Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तिसऱ्या भारत-आफ्रिका परिषदेदरम्यान संपादकीय मंचावर पंतप्रधानांचा आफ्रिकी पत्रकारांसोबत संवाद

तिसऱ्या भारत-आफ्रिका परिषदेदरम्यान संपादकीय मंचावर पंतप्रधानांचा आफ्रिकी पत्रकारांसोबत संवाद


पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन

तुम्हा सर्वांचे स्वागत. तुमच्यापैकी काहीजणांना यापूर्वी भारताला भेट देण्याची संधी मिळाली असेल आणि काही जणांसाठी ही पहिलीच वेळ असेल. मला विश्वास आहे तुमची याठिकाणी चांगली व्यवस्था झाली असणार. मला माहित आहे की याठिकाणी अधिकृत कार्यक्रम आहे पण या कार्यक्रमाव्यतिरिक्त तुम्हाला काही सुचवायचे असेल तर जरुर सांगा. मला वाटते की तुमची ही भेट केवळ भारत-आफ्रिका शिखर परिषदेसाठी नाही तर तुम्ही भारताला भेट देत आहात, हे महत्वाचे आहे आणि यासाठी माझ्या सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

भारत-आफ्रिका शिखर परिषद ही अनेक बाबींनी अतिशय महत्वपूर्ण असल्याचे मी मानतो. भारतासाठी हे महत्वपूर्ण आहे कारण भारत यजमान देश आहे. पण अशी पहिलीच परिषद आहे ज्यासाठी सर्व 54 आफ्रिकी देशांना आमंत्रण देण्यात आले आणि हे सर्व देश या परिषदेत सहभागी होत आहे. त्या अर्थाने भारत-आफ्रिका शिखर परिषद हा मोठा कार्यक्रम आहे आणि भागीदारीच्या स्तरावरदेखील सर्वात मोठी घटना आहे.

आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, 40 देशांचे प्रतिनिधीत्व त्या देशांच्या प्रमुख करणार आहेत तर उर्वरीत देशांचे प्रतिनिधीत्व त्या देशांच्या वरिष्ठ मंत्र्यांनी केले आहे. यावेळी, भारत-आफ्रिका शिखऱ परिषदेला जोडूनच व्यापार मंत्र्यांची परिषद आयोजित केली आहे कारण आम्हाला वाटते की आगामी काळात भारत आणि आफ्रिकी देशांदरम्यानचे आर्थिक संबंध दृढ झाले पाहिजेत.

यापूर्वी 2008 आणि 2011 मध्ये भारत-आफ्रिका शिखर परिषदा झाल्या. ही तिसरी शिखर परिषद आहे. यापूर्वीच्या दोन परिषदा बंजूल निकषानुसार आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यामुळे या दोन्ही परिषदांमध्ये मर्यादित देशांचा सहभाग होता. यावेळी मात्र आम्ही या निकषातून बाहेर पडून सर्व आफ्रिकी देशांच्या सहभागासाठी प्रयत्न केला. मला वाटते यामुळे भारत आणि आफ्रिका संबंध नव्या उंचीवर पोहचतील. अशाप्रकारची भागीदारी आणि समानता सर्व देशांना दिली पाहिजे. आमच्या बाजूने यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे म्हणून यापूर्वीच्या परिषदांपेक्षा या परिषदेला वेगळेपण प्राप्त झाले आहे. सर्व स्तरावर, उच्च पातळीवर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या भागीदारीमुळेच संपूर्ण आफ्रिकेमध्ये नवे चैतन्य पसरणार आहे. हे नवे चैतन्य फक्त आफ्रिकेसाठी नाही तर भारतासाठीही आहे व या परिषदेमुळे आपल्या संबंधांमध्येही नवा तजेला येणार आहे.

मला सांगण्यात आले की तुम्ही भारतात आला आहात आणि तुमचा आठवडाभर भरगच्च कार्यक्रम आहे, ज्यात तुम्ही देशाच्या विविध भागाना भेट देऊन तुम्ही स्वतः विकास व प्रगती पाहू शकाल. तुमच्या व्यतिरिक्त आफ्रिकेहून 400 पत्रकार या परिषदेचे वृत्तांकन करण्यासाठी येणार आहेत हे सर्वजण स्वखर्चाने येत आहेत. यावरुनच या परिषदेचे महत्त्व लक्षात येते. भेटणाऱ्या प्रत्येकाशी केलेल्या चर्चेतून मला जाणवत आहे की, या परिषदेने जगाचे लक्ष वेधले आहे आणि प्रत्येकजण या परिषदेकडे अतिशय महत्त्वपूर्ण दृष्टीने पाहत आहे, हे सुचिन्ह असल्याचे मला वाटते.

