पीएम्इंडिया
टागोर सांस्कृतिक सदभावना पुरस्कार विजेत्यांचे मी मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. ‘राजकुमार सिंहाजित सिंह’, राम सुतारजी आणि छायानट यांचा सन्मान हा कलेचा सन्मान आहे, संस्कृतीचा सन्मान आहे आणि ज्ञानाचा सन्मान आहे.
संस्कृती हा कोणत्याही राष्ट्राचा प्राणवायू असतो. यातूनच देशाची ओळख आणि अस्तित्वाला शक्ती मिळते. कुठल्याही राष्ट्राचा सन्मान आणि त्याचे वय संस्कृतीची परिपक्वता आणि सांस्कृतिक मुळांच्या मजबूतीनेच ठरते.
भारताकडे हजारो वर्षांचा एक सांस्कृतिक विस्तार आहे, ज्याने गुलामीच्या प्रदीर्घ कालखंडाचा, बाह्य आक्रमणाला प्रभावित न होता सामना केला आहे. या सगळ्या गोष्टींमागे स्वामी विवेकानंदजी आणि गुरुदेव रबिंद्रनाथ टैगोर यांच्यासारख्या अनेक विद्वानांचे योगदान असल्यामुळे हे शक्य झाले आहे.
भारताचे सांस्कृतिक सामर्थ्य एका रंगीबेरंगी माळेसारखे आहे, जिला तिच्या वेगवेगळ्या मण्यांचे विविध रंग शक्ती देतात. कोसा- कोसावर बदलणारे पाणी आणि चार कोसांवर बदलणारी वाणी भारताला बहुरंगी आणि बहुआयामी बनवतात.
भारताची हीच शक्ती गुरुदेवांनी ओळखली आणि रवींद्र संगीतात हे वैविध्य समाविष्ट केले. रवींद्र संगीतात पूर्ण भारताचे रंग आहेत आणि भाषेच्या बंधनापलिकडचे आहेत.
गुरुदेव, लोक-कला आणि पारंपरिक नृत्यांना देशाच्या संस्कृतीचे परिचालक मानायचे. मणिपुरी नृत्य शिक्षक नबाकुमार सिंहाजी यांचा त्यांच्यावर किती प्रभाव होता हे शांतिनिकेतन मध्ये गेल्यावर समजते.
आज टागोर पुरस्काराने सन्मानित राजकुमार सिंहाजित सिंह याच समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात. राजकुमारजी मणिपुरी नृत्याच्या प्रचार-प्रसाराप्रति समर्पित आहेत. त्यांनी मणिपुरी नृत्य परंपरेच्या माध्यमातून सांस्कृतिक सद्भावनेला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. भविष्यातही ते याच क्षेत्रात आपले योगदान देत राहतील अशी आशा आहे. या पुरस्काराबद्दल माझ्याकडून त्यांचे खूप-खूप अभिनंदन.
मित्रांनो, गुरुदेव प्रत्येक सीमेच्या पलिकडले होते. ते निसर्ग आणि मानवतेप्रति समर्पित होते. गुरुदेव संपूर्ण जगाला आपले घर मानायचे, त्यामुळे जगानेही त्यांना तेवढंच आपले मानले. आजही अफगाणी लोकांच्या तोंडी काबुलीवाल्याची गोष्ट आहे. आजही जगातील अनेक शहरांमध्ये त्यांच्या नावाशी निगडित आठवणी आहेत, अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये त्यांच्या नावाने अध्यासन आहे. साडेतीन वर्षांपूर्वी मी ताजिकिस्तानला गेलो होतो, तेव्हा मला तिथे गुरुदेवांच्या प्रतिमेचे लोकार्पण करण्याचे सौभाग्य लाभले होते.
मित्रांनो, अगदी क्वचित एखाद्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात दोन देशांचे पंतप्रधान सहभागी झालेले पाहायला मिळतात. ही गुरुदेवांप्रति आपुलकी होती, त्यांच्याप्रति श्रद्धा होती, ज्यामुळे विश्वभारतीच्या दीक्षांत समारंभात माझ्याबरोबर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील उपस्थित होत्या.
गुरुदेव यांची रचना ‘आमार सोनार बांग्ला’ बांग्लादेशची ओळख आहे, त्यांचे राष्ट्रगीत आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्या या सामायिक सांस्कृतिक वारशाला छायानट यांनी आणखी मजबूत केले आहे. छायानट यांची मानवतावादी आणि सांस्कृतिक मूल्य गुरुदेव यांच्या भावना अभिव्यक्त करतात. मी त्यांचे आजच्या सन्मानासाठी खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो, गुरुदेव यांच्याबद्दल बोलताना मी अनेकदा गुजरात मध्ये त्यांनी व्यतित केलेल्या दिवसांबद्दलही चर्चा करतो. त्यांचे बंधू अहमदाबादचे आयुक्त होते आणि आपल्या भावाबरोबर राहताना त्यांनी तिथे अनेक कविता रचल्या. गुरुदेव यांची रचना जन-गण-मनची जी भावना आहे ती एक भारत, श्रेष्ठ भारताचे प्रणेते सरदार वल्लभ भाई पटेल यांनी सशक्त केली.
मला आनंद आहे की, या दोन महानायकांना जोडणारा आज आणखी एक दुवा आहे. राम सुतारजी आज गुरुदेव आणि सरदार साहेब यांच्यातला सेतू बनले आहेत. सुतार यांनी स्टैच्यू ऑफ यूनिटीच्या माध्यमातून देशाचा गौरव वाढवला. राष्ट्रीय एकतेची भावना सशक्त करण्यात, भारतीयांची गौरवाची भावना आणखी मजबूत करणाऱ्या सुतार यांचे टागोर पुरस्कारासाठी मी पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो. आणि आता मी त्यांच्या भाषणात ऐकले आहे, त्यांचे वय तर ९३ च्या पुढे आहे मात्र त्यांच्या भाषणाचा मूलमंत्र हाच होता की अजून मला खूप काही करायचे आहे. हे प्रत्येक युवकाला प्रेरित करणारे आहे.
मित्रांनो, गुरुदेव यांचे कर्तृत्व आणि त्यांचा संदेश वेळ, काळ आणि परिस्थितीच्या पलिकडे आहे. मानवतेच्या रक्षणाप्रति त्यांचा आग्रह आणखी मजबूत करण्याची गरज आहे. आज जगात ज्याप्रकारची आव्हाने आहेत, त्यामध्ये गुरुदेव यांच्यासंबंधी वाचन, त्यांच्याकडून शिकणे हे अधिक प्रासंगिक आहे.
मी गुरुदेव यांच्या पंक्तींनी माझे भाषण संपवतो-
गुरुदेव यांनी लिहिले आहे –
”I slept and dreamt that life was joy.
I awoke and saw that life was service.
I acted and behold, service was joy.
म्हणजे
”मी झोपलो आणि स्वप्नात पाहिले की जीवन आनंद आहे.
मी जागा झालो आणि मी पाहिले की जीवन सेवा आहे.
मी केले आणि मला जाणवले , सेवा हाच आनंद आहे. ”
आपण सर्वजण हा सेवाभाव असाच कायम जपू, देशाची संस्कृती आणखी समृद्ध करण्यासाठी काम करत राहू याच कामनेसह पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा.
राष्ट्रपतींचे मी आभार मानतो, त्यांनी वेळ काढला आणि या समारंभाची शोभा अनेक पटींनी वाढवली. महेश शर्माजी यांचेही मी अभिनंदन करतो, त्यांच्या विभागाने अतिशय उत्तम प्रकारे या एका पुरस्काराच्या माध्यमातून त्या भावना जोडण्याचे काम उत्तमरित्या पार पाडले.
खूप-खूप धन्यवाद !!!
B.Gokhale/S.Kane/ P.Kor
Joined the programme to mark the conferring of the 'Tagore Award For Cultural Harmony' for 2014, 2015 and 2016.
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2019
I congratulate Rajkumar Singhajit Singh Ji, Chhayanaut and Ram V. Sutar Ji on being conferred the Tagore Award for their rich contribution to culture, art and music. pic.twitter.com/davsqdFHX4