएम मशीन बंद पडले. तरीही काही हरकत नाही उद्या दुरुस्त होईल असा विचार केला. देशाच्या उज्वल भवितव्याचे हे प्रतीक आहे, उज्वलतेचे चिन्ह आहे. हे देखील बरोबर आहे की पाप करणा-यांची संख्या काही जास्त असणार नाही. हे लोक लाख-दोन लाख, पाच लाखांच्या घरात असतील. पण त्रास सव्वाशे कोटी लोकांना होत आहे. तरीही सव्वाशे कोटी लोकांना वाटत आहे की जर एवढेसे सहन केल्यानंतर, तुम्ही पाहिले असेल, आता तर व्हॉट्सऐप वर सर्व काही येत असेल. पूर्वी गंगेत कोणी चार आणे टाकत नव्हते आता गंगेत नोटा वाहू लागल्या आहेत.

तुम्ही मला सांगा चोरीचा माल बाहेर पडला पाहिजे की नाही, बाहेर आला पाहिजे की नाही. सर्वसामान्य माणसाची तक्रार असते की एकाला फायदा व्हावा आणि एकाचे नुकसान व्हावे. त्याला वाटते की कायद्याने सर्वांना पाचशेच्या नोटा द्याव्यात, सर्वांना हजारच्या नोटा द्याव्यात. आता मोदींच्या नोटाही बाजारात चालणार नाहीत. लोक म्हणतात की हे तर खूप छान झाले. असे व्हायला हवे. प्रत्येकासाठी समान हा त्याचा परिणाम आहे आणि या कारणामुळे मलाही माहित नव्हते की मला असे आशीर्वाद मिळतील ज्या आशीर्वादांचा मी विचार करत होतो. हे केले तर काय त्रास होईल, काय-काय फायदा होईल, याचा विचार मी केलाच नव्हता. मी माझ्या डोक्याला ताण देत विचार करत होतो की कसे करू, कसे करू आणि हे काम असे होते की लोकांना सांगूही शकत नव्हतो. अचानक करायला पाहिजे, नाहीतर सगळेच संपले. जे लोक इतके जमा करू शकतात ते आपल्या जागेवरही असे करू शकतात. त्यामुळेच तर सर्व काही गुप्त राखण्याची गरज होती. त्यावेळी मी असा विचार करत होतो की हा त्रास होईल, असा त्रास होईल, हे कठीण होईल. त्यावेळी आमची लहानशी टीम एकत्र बसून विविध उपायांवर विचार करत होती. मात्र, मी हा विचार केला नव्हता की यातून काही आशीर्वादही मिळेल. जेव्हा लोकांना माहित झाले की याच गृहिणीकडे , प्रत्येक महिला भाजी घ्यायला बाजारात जाते तेव्हा काहीतरी पैसे वाचवते आणि साडीच्या पदराला बांधून ठेवते जेणेकरून घरातील सर्व काही रिकामे झाले, काही संकट आले तर ती काढून देऊ शकेल. आपल्या देशात महिला काही ना काही वाचवून ठेवत असतात आणि हा पैसा प्रामाणिकपणाने कमावलेला असतो, कोणत्याही प्रकारे बेईमानी करून कमावलेला नसतो. जेव्हा आम्ही सांगितले की जर एखाद्या गृहिणीने बँकेत अडीच लाख रुपये जमा केले तर तिला सरकार हे अडीच लाख रुपये कुठून आणले म्हणून विचारणार नाही. त्याचा परिणाम काय झाला माहित आहे का? अनेक मुले आणि सुना ज्यांनी आपल्या आईला-सासूला वृद्धाश्रमात ठेवले होते त्यांनी आपल्या आईच्या खात्यात अडीच-अडीच लाख रुपये जमा केले. आता मला सांगा ती आई मला आशीर्वाद देणार की नाही देणार. अशा वृद्ध आई मला आशीर्वाद देणार असतील तर एखादी योजना यशस्वी होण्याबाबत साशंकता राहू शकते का.

बंधु आणि भगिनींनो ही एक मोठी स्वच्छता मोहीम आहे. कोणालाही त्रास देण्यासाठी ही मोहीम नाही आहे. गैरसोय झाली आहे याची मलाही कल्पना आहे. मी पहिल्या दिवशीच सांगितले होते ज्यावेळी आठ तारखेला मी देशाच्या नावाने संबोधित केले होते. त्यावेळीही मी सांगितले होते की एवढा मोठा देश आहे. पन्नास दिवस आहेत. घाई करायची कोणतीही गरज नाही. पन्नास दिवस दिले जात आहेत, तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या हक्काचे जे पैसे आहेत ते जमा करा. त्या बदल्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.पण मी हे देखील स्पष्टपणे सांगतो जर काही बेहिशोबी सापडले तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंतच्या कालावधीचा त्याचा हिशोब तपासला जाईल. जितक्या लोकांची नव्याने गरज लागेल तितक्या लोकांना मी या कामाला लावेन. प्रामाणिकपणाचा अधिकार आहे, त्याचा जयजयकार होईल, त्यांची काहीच समस्या नाही आहे. पण याच प्रकारे कोणी जमा केले असेल तो विचार करत असेल, आज बँकेत ठेवेन, नंतर बघूया काय ते. पण कोणीही वाचणार नाही आणि जे लोक मला ओळखतात त्यापैकी काही समजुतदार आहेत. त्यांना वाटते बँकेत जाण्याऐवजी गंगेमध्ये पैसे वाहणे चांगले आहे. पैसे मिळोत ना मिळोत पुण्य तर मिळेल आणि म्हणूनच तर देशाला मी पुन्हा एकदा, आज पोहोचल्याबरोबर लोकांना वारंवार सांगणार आहे की प्रामाणिक लोकांचे रक्षण करण्यासाठी माझे सरकार सर्व काही करेल आणि बेइमान लोकांचा हिशोब चुकता केला जाईल.
तसे पाहायला गेले तर असेही नाही की आम्ही हे सर्व रातोरात केले. आम्ही पहिल्यांदा एक योजना सुरु केली होती की तुम्ही अमुक इतका दंड भरून जितके पैसे जमा करू शकता तितके जमा करा.त्यावेळी सुमारे 67 हजार कोटी रुपये जमा झाले. तेव्हा सुद्धा काही लोक बोलत होते मोदी अपयशी होणार. पण मोदींचे काही झाले नाही. पण शेवटी जेव्हा प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली तेव्हा तर ते काही बोलतच नाहीत.

आणि गेल्या दोन वर्षात अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. सुमारे सव्वा लाख कोटी रुपये परत आले. संधी दिली होती, नाही असे नाही मात्र तरीही जर आपल्याला असे वाटत असेल की, आधी सारखीच परिस्थिती आहे तर त्यात माझी चूक नाही. म्हणूनच 30 डिसेंबरपर्यंत कोणताही त्रास न होता सर्व कामे योग्य प्रकारे होत राहतील. सव्वाशे कोटी देशवासियांना 30 डिसेंबरपर्यंत कोणताही त्रास होणार नाही. त्यांच्या हक्काच्या सर्व बाबी मिळतील तरीही काही लोकांना वाटत असेल की 30 डिसेंबर नंतर काय… तर आज मला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की ही योजना पूर्ण झाल्यानंतर शिस्त लावण्यासाठी दुसरे काही समोर येणार नाही याची खात्री देता येणार नाही.

आता जग फार बदलले आहे. आपण मुख्य प्रवाहात आहोत. मी संधी दिली, आता आपण आपल्या नशिबाची काळजी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण सर्व कठोर मेहनत करुन देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे प्रयत्न करीत आहात. आपल्या पुरुषार्थामुळे देशाचा सन्मानही वाढतो. जगात जेथे जावे तेथे भारतीय समुदायाबद्दल सकारात्मक चर्चा ऐकू येते. जगात ज्या-ज्या ठिकाणी भारतीय समुदाय निवास करतो त्या ठिकाणीही सकारात्मक बाबीच ऐकू येतात. त्याचमुळे भारताची प्रतिष्ठा वाढते, हे आपणा सर्वांचे योगदान आहे.

मला आपणा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. यापुढे भारत सातत्याने प्रगती करीत राहील, विकासाची नवी शिखरे गाठत राहील, आपण जगात जाऊन जी स्वप्ने पाहता आणि ज्या चांगल्या बाबी भारतात असाव्यात असे आपल्याला वाटते त्या सर्व बाबी भारतात असणे शक्य झाले आहे आणि ते निश्चितच होईल, अशी ग्वाही मी देतो. मन:पूर्वक आभार.

B.Gokhale/S.Patil/Anagha