भारत आणि आफ्रिकी देशांदरम्यानचे संबंध हे केवळ राजकीय व आर्थिक नाहीत तर आमची अतिशय समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. असे म्हटले जाते की, कित्येक लाख वर्षांपूर्वी पृथ्वीचे दोन तुकडे हे एकच होते ते कालांतराने आशिया आणि आफ्रिका खंड झाले व आम्हाला विभागणारा सागर आहे. भारताचा पश्चिमी तट आणि आफ्रिकेचा पूर्व किनारा सागराने जोडला आहे. मी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात राज्यातील आहे. गुजराती समुदायानेच सुरुवातीला आफ्रिकेसोबत व्यापाराची सुरुवात केली व सागरी संबंध प्रस्थापित केले. आजही 270,000 भारतीय आफ्रिकेमध्ये राहत आहेत व त्यापैकी अनेक गुजराती आहेत. माझेसुद्धा आफ्रिकेशी नाते आहे ते म्हणजे केवळ मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो म्हणून नाही तर त्यापूर्वीही होते. माझे आफ्रिकी देशांशी नेहमीच संबंध राहिले आहेत आणि आफ्रिकेतून येणाऱ्या पाहुण्यांची नियमित भेट होते. आफ्रिकेतील बऱ्याच थोर व्यक्तींसोबत माझे चांगले संबंध आहेत. म्हणून वैयक्तिकदृष्ट्याही माझी या प्रदेशाशी जवळीक आहे.

किंबहुना भारत आणि आफ्रिकेमध्ये बरेच साम्य आहे आणि भारत-आफ्रिका मिळून जागतिक लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करते. भारताची लोकसंख्या पूर्ण आफ्रिका खंडाच्या लोकसंख्येएवढी आहे. आफ्रिका जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेल्या प्रदेशाचे प्रतिनिधीत्व करते तर भारत हा सुध्दा तरुण देश आहे. आज आपण जगाकडे पाहतो त्यावेळी दिसते की ही दोन ठिकाणेच अशी आहेत की ज्यांची 65 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षे वयोगटाखालील आहे आणि म्हणून मला वाटते की भारत व आफ्रिकेच्या दृष्टीने ही सुदैवाची बाब आहे.

भारत आणि आफ्रिकेदरम्यानचा द्वीपक्षीय व्यापार वेगाने वाढत आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये या वाढीचे प्रमाण आठ ते नऊ पट आहे. या परिषदेनंतर यात आणखी भरीव वाढ होईल असे मला वाटते. आज भारत आफ्रिकेतील एक प्रमुख गुंतवणूकदार आहे विशेषतः तेल क्षेत्रातील गुंतवणुकीमळे आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळत आहे.

आतापर्यंत झालेल्या दोन परिषदांमध्ये भारताने 7.4 अब्ज डॉलर्सची मदत सवलतीच्या दराने केली जी पायाभूत सुविधा, कृषी, उद्योग, ऊर्जा आणि जल क्षेत्रासाठी वापरण्यात आली. आज 40 पेक्षाही जास्त देशांमध्ये 100 प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे भारताने 100 हून अधिक संस्थांमध्ये 1.2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यामुळे मनुष्यबळ विकासाला मोठी मदत होत आहे. मला सुखावणारी बाब म्हणजे भारत-आफ्रिकेदरम्यान होणारी मनुष्यबळ विकासातील वाढ, क्षमता निर्माण ही होय. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही 25 हजार आफ्रिकी विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण दिले ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. आज आफ्रिकेतील उच्चपदस्थ नेत्यांपैकी सत्तेत असलेले व उच्च पदावर असलेल्या बऱ्याच जणांचे शिक्षण भारतात झाले आहे.

