Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीत झालेल्या रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण

नवी दिल्लीत झालेल्या रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधानांचे भाषण


उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर,

ज्यांना ज्यांना आज पुरस्कार मिळाला, त्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि आणखी बरेच लोक आहेत, ज्याना कदाचित पुरस्कार मिळू शकला नसेल, त्यांची संधी थोडक्यात हुकली असेल. मी त्या सर्वांचेही अभिनंदन करतो, कारण पत्रकारितेचा हा वारसा सुरु राहायला हवा. प्रत्येकाची लेखणी, त्याचे विचार, त्याची मेहनत देशाला पुढे नेण्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे योगदान देत असते.

असे खूप जण असतात, जे आपल्या आयुष्यात आपापल्या क्षेत्रात स्वतःचे असे स्थान बनवतात.काही लोक असेही असतात जे आपल्या आयुष्यात स्वत:च्या कार्यक्षेत्राबाहेरही कर्तृत्व गाजवून आपले स्थान बनवतात. मात्र असे खूप कमी लोक असतात, जे आपल्या जीवनकाळातच नव्हे, तर त्याहीपलीकडे आपल्या क्षेत्रात असे कर्तृत्व गाजवतात की त्यामुळे त्यांचे नाव अमर होऊन जाते. अशाच नावांपैकी एक नावं म्हणजे रामनाथ गोयंका !

मला रामनाथ गोयंका यांची भेट घेण्याचे भाग्य लाभले होते. ते एकदा गुजरातला आले होते. ते ज्या पदावर होते, त्या पदावर त्यांची भेट घेण्यासाठी राजकीय पक्षाचे अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री असे कोणी दिग्गज व्यक्तीच जाऊ शकत होते.मी तर तेव्हा कोणीच नव्हतो. जर मी शहरातल्या एखादा संपादकाना भेटीची वेळा मागितली असती, तर त्यानेही भेटीची एक महिना वेळ दिली नसती. मात्र मला रामनाथजींचे दर्शन घेण्याची संधी लाभली. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाचा तो काळ होता. रामनाथ गोयंका यांच्या मनात जी ज्वाळा होती, तिचा अनुभव त्यांच्याशी झालेल्या भेटीतच मिळाला. आणि ती ज्वाळा केवळ इंडीयन एक्स्प्रेस या वृत्तपत्रापुरती नव्हती. वर्तमानापत्राच्या माध्यमातून जे अभिव्यक्त होता येईल, ते तर ते करत होतेच, मात्र केवळ त्यावर ते समाधानी नव्हते. त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी वर्तमानपत्र खूप कमी होते. आणि म्हणूनच वर्तमानपत्राच्या परिघाबाहेरही काही करण्याची त्यांची इच्छा होती, आणि ते हे काम करतही होते. जयप्रकाश नारायण यांच्या मागे एक शक्ती म्हणून उभे राहण्याचे काम त्या काळात कोणी केले असेल तर ते रामनाथ गोयंका यांनी केले. ते आपल्या तत्वांचे अगदी पक्के होते. आणि एका कुटुंबाशी घनिष्ट संबंध असूनही त्यांनी त्यामुळे आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. त्या कुटुंबाची कृपा दृष्टी असावी म्हणून कित्येक लोक धडपड करतात,मात्र रामनाथ गोयंकानी प्रसंगी त्या कुटुंबाशी नाते तोडले, मात्र तत्व बाजूला ठेवली नाहीत. स्वतःची तत्व आणि आदर्श जपण्याचे साहस त्यांनी त्या आंदोलनाच्या काळात दाखवले.

आणि म्हणूनच पत्रकारितेच्या लेखणीतून जे लिहिले जाते, जे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापले जाते, ते तेवढ्या एका दिवसापुरते सीमित राहत नाही. भारताचा पूर्ण इतिहास बघा.. आज पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात काय शिकवले जाते मला माहित नाही, मात्र जर आपण भारतातल्या पत्रकारितेचा इतिहास चाळून पाहिला तर आपल्याला जाणवेल की पत्रकारिता क्षेत्राच्या प्रगतीचा प्रवास हा भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रगतीच्या इतिहासाशी समांतर होता. या देशातले कुठलेही आंदोलन असे नव्हते जे कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्राशी जोडलेले नसेल.प्रत्येकाला वाटत होते, की इंग्रज सरकारशी लढायचे आहे, तर माझ्याजवळ हेही एक साधन आहे, ज्याच्या आधारे मी इंग्रजांशी दोन हात करू शकतो. आणि पत्रकारितेच्या क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या अनेकांना कित्येक वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. मात्र त्यांनी आपला लढा थांबवला नाही. आपल्या देशातील प्रत्येक महनीय व्यक्ती, मग ते लोकमान्य टिळक असोत, गांधीजी असोत, श्री अरबिंदो .. प्रत्येक महान व्यक्तीने आपल्या कारकीर्दीत वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनाला एक मोठी ताकद दिली होती. भारताचे आणखी एक वैशिष्ट्य आम्हाला जाणवते, ते म्हणजे आपल्या देशातील साहित्यिक.. सरस्वतीदेवीचे पुत्र . ज्यांची कविता सहज कागदावर उतरते, सृजनशील साहित्याची जे निर्मिती करतात, ज्यांच्यावर सरस्वती देवीची सदैव कृपा असते,अशा जवळ जवळ सर्वच प्रतिभावंतानाही एकेकाळी पत्रकारितेशी जोडून घ्यायला आवडते.आणि पत्रकारिता शिकवली जाऊ शकत नाही. हे साहित्यिक कवितेतून भावनांना साद घालत तर पत्रकारितेतून समाजात एक उत्साह संचारत. कवितेच्या ताकदीपेक्षा त्यावेळी त्याना त्यावेळी पत्रकारितेतून मिळणाऱ्या ताकदीची अनुभूती होत होती. कवितेचा मार्ग स्वतःच्या आनंदासाठी तर पत्रकारितेचा मार्ग राष्ट्राच्या कल्याणासाठी निवडून या साहित्यिकांनी देशाची सेवा केली. हा एकप्रकारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचाच प्रवास आहे. आणि इंग्रज सरकारला या देशात ज्यांची भीती वाटत होती, त्यापैकी एक उच्चविद्याविभूषित लोक ! इंग्रजाना वाटत होते, की या लोकांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा, त्यांच्याविरुद्ध लढा द्यायला हवा.

देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही सक्षम करण्यात, लोकशाहीची वाटचाल योग्य दिशेने सुरु ठेवण्यात पत्रकारितेची भूमिका अतिशय महत्वाची ठरली. कोणावर केवळ टीका करण्यासाठी नाही, कोणाला भलेबुरे बोलण्यासाठी नाही, तर ती एक व्यापक भूमिका होती. कल्पना करा, की देशात एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ आली.तर आपण साहाजिकच भूतकाळात आलेल्या अशा आजाराविषयी आठवण काढतो, की त्यावेळी असे झाले होते. कारण अनुभवाच्या मार्गावरून नव्या गोष्टींकडे जाणे अधिक सोपे असते. आणि म्हणूनच लोकशाहीवर कसे संकट येऊ शकते, आणि अशा काळात लोकशाहीचे महत्त्व कसे अबाधित ठेवावे, हे समजून घेण्यासाठी आणीबाणीचा काळ अतिशय उपयोगी आहे. मात्र आणीबाणीचा उल्लेख केला तर काही लोकांना वाईट वाटते. त्याकडे राजकीय नजरेतूनच बघितले जाते. मला वाटते की राजकारणाचा खेळ आता संपला आहे. आज मी निरपेक्ष भावनेने त्याची मीमांसा करू शकतो, मी त्यावर ‘टीका’ हा शब्द वापरलेला नाही, तर मीमांसा म्हणतो आहे. आणि ही मीमांसा प्रत्येक पिढीत व्हायला हवी म्हणजे असा कुठला राजपुरुष पुन्हा जन्माला येणार नाही, ज्याला अशाप्रकारची दुर्बुद्धी होईल. हे आमच्यासाठी, म्हणजेच राजकारण्यासाठी खूप आवश्यक आहे. आम्हालाही नेहमी सजग राहण्यासाठी आणिबाणी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हे ही खरे आहे की, तेव्हा माध्यमांच्या सामर्थ्याची चर्चा होत असे, मात्र आणिबाणीच्या कालखंडात हे सिद्ध झाले की या माध्यमंविषयी जे ऐकले-बोलले जाते , तसे वास्तवात नाही. खरे चित्र वेगळेच आहे. आणीबाणीला आव्हान देणारे अतिशय कमी लोक होते, अगदी बोटावर मोजता येणारे! आणि या लोकांचे नेतृत्व तेव्हा रामदास गोयंकाजी यांनी केले होते, इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाने केले होते, अगदी निडरपणे केले होते. म्हणूनच मला वाटते की इतिहासाची ही पाने लोकशाहीसाठी आवश्यक आहेत. लोकशाहीच्या प्रत्येक युगात सजग राहणे आवश्यक आहे.

