पीएम्इंडिया
पंतप्रधान : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि नरेगामार्फत जलसाठा करण्याची क्षमता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील कृषी विज्ञान केंद्र, विद्या प्रतिष्ठानला
पंतप्रधानांची भेट, अप्पासाहेब पवार सभागृहाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
देशातल्या दारिद्रय निर्मुलनासाठी कृषी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या बारामती येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना सांगितले. देशभरात जलसाठा करण्याची क्षमता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे वाढविण्यात येईल. ही क्षमता वाढवण्यासाठी नरेगाचाही उपयोग करण्यात येईल. ही क्षमता वाढल्याने कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत होईल.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत कृषी क्षेत्रात आधुनिकता आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. मूल्यवृध्दीला चालना देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या साखर उत्पादनाचा उल्लेख करत या उद्योगासाठी तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
शाळांमधल्या प्रयोगशाळांमध्ये फेब्रुवारी ते जुलै दरम्यान फारशी वर्दळ नसते हे लक्षात घेऊन दहावीपासूनच्या विद्यार्थ्यांना मृद् परिक्षणासाठी प्रशिक्षण देता येईल आणि या काळात या प्रयोगशाळा मृद परीक्षण प्रयोगशाळा म्हणून वापरता येतील अशी सूचना त्यांनी केली.
व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या देशाच्या कृषी विकासातल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. चर्चा (विवाद) आणि संवाद या दोन चाकांवर लोकशाही पुढे जाते असे सांगून संवाद सुरु करण्याची मोठी जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असते असे मोदी म्हणाले. महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह कार्यक्रमाला उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्र आणि विद्या प्रतिष्ठानला पंतप्रधानांनी भेट दिली. बारामती येथे अप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.