पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार आणि मोझांबिक सरकार यांच्यातल्या सामंजस्य कराराला आज मंजुरी दिली.
भारत सरकारचे नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि मोझांबिक सरकारचे ऊर्जा आणि खनिज साधनसंपत्ती मंत्रालय यांच्यात नवी दिल्ली येथे 5 ऑगस्ट 2015 रोजी मोझांबिकचे राष्ट्रपती फिलिप न्यूसी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या करारामुळे दोन्ही देशांमदरम्यान द्विपक्षीय सहकार्य मजबूत व्हायला मदत होईल.
पार्श्वभूमी :-
या सामंजस्य कराराचा उद्देश, परस्पर हिताच्या नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जेसंबंधी तांत्रिक द्विपक्षीय सहकार्य, गुंतवणूक प्रोत्साहन आणि भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक सहकार्य संबंध विकसित करणे हा आहे. पुनर्नवीकरणीय ऊर्जेबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्यावर सहकार्याचा भर असेल.
S.Kane/S.Tupe/N.Sapre