भारत-आफ्रिकेला जोडणारा आणखी एक दुवा म्हणजे सौर ऊर्जा. आफ्रिकेतील बऱ्याच देशांना सौर ऊर्जेचा लाभ मिळत आहे. आगामी काळात हा एक सबळ देशांचा समुह बनणार आहे. आगामी काळात जागतिक हवामानबदलाच्या समस्येविरुद्ध जगाची लढाई सुरू असताना जागतिक हवामानबदलाची तीव्रता कमी करण्यासाठी आपली भूमिका फार महत्त्वाची असणार आहे.

माझ्या दृष्टीने भारत आणि आफ्रिकेसाठी अभिमानाची बाब म्हणजे आज जरी जगासमोर हवामानबदलाची समस्या असली तरी भारत व आफ्रिका यांची संस्कृती व परंपरा प्रदूषित करणारी वा पर्यावरणाची हानी करणारी नाही. यामुळे आपण या पापाचे फार कमी प्रमाणात वाटेकरी आहोत आणि जगासमोरील या सर्वात मोठ्या समस्येसाठी अतिशय अल्प प्रमाणात कारणीभूत आहोत. मला वाटते हाही भारत आणि आफ्रिकेदरम्यान समान घटक आहे.

मला खात्री आहे की या परिषदेदरम्यान आणि परिषदेनंतरही भारत-आफ्रिकेला आत्मविश्वास देणारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, यामुळे आपले संबंध अधिक दृढ होतील, आणि आपण एकत्रितपणे जगासाठी योगदान देण्याविषयी पायाभरणी करू.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. परिषदेदरम्यान तुमचे स्वागत करण्याची आणखी एक संधी मला मिळणार आहे. धन्यवाद.

पंतप्रधानांची तिसऱ्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेदरम्यान आफ्रिकी पत्रकारांसोबतची लिखित मुलाखत

प्रश्न- भारतासाठी आफ्रिकेचे सामरिकदृष्ट्या सामाजिक, आर्थिक व राजकीय महत्त्व काय आहे? भारत आफ्रिकेच्या सहकार्याने चीनशी बरोबरी करण्यासाठी संसाधनांची जुळवाजुळव करत आहे का?

उत्तर- या परिषदेसाठी आलेल्या सर्व आफ्रिकी देशांचा सहभाग ज्यामध्ये 40 हून अधिक आफ्रिकी देशांच्या राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती ही भारत आणि आफ्रिकेदरम्यान असलेल्या मैत्री व परस्पर विश्वासाची साक्ष आहे.

हे संबंध सामरिकदृष्ट्या विचार करण्यापलीकडचे आहेत. हे संबंध दृढ भावनिक आहेत. आपल्याला जोडणारा इतिहास, शेकडो वर्षे जूने नाते, व्यापार व संस्कृती, वसाहतवादाविरुद्धचा समान लढा, समानतेच्या शोधासाठीची आपली धडपड, प्रत्येकाची थोरवी आणि समान न्याय, आणि आपली प्रगतीसाठीची सामुहिक आकांक्षा आणि जगात उमटणारा आवाज, आपल्याला परस्पर सदभावना आणि विश्वासाची देण आहे.

भारत आणि आफ्रिका जगाच्या एक तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करते. यापैकी तरुण लोकसंख्येचे प्रमाण मोठे आहे. किंबहुना या शतकात भारत आणि आफ्रिकेचा जागतिक युवा लोकसंख्येत महत्वाचा सहभाग असणार आहे. यांचे भविष्य मोठ्या प्रमाणात जगाची दिशा निश्चित करेल.

भारत आणि आफ्रिका हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आशेचे केंद्रबिंदू आहेत. भारत आज वेगाने विकसित होणारी महत्वाची अर्थव्यवस्था आहे. आफ्रिकाही वेगाने विकास करत आहे. भारत आणि आफ्रिका आपल्या देशवासियांची प्रगती आणि शांतता यासाठी बरेच काही करु शकतात. आपली भागीदारी ही परस्परांसाठीच्या शक्तीचा मोठा स्रोत असेल. परस्परांच्या आर्थिक विकासाला यामुळे गती प्राप्त होईल आणि यामुळे फक्त समावेशी, समान आणि शाश्वत जगाची निर्मिती होईल. आपले स्रोत आणि बाजारपेठा परस्परपूरक आहेत, तसेच मानवी भांडवलही. आमची जागतिक दूरदृष्टी सामाईक आहे.

