पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज सर्वजण एक नवीन इतिहास घडताना पाहत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की विक्रम संवत 2082 रोजी, फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशी, माघ 24 आणि शक संवत 1947 च्या शुभ मुहूर्तावर, आजच्या प्रचलित भाषेत 13 फेब्रुवारी 2026 हा दिवस भारताच्या विकास प्रवासात एका नवीन आरंभाचा साक्षीदार बनला आहे. शास्त्रांमध्ये विजया एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी घेतलेला संकल्प नेहमीच विजयाकडे घेऊन जातो. मोदी म्हणाले की, आज विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण सर्वजण सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहेत. या ध्येयात विजयी होण्यासाठी दैवी आशीर्वाद आपल्यासोबत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. सेवा तीर्थ आणि नवीन इमारतींबद्दल त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची टीम , कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामात सहभागी सर्व अभियंते आणि कामगार सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यानंतर, साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकसारख्या इमारतींमधून देशासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले , धोरणे आखण्यात आली हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, या इमारती ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक म्हणून बांधण्यात आल्या होत्या, ज्यांचा उद्देश भारताला शतकानुशतके गुलामगिरीत जखडून ठेवणे हा होता.
कोलकाता एकेकाळी देशाची राजधानी होती, परंतु 1905 च्या बंगाल फाळणीदरम्यान ते ब्रिटीशविरोधी चळवळींचे एक मजबूत केंद्र बनले होते याची आठवण मोदींनी सांगितली. . म्हणूनच,1911 मध्ये, ब्रिटिशांनी राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवली. त्यांनी नमूद केले की त्यानंतर, वसाहतवादी राजवटीच्या गरजा आणि मानसिकता लक्षात घेऊन, नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचे बांधकाम सुरू झाले. पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की जेव्हा रायसीना हिल्सवरील या इमारतींचे उद्घाटन झाले तेव्हा तत्कालीन व्हाईसरॉय म्हणाले होते की या नवीन इमारती ब्रिटनच्या महाराजाच्या इच्छेनुसार बांधल्या गेल्या आहेत, म्हणजेच ब्रिटनच्या राजाचे विचार गुलाम भारताच्या भूमीवर लादण्याचे एक माध्यम होत्या. रायसीना हिल्सची निवड देखील अशा प्रकारे करण्यात आली होती की या इमारती इतर सर्वांपेक्षा उंच असतील आणि कुणीही इमारतीची बरोबरी करू नये यावर त्यांनी भर दिला. मोदींनी याची तुलना नवीन सेवा तीर्थ संकुलाशी केली, जे टेकडीवर नाही तर जमिनीशी जास्त जोडलेले आहे. साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक सारख्या इमारती वसाहतवादी मानसिकता लागू करण्यासाठी बांधल्या होत्या हे अधोरेखित करत, पंतप्रधान म्हणाले की आज, सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन हे भारतातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बांधले गेले आहेत. येथे घेतलेले निर्णय कोणत्याही महराजाची विचारसरणी प्रतिबिंबित करणार नाहीत तर 140 कोटी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पाया म्हणून काम करतील यावर त्यांनी भर दिला. याच भावनेने, पंतप्रधानांनी सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन भारतीय जनतेला समर्पित केले.
21 व्या शतकाची सुरुवातीची पंचवीस वर्षे आता उलटली आहेत आणि विकसित भारताचे स्वप्न केवळ धोरणे आणि योजनांमध्येच नव्हे तर कामाची ठिकाणे आणि इमारतींमध्येही प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. ज्या ठिकाणाहून देशाचा कारभार चालतो ती ठिकाणे प्रभावी आणि प्रेरणादायी, प्रभावी आणि प्रेरणादायी असली पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की नवीन तंत्रज्ञान वेगाने उदयास येत असून , सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन साधने स्वीकारण्यासाठी जुन्या इमारती अपुऱ्या पडत होत्या. मोदींनी निदर्शनास आणून दिले की साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये जागेची कमतरता आणि मर्यादित सुविधांचा सामना करावा लागत होता आणि जवळजवळ शंभर वर्षे जुन्या असल्याने, इतर अनेक आव्हानांबरोबरच त्या आतून खराब होत चालल्या होत्या.