आज मला असेही वाटते की गेल्या संपूर्ण शतकात जी आव्हाने माध्यमांपुढे नव्हती, ती आव्हाने आज आहेत. कदाचित याआधी कधी हा त्रास झाला नसेल. कारण, त्याचे मूळ कारण तंत्रज्ञान हे आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज माध्यमांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. आधी बातमी २४ तास उशीरा यायची तरीही ती बातमीच वाटायची. आज २४ सेकंद जरी झाले, तरीही अरे, ‘मला माहित नाही -अरे तुला माहित नाही,असं असं झालं’ अशी चर्चा मोबाईलवरून सुरु होते. माध्यमांमुळे आज आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यातली घडामोड आपल्याला कळते.

जेव्हा दूरचित्रवाणीवरची माध्यमे आलीत तेव्हा सरकारांना काळजी वाटायला लागली. कुठे काही घटना घडली, त्याची बातमी आली , तर सरकारला प्रतिसाद द्यायला वेळ मिळायला हवा. म्हणजे समजा एखादा साथीचा आजार आला, तर लोकांना सावध करावे लागेल, उपाय करावे लागतील, कुठे काही दंगल झाली तर पोलिसांना पाठवावे लागेल. पण बातमीनंतर तेवढा वेळ दिला जात नव्हता. माध्यमांसाठी तर ती बातमी असते. ‘ब्रेंकिंग न्यूज’ ! का? माहित नाही! आणि या इलेक्ट्रोनिक माध्यमांच्या गतीशी जुळवून घेण्याचे सामर्थ्य सरकारला मिळालेच नव्हते, तेवढ्यात सोशल मिडीया अस्तित्वात आला. त्यावर तर क्षणार्धात कोणीही काहीही पसरवते. पूर्वी तर पत्रकारितेचा नीट अभ्यास केलेले, कुठल्या व्यवस्थेशी जोडले गेलेले लोक बातमी द्यायचे. आज तर खेड्यापाड्यातल्या कोणत्याही माणसाला काहीही वाटले तर तो फोटो काढतो, त्यावर हवे ते लिहून सोशल मिडीयावर टाकतो. त्यामुळे आज बातम्याचा महापूर असतो. मात्र अशा वेळी विश्वासार्हता खूप महत्वाची ठरते. सवयीनुसार लोक रोज सकाळी वर्तमानपत्र हातात घेतात. ही सवय चहा घेण्याच्या सवयी इतकीच नैसर्गिक असते. टीव्हीवर कितीही बातम्या पाहिल्या तरी आपण वर्तमानपत्र वाचतोच. मात्र आता लोक बातम्या फक्त वाचत नाहीत, तर ते त्यातली तथ्ये तपासतात. ते बघतात की काल मोबाईलवर जे वाचले तेच लिहिलेय की वेगळे काही आहे. आणि त्या तथ्यांत त्याला काही वेगळे दिसले तर तो म्हणतो, जाऊ दे आजचे दोन रुपये गेले वाया.म्हणूनच मला वाटते की प्रसारमाध्यमांपुढे हे मोठे आव्हान आहे, या आव्हानांचा सामना आपण कसा करणार आहोत ? मात्र त्याशिवाय मला एक वेगळा अनुभवही येतो, की देशात किती मोठी गुणवत्ता आहे आणि किती संवेदनानी भरलेला मानव समुदाय आहे. प्रत्येक लहानसहान गोष्टीचे तो आपल्या परीने विश्लेषण करत असतो.

मला आठवतंय, मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा कधी कधी नेत्यांविषयीच्या बातम्या वर्तमानपत्रात येत असत. प्रत्येकाचीच बातमी येते, किमान वर्षातून दोनदा तरी कोणा नां कोणाची तरी बातमी येतेच. बातमी असते नेत्यांच्या व्हीआयपी संस्कृतीची! की नेतेमंडळी कशी खूप गाड्या घेऊन फिरतात..वगैरे, काही बातमी नसेल तर हा मसाला लावला जातोच. आपणही चवीने वाचतो. मी पण माझ्या अधिकाऱ्यांना विचारायचो, की कशाला इतक्या गाड्या घेऊन जायचे?तर त्यावर त्यांचे उत्तर असे की साहेब हे ‘ब्लू बुक’मध्ये ( सरकारी नियमावलीत) लिहीले आहे, त्याच्याशी तडजोड नाही करू शकत. मी ही त्यांना समजावू शकलो नाही. एकदा मी जेव्हा अहमदाबाद इथे संध्याकाळी माझ्या गाड्यांचा ताफा जात होता, तेव्हा एका युवकाने लगेच आपल्या मोबाईलवर त्याचे चित्रीकरण सुरु केले. जशा जशा गाड्या जात होत्या, तसतशा तो गाड्या मोजत त्याचे रेकार्डिंग करत होता. मग त्याने तो व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला. त्यावेळी, मी स्वतः सोशल मिडीयावर कृतीशील होतो, त्यामुळे दोन तीन तासातच तो व्हिडीओ माझ्यापर्यंत पोचला. वर्तमानपत्रात त्यावर टीका होऊन जो परिणाम झाला नाही, तो या व्हिडीओमुळे माझ्यावर झाला. मी माझे उदाहरण यासाठी सांगितले, की मी स्वतः त्यावेळी सोशल मिडीयाच्या प्रभावाचा अनुभव घेतला.ही एक शक्ती झाली आहे, जनतेची शक्ती ! अतिशय उत्तम गोष्ट आहे. आणि म्हणूनच अशा काळात विश्वासार्हता कायम ठेवणे अतिशय महत्वाचे झाले आहे.

दोन अशा गोष्टी आहेत., हा एक असा वर्ग आहे, आणि हे एक असे क्षेत्र आहे जिथे कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे. आणि कोणालाच त्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही. समजा म्हटले तर काय होईल? तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही.. तसा मी तर प्रसारमाध्यमांचा खूप आभारी आहे. नाहीतर मला कोण ओळखत होत? स्वातंत्र्यानंतर जर कुठल्या राजकारण्याला हे भाग्य लाभले असेल तर तो मी एकटाच आहे. म्हणूनच दोन गोष्टी नेहमीच माझ्या मनात असतात. आणि माझी इच्छा आहे, की इतरांनीही या विषयावर विचार करावा. बघा जग बदलते आहे. फक्त अर्थव्यवस्थाच नाही, तर संपूर्ण आयुष्यच वैश्विक झाले आहे.सगळे जग एकमेकांना जोडले गेले आहे, एकमेकांवर अवलंबून आहेत. पण काय कारण आहे की जगातल्या प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय प्रसारमाध्यमांचे नावं घेतले जात नाही. आजही काही लोक भेटतात, ते बोलतात, अरे मी बीबीसी वर ही बातमी ऐकली, आता अलजजीराचे नावं ऐकतो. सीएनएन, बीबीसी आणि अलजजिरा, यांचीच नावे ऐकू येतात. या क्षेत्रातल्या लोकांनी हे आव्हान म्हणून स्वीकारायला हवे. भारतीय भूमीतली एखादी वाहिनी जागतिक स्तरावर पोचायला हवी. आपण जर जगात महत्वाच्या भूमिकेत आहोत, तर आपल्या प्रत्येक पैलूचा प्रभाव जगावर असायला हवा, आपले हे स्वप्न असायला आहे, कोणाला आवडो नं आवडो, मला हे आवडते. मला वाटत की माझ्या देशाचा प्रभाव असायला हवा. आपल्याकडे खूप शक्ती आहे. जसे आता पर्यावरण पुरस्कार मिळाला, मी विवेकला विचारले, की हा प्रदूषणाच्या वार्तांकनासाठी आहे की पर्यावरणविषयक वार्तांकनासाठी ? मी सहज गंमतीने त्याना विचारले.

आज संपूर्ण जग तापमानवाढ आणि पर्यावरणावर चर्चा करीत आहे. भारताच्या रक्तातच निसर्गाच्या सोबत जगणे शिकवलेले आहे. निसर्गाचे काय महत्त्व आहे ? त्याचे काय सामर्थ्य आहे ? याची जाणीव आपल्याला स्वभावतःच असते. जर आपल्यापाशी आपले स्वतःचे प्रसारमाध्यम असते, जे जागतिक स्तरावर प्रभावी असते, तर आपण जगाला हे सांगू शकलो असतो की पर्यावरणाच्या हानीसाठी तुम्ही जबाबदार आहात.

महात्मा गांधी साबरमतीच्या किनाऱ्यावर राहत. त्यावेळी म्हणजे १९३० साली नदीत खूप पाणी असायचे, मात्र त्यावेळीही आश्रमात कोणी पाणी आणून देई त्याला गांधीजी सांगत, की अर्धा पेलाच पाणी द्या, उरलेले अर्धे पाणी माठात परत टाका. नैसर्गिक स्त्रोतांविषयी अशी काळजी असलेली आपली विचारसरणी आहे. आपला देश असा देश आहे की जो , मुलाना लहानपणी शिकवतो, की अंथरुणावरून खाली पाय ठेवताना पृथ्वीमातेची क्षमा मागा, कारण तुम्ही आपला पाय पृथ्वीवर ठेवता आहात.हे आपले संस्कार आहेत, आई कितीही शिकलेली असेल, ती आपल्या मुलाला निसर्गाशी नाते जोडायला शिकवते, सगळे ब्रम्हांड कुटुंब असल्याची शिकवण देते. हे संस्कार आपल्या नसानसांत भिनले आहेत. आज तापमानवाढीपासून जगाला वाचवण्यासाठी आपल्यापाशी पत्रकारितेची ताकद का नाही? एखादी जागतिक संस्था का नाही आपल्याकडे, की जिच्या माध्यमातून आपण जगाला सांगू शकू की हाच योग्य मार्ग आहे. हा रस्ता कठीण आहे, मात्र तोच मार्ग आहे, कोणी अशा पद्धतीने विचार करेल का ?
आणि मला विश्वास आहे की कदाचित कोणी ना कोणी तर असतील जे अशी संस्था काढतील, आणि ते सरकारी असू नये. सरकारचा त्यात अजिबात सहभाग नसावा. विनोबाजींनी एक मंत्र सांगितला होता,तो मंत्र मला नेहमीच आठवतो, विनोबाजी शब्दांशी खेळण्यात वाकबगार होते. त्यांचे साहित्य वाचायला मला नेहमीच आवडायचे. एका ठिकाणी त्यांनी लिहिले होते , अ-सरकारी-असरकारी … शब्द एकच , अ-सरकारी, असरकारी (प्रभावी) आपले असे स्वप्न असे असावे की आपली स्वतःची जागतिक दर्जाची प्रसारमाध्यमे असावी, जागतिक प्रसारमाध्यमात आपल्यालाही वेगळे स्थान असावे. आज जे लोक जागतिक दर्जाच्या प्रसारामाध्यमांचा अभ्यास करतात, त्यांना माहित असावे की जगात जे जे मोठे देश आहेत, त्यांच्याकडे अर्थव्यवस्था, बजेट बनवतानाच एक जागतिक दर्जाची संवाद यंत्रणा बनवण्यावर भर दिला जातो आहे. सगळ्या देशांना असे वाटते की, या जागतिक अर्थव्यवस्थेत आपल्या देशाचे स्थान उठून दिसायला हवे. ही एक संधी पण आहे आणि आव्हान पण ! आपण यावर विचार करायला हवा

दुसरी एक गोष्ट- सरकारवर जितकी टीका होईल तितके चांगले, मला त्याविषयी काहीही समस्या नाही. त्यामुळे तुम्ही वार्तांकनात काही चूक करू नका. मात्र भारत विविधतेनी भरलेला देश आहे, अनेकविध वैशिष्ट्यांचा देश आहे. देशाची एकता तुमच्यासाठी केवळ बातमी आहे, आणि कुठलीही बातमी देऊन तुम्ही लगेच दुसऱ्या बातमीच्या शोधात लागता. मात्र कधी कधी तुम्ही दिलेल्या बातमीमुळे कोणाला मोठी, खोलवर जखम होऊ शकते. याचा अर्थ हा नाही की हे पाप इतर लोक करत नाही. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त आमच्या व्यवसायातले म्हणजे राजकारणी हे पाप करत असतील. मात्र हा खरोखरच चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे की आपण देशाची एकता अबाधित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो ? मी एक उदाहरण देतो. आणि जर मी चुकीचे बोलत असेल, तर इथे बसलेले अनेक लोक आज काही सांगणार नाही, एका महिन्यानंतर सांगतील , असो.. जेव्हा पूर्वी कुठला अपघात होत असे, तेव्हा बातमी यायची की अमुक गावात अपघात झाला, एका ट्रक आणि सायकल दरम्यान , त्यात सायकलस्वार जखमी झाला, ठार झाला.. हळूहळू यात बदल होत गेला, बदल हा झाला की दिवसा भरधाव वेगाने गाडी चालवत , दारू प्यायलेल्या चालकाने निर्दोष व्यक्तीला गाडीखाली चिरडले. हळूहळू वार्तांकन पुन्हा बदलले, बीएमडब्ल्यू कारवाल्याने एका दलिताला चिरडले.. सर मला माफ करा, त्या बीएमडब्ल्यूवाल्या माणसाला माहित नव्हते की गाडीखाली येणारी व्यक्ती दलित होती. मात्र आपण आग लावून देतो. मला सांगा यात फक्त अपघाताची बातमी द्यायला नको का? तर तीच द्यायला हवी. जर ती मथळ्याची बातमी असेल , तरच तिचा मथळा द्या, मात्र उगाचच सनसनाटी देणाऱ्या बातम्या नको.

अर्थसंकल्प असतो, अर्थसंकल्पाची काय बातमी द्यायची? की सरकारचे बजेट आहे ते तुटीचे की शिलकीचे ? दोन हजार रुपये कर लावला ..अमुक तमुक पण आपल्याला त्यात बातमी मिळत नाही. बातमी काय असते- मोदी सरकारचे कमरतोड बजेट! किंवा उत्तरप्रदेशातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारचे बजेट… असो, हे तर मलाही समजत आणि तुम्हालाही… मात्र ही टीका नाही, आमच्यासाठी हे खूप आवश्यक आहे.

एवढा मोठा देश केवळ सरकारामुळे चालत नाही. ज्या संस्था देशाला एकत्र ठेवू शकतात, ज्या संस्था देशाला पुढे नेऊ शकतात, त्या सर्वानी , आपण सर्वानी मिळून हे काम करुया. मग काही कारण नाही आपण मागे राहण्याचे, काही कारण नाही की आपण जगाला काही नं देण्याचे … आणि असे नवयुवक, ज्यांनी पत्रकारीतेला आपला धर्म मानून या व्यवसायात उत्तम सुरुवात केली आहे, त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा ! तुमच्यापासून प्रेरणा घेऊन नवी पिढी तयार होईल. विवेक यांनी आज मला इथे बोलावले, त्यांच्या कुटुंबाशी माझे जुने संबंध आहेत, मात्र आज या प्रसंगी येण्याची संधी मला मिळाली. मी आपल्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद देतो ! धन्यवाद !!

B.Gokhale/R.Aghor/Anagha