पीएम्इंडिया
महोदय,
दहशतवाद हे जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. जिथे संघर्ष सुरू आहे अशा प्रदेशांपासून ते त्यापासून दूरवर असलेल्या शहरातल्या रस्त्यांपर्यंत, दहशतवाद जीवघेणी किंमत घेत आहे.
दहशतवादाचा जुना ढाचा कायम आहे. काही देश अद्यापही राष्ट्राचे धोरण म्हणून त्याचा साधन म्हणून वापर करत आहेत. मात्र, दहशतवादाचे बदलते स्वरुपही आपण पहात आहोत. जागतिक संबंध, वाढता दहशतवाद आणि अपप्रचारासाठी सायबर यंत्रणेचा वापर.
खुल्या समाजाला नवा धोका आहे. भर्तीसाठीचा प्रदेश आणि हल्ल्यासाठीचे लक्ष्य एकच आहे ते म्हणजे समाज.
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे सर्वंकष जागतिक धोरणाचा अभाव आहे आणि आपल्याकडे असलेल्या साधनांचा निवडक वापर आम्हाला करायचा आहे.
महोदय,
आपण कशाला तोंड देत आहोत यापेक्षा महत्वाचे आहे ते म्हणजे या धोक्याला आपण कसा प्रतिसाद देत आहोत? दहशतवादाविरोधात सर्व जगाने एकमुखाने कोणत्याही राजकीय विचाराशिवाय एकत्रित कृती करायला हवी. दहशतवादी गटात तसेच राष्ट्रांत फरक करता कामा नये. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना आपण वेगळे केले पाहिजे आणि आपल्या मानवतेच्या मूल्यांची जपणूक करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे.
दहशतवादाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विधी चौकटीची फेररचना करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादावर सर्वसमावेशक करारही विनाविलंब आपण करायला हवा.
गुप्तवार्ता आणि दहशतवाद रोखण्यासंदर्भातले आंतरराष्ट्रीय सहकार्यही वाढायला हवे.
दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र पुरवठा रोखण्यासाठी, त्यांच्या हालचाली रोखण्यासाठी त्यांचा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आपल्याला दृढ प्रयत्नांची गरज आहे.
सायबर यंत्रणा सुरक्षित राखण्यासाठी दहशतवाद्यांना इंटरनेट आणि सोशल मिडियाचा त्यांच्या कारवायासाठी वापर करता येऊ नये यासाठी आपण एकमेकांना मदत करायला हवी.
जहालांविरुध्द सामाजिक अभियान चालवून त्यात धार्मिक नेते, विचारवंतांना सामावून घेण्याची गरज आहे. या अभियानाची युवकांसाठी जास्त गरज आहे.
धर्म आणि दहशतवादाची सांगड असता कामा नये. पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देणंही महत्वाचं आहे. सध्याचा शरणार्थीबाबतचा पेच सोडविण्यासाठीही याची गरज आहे.
महोदय,
जगभरात सुमारे 60 दशलक्ष जनतेला संरक्षणाची गरज आहे. पश्चिम आशियातल्या पेचामुळे मानवतेसंदर्भातल्या या आव्हानांकडे जागतिक लक्ष वेधले गेले आहे. संकटांचा सामना करणाऱ्या देशातही याचे मोठे परिणाम जाणवत आहेत. ज्या देशांनी आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत आणि निवारे उभारले आहेत त्यांचे आभार.
जागतिक स्तरावरच्या या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून ठोस आणि दीर्घकालीन दृष्टीकोनाची गरज आहे.
N. Chitale/S.Tupe/N.Sapre