नवी दिल्ली : 21 नोव्हेंबर, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील आयआयटी खरगपूरच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्यासमोर भारताच्या भूतकाळाशी, वर्तमानाशी आणि भविष्याशी नाते जोडलेली प्रतिभावान आणि महत्त्वाकांक्षी तरुण पिढी उपस्थित आहे. संस्थेच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि तिच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यासाठी ही पिढी एकत्र आली आहे.
आयआयटी खरगपूरने गेल्या 75 वर्षांत गाठलेल्या अनेक टप्प्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. या काळात भारताने बैलगाड्यांपासून बुलेट ट्रेनपर्यंत आणि टपालाद्वारे पाठविल्या जाणाऱ्या पत्रांपासून समाज माध्यमांवरील संदेशांपर्यंत व्यापक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. देशातील पहिली आयआयटी असलेल्या या संस्थेने या सर्व बदलांच्या प्रत्येक टप्प्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
“येथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि आयआयटी खरगपूरचे सर्व माजी विद्यार्थी यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो,” असे मोदी म्हणाले.
महाविद्यालयीन जीवनातील काही आठवणी आयुष्यभर मनात कायमच्या घर करून राहतात असे नमूद करत पंतप्रधान म्हणाले की, मला विश्वास आहे की, या संस्थेतील माजी विद्यार्थ्यांना आजही, कित्येक दशकांतरही चेडी इथे चहा पिताना रंगलेल्या गप्पा आणि चर्चा आजही आठवत असतील. इतर शैक्षणिक संस्थांमधील वसतिगृहांपेक्षा आयआयटी खरगपूरची वेगळी ओळख असलेल्या ‘हॉल्स’ (निवास संकुलां) बद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून अभिमान वाटतो, असेही त्यांनी नमूद केले. अलीकडेच झालेल्या दिवाळी उत्सवाबाबत बोलताना ते म्हणाले की, मला असं सांगण्यात आले की आयआयटी खरगपूरमधील दिवाळीचा उत्साह आगळा वेगळा असतो. इथल्या रोषणाईची स्वतःची एक वेगळीच जादू असते आणि विविध हॉल्समध्ये होणाऱ्या स्पर्धेमुळे या उत्सवाला आणखी विशेष रंगत येते. “यावेळी या स्पर्धेत कोणत्या हॉलने बाजी मारली?” असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी विचारला.
बंगाल ही भूमी अशी आहे जिथे विचारांना बळ मिळते, जिथे राष्ट्रीय चळवळी जन्माला आल्या असे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, आज आयआयटी खरगपूर ज्या ठिकाणी उभे आहे, तेथे पूर्वी स्वातंत्र्यसैनिकांसाठी नजरकैद छावणी होती. काही दशकांपूर्वी याच ठिकाणी स्वराज्यासाठी लढणाऱ्या आणि भारताला सर्वोच्च शिखरावर पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या भारतीयांच्या दुर्दम्य शौर्याचा हा परिसर साक्षीदार राहिला आहे. आज याच परिसरात अशा तरुणांना घडवले जात आहे, ज्यांचे नवोन्मेष आणि विचार भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे बळ देत आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी भूतकाळातील ‘स्वराज्याची’ आकांक्षा आणि स्वातंत्र्याचे स्वप्न, यांची तुलना आजच्या ‘आत्मनिर्भरतेच्या’ संकल्पाशी आणि भविष्य घडवण्याच्या संधीशी केली. “आकांक्षेपासून आत्मनिर्भरतेपर्यंतचा हा प्रवासच ‘विकसित भारत’ घडवण्याची खरी ऊर्जा आहे,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