या आव्हानांबद्दल देशाला सातत्याने माहिती देणे महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकांनंतरही भारत सरकारची अनेक मंत्रालये दिल्लीतील 50 हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होती असे त्यांनी नमूद केले . दरवर्षी या मंत्रालयांच्या इमारतींच्या भाड्यापोटी 1,500 कोटी रुपये खर्च केले जात होते, तर 8,000 ते 10,000 कर्मचाऱ्यांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी दररोज प्रवास खर्च करावा लागत होता. सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनाच्या बांधकामामुळे हे खर्च कमी होतील आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल यावर त्यांनी भर दिला.
मोदी यांनी नमूद केले की या बदलामध्येही , जुन्या इमारतींमध्ये घालवलेल्या वर्षानुवर्षांच्या आठवणी कायम आपल्यासोबत राहतील, कारण तिथे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे देशाला नवीन दिशा मिळाली आणि सुधारणा हाती घेण्यात आल्या. तो परिसर भारताच्या इतिहासाचा अमर भाग आहे. म्हणूनच,जुन्या इमारती राष्ट्रासाठी संग्रहालय म्हणून समर्पित करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला, ज्यामुळे ती युगेन युगे भारत संग्रहालयाचा भाग बनतील. त्यांनी अधोरेखित केले की ही इमारत भावी पिढ्यांसाठी प्रेरणा केंद्र म्हणून काम करेल आणि जेव्हा तरुण लोक इथे भेट देतील तेव्हा ऐतिहासिक वारसा त्यांना मार्गदर्शन करेल.
विकसित भारताच्या प्रवासात वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त होऊन पुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरही वसाहतवादी राजवटीची प्रतीके सोबत येत राहिली, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांच्या निवासस्थानाला एकेकाळी रेसकोर्स रोड म्हटले जात असे, उपराष्ट्रपतींचे कुठलेही निवासस्थान नव्हते आणि राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या रस्त्याला लोकशाहीमध्ये राजपथ म्हटले जात होते असे त्यांनी नमूद केले. स्वतंत्र भारतात जे सैनिक हुतात्मा झाले किंवा आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र भारतात स्मारक नव्हते असे त्यांनी अधोरेखित केले. स्वतंत्र देशाची राजधानी वसाहतवादी मानसिकतेत खोलवर जखडली होती , दिल्लीतल्या इमारती, सार्वजनिक ठिकाणे आणि ऐतिहासिक स्थळे अशा गुलामीच्या प्रतीकांनी भरलेली आहेत.
काळ कधीच सारखा नसतो असे सांगून पंतप्रधान म्हणाले की वसाहतवादी मानसिकता यापुढे चालू राहणार नाही असा संकल्प देशाने 2014 मध्ये केला. ही मानसिकता बदलण्यासाठी एक मोहीम हाती घेण्यात आली, यामध्ये हुतात्म्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि पोलिसांच्या शौर्याला ओळख मिळवून देण्यासाठी पोलिस स्मारक उभारले गेले, असे त्यांनी नमूद केले. रेस कोर्स रोडचे नाव बदलून लोक कल्याण मार्ग करण्यात आले. हा केवळ नाव बदलण्याचा प्रयत्न नव्हता, तर सत्तेच्या वृत्तीला सेवेच्या भावनेत रूपांतरित करण्याचा प्रयत्न होता, असे ते म्हणाले.
या निर्णयांमागे भारताच्या वर्तमान, भूतकाळ आणि भविष्याला राष्ट्रीय अभिमानाशी जोडणारी एक दृढ भावना आणि दृष्टीकोन आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. एकेकाळी राजपथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी सामान्य नागरिकांसाठी पुरेशा सुविधा आणि व्यवस्थेचा अभाव होता, आज कर्तव्य पथ म्हणून त्याचा पुनर्विकास करण्यात आला असून, ते कुटुंबे, मुले आणि नागरिकांसाठी एक चैतन्यदायी सार्वजनिक स्थान बनले बनले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याच संकुलात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्यात आला असून, राजधानी आता महान वीरांचा सन्मान करते आणि नव्या पिढीला प्रेरणा देते, असे त्यांनी अधोरेखित केले. मोदी म्हणाले की, राष्ट्रपती भवन संकुलातही बदल करण्यात आले असून मुघल गार्डनचे अमृत उद्यान असे नामकरण करण्यात आले आहे. जेव्हा नवीन संसद भवन बांधले गेले, तेव्हा जुन्या इमारतीचा विसर पडला नाही, तर त्याला ‘संविधान सदन’ अशी नवी ओळख देण्यात आली, असे ते म्हणाले. जेव्हा मंत्रालये एका संकुलात एकत्र आणली गेली, तेव्हा इमारतींना ‘कर्तव्य भवन’ असे नाव देण्यात आले, असे त्यांनी नमूद केले. नामांतरणाचे हे उपक्रम म्हणजे केवळ शब्दांतर नव्हे, तर वसाहतवादी ठशांपासून मुक्त, स्वतंत्र भारत या सुसंगत वैचारिक सूत्राचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी सांगितले की नवीन पंतप्रधान कार्यालयाचे नाव सेवा तीर्थ ठेवण्यात आले आहे, जे सेवेची भावना ही भारताचा आत्मा आणि त्याची खरी ओळख आहे हे अधोरेखित करते. त्यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या शब्दांचे स्मरण केले, त्यांनी म्हटले होते की, शिवाच्या ज्ञानाने मानवतेची सेवा करणे हा केवळ आध्यात्मिक विचार नाही, तर राष्ट्र उभारणीचे तत्वज्ञान आहे. ते म्हणाले की, ही इमारत, प्रशासन म्हणजे सेवा आणि जबाबदारी म्हणजे समर्पण, या गोष्टीची सर्वांना सतत आठवण करून देईल. “सेवा परमो धर्मः” म्हणजेच सेवा हे सर्वोच्च कर्तव्य आहे, असा पंतप्रधान कार्यालयाचा आणि सरकारचा दृष्टीकोन असल्याचे ते म्हणाले. सेवा तीर्थ हे केवळ नाव नाही, तर एक संकल्प आहे, नागरिकांची सेवा करणारे पवित्र स्थान, सेवेची शपथ पूर्णत्वापर्यंत नेण्याचे स्थान आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी स्पष्ट केले की तीर्थ म्हणजे, ज्यामध्ये मुक्तता करण्याची आणि उद्दिष्टे साध्य करायला सहाय्य करण्याची क्षमता आहे, आज भारताकडे देखील विकसित राष्ट्र बनणे, स्वावलंबी होणे, लाखो लोकांना गरिबीतून मुक्त करणे आणि देशाला वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त करणे ही उद्दिष्टे आहेत, हे सर्व सेवेच्या सामर्थ्याने पूर्ण होईल. भारत आज ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर स्वार होत असून, आंतरराष्ट्रीय संबंधांमधील नवा अध्याय लिहित आहे, व्यापार करारांद्वारे नवीन क्षेत्रांचे दरवाजे उघडत आहे आणि परिपूर्तिचे उद्दिष्ट घेऊन वेगाने वाटचाल करत आहे, अशा वेळी सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनांमधील कामाची नवी गती आणि नवा आत्मविश्वास राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यात मोठी भूमिका बजावेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
भारतीय संस्कृती शिकवते की प्रत्येक शुभ कार्यापूर्वी कल्याणाचा संकल्प असावा, ज्याला सर्व दिशांनी वाहणाऱ्या उदात्त विचारांचे मार्गदर्शन मिळेल, असे अधोरेखित करून, मोदी यांनी भर दिला की हाच इमारतीचा आत्मा असावा, कारण भारताच्या महान लोकशाहीमध्ये लोकांचे विचार ही खरी ताकद आहे, त्यांची स्वप्ने हे खरे भांडवल आहे, त्यांच्या अपेक्षा हे प्राधान्य आहे आणि त्यांच्या आकांक्षा हा मार्गदर्शक प्रकाश आहे. त्यांनी सांगितले की या भावना आणि इमारतीमध्ये कोणतीही तफावत अथवा अंतर असू नये, कारण जेव्हा लोकांची स्वप्ने समजली जातात तेव्हाच धोरणे जिवंत होतात आणि जेव्हा त्यांच्या आकांक्षा जाणवतात तेव्हाच निर्णय प्रभावी होतात.
गेल्या अकरा वर्षांत प्रशासनाचे एक नवे मॉडेल उदयाला आले आहे, जिथे नागरिक, हे निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले. नागरिक देवो भव” हा केवळ एक वाक्प्रचार नसून, ती कार्य संस्कृती आहे, अधिकाऱ्यानी या नवीन इमारतींमध्ये प्रवेश करताना ती आत्मसात करायला हवी, यावर त्यांनी भर दिला. सेवा तीर्थात घेतलेला प्रत्येक निर्णय, पुढे गेलेली प्रत्येक फाईल आणि घालवलेला प्रत्येक क्षण 140 कोटी नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी समर्पित असायला हवे, असे मोदी म्हणाले. त्यांनी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि कर्मयोगी यांना इमारतीत पाऊल ठेवताना थांबून स्वतःला विचारण्याचे आवाहन केले की त्या दिवशीचे त्यांचे काम लाखो नागरिकांचे जीवन सुसह्य करेल का, हे आत्मचिंतन या ठिकाणाची सर्वात मोठी ताकद बनेल, असे ते म्हणाले. आपण अधिकार दाखवण्यासाठी नाही तर जबाबदारी पार पाडण्यासाठी आलो आहोत यावर भर देऊन, मोदी म्हणाले की जेव्हा प्रशासन सेवेच्या भावनेने प्रेरित असते तेव्हा त्याचे परिणाम असाधारण असतात. अशा प्रकारे 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत, आणि अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
विकसित भारत 2047 हे केवळ एक ध्येय नाही, तर जगासमोर भारताची प्रतिज्ञा आहे, आणि म्हणूनच येथे आखलेले प्रत्येक धोरण आणि निर्णय सेवेच्या निरंतर भावनेने प्रेरित असायला हवे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, एके दिवशी, जेव्हा अधिकारी निवृत्त होतील किंवा या इमारतीतून बाहेर पडतील, तेव्हा मागे वळून पाहताना, त्यांचे इथले दिवस आठवतील, सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनातील आपला प्रत्येक क्षण नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित होता आणि प्रत्येक निर्णय राष्ट्र हितासाठी घेतला गेला होता, हे जाणून त्यांना समाधान वाटेल, हेच त्यांचे सर्वात मोठे यश आणि वैयक्तिक भांडवल असेल, आणि यामुळे त्यांचे जीवन अभिमानाने भरून जाईल.
कर्तव्याच्या मजबूत पायावरच अधिकारांची भव्य इमारत उभी राहते या महात्मा गांधींच्या विचाराची आठवण करुन देत पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा कर्तव्य पार पाडले जाते त्यावेळी अत्यंत कठीण आव्हानांचा सामना करुन त्यावर मात करता येते. याच उद्देशाने घटनेच्या निर्मात्यांनी कर्तव्यावर अधिक भर दिला आहे असे सांगून कोट्यवधी नागरिकांची स्वप्ने याच आधारावर टिकून आहेत असे त्यांनी सांगितले. कर्तव्य ही सुरुवात आहे, देशाच्या धमन्यांमधून वाहणारे रक्त आहे आणि करुणा व मेहनत, निर्धारांची अपेक्षा, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, विकसित भारताचा विश्वास यांची जोड त्याला असावी असे मोदी म्हणाले. कर्तव्य म्हणजे समानता, कर्तव्य म्हणजे प्रेम असे सांगून कर्तव्य वैश्विक व सर्वव्यापी आहे, सबका साथ सबका विकास या विचाराचा आत्मा आहे असे त्यांनी जाहीर केले. कर्तव्य म्हणजे देशाप्रति समर्पणाची भावना, प्रत्येकाचे आयुष्य उजळून टाकणारा दिवा, आत्मनिर्भर भारताचा आनंद, पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी, भारतमातेच्या उर्जेची पताका आणि नागरिक देवो भव तत्त्वाचा मार्ग असे त्यांनी कर्तव्याचे वर्णन केले. सेवा तीर्थ आणि परिसरात नव्याने बांधलेल्या इमारतींमध्ये सर्वांनी कर्तव्याच्या सर्वोच्च भावनेनेच प्रवेश करावा असे आवाहन त्यांनी केले.
