पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर युनिटच्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. नवी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटच्या अनुषंगाने हा समारंभ म्हणजे जागतिक सेमीकंडक्टर हब बनण्याच्या भारताच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे.
या सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी भर दिला की भारत विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहे. “मी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून म्हटले आहे की, भारताकडे थांबण्यासाठी किंवा थबकण्यासाठी वेळ नाही. 2026 च्या सुरुवातीपासून भारताने आपला वेग वाढवला आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले. मोदी यांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, भारतातील स्टार्ट अप क्रांतीला ऊर्जा देणारा राष्ट्रीय स्टार्टअप दिन आणि भारताच्या ताकदीने जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या इंडिया एनर्जी समिट यासारख्या अलीकडील टप्प्यांचा उल्लेख केला.
विकसित भारतासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने देशाच्या प्रगतीला नवीन गती दिली असून हा आठवडा भारतासाठी खरोखरच ऐतिहासिक ठरला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ग्लोबल एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत जागतिक नेते, राष्ट्रप्रमुख आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज भारताच्या एआय क्षमता पाहण्यासाठी एकत्र आले, तसेच या मंडळींनी देशाच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची दखल घेत त्याची प्रशंसा केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. काल एआय शिखर परिषदेचा समारोप झाल्यानंतर लगेच आज देश भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी या भव्य कार्यक्रमासह पुढे जात आहे. “आधुनिक जग चालवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया शक्ती प्रदान करण्यात भारत आता जगातील अव्वल राष्ट्रांसोबत उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे तसेच सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही क्षेत्रात एकाच वेळी काम करत आहे”, असे मोदी यांनी अधोरेखित केले.
सध्याचे दशक हे भारताचे ‘टेकेड’ (Techade) असल्याची आपली संकल्पना पुन्हा अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की हरित ऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि एआयमधील गुंतवणूक 21 व्या शतकातील क्षमतांची पायाभरणी ठरेल. भारत आज मानवतेचे भविष्य निश्चित करणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञानात अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे आणि भारतातील या मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विकास हे त्याचे एक प्रमुख उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
चिप्सचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी 21 व्या शतकातील चिप्सच्या मूल्याची तुलना 20 व्या शतकातील तेलाच्या मूल्याशी केली. “कोरोना महामारीच्या काळात, जगाने चिप पुरवठा साखळीची नाजूकता पाहिली. जेव्हा पुरवठा मंदावला तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत झाल्या”, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्या संकटातून धडा घेत भारताने त्याचे संधीत रूपांतर केले पाहिजे आणि चिप उत्पादनात भारताने स्वावलंबी बनले पाहिजे असा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “आजचा कार्यक्रम या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे”, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की “मेड-इन-इंडिया” चिप्स विकसित भारताचा कणा आहेत, जे एआय आणि 6जी पासून ते संरक्षण आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना उर्जा देतात. या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी, त्यांनी ‘चिप्स टू स्टार्टअप’ उपक्रमाचा उल्लेख केला. या उपक्रमांतर्गत 85,0000 तज्ञांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, सेमीकंडक्टर मिशनच्या दुसऱ्या टप्प्यासारख्या अर्थसंकल्पीय उपक्रमासह संपूर्ण संशोधन आणि विकास तसेच उत्पादन सहाय्यासाठी रेअर अर्थ कॉरिडॉरची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे खासदार म्हणून, पंतप्रधानांनी राज्यात झालेल्या परिवर्तनाबद्दल मनापासून अभिमान व्यक्त केला. “उत्तर प्रदेश सेमीकंडक्टर इकोसिस्टमचे एक प्रमुख केंद्र बनत आहे, यामुळे या राज्यात डिझाइन हाऊसेस, संशोधन आणि विकास केंद्रे आणि स्टार्टअप इकोसिस्टम येतील, त्यामुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील,” असे मोदी यांनी नमूद केले.
गेल्या 11 वर्षांत भारताच्या औद्योगिक परिदृष्यात मोठा बदल झाला आहे, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सहा पटीने वाढ झाली असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “देशांतर्गत उत्पादन 28 पटीने वाढले असून निर्यातीत 100 पट एवढी मोठी वाढ झाली असून ही वाढ मोबाईल क्रांतीमधून प्रकर्षाने दिसून येते, ” असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश हे या यशोगाथेतील पॉवरहाऊस आणि भक्कम आधारस्तंभ म्हणून उदयास आले आहे, देशात सध्या तयार होणाऱ्या एकूण मोबाइल फोनपैकी निम्म्याहून अधिक फोन येथे तयार केले जात आहेत. हे परिवर्तन जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने भारताच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे.
एकेकाळी मुख्यत्वे गुन्हेगारी आणि स्थलांतर या गोष्टींशी निगडित असलेली उत्तर प्रदेशची ओळख महामार्ग, संरक्षण कॉरिडॉर आणि जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि समर्पित फ्रेट कॉरिडॉर सारख्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांमध्ये बदलली असून या बदलास राज्यामधील “डबल इंजिन सरकार” कारणीभूत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “आपल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळेल याची खात्री असल्याचे ठाऊक असल्यानेच जागतिक गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात येत आहेत ” असे पंतप्रधान म्हणाले. उद्या आपण दिल्ली-मेरठ नमो भारत रेल कॉरिडॉरचे उद्घाटन करणार असून त्यामुळे या प्रदेशाची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली .
आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नाडर आणि फॉक्सकॉन सेमीकंडक्टर बिझनेस ग्रुपचे अध्यक्ष बॉब चेन यांचे त्यांनी केलेल्या भागीदारीबद्दल आभार मानले. फॉक्सकॉनची उपस्थिती: “लोकशाहीवादी भारत हा विश्वासार्ह भागीदार असल्याचा जगाला संदेश देत असल्याचे त्यांनी नमूद केले. मूल्य साखळीतील आमचा सहभाग त्याची लवचिकता वाढवणारा असून तो भारत आणि जगासाठी सारखाच लाभदायक आहे.”
The establishment of the HCL-Foxconn semiconductor facility in Uttar Pradesh is a step towards technological self-reliance. It will boost India’s presence in the global chip ecosystem.
https://t.co/DNY4D9MDUz— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2026
भारत software और hardware… दोनों पहलुओं पर एक साथ काम कर रहा है।
हम सभी के लिए ये गर्व की बात है कि उत्तर प्रदेश भी भारत के semiconductor ecosystem का बड़ा centre बनने जा रहा है।
HCL और Foxconn की ये नई factory… technology powerhouse के रूप में यूपी की नई पहचान को और सशक्त…
— PMO India (@PMOIndia) February 21, 2026
ये Decade भारत का Techade है।
इस दशक में भारत technology के क्षेत्र में जो कुछ कर रहा है… वो 21वीं सदी के हमारे सामर्थ्य का आधार बनेगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 21, 2026
भारत को chip manufacturing में आत्मनिर्भर बनाना है… इसके लिए… भारत में semiconductor ecosystem का निर्माण करना है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 21, 2026
भारत जैसा लोकतांत्रिक देश… दुनिया का एक भरोसेमंद partner है… किसी भी Value Chain में भारत की बढ़ती भागीदारी, उस Value Chain की resilience को ही बढ़ाएगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 21, 2026
आज दुनिया भारत को tech future के centre के रूप में देख रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 21, 2026
***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/ श्रद्धा मुखेडकर /मंजिरी गानू /परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com