Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तुमकुर इथल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक लिमिटेडच्या नव्या हेलीकॉप्टर कारखान्याच्या भूमीपूजन समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे भाषण

तुमकुर इथल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक लिमिटेडच्या नव्या हेलीकॉप्टर कारखान्याच्या भूमीपूजन समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे भाषण

तुमकुर इथल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक लिमिटेडच्या नव्या हेलीकॉप्टर कारखान्याच्या भूमीपूजन समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे भाषण

तुमकुर इथल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक लिमिटेडच्या नव्या हेलीकॉप्टर कारखान्याच्या भूमीपूजन समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे भाषण

तुमकुर इथल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक लिमिटेडच्या नव्या हेलीकॉप्टर कारखान्याच्या भूमीपूजन समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे भाषण


व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू-भगिनीनों,

पंतप्रधान झाल्यानंतर माझे तुमकुर जिल्ह्यात हे दुसऱ्यांदा येणे झाले आहे. आज एक भूमीपूजन समारंभ झाला आहे असे आपल्याला वाटत असेल, इथे कुठलातरी कारखाना होणार आहे, असंही लोकांना वाटत असेल, पण इथे कुठला तरी सामान्य कारखाना होणार नाही. या जमिनीवर असे काही होणार आहे, जे भारताचे संरक्षण करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. बघता-बघता हे छोटेसे गांव, हा तुमकुर जिल्हा जगाच्या नकाशावर स्वत:ची ओळख निर्माण करणार आहे. कुठला सामान्य कारखाना उभा राहिला असता, तर ना देशाचे लक्ष गेले असते, ना जगाचे. पण इथे असं काही होणार आहे, की ज्या कडे जगाचे लक्ष वेधणे स्वाभाविकच आहे.

आज आणखी एक सुयोग आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिकल लिमिटेड जी हाल “HAL” या नावाने परिचित आहे, ती आपल्या प्रवासाचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहे. “ हाल” चा हा 75 वर्षांचा प्रवास अनेक वैविध्याने भरलेला आहे. आज “हाल” चे अनेक माजी अध्यक्ष, या सुयोगाची शोभा वाढवण्यासाठी आले आहेत. गेल्या 75 वर्षात “हाल” साठी ज्या-ज्या लोकांनी कामं केलं, छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, मग ते कामगार असोत वा अध्यक्ष, मी या 75 वर्षांच्या सफळ प्रवासाच्या वेळी, या प्रवासातल्या सर्व सहकाऱ्यांचे स्मरण करतो, त्यांचे अभिनंदन करतो.

एक काळ असा होता की, आपल्या देशात खाण्यासाठी आपल्याला बाहेरुन धान्य आणावं लागत होतं. परदेशातून धान्य मागवून आम्हाला देशवासियांचे पोट भरावे लागत होते. परंतु जेंव्हा लाल बहादुर शास्त्रीजींनी “जय जवान, जय किसान” चा मंत्र दिला, देशातल्या शेतकऱ्यांना देशाची भूक भागवण्यासाठी प्रेरीत केले. भारतातल्या शेतकऱ्यांनी गेल्या 50 वर्षात जी मेहनत केली, नवे-नवे शोध लावले, कृषि क्षेत्रात नव्या-नव्या योजना आणल्या त्याचा परिणाम असा झाला, की आज देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालाय. आमच्या शेतकऱ्यांनी “जय किसान” हा मंत्र साकार करुन दाखवला. आपल्या उपजिविकेचे साधन बनवले आणि अन्नधान्य क्षेत्रात देशाला स्वावलंबी केलं. परंतु “जय जवान” हे दुसरे काय आहे, ज्यामध्ये आपला देश संरक्षणाच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावा, स्वावलंबी बनावा, आपल्या संरक्षणासाठी भारताला जगातल्या कोणाचेही आश्रित होऊन रहावे लागू नये. हे काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे.

आजही आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या देशातल्या नागरीकांच्या रक्षणासाठी आपले जवान जीवाची बाजी लावायला सज्ज आहेत, बलिदान करायला तयार आहेत. पण आमच्या जवानांना लढण्यासाठी जी शस्त्रे पाहिजेत, जी साधने हवीत, दुर्गमातल्या दुर्गम जागी जाण्यासाठी जी व्यवस्था हवी या सर्वांच्या बाबतीत आपल्याला अजून खूप अंतर पार करायचे आहे. भारतीय सैन्य जगातल्या इतर कुठल्याही सैन्यदलापेक्षा कमकुवत असता कामा नये. भारतीय सैन्याजवळ जगातल्या कोणत्याही देशापेक्षा कमी सामर्थ्यशाली शस्त्रे असता कामा नयेत.

आज भारतीय सैन्यासाठी ज्या शस्त्रास्त्रांची गरज भासते, ती आपल्याला परदेशातून आणावी लागतात. अब्जावधी रुपये परदेशात जातात. परदेशातून आपल्याला जी शस्त्र मिळतात, ती अत्याधुनिक शस्त्रांपेक्षा थोडी कमी सामर्थ्यशाली असतात. एकीकडे रुपये तर जातातच पण तिकडे जी वस्तू 2005 मध्ये चालत होती, 2010 मध्ये चालत होती, ती वस्तू ते आपल्याला 2015 मध्ये देतात. 2015 मधल्या बरोबरीच्या वस्तू पाहिजेत असं म्हटले, तर त्या 2020 मध्ये मिळतील असं सांगतात आणि त्यामुळेच जर जगात भारताला आपल्या स्वयंसुरक्षा क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हायचे असेल, तर भारताला आपल्या गरजेनुसार, आपल्या संरक्षणासाठी स्वत:ची शस्त्रास्त्रे स्वत:च निर्मित करावी लागतील आणि यासाठीच आपल्या सरकारने संरक्षण उत्पादन, शस्त्रास्त्रांची भारतातच निर्मिती ती देखील भारतीय अभियंत्याद्वारे, भारतीय वैज्ञानिकांद्वारे, आधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर अधिक जोर द्यायला सुरुवात केली आहे.

पहिल्यांदा आपण जगातल्या इतर देशांकडून शस्त्रास्त्र घेत होतो आणि जोपर्यंत आपण उत्पादन सुरु करत नाही तोपर्यंत आजही घ्यायला लागतील. पण हल्ली जेंव्हा आपण जगातल्या देशांबरोबर शस्त्रास्त्र खरेदीचा करार करतो, तेंव्हा आम्ही असे सांगतो, की आपण ज्याची निर्मिती करत आहात तेवढी आम्ही आत्ता घेऊ, मात्र आमची जी उर्वरीत मागणी आहे, ती तुम्हाला भारतातच निर्मित करायला लागेल, जी “मेक इन इंडिया” अंतर्गत असायला हवी, तेंव्हाच आम्ही ती घेऊ आणि यासाठीच माझ्या बंधू-भगिनीनों, आपल्या या छोट्याश्या गावाच्या बाजूला, तुमकुर सारख्या जिल्ह्यात हा जो हेलिकॉप्टर निर्मितीचा प्रकल्प सुरु होत आहे. ही हेलीकॉप्टर्स मुख्यत्वेकरुन सैन्यदलांसाठी वापरण्यात येतील. दुर्गम भागात जिथे आपली सेना तैनात असते, तिथे जर आपला कोणी जवान आजारी पडला आणि त्याला त्या दुर्गम ठिकाणी औषधे पोहोचवायची असतील तर इथे जी हेलीकॉप्टर्स तयार होतील, ती हेलीकॉप्टर्स ही औषधे पोहोचवण्याचे काम करतील.

एका प्रकारे, संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनण्याच्या दिशेने, आज जानेवारी 2016 च्या जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात एका नवीन प्रयत्नाची सुरुवात होत आहे. एका अर्थी 2016 हे नवं वर्ष नव्या पद्धतीने साजरा करण्याची संधी मिळाली आहे. भारताला विशेषत: कर्नाटकला आणि त्यातही विशेषकरुन तुमकुर जिल्ह्याला, ही 2016 मधली भारत सरकारची ही अमूल्य भेट आहे आणि हे काम पण एवढ्या वेगाने करायचे आहे की, 2018 मध्ये इथून पहिल्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केले पाहिजे. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे हेलीकॉप्टर या भूमीवरुन 2018 मध्ये उड्डाण करेल, अशी आमची अपेक्षा आहे.

आणखी एक स्वप्न आहे की जेंव्हा पहिल्या हेलीकॉप्टरची निर्मिती होईल, त्या नंतर 15 वर्षांच्या आत इथे 600 हेलीकॉप्टर्सची निर्मिती होऊन, ती भारतीय सैन्यदलांकडे पोहोचली पाहिजेत आणि सरकारच्या उपयोगी पडली पाहिजेत, देशासाठी उपयोगी पडली पाहिजेत. इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करायचे आहे. मला विश्वास आहे की, एचएएल (हाल) च्या 75 वर्षांच्या या प्रवासात, त्यांच्याकडे उत्तम दर्जाचे सक्षम मनुष्यबळ आणि देशापुढील स्वप्नांसोबत एकदिलाने वाटचाल करण्याची त्यांची इच्छा आहे. 15 वर्षात अश्या 600 हेलिकॉप्टर्सची निर्मिती असे जे स्वप्न आहे, ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या प्रकल्पामुळे इथे जवळजवळ 5 हजार कोटी रुपयांच्या निधीची गुंतवणूक होणार आहे. तुमकुर जिल्ह्यात हा सर्वाधिक गुंतवणूक असणारा कारखाना उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे 4 हजार कुटुंबातल्या कोणा ना कोणा व्यक्तिला इथे रोजगार मिळणार आहे.

आज जर एखाद्या शेतकऱ्याच्या घरी तीन मुले असतील आणि या शेतकऱ्याला विचारले की, या मुलांसाठी भविष्यातील तुमच्या काय योजना आहेत ? ते शेतकरी कितीही मोठ्या जमिनीचा मालक असो, सिंचनाच्या उत्तमातल्या उत्तम सोयी त्याच्याकडे असोत. जमीन देखील सर्वोत्तम पीक देणारी असो पण जेंव्हा या शेतकऱ्याला विचारणा केली जाते की, त्याने आपल्या मुलांच्या भविष्याबाबत काय विचार केला आहे, तेंव्हा हा उत्तमातली उत्तम जमीन असणारा, सिंचनाची उत्तम सोय असणारा शेतकरी त्वरित उत्तर देईल की, एका मुलाला शेतीत लावेन पण बाकीच्या दोन मुलांना शहरातल्या कुठल्या तरी कारखान्यांमधे रोजगार कमावण्यासाठी पाठवून देईन आणि यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या कुटुंबातील दोन तृतीयांश हिस्सा शेतीतून बाहेर काढून कोणते ना कोणते काम करण्यासाठी, रोजगार मिळवण्यासाठी उद्योग क्षेत्रात वाढवू इच्छितो. आणि जर का शेतकऱ्याला पण मदत करायची असेल, शेतकऱ्याच्या भावी पिढीचीही मदत करायची असेल तर उद्योग उभारल्याखेरीज शेतकऱ्याच्या मुलाला रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण होणे असंभव आहे.

आपल्या राज्यघटनेचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर वारंवार या गोष्टीचा आग्रह धरत असत की भारतात लवकरात लवकर औद्योगिकरण व्हायला हवे, उद्योगिकरणही व्हायला हवं आणि ते म्हणत असतं कि, दलितांकडे जमिन नाही, तर दलित काय करणार? जर उद्योग उभे राहिले, तरच दलिताच्या मुलाला काहीतरी काम मिळेल. आणि यासाठीच बाबासाहेब आंबेडकर भारताच्या आर्थिक विकासासाठी आणि भारताच्या सामाजिक वीणेला सामर्थ्य देण्यासाठी औद्योगिकीकरणाचे पाठीराखे होते. एका प्रकारे हे हेलिकॉप्टर निर्मितीचे कार्य देशाच्या संरक्षणाचेही काम तर आहेच, पण शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोजगार देण्याचेही काम आहे. हा प्रकल्प भारताला शक्तीशाली करण्यासाठीही आहे आणि हा प्रकल्प बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठीही आहे. कर्नाटक सरकार यांचे यापुढेही सहकार्य मिळत राहील, भारत सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळेल आणि हाल (एचएएल) च्या मित्रांनी जो विडा उचललाय, मी 2018 मध्ये इथून पाहिन हेलिकॉप्टर उड्डाण करेल, त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

जेव्हा कर्नाटकचा दौरा ठरत होता, तेंव्हा काही दिवसांपूर्वी मी तुमकुर जिल्ह्यात आलो होतो, तेंव्हा आमच्या व्यवस्थापकांनी हा विचार मांडला होता, की तुम्ही इथे याल, 15 मिनीटात भूमिपूजन समारंभ होईल आणि तुम्ही 2-5 मिनिटांमध्ये तुम्हाला जे सांगायचे ते सांगून परत जायला निघाल. पण मी कधीही असा विचार केला नव्हता की, एवढ्या उन्हातही लाखो लोक माझ्यासमोर उपस्थित आहेत. हे मी पाहतो आहे. जिथपर्यंत माझी नजर पोहोचते आहे, तिथपर्यंत लोकच लोक दिसत आहेत. मी तुमच्या या अलोट प्रेमाबद्दल आपला खूप-खूप आभारी आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नमस्कार.

J. Patankar/S. Tupe/M. Desai