भारत वेगाने नवी उंची गाठत आहे, नव्या युगात प्रवेश करत आहे यावर भर देत मोदी म्हणाले की, येत्या काही वर्षांत देशाची ओळख केवळ त्याची अर्थव्यवस्था नसेल तर प्रशासनाची गुणवत्ता, धोरणांमधील स्पष्टता आणि कर्मयोगींचे समर्पण हीदेखील असेल. सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात घेतला गेलेला प्रत्येक निर्णय केवळ एका फाईलला मिळालेली मंजुरी नसेल, हे निर्णय विकसित भारत 2047 या स्वप्नपूर्तीची दिशा असेल असे त्यांनी सांगितले. 2047 ही नुसती एक तारीख नाही, 140 कोटी लोकांच्या स्वप्नांच्या पूर्ततेची कालमर्यादा आहे याची आठवण करुन देत ते म्हणाले की इथे प्रत्येक संस्था, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी आणि प्रत्येक कर्मयोगी महत्त्वाचा आहे. सेवा तीर्थाबाबतची आपली कल्पना सामावताना पंतप्रधान म्हणाले की सेवा तीर्थ संवेदनशील प्रशासनाचे प्रतीक ठरले पाहिजे, नागरिक केंद्रित प्रशासनाचे आदर्श उदाहरण, ताकदीपेक्षा सेवाभाव, पदापेक्षा वचनबद्धता, अधिकारापेक्षा जबाबदारी ठळकपणे दिसून येणारी जागा ठरली पाहिजे. हा निर्धार इतिहास निर्माण करेल आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘हीच ती वेळ आहे, योग्य वेळ आहे’ या लाल किल्ल्यावरुन उच्चारलेल्या वाक्याची आठवण करुन देत, देशासाठी प्रत्येक क्षणाचा उपयोग करा असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. यामुळे भविष्यातील अनेक पिढ्या असे म्हणतील की, याच काळात भारताने आपले भविष्य घडवले आणि हजारो वर्षांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. याच निश्चयासह सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी आपले भाषण संपवले. केंद्रीय मंत्री, खासदार आणि सरकारी अधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी सेवा तीर्थ इमारत संकुलाच्या नामफलकाचे अनावरण केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते सेवा तीर्थ व कर्तव्य भवन 1 व 2 यांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
हे उद्घाटन भारताच्या प्रशासकीय कामकाजाच्या रचनेत परिवर्तन घडवणारा मैलाचा दगड आहे तसेच आधुनिक, कार्यक्षम, सहज उपलब्ध व नागरिक केंद्री प्रशासन परिसंस्थेच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
कित्येक दशके अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये व मंत्रालये वेगवेगळ्या जागी असलेल्या जुन्या इमारतींमधून काम करत होती. इमारती वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे कामकाजातील अकार्यक्षमता, समन्वयाचा अभाव, वाढता खर्च, आणि कामाच्या ठिकाणी दुय्यम दर्जाचे वातावरण अशी स्थिती होती. प्रशासकीय इमारती एकाच ठिकाणी आणून, तिथे आधुनिक भविष्यानुकूल सुविधा निर्माण करुन नव्या इमारत संकुलांमध्ये या सर्व अडचणी सोडवण्यात आल्या.
सेवी तीर्थमध्ये पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, मंत्रिमंडळ सचिवालये सामावली आहेत. ही सर्व कार्यालये यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी होती.
