Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जीईच्या मल्टी मॉडेल उत्पादन सुविधेचे चाकण येथे उद्‌घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण


s2015021462244 [ PM India 125KB ]

s2015021462243 [ PM India 132KB ]

s2015021462217 [ PM India 93KB ]

s2015021462215 [ PM India 112KB ]

s2015021462210 [ PM India 131KB ]
उपस्थित मान्यवर,

न्यूयॉर्कच्या आपल्या दौऱ्यात जीईचे लोक भेटले तेव्हा त्यांनी पुण्यातल्या युनिटचा विस्तार होत आहे, तुम्ही या, मलाही महाराष्ट्रात यायचे होते तर मी होकार दिल मलाही पाहायची इच्छा होती, आधुनिक औद्योगिक पायाभूत संरचना कशी असू शकते, आधुनिक तंत्रज्ञानाचे पर्व कसे असू शकते हे आज मी प्रत्यक्ष पाहिले. मी जीईला शुभेच्छा देतो. अमेरिकेनंतर त्यांनी भारतात हा सर्वात मोठा प्रकल्प सुरु केला आहे आणि त्यांनी आणखी पुढे जायचीही घोषणा केली आहे. मेक इन इंडिया या आमच्या अभियानाला या घोषणेमुळे नक्कीच आणखी बळ मिळणार आहे.
मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि भरवसा देतो की विकासाबाबत, भारतीय युवकांना रोजगार देण्याच्या क्षेत्रात औद्योगिक विकासात, सर्वांना माझे आमंत्रण आहे, भारतात या, भारतात विकासाच्या मोठया संधी आहेत आणि भारताच्या विकासाशी आपल्या सर्वांचा विकास जोडला गेला आहे. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या काळात, स्पर्धात्मक काळात मी जगातील उद्योगपतींना विश्वास देऊ इच्छितो की भारतात विपुल संधी आहेत.

गेल्या काही काळात संपूर्ण जगात भारताच्या वेगाने होत असलेल्या आर्थिक विकासाबाबत चर्चा झाली. बऱ्याच काळापासून आपण ऐकत आलो आहोत की एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे, मात्र त्यात भारताचा उल्लेख नसे. मात्र गेल्या काळात जे निर्णय झाले, जे प्रयत्न झाले, ज्या प्राधान्याने ज्या दृष्टिकोनाने आम्ही मार्गक्रमण करत आहोत, त्यामुळे आज जग ज्या एकविसाव्या शतकाचा विचार करत आहे त्यात भारताचाही उल्लेख होत आहे आणि मला विश्वास आहे की एकविसावे शतक आशियाचे शतक असेल. त्यात भारताची महत्त्वाची भूमिका असेल. उत्पादन क्षेत्रात आम्हाला आणखी पुढे जायचे आहे. भारताचे ढोबळ राष्ट्रीय उत्पादन 7.4 टक्क्यांवर पोहचले आहे. आर्थिक जगताने भारताची अर्थव्यवस्था, सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून केला आहे. अर्थव्यवस्थेचा हा विकास आपल्याला आणखी पुढे न्यायचा आहे, तो कायम राखायचा आहे आणि त्यासाठी उत्पादन, कृषी आणि सेवा क्षेत्रावर भर द्यायचा आहे.

उत्पादन क्षेत्रात भारतात अपार संधी आहेत, आपल्याकडे 35 वर्षाखालची 65 टक्के लोकसंख्या आहे. ज्या देशाकडे एवढे युवाधन आहे तो देश धनवान होण्यासाठी मागे राहू शकत नाही. ही ताकद भारताच्या युवावर्गाकडे आहे आणि या युवाशक्तीत जगाला भारताकडे आकर्षित करण्याची शक्ती आहे. जगातल्या संपत्तीचा ओघ भारताकडे वळवण्याची क्षमता युवावर्गात आहे आणि म्हणूनच युवकांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. रोजगार निर्मिती असू दे, रोजगार निर्मितीसाठी मनुष्यबळ असू दे, संसाधन विकासात, कौशल्य विकासावर भर दयायला हवा आणि कौशल्‍य विकासासाठी सरकारने प्रथमच एक स्वतंत्र मंत्रालय तयार केले आहे, ते युवकांच्या कौशल्य विकासावर भर देईल. भारताच्या कुशल मनुष्यबळात संपूर्ण जगाला आकर्षित करण्याची शक्ती आहे असा मला विश्वास आहे. आपल्याकडे प्रतिभा आहे आणि भारताच्या युवकांकडे अशी प्रतिभा आहे ज्याकडे जगभरातले तंत्रज्ञान आकर्षित होईल. हॉलीवूडचा चित्रपट बनवण्यासाठी जितका खर्च होतो त्यापेक्षा कमी खर्चात भारताच्या युवा शक्तीने आपले मंगळयान पाठविले. हॉलीवूड चित्रपटापेक्षा कमी खर्चात, हे समजल्यावर जगाला आश्चर्य वाटले आपल्या प्रतिभेचा हा आविष्कार आहे. शासननिर्णय स्पष्ट असतील तर कोणतीही व्यक्ती त्यावर विश्वास ठेवेल. आपल्या व्यवस्थेत, कायद्याच्या संबंधात अधिक विश्वसनियता हवी. तरच कोणी विश्वास ठेवेल. भारताकडे सर्व काही आहे, सरकारी सुविधा आहेत आपण जाऊया. गेल्या काही दिवसात मेक इन इंडिया या अभियानाअंतर्गत अनेक पावले उचलण्यात आली. व्यापारासंदर्भात महाराष्ट्राने उचलेल्या पावलांची देवेंद्रजी यांनी माहिती दिली. देशाच्या इतर राज्यांसाठी प्रेरणादायी आहे. एके काळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकरशाहीचे इतकी प्रबळ होती, सरकारी कायदे नियम असे होते की सरकारी व्यवस्थेतही कोणाला उदयोग सुरु करायचा असेल तर 70-80 परवान्यांसाठी दोन-दोन, चार-चार वर्ष रखडायला लागत असे. देवेंद्रजीनी या परवान्यांची संख्या 70-80 वरुन कमी करुन 30-35 पर्यंत आणली आणि ही संख्या आणखीही कमी करणार असल्याचे त्यांनी मला सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा भारतात काही दिवसांपूर्वी आले तेव्हा भारत आणि अमेरिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. देशातील पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे अशी आमची इच्छा आहे, पण येथे एक हॉटेल सुरु करण्यासाठी एकशे दहापेक्षा जास्त मंजुऱ्या मिळवाव्या लागतात. एकशे दहापेक्षा जास्त सरकारी कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. एक मंजुरी मिळवायला जर एक महिना लागला तर एकशे दहा महिने आपले कागदच फिरत राहतील आणि तेव्हा आपला बांधकाम खर्च अनेक पटींनी वाढतो कमीत कमी यासाठी तरी थोडा विचार करा. हे ऐकल्यानंतर संबंधित लोकांशी मी चर्चा केली आणि मला आनंद आहे की देवेंद्रजींनी मला सांगितले की आदरातिथ्य उद्योगासाठी ज्या 110-120 मंजुऱ्या घ्याव्या लागत होत्या, त्यांची संख्या कमी करुन 20 करण्यात आली आहे. सुप्रशासन, विकासाची हमी असते, व्यापार सुलभीकरण प्रत्येकाला प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करुन देते आणि भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही त्यावर जोर देऊ इच्छितो. आगामी काळात औद्योगिक विकासामध्ये आम्ही नवी उंची प्राप्त करु.

जीईचे लोकहो तुम्ही जमिन आणि आकाशाशी निगडीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. भारतात जहाजबांधणी उद्योगातही मोठया संधी आहेत. इतकी मोठी किनारपट्टी आहे. पोलाद उत्पादन होत आहे. मोठया प्रमाणावर कुशल मनुष्यबळ आहे. जर आपण जहाज इंजिने बनवण्याच्या दिशेने गतिने काम केले तर जहाजबांधणी क्षेत्रातील संधी वाढतात आणि त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या सर्व राज्यांच्या युवकांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होतात. दुसरे असे की मी त्यांना म्हटले की तुम्ही येथे सुटे भाग बनवता आणि पूर्ण वस्तू बाहेर बनते. संरक्षण क्षेत्रात पूर्ण ताकदीने पुढे जाण्याची भारताची इच्छा आहे. आपल्या येथे संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठया संधी आहेत. भारत स्वत:च एक मोठा ग्राहक आहे मात्र तिसऱ्या जगातल्या देशांना आपण खूप कमी दरात संरक्षण साधने निर्यात करु शकतो. या शक्यतांच्या बाबतीत भारत सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. संरक्षण उत्पादन क्षेत्रात 49 टक्के परकीय गुंतवणूकीचा निर्णय आम्ही घेतला आहे.

पुणे एकतऱ्हेने शिक्षणाचे केंद्र बनले आहे. तिथल्‍या अभियांत्रिकी महाविद्यालयात संरक्षण अभियांत्रिकेचे अभ्यासक्रम सुरु झाले तर चांगले मनुष्यबळ तयार होईल. सध्या भारताचे अभियांत्रिकी केंद्र म्हणून पुणे नावारुपाला येत आहे. येथील अभियांत्रिकी क्षमतांचा विकास केला तर मला खात्री आहे की आपण संरक्षण क्षेत्रात मोठी मजल मारु शकतो.

भारतात लोकोमोटिव्हचे काम होत आहे पण रेल्वे क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण व्हावे अशी आमची इच्छा आहे. रेल्वेच्या तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण व्हावे, रेल्वेचा विस्तार व्हावा, रेल्वेची गती वाढावी आणि रेल्वे हे केवळ दळणवळणाचे साधन म्हणून नव्हे तर संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेचे सुकाणू बनू शकते. त्या दिशेने रेल्वेचा विकास केला जाऊ शकतो. त्याच्या उत्पादनासाठी मोठया संधी आहेत. त्यासाठीही आम्ही प्रयत्‍न करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, आगामी काळात युवाशक्तीच्या जोरावर हुशार मनुष्यबळाच्या आधारावर कमाल स्रोतांच्या पुरेपूर वापराच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेला एका नव्या उंचीवर आम्हाला आणायचे आहे. मला विश्वास आहे की पायाभूत क्षेत्र असो, उत्पादन क्षेत्र असो, आम्हाला दुसऱ्या टप्प्यात यायचे आहे आणि जागतिक स्पर्धेत पुढे जायचे आहे, त्यादृष्टीने काम करायचे आहे.

भारताचा युवक आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका निभावू शकतो आणि त्यासाठी भारताला गतीने पुढे जायचे आहे. मी पुन्हा एकदा जीईच्या साहसी निर्णयांचे स्वागत करतो. जगातील गुंतवणूकदारांना मी विश्वास देऊ इच्छितो की भारतात अपार संधी आहेत आणि या संधीना साकार करण्यासाठी ज्या निर्णयांची आवश्यकता आहे त्याबाबतीत गतीने मार्गक्रमण करत आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होणार आहे.

मला येथे आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद आणि आपणा सर्वांना माझ्याकडून अनेक शुभेच्छा.

धन्यवाद.