आमचा आफ्रिकेसोबतच्या भागीदारीविषयीचा दृष्टीकोन सबलीकरण, क्षमता निर्माण, मनुष्यबळ विकास, भारतीय बाजारपेठेची उपलब्धता, आफ्रिकेतील भारतीय गुंतवणुकीला पाठबळ देणे हा आहे जेणेकरुन आफ्रिकी लोकांना सर्व पर्याय खुले राहतील आणि ते आपल्या भागाचा विकास होण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न करतील. आमचे आफ्रिकेसोबतचे संबंध एकमेवाद्वितीय आहेत ज्यांना कोणत्याही संदर्भात अडकवण्याची गरज नाही.

प्रश्न- आफ्रिका खंडाच्या विकासासाठी भारत आणि आफ्रिकेदरम्यानच्या संबंधाची कितपत मदत झाली? दोघांसाठी ही परिस्थिती लाभदायक कशी आहे?

उत्तर- आफ्रिकीची गेल्या काही वर्षांमध्ये झालेली प्रगती प्रभावी आहे. सर्वात प्रमुख बाब म्हणजे यासाठी आफ्रिकेचे दूरदर्शी नेतृत्व आणि त्यांनी आपल्या भागाच्या आर्थिक विकासासाठी केलेले प्रयत्न. शाश्वत विकास आणि आणि लोकांचे विशेषतः युवा आणि महिलांचे सबलीकरण यासंदर्भात आफ्रिकेच्या प्रेरणादायी यशोगाथा आहेत.

आफ्रिकेच्या प्रगतीतील एक भागीदार असल्याचा भारताला आनंद आहे. आफ्रिकी देशांना स्वातंत्र्य मिळण्यास सुरुवात झाल्यापासून भारताने आफ्रिकी देशांच्या मनुष्यबळ विकासाला पाठिंबा दिला आहे. आमच्या सहकार्याने आता नवे रुप धारण केले आहे आणि त्याची व्याप्ती वाढत आहे. 34 आफ्रिकी देशांना सव्वाशे कोटीच्या भारतीय बाजारपेठेत येण्यासाठी आयात शुल्क माफ केले आहे. आम्ही कबूल केलेल्या 7.4 अब्ज अमेरिकी डॉलर्समुळे आफ्रिकेतील पायाभूत सुविधा, विद्युत उत्पादन, सार्वजनिक सेवा आणि स्वच्छ ऊर्जा इत्यादी क्षेत्राच्या विकासाला मदत होत आहे. विकास होत आहे. आम्ही 1.2 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या मदतीसाठी कटीबद्ध आहोत ज्यामुळे आफ्रिकेतील 100 पेक्षाही जास्त संस्थांमध्ये मनुष्यबळ विकास आणि क्षमता निर्माण कार्य होईल. गेल्या तीन वर्षात भारतात 25000 आफ्रिकी विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण दिले आहे. संपूर्ण आफ्रिकेच्या ई-नेटवर्कमुळे 48 आफ्रिकी देश जोडले आहेत हा प्रादेशिक जोडणीचा आणि मनुष्यबळ विकासाचा नवा महामार्ग ठरत आहे. आफ्रिकेमध्ये थेट विदेशी गुंतवणूक करणारा भारत मोठा आणि झपाटयाने वाढत असलेला स्रोत ठरत आहे. आफ्रिकेमध्ये भारतीय पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे.

आफ्रिकेचा विकास ही भारतासाठी मोठी संधी आहे, जसे आफ्रिकेचे स्रोत, ज्यात तेल, यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि आफ्रिकेमध्ये संपत्ती आणि रोजगारनिर्मिती होईल. या प्रदेशाचा विकास जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य प्रदान करेल तसेच यामुळे भारताचाही लाभ होईल.

प्रश्न- काही विश्लेषकांच्या मते वसाहतवादाचा प्रभाव आणि नवं वसाहतवाद हे आफ्रिकेच्या शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी अडथळा ठरत आहेत. भारताचाही इतिहास अशाप्रकारचा आहे, मात्र भारताने वाद आणि विघटन यावर विजय मिळवत सुशासन, विकास आणि वाढ साध्य केली आहे. याविषयी भारत आफ्रिकेला काय शिकवण देऊ शकेल?

उत्तर- भारताच्या स्वातंत्र्याचा आफ्रिकेच्या वसाहतवादविरोधी आणि स्वातंत्र्यचळवळीवर सकारात्मक प्रभाव आहे. आम्हीसुद्धा आफ्रिकी देशांच्या स्वातंत्र्यासाठी ठाम भूमिका घेतली वर्णद्वेष संपवण्यासाठी प्रयत्न केले.

आफ्रिकेला आमच्याकडून कुठलाही धडा गिरवण्याची आवश्यकता नाही. वसाहतवादाचे आपणा सर्वांवर दूरगामी परिणाम आहेत. आफ्रिकेलाही या कठीण काळातून जावे लागले आहे. तथापि, सध्या आफ्रिका चांगली प्रगती करत आहे. या खंडाला सध्या स्थैर्य प्राप्त झाले आहे. आफ्रिकी देश आता आपला विकास, शांतता आणि सुरक्षेची जबाबदारी स्विकारण्यासाठी एकत्र येत आहेत. आफ्रिकी लोक आपल्या अधिकारांचा वापर करत आहेत. आर्थिक सुधारणा आणि प्रादेशिक आर्थिक सहकार्य व एकात्मता यासाठीच्या प्रयत्नांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. आर्थिक विकासाची गती वाढली आहे. 95 टक्के आफ्रिका मोबाईल फोनचा वापर करत आहे. शिक्षण, नवनवीन संशोधन, महिला सबलीकरण, कौशल्य विकास आणि नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण यासाठी पुढाकार घेतला जात आहे.

अर्थातच, आफ्रिकेला बऱ्याच परिचित अशा विकास समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुरक्षेविषयी नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत, यात दहशतवाद आहे, ज्याचा जगातील इतर भागावरही परिणाम होत आहे.

आफ्रिकेचा इतिहास समृद्ध आहे, विपुल नैसर्गिक संसाधने आहेत, मोठ्या प्रमाणात आणि प्रतिभाशाली तरुण लोकसंख्या आहे. आफ्रिकी जनता आणि नेतृत्त्वावर माझा पूर्ण विश्वास आहे, की ते “अजेंडा-2063” आम्हाला पाहिजे असलेली आफ्रिका (The Africa We Want) साध्य करु शकतील.

भारत एक मित्र आणि भागीदार या नात्याने मदतीसाठी नेहमी तयार आहे, अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करता येईल, आफ्रिकी देशांचे स्रोत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य करण्यात येईल. आफ्रिकेसमोरील आव्हाने आणि आमच्यासमोरील आव्हाने सारखीच आहेत, आमच्या समोरील आव्हानांवर आम्ही कशाप्रकारे मात केली आहे हे आफ्रिकी संदर्भातही लागू होते.

प्रश्न- द्वीपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकीतून भारत आणि आफ्रिकेला कशाप्रकारे लाभ होईल? यासंदर्भात 2008 पासूनच्या पहिल्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेपासून काय उपलब्धी झाली आहे?

उत्तर- भारत आणि आफ्रिकेदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीसाठी प्रचंड संधी असल्याचे मला दिसते. या शतकातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश भारत आणि सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आफ्रिका असणार आहे. आपणा दोघांकडेही तरुण लोकसंख्या आहे. आफ्रिकेला प्रचंड स्रोतांचे वरदान आहे. भारत आणि आफ्रिका दोघेही विकास करणार आहेत, आधुनिकीकरण आणि नागरीकरणाचा वेग प्रचंड असणार आहे.

आमच्या आर्थिक भागीदारीला गती मिळत आहे. भारताचा आफ्रिकेसोबतचा व्यापार 2007-08 या आर्थिक वर्षात 30 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढा होता तो 2014-15 मध्ये दुप्पटीपेक्षाही जास्त म्हणजे 72 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढा झाला आहे. भारत आणि आफ्रिकेतील आर्थिक वाढीशिवाय, भारताने 2008 मध्ये पहिल्या शिखर परिषदेदरम्यान घेतलेल्या कमी विकसित देशांसाठीच्या आयातशुल्क माफीच्या निर्णयामुळे भारत – आफ्रिका दोघांनाही लाभ झाला आहे. या योजनेचा 34 आफ्रिकी देशांना थेट लाभ होत आहे.

आफ्रिकेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये भारत चीनपेक्षाही अग्रेसर आहे.

पहिल्या दोन शिखर परिषदांदरम्यान आफ्रिकेसाठी दिलेल्या 7.4 अब्ज अमेरिकी डॉलर्स कर्जाच्या रक्क्मेचा वापर आफ्रिकेतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि द्वीपक्षीय व्यापारवृद्धीसाठी झाला आहे. तसेच आफ्रिकेतील प्रचंड स्रोत आणि उपलब्ध लागवडीयोग्य जमीन यामुळे केवळ आफ्रिकेची भरभराट होणार नाही तर भारताच्या वाढत्या गरजा पुरवण्यासाठीचा महत्त्वाचा स्रोत ठरणार आहे.

भारताने आफ्रिकेमध्ये मनुष्यबळ विकास आणि विविध संस्थांच्या वाढीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे आफ्रिकेमध्ये कौशल्य विकास आणि क्षमता निर्माण होण्यास मदत झाली आहे. कृषी, अन्न प्रक्रिया, वस्रोद्योग, लघु उद्योग यासारख्या क्षेत्रांमधून भारत आणि इतर देशांना निर्यात होत आहे.

मी आणखी एक मुद्दा नमूद करु इच्छितो तो म्हणजे, आफ्रिकेच्या बाजारपेठांचे एकात्मिकीकरण करण्यासाठीच प्रयत्न, यामुळे द्वीपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळाली आहे.

भारत आणि आफ्रिका 21 व्या शतकातील गुंतवणुकीसाठीचे नवे अग्रणी म्हणून उदयास येत आहेत. मी तिसऱ्या भारत-आफ्रिका परिषदेकडे आमची आर्थिक भागीदारी आणखी कशी वाढवता येईल तसेच जागतिक आर्थिक वातावरण अधिक पूरक कसे होईल आणि संस्थांत्मक आराखडा यादृष्टीने पाहत आहे.

प्रश्न- ब्रिक्स समुहाने जुलै 2015 मध्ये सुरू केलेल्या नवीन विकास बँकेचा आफ्रिकी देशांना कसा लाभ होईल?

उत्तर- नवीन विकास बँकेची सुरुवात ही जागतिक अर्थव्यस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. किंबहुना गेल्या काही दिवसातील आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेप्रमाणे हा एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे. यामुळे पाच ब्रिक्स देश बँकेच्या स्थापनेसाठी समान भागीदार म्हणून एकत्र आले आहेत, यामुळे अशा संस्थांच्या आर्थिक आराखडयाला एक नवे परिमाण लाभले आहे. विकसित देशांचे हित आणि अनुभव लक्षात घेऊन कर्जवितरणाचा आराखडा तयार करण्यात येईल. यामुळे विकसित देशांमध्ये पायाभूत गुंतवणुकीला अर्थसहाय्य करण्यासाठी नवे दालन खुले झाले आहे. यातून आफ्रिकेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येईल, तसेच भविष्यात आफ्रिकेसाठी स्वतंत्र खिडकी किंवा प्रादेशिक अस्तित्व नक्कीच दिसेल अशी आशा करतो.

प्रश्न- आफ्रिका खंडातील लोकांसाठी कृषी व पूरक व्यवसाय मूलभूत आहे का ? मग भारत आफ्रिकेला शाश्वत कृषी व्यवसायासाठी आणि विकासासाठी कशाप्रकारे मदत करु शकेल?

उत्तर- आफ्रिकेकडे जागतिक क्षेत्रापैकी 60 टक्के लागवडीयोग्य जमीन आहे, परंतु जागतिक उत्पादनापैकी केवळ 10 टक्के अन्नधान्याचे उत्पादन होते. कृषीक्षेत्राचा विकास हा केवळ आफ्रिकी खंडासाठी आर्थिक विकास, रोजगार आणि अन्नसुरक्षा एवढ्या पुरताच मर्यादीत असणार नाही तर यामुळे आफ्रिका जगाची अन्नाची गरज भागवू शकते. आफ्रिकेच्या सध्याच्या यशामुळे आम्हाला आफ्रिकेच्या कृषी क्षेत्राच्या भवितव्याविषयी विश्वास आहे.

भारताने गेल्या काही दशकांमध्ये कृषी आणि दुग्ध व्यवसायात नेत्रदीपक प्रगती केली आहे. या क्षेत्रांमध्ये आम्ही जगात आघाडीचे उत्पादक आहोत. भारताचे यश हे कमी भांडवलाधारीत शेती आणि विविधप्रकारची जैव विविधता यातून शक्य झाले आहे जे आफ्रिकेलाही लागू होऊ शकते. किंबहुना, 1960 च्या दशकापासून आफ्रिकी देशांमध्ये भारतीय कृषी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील कृषी व संबंधित अभ्यासक्रमासाठीच्या शिष्यवृत्ती आफ्रिकेत प्रचंड लोकप्रिय आहेत. आफ्रिकेसोबतच्या भागीदारीसाठी कृषी क्षेत्र हे अग्रक्रमाचे क्षेत्र आहे. यात अनेक बाबींचा समावेश आहे- मनुष्यबळ विकास, आफ्रिकेमध्ये कृषी संबंधित संस्थांची उभारणी करणे, सिंचन प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण, आधुनिक कृषी पद्धती. आज आम्ही भविष्याच्या दृष्टीने विचार करता, या क्षेत्रामध्ये आफ्रिकेसोबत काम करणे सुरू ठेवणार आहोत. तसेच भविष्यातील आव्हानेः हवामान संवेदनक्षम कृषी आणि हवामानबदलाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया. आम्ही कापणीनंतरची प्रक्रिया आणि पुरवठा साखळी यावरही लक्ष केंद्रीत करणार आहोत. यासंबंधी आफ्रिकेच्या प्राथमिकता काय आहेत हे ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.

प्रश्न- भारत आणि आफ्रिकेदरम्यानची आर्थिक भागीदारी ही व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण, क्षमता निर्माण यापलिकडची आहे. आगामी काळात भारताकडून आणखी काय अपेक्षा राहतील?

उत्तर- भारत-आफ्रिका आर्थिक भागीदारी ही केवळ व्यवहारापुरती मर्यादीत नाही. तर आमचे एकत्रित भाग्य आणि दक्षिण-दक्षिण सहकार्याची ताकद यामध्ये सामावली आहे. आमच्या लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारी आहे.

भारत नेहमी आफ्रिकेतील आपल्या मित्रांच्या गरजा आणि प्राथमिकता यानुसार काम करेल. नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या संधी आणि हवामान बदलासारखी नवीन आव्हाने यावर आम्ही एकत्रितरित्या काम करू. भविष्यासाठीच्या आराखड्यात आमची सामुहिक दूरदृष्टी आणि ध्येय, परस्परांची ताकद आणि क्षमता यांचे प्रतिबिंब असेल.

आमचे लक्ष मनुष्यबळ विकास, संस्था निर्माण, पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकासावर केंद्रीत असेल. आम्ही निल अर्थव्यवस्थेसाठी हवामानबदल आणि शाश्वत विकासासाठी एकत्रित कार्य करणार आहोत.

आगामी काही वर्षांमध्ये निश्चितच आम्ही आमची भागीदारी आणखी उंचीवर नेऊ. आमची भागीदारी अधिक परिणामकारक केली जाईल. यात आफ्रिकेसोबतचा विकासात्मक भागीदारी कार्यक्रमाचा परिणामकारक आढावा घेतला जाईल. ज्यात मुख्यत्वे क्षमता निर्माण, पायाभूत सुविधांसाठी पाठिंबा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण आणि आफ्रिकी भागीदारांसोबत चर्चा यांचा समावेश आहे.

प्रश्न- जागतिक राजकीयआणि आर्थिक परिस्थितीत बदल करण्याची भारताची कटीबद्धता ही, संयुक्त राष्ट्रसंघटनेचा स्थायी सदस्य बनण्याच्या महत्वाकांक्षेशी संबंधित आहे का?

उत्तर- जग सध्या राजकीय, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर प्रचंड वेगाने बदलत आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत सदस्यसंख्येत चौपट वाढ झाली आहे. सध्या अधिकारांविषयी जागृती आणि प्रगतीची आकांक्षा यांचा प्रसार झाला आहे. जागतिक सत्ताकेंद्राची विभागणी झाली आहे. आपण सध्या डिजीटल युगात राहत आहोत, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची परिभाषा बदलली आहे. शांतता आणि स्थैर्याला निर्माण झालेला धोका हा गुंतागुंतीचा, अनिश्चित आणि अपरिभाषीत आहे. अनेक अर्थांनी आपले आयुष्य जागतिक झाले आहे, पण त्याचवेळी दुषीत प्रवृत्ती वाढत आहेत. दहशतवाद, सायबर आणि अंतराळ हे धोका, संधी आणि आव्हानांचे नवीन घटक ठरत आहेत. हवामानबदलाचा जगासमोर धोका आहे. विकसित देश नागरीकरणाच्या नव्या लाटेमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीचा सामना करत आहेत.

तरीसुद्धा जागतिक परिप्रेक्ष, त्यातील संस्था आणि आमची विचारसरणी यातून गेल्या विश्व युद्धानंतरच्या परिस्थितीचे प्रतिबिंब दिसत आहे. या संस्थांनी आपल्यासाठी चांगले काम केले आहे, पण नव्या काळाशी सुसंगत बदल करुन या अधिक प्रभावी व्हायलाच पाहिजेत. सध्याचे जग विस्कळीत असेलही आपल्या युगातील आव्हाने आणि बदलांची सामना करण्याची क्षमता ही कमकुवत ठरेल.

म्हणून जागतिक राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा संस्थांमध्ये सुधारणा व्हाव्या अशी भारताची इच्छा आहे. त्या अधिक लोकशाहीवादी, सर्वसमावेशक आणि सर्वंकष जागतिक प्रतिनिधीत्व करणाऱ्या झाल्या पाहिजेत. जर या संस्था आफ्रिका किंवा 1/6 लोकसंख्या असणाऱ्या जगातील सर्वात मोठया लोकशाहीला प्रतिनिधीत्व देत नसतील तर त्या संस्था सर्वसमावेशक नसतील. म्हणून आम्ही संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेत आणि जागतिक आर्थिक संस्थांमध्ये सुधारणांची मागणी केली. भारत आणि आफ्रिका जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक-तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करतात. म्हणून त्यांनी या सुधारणांसाठी एकमुखाने आवाज उठवला पाहिजे.

प्रश्न- या परिषदेमुळे (आयएफएस-III) भारत-आफ्रिकेतील सहकार्याला कशा प्रकारे मूर्त स्वरुप येईल?

उत्तर- आमच्या भागीदारीची व्याप्ती वाढवणे, आमच्या आंतरराष्ट्रीय एकतेला मजबूत करणे, सहकार्य वाढवणे हा आमचा उद्देश आहे. मी ज्यावेळी आफ्रिकेचा अजेंडा 2063 पाहतो, त्यातून दिसून येते की, आमची विकासात्मक लक्ष्ये आणि आंतरराष्ट्रीय आकांक्षा यात बरेच साम्य आहे. हाच आगामी काळातील आमच्या भागीदारीचा पाया असणार आहे.

दिल्लीतील तिसऱ्या भारत-आफ्रिका परिषदेनिमित्त, आम्ही आमची महत्वाकांक्षी ध्येय आणि विकासात्मक भागीदारीसाठी नवे मानक निर्माण करण्याची आशा आहे. गेल्या दशकातील अनुभव पाहता याला अधिक परिणामकारक करत येईल. भूतकाळात, आमचे प्राथमिक ध्येय म्हणजे आफ्रिकी देशांना त्यांच्या विकासासाठी मदत करणे हे होते. आता आम्ही सध्याची प्रमुख आव्हाने अन्न, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण यावरही लक्ष केंद्रीत करणार आहोत. परस्परांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी वातावरण निर्मिती करु. हवामानबदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही एकत्रित काम करु. शाश्वत निल अर्थव्यवस्थेसारख्या नव्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, अंतराळ विज्ञान आणि जीवनमान बदलण्यासाठी नेटवर्कयुक्त जग यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. हा एकेरी मार्ग असणार नाही. आम्ही आफ्रिकेच्या विविध क्षेत्रांमधील यशोगाथांपासून बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत.

जागतिक स्तरावर आमची भागीदारी प्रस्थापित करु, सुरक्षा सहकार्य वाढवण्यात येईल, यात सागरी सुरक्षा, दहशतवादाचा सामना याचा समावेश असेल.

तिसरी परिषद, ज्यात सर्व आफ्रिकी देशांचा प्रथमच सहभाग आहे यामुळे भारत-आफ्रिका मैत्रीचे नवे पर्व आरंभ होईल.

S.Thakur/S.Tupe