कर्तव्य भवन 1 व 2 मध्ये अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, सहकार मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, कायदे व न्याय मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, रसायने व खते मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयासह अनेक प्रमुख मंत्रालये आहेत.
दोन्ही इमारत संकुलांमध्ये डिजिटल सुविधायुक्त कार्यालये, रचनात्मक सार्वजनिक संयुक्त क्षेत्र आणि केंद्रीय स्वागत सुविधा आहेत. या वैशिष्ट्यांमुळे समन्वय, कार्यक्षमता, विनासायास प्रशासन वाढेल, इमारतींमधील नागरिकांचा वावर वाढेल आणि कर्मचाऱ्यांसाठीही सुविधाजनक असतील. 4 तारांकित गृह मानकांनुसार रचना असलेल्या या संकुलांमध्ये नवीकरणीय उर्जा प्रणाली, जल संवर्धन उपाययोजना, कचरा व्यवस्थापन पर्याय आणि उच्च कार्यक्षमता इमारत आवरण आहेत. या उपायांमुळे पर्यावरणावरील दुष्परिणाम लक्षणीयरित्या कमी झाला आणि कार्यक्षमता वाढली. या इमारत संकुलांमध्ये सहज उपलब्ध नियंत्रक प्रणाली, सतर्कता यंत्रणा आणि आधुनिक आपत्कालीन प्रतिसाद सुविधा यासह सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था आहे. यामुळे अधिकारी आणि इथे येणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित व सहज वातावरण निर्माण झाले आहे.
***
शैलेश पाटील/सुषमा काणे/राजश्री आगाशे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
Seva Teerth, Kartavya Bhavan 1 and 2 mark an important milestone in India’s journey towards Viksit Bharat. These reflect our commitment to citizen-centric governance and national progress. https://t.co/vCeE8Uyz69
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
Seva Teerth and Kartavya Bhavan have been built to fulfil the aspirations of the people of India. pic.twitter.com/JX4b6r9kAK
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
As we move towards a Viksit Bharat, it is vital that India sheds every trace of colonial mindset. pic.twitter.com/I1aZ1qOwWu
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
Race Course Road was renamed Lok Kalyan Marg. This was not merely a change of name.
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
It was an effort to transform the mindset of power into a spirit of service. pic.twitter.com/px9QxnlWRy
The new Prime Minister's Office has been named Seva Teerth.
— PMO India (@PMOIndia) February 13, 2026
Seva, or the spirit of service, is the soul of India. It is the identity of India. pic.twitter.com/RPIQhU1Qr2
दिल्ली में आज 'सेवा तीर्थ' और कर्तव्य भवन के लोकार्पण के अवसर पर सेवा तीर्थ स्मारक डाक टिकट और सिक्का जारी कर गौरवान्वित हूं। pic.twitter.com/r130HzBnYe
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
आज मैंने जिस अमृत भावना के साथ 'सेवा तीर्थ' और कर्तव्य भवन को राष्ट्र को समर्पित किया है, वो 140 करोड़ देशवासियों की आकांक्षाओं और अपेक्षाओं को पूरा करने का सशक्त आधार बनेंगे। pic.twitter.com/HMdsvwlb4B
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
बीते 11 वर्षों से हम गुलामी की मानसिकता को बदलने के अभियान में जुटे हैं। हमारा मंत्र है- स्वतंत्र भारत की स्वतंत्र पहचान, गुलामी से मुक्त निशान! pic.twitter.com/ITbaLp9mCG
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
'सेवा तीर्थ' के नाम में ही एक बड़ा संदेश है- देशवासियों की सेवा के संकल्प को सिद्धि तक ले जाने का एक पावन स्थल! pic.twitter.com/01HE9ntZWA
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
कर्तव्य इस जीवंत राष्ट्र की प्राण वायु है। यह कोटि-कोटि देशवासियों के सपनों को साकार करने के हमारे संकल्प को नई ऊर्जा दे रहा है। pic.twitter.com/W7ffr9w3qT
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026