नवस्वतंत्र भारतात, पहिली सार्वत्रिक निवडणूक होण्यापूर्वीच, जेव्हा देशाला उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी अभियंत्यांची गरज होती, तेव्हा आयआयटी खरगपूरच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा मागोवा घेत पंतप्रधानांनी नमूद केले की, जसजशी भारताची वैज्ञानिक क्षमता वाढत गेली, तसतसे येथील पदवीधरांनी अंतराळ आणि अणुऊर्जा कार्यक्रमांना पुढे नेले आणि नंतर माहिती तंत्रज्ञान युगात व जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा सॉफ्टवेअर उद्योग मजबूत केला आणि प्रमुख जागतिक कंपन्यांचे नेतृत्व केले. प्रत्येक युगात राष्ट्र उभारणीची जबाबदारी पार पाडण्यासाठी ही संस्था सातत्याने पुढे सरसावली आहे आणि विकसित भारतच्या दिशेने वाटचाल करत असताना, तिचा 75 वर्षांचा अनुभव देशाच्या विकासात आणि नवोन्मेषाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावेल, हे स्पष्ट करताना त्यांनी विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. मला खात्री आहे की, आजच्या महत्त्वाकांक्षी भारताची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. एखादी व्यक्ती किती लवकर समाधानी होऊन स्वस्थ बसते यावर नाही, तर अडथळ्यांना आव्हान देण्याच्या धैर्यावर तिची क्षमता ठरते, असे स्पष्ट करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, लोक अनेकदा स्वतःच्या विचारांवर मर्यादा घालतात, ज्याला मर्यादित विचार म्हणतात. या मर्यादांमुळे त्यांची स्वप्ने, त्यांची प्रतिभा आणि त्यांच्या देशाची क्षमता मर्यादित होते, ज्यामुळे काय शक्य आहे आणि काय नाही हे ते स्वतःच ठरवू लागतात. आपण आपल्या विचारांच्या मर्यादेलाच जगाची मर्यादा मानू लागतो, असे निरीक्षण मोदींनी नोंदवले.
भारताने गेल्या काही वर्षांत दाखवून दिल्याप्रमाणे, राष्ट्रे देखील त्यांच्या विचारांच्या मर्यादा तोडल्यावरच स्वतःच्या क्षमता ओळखतात, असे सांगून पंतप्रधानांनी सांगितले, भारताने निक्षून सांगितले : मर्यादा तोडा, संधींचा लाभ घ्या.
पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या 12 वर्षांत सरकारने गरिबांना सक्षम आणि सशक्त करून तसेच त्यांच्या सुलभ जीवनासाठी योजना सुरू करून ही मानसिकता बदलली, ज्याचे परिणाम आज दिसून येत आहेत. भारतातील 50 कोटी लोक केवळ 12 ते 13 वर्षांत गरिबीतून बाहेर आले, असे सांगणाऱ्या जागतिक बँकेच्या ताज्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित केले. हा काही छोटा बदल नाही; ‘मर्यादा तोडा असे म्हणणाऱ्या मानसिकतेचा हा परिणाम आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सेमीकंडक्टर मिशनचे आणखी एक उदाहरण देताना पंतप्रधानांनी नमूद केले की, या मिशनच्या शुभारंभावेळी अनेक प्रश्न उपस्थित झाले होते; जसे की, इतर देश 50 वर्षांपासून सेमीकंडक्टर बनवत असताना याची गरज काय आणि भारत आता काय साध्य करू शकेल. त्यामुळे, जेव्हा मी सेमीकंडक्टर मिशनबद्दल बोललो, तेव्हा असे म्हटले गेले की आता खूप उशीर झाला आहे, असे मोदी म्हणाले.
पूर्वी झालेल्या विलंबामुळे आपण हातावर हात ठेवून बसावे का असा प्रश्न उपस्थित करत आम्ही आपल्या निर्धारावर ठाम राहिलो असे पंतप्रधान म्हणाले. अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून योजना आखून आपणच या कामाची सुरुवात केल्याची आठवण त्यांनी सांगितली. गेल्या चार वर्षांत देशभरात अनेक सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू झाले आहेत. भारताने चिप्सची निर्यात सुरू केली असून यापैकी अनेक प्रकल्पांचे नेतृत्व आणि अंमलबजावणी आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी करत आहेत, असे त्यांनी सांगितले. “मात्र, ‘ जर आपण हे काम तिकडे झाले आहे, मग आपण आता सेमीकंडक्टर का