नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह 22 ते 23 नोव्हेंबर 2026 या कालावधीत भारताच्या औपचारिक राजनैतिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत उच्चस्तरीय अधिकृत प्रतिनिधीमंडळही होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान बालेंद्र शाह यांचा हा पहिलाच भारत दौरा होता.
राष्ट्रपती भवनात पंतप्रधान शाह यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान शाह यांनी भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही पंतप्रधान शाह यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शाह यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन केले. दोन्ही नेत्यांमधील चर्चेत द्विपक्षीय सहकार्याची प्रमुख क्षेत्रे आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक मुद्द्यांसह जागतिक घडामोडींचा समावेश होता.
नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी घडवून आणणाऱ्या रसुवा-भोटेकोशी येथील भीषण पुरानंतर भारताने केलेल्या मानवतावादी आणि तांत्रिक मदतीबद्दल तसेच दाखवलेल्या एकजुटीबद्दल पंतप्रधान शाह यांनी भारताचे आभार मानले.
भारत हा नेपाळचा जवळचा मित्र आणि शेजारी देश असल्याने नेपाळच्या विकासाच्या प्रवासात भारताचा भक्कम पाठबळ कायम राहील, याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. भारत नेपाळला 15,000 कोटी भारतीय रुपये (24,000 कोटी नेपाळी रुपये) इतकी विकास मदत देणार आहे. यामध्ये नेपाळमधील आपत्तीनंतरच्या पुनर्बांधणीसाठी आणि नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 3,500 कोटी भारतीय रुपये (5,600 कोटी नेपाळी रुपये) अनुदान स्वरूपात दिले जातील. तसेच, ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 11,500 कोटी भारतीय रुपये (18,400 कोटी नेपाळी रुपये) इतका रुपया-आधारित पतपुरवठा (Line of Credit) केला जाईल. कोणते प्रकल्प राबवायचे आणि विकास मदतीची अंमलबजावणी कशी करायची, हे दोन्ही देश परस्पर सल्लामसलतीने निश्चित करतील.
व्यापक आणि ठोस परिणाम घडवून आणणाऱ्या सामुदायिक विकास प्रकल्पांसह (HICDP – हाय इम्पॅक्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स) नेपाळमधील विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारत सरकारच्या मदतीने नेपाळमध्ये उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या बांधकामातील प्रगतीचीही त्यांनी दखल घेतली. तसेच, भारताच्या अनुदानातून चितवन येथे कृषी-औद्योगिक केंद्र उभारण्यात येणार असल्याच्या घोषणेचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.
दोन्ही नेत्यांनी ‘विकसित भारत आणि समृद्ध नेपाळ’ या विकासाच्या सामायिक संकल्पनेला मान्यता दिली. हे संयुक्त निवेदन, भारत आणि नेपाळ यांच्यातील महत्त्वाकांक्षी भागीदारीला नवी दिशा देणारा आणि भविष्यातील सहकार्याचा मार्ग निश्चित करणारा कृती आराखडा आहे. यामध्ये आर्थिक आणि विकासविषयक भागीदारी, दळणवळण, ऊर्जा आणि जलसंपदा तसेच दोन्ही देशांतील जनतेचे परस्पर संबंध या सहकार्याच्या पारंपरिक मजबूत क्षेत्रांना अधिक बळकट करणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याची क्षमता, आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन, क्रीडा, स्टार्ट-अप्स, डिजिटल सेवा, अंतराळ आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील नवीन सहकार्याचा समावेश आहे.
दळणवळण अधिक सुलभ करणे आणि दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार वाढवणे या उद्देशाने नागरी विमान वाहतुकीबाबत सुरू असलेल्या चर्चेची दोन्ही नेत्यांनी दखल घेतली. सध्या एकाच दिशेने सुरू असलेली B345 काठमांडू-भैरहवा-लखनौ विमानसेवा दोन्ही दिशांनी सुरू करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी तसेच सध्या चर्चेत असलेल्या नागरी विमान वाहतुकीसंबंधी दोन्ही देशांच्या अन्य प्रस्तावांवर विचार करण्यासाठी तांत्रिक स्तरावर चर्चा केली जाणार आहे..
पंतप्रधान मोदी यांनी, नेपाळच्या पारगमन व्यापारासाठी (दुसऱ्या देशाच्या भूमी किंवा बंदराचा वापर करून आंतरराष्ट्रीय व्यापार) गुजरातमधील कांडला येथील दीनदयाल बंदरातून नवीन दळणवळण मार्ग उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तसेच, आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्यानंतर, व्यापारासाठी ओदिशातील पारादीप बंदराचा वापर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल.
नवीन रेल्वेमार्ग, पूल, सीमेवरील एकत्रित तपासणी केंद्रे आणि पेट्रोलियम वाहिनी (पाइपलाइन) उभारून दोन्ही देशांमधील दळणवळण अधिक सुलभ करणे आणि सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.
दोन्ही पंतप्रधानांनी अयोध्या आणि जनकपूर दरम्यान ‘सरयू–कमला एक्सप्रेस’ या पहिल्या रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या रेल्वे सेवेने दळणवळणाची सुविधा सुधारेल, तसेच रामायण सर्किटवरील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळेल. भारत व नेपाळ यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करेल. बौद्ध आणि शिव शक्ती धार्मिक पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी अशाच प्रकारच्या रेल्वे जोडण्या निर्माण करण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
प्रस्तावित रक्सौल–काठमांडू विद्युतीकृत ब्रॉड गेज रेल्वे मार्गाच्या स्थळ निश्चितीसाठीचे क्षेत्रीय सर्वेक्षण पूर्ण झाल्याची घोषणा दोन्ही नेत्यांनी केली. तसेच, नेपाळमधील पूर्व–पश्चिम रेल्वे मार्गाच्या विकासासाठी दोन्ही देश सहकार्य करतील, असेही जाहीर केले.
बनबसा इथे नवीन एकात्मिक तपासणी चौकी- (आयसीपी)च्या उभारणीसाठी दोन्ही नेत्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी केली. तसेच, भैरहवा, सुनौली आणि दोधारा-चांदनी इथे आयसीपीच्या बांधकामात झालेल्या प्रगतीचे स्वागत केले. भारत आणि नेपाळ यांच्यातील अशा तीन आयसीपी यापूर्वी कार्यान्वित झाल्या आहेत.
भारतामधील धार्चुला आणि नेपाळमधील दार्चुला यांना जोडणाऱ्या नव्या सीमापार वाहन वाहतुकीयोग्य पुलाचे उद्घाटन दोन्ही नेत्यांनी केले. यामुळे पश्चिम नेपाळ आणि भारत यांच्यातील थेट दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होईल.
सीमा स्तंभांची देखभाल आणि दुरुस्तीशी संबंधित संयुक्त क्षेत्रीय कामकाजातील प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, प्रलंबित सीमाविषयक प्रश्नांवर काम करण्याचे निर्देश त्यांनी आपापल्या देशांच्या परराष्ट्र सचिवांना दिले.
भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमापार पेट्रोलियम पायाभूत सुविधांचा विस्तार करताना, दोन्ही नेत्यांनी मोतिहारी–अमलेखगंज तेल वाहिनीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण नेपाळच्या जनतेसाठी केले. तसेच, नेपाळमधील झापा इथे पेट्रोलियम टर्मिनल विकसित करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी केली. सिलीगुडी आणि झापा यांना जोडणाऱ्या पेट्रोलियम वाहिनीच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. भारत आणि नेपाळ यांच्यात गॅस वाहिनीच्या उभारणीसाठी सहकार्य करण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.
भारत–नेपाळ ऊर्जा क्षेत्र सहकार्यविषयक संयुक्त दृष्टिकोन दस्तऐवज आणि दीर्घकालीन वीज व्यापार करार यांच्याशी सुसंगती साधून जलविद्युत क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यामध्ये झालेल्या प्रगतीबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. नेपाळमधील जलविद्युत क्षेत्रात, भारतीय कंपन्यांच्या सक्रिय सहभागाचे दोन्ही देशांनी स्वागत केले. तसेच, नेपाळमध्ये भारतीय कंपन्यांकडून विकसित करण्यात येत असलेल्या विविध जलविद्युत प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण होतील, याची खातरजमा करण्यावर सहमती दर्शवली. या प्रसंगी, दोन्ही नेत्यांनी 669 मेगावॅट क्षमतेच्या लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पाची दूरदृश्य प्रणालीद्वारे पायाभरणी केली.
दोन्ही नेत्यांनी पंचेश्वर विकास प्राधिकरण आणि जलस्रोतविषयक संयुक्त समितीला पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) लवकरात लवकर अंतिम करण्याचे आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. परस्पर लाभासाठी जलस्रोतांचा उपयोग करून घेणे आणि पुरांचे परिणाम कमी करणे या उद्देशाने सप्तकोशी आणि सुनकोशी बहुउद्देशीय प्रकल्पांच्या डीपीआरची तयारीही वेगाने पूर्ण करण्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
इनरुवा (नेपाळ) – न्यू पूर्णिया (भारत) आणि दोदोधारा (नेपाळ) – बरेली (भारत) या दोन उच्च क्षमतेच्या सीमापार वीज पारेषण वाहिन्यांसाठी संयुक्त व्यवस्था निर्मितीच्या प्रक्रियेत झालेल्या प्रगतीबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले.
भारताच्या नेपाळमधील विकासविषयक सहकार्याचा आणि क्षमता बांधणीच्या प्रयत्नांचा विस्तार करताना, नेपाळमध्ये आयआयटीचे (IIT) परदेशातील संकुल स्थापन करण्याचा निर्णय, दोन्ही देशांच्या नेत्यांनी घेतला. यामुळे नेपाळच्या शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळण्याबरोबरच रोजगारनिर्मितीलाही प्रोत्साहन मिळेल. स्टार्टअप्स, डिजिटल आणि आर्थिक संपर्कव्यवस्था यांसह तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि नेपाळ यांच्यात वाढत असलेल्या सहकार्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.
एका देशातील नागरिक दुसऱ्या देशात वास्तव्यास असताना त्यांना बँकिंग आणि दूरसंचार यांसह विविध सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य करण्याची आवश्यकता मान्य केली.
या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये खालील सामंजस्य करारांची (MoU) देवाणघेवाण करण्यात आली :
नेपाळच्या पंतप्रधानांनी त्यांना आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिलेल्या स्नेहपूर्ण आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आभार मानले. तसेच, त्यांनी पंतप्रधान मोदी यांना नेपाळ भेटीचे औपचारिक निमंत्रण दिले. मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून, या भेटीच्या अधिकृत तारखा राजनैतिक माध्यमांद्वारे निश्चित केल्या जातील.
भारत-नेपाळ भागीदारी ही परस्परांमधील दृढ विश्वास, मैत्री, आदर आणि सर्व स्तरांवरील सामंजस्यावर आधारित आहे. दोन्ही देशांतील जनतेमधील घनिष्ठ संबंध तसेच आर्थिक आणि विकासविषयक क्षेत्रांतील निकटचे सहकार्य यांमुळे ही भागीदारी अधिक बळकट झाली आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान उच्चस्तरीय नेत्यांच्या नियमित भेटीगाठींची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली असून, ही परंपरा अधिक पुढे नेण्याचा दोन्ही देशांचा संकल्पही दृढ झाला आहे.
* * *
राधिका अघोर/आशुतोष सावे/रेश्मा बेडेकर/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai