पीएम्इंडिया
दारिद्रय आणि उपासमार दूर करण्यासाठी, इब्सा निधीबाबत भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान त्रिस्तरीय करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या निर्णयामुळे इब्सा निधी मजबूत होण्यास मदत होईल. इब्सा देश या निधीमध्ये दरवर्षी प्रत्येकी 10 लाख अमेरिकन डॉलर्सचे योगदान देतात. जानेवारी 2015 पर्यंत या निधीमध्ये 28.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स जमा झाले आहेत. अंमलबजावणी झालेले/मंजूर झालेले एकूण प्रकल्प 26.2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे असून उर्वरित 2.09 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कार्यक्रमासाठी उपलब्ध आहेत. भारताने आतापर्यंत या निधीमध्ये 9.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले आहे.
इब्सा निधीतून तीन देशांमध्ये विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
इब्सा निधीतून अर्थसहाय्य देण्यात आलेला पहिला प्रकल्प कृषी आणि पशुधन विकासाच्या मदतीसाठी होता. इब्सा निधीला डिसेंबर 2006 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र दिन कार्यक्रमात दक्षिण-दक्षिण भागीदारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यातून दक्षिण-दक्षिण विकास सहकार्यासंदर्भात इब्सा निधीचे महत्त्व आणि मान्यता दिसून येते.
दारिद्रय आणि उपासमार निर्मूलनासाठी 2004 मध्ये सहकार्याच्या तीन स्तंभांपैकी एक स्तंभ म्हणून इब्सा निधीची स्थापना करण्यात आली. जागतिक राजकीय मुद्यांबाबत सल्लामसलत आणि समन्वय आणि प्रमुख प्रकल्पांमध्ये त्रिस्तरीय सहकार्य हे दोन अन्य स्तंभ आहेत.
S. Kane/S.Tupe/N.Sapre