Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची स्लोव्हाक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर भेट

पंतप्रधानांची स्लोव्हाक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर भेट


नवी दिल्ली, 15 जून 2026

स्लोव्हाक प्रजासत्ताकचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक ब्रातिस्लावा प्रासादात स्नेहपूर्वक स्वागत केले. तिथे त्यांचे आगमन होताच समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.

दोन्ही नेत्यांनी परस्परांशी स्वतंत्रपणे तसेच शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वाढवून ते ‘समावेशक भागीदारी’त रुपांतरित झाल्याचे त्यांनी स्वागत केले; यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये एका नवीन पर्वाची सुरुवात झाली असून, हे संबंध दोन्ही देशांमधील सामायिक मूल्ये आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या मैत्रीचे निदर्शक आहेत.

दोन्ही पंतप्रधानांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, अंतराळ, नागरी अणुऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल नवोन्मेष, शैक्षणिक आदान-प्रदान, संस्कृती आणि कुशल-प्रतिभावंतांची देवाणघेवाण (टॅलेंट मोबिलिटी) यांसह द्विपक्षीय संबंधांमधील सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सुपरकॉम्प्युटर्स यांसारख्या नवीन क्षेत्रांमधील सहकार्याच्या संधींविषयीही चर्चा केली.

एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्लोव्हाकियाने भारताला दिलेला पाठिंबा आणि दर्शविलेल्या सहानुभूतीबद्दल पंतप्रधानांनी पंतप्रधान फिको यांचे आभार मानले. यामुळे सर्व प्रकारच्या आणि वेगवेगळ्या स्वरुपातील दहशतवादाचा  सामना करण्यासाठी दोन्ही देश दृढपणे कटिबद्ध असल्याचे अधोरेखित झाले. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचार-विनिमय केला. बहुपक्षीयतेप्रती तसेच जागतिक प्रशासन संस्थांमधील सुधारणांसाठी आपले देश कटिबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

नुकत्याच झालेल्या भारत-युरोपियन संघ (ईयू) शिखर परिषदेच्या उत्साहवर्धक परिणामांबद्दल उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले. ऐतिहासिक असा भारत-ईयू मुक्त व्यापार करार प्रत्यक्षात आल्याबद्दल  आणि ‘संयुक्त सर्वंकष धोरणात्मक कार्यक्रम’ स्वीकारल्याचेही त्यांनी स्वागत केले; या दोन्ही गोष्टी प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले मोठे पाऊल आहे.

चर्चेनंतर, डिजिटल तंत्रज्ञान, कामगार स्थलांतर, उच्च शिक्षण आणि संशोधन, आणि दृकश्राव्य निर्मिती या क्षेत्रांतील सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले. संरक्षण क्षेत्रात सहकार्याला चालना देण्यासंबंधीच्या इरादापत्राचीही देवाणघेवाण झाली. तसेच, भारताच्या वतीने कोसिचे येथील तंत्रज्ञान विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्तेचे पहिलेवहिले अध्यासन स्थापन करण्याबाबतही सहमती झाली.

पंतप्रधान फिको यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले. तर पंतप्रधान मोदींनी त्यांना परस्परांना सोयीच्या असलेल्या तारखांना भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.

निलीमा चितळे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai