Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी पीक विमा योजनेसाठीची मार्गदर्शक तत्वं जारी केली

पंतप्रधानांनी पीक विमा योजनेसाठीची मार्गदर्शक तत्वं जारी केली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या सिहोर इथे शेतकरी मेळाव्यात पीक विमा योजनेसाठी कार्यान्वयन मार्गदर्शक तत्वं जाहीर केली.

शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात, त्यांच्या समस्यांचं निराकरण या पीक विमा योजनेमुळे व्हायला मदत होईल, असे पंतप्रधानांनी या सर्वंकष पीक विमा योजनेचे लाभ विषद करताना सांगितले. आधीच्या पीक विमा योजनेतल्या त्रुटी दूर करुन पीक विम्याविषयी शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमधे विम्याच्या दाव्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येईल. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. ऊसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयांपर्यंत थकलेली देणी पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने केलेल्या उपाययोजनांचा उल्लेखही त्यांनी केला.

डिजीटल इंडिया उपक्रमाच्या अग्रस्थानी शेतकऱ्यांचे हित असल्याचे पंतप्रधान म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजे 14 एप्रिलला राष्ट्रीय कृषी बाजार हा डिजीटल प्लॅटफॉर्म सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाचा उत्तम भाव मिळेल.

मृदा आरोग्य कार्ड, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जैव शेती, युरीया उपलब्धता, यासारख्या कृषी क्षेत्रातल्या सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली.
कृषी क्षेत्रातल्या राज्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान आणि शेतकऱ्यांचीही प्रशंसा केली.

निवडक लाभार्थ्यांना विमा दावे निपटाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच मृदा आरोग्य कार्डही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

N. Chitale / I. Jhala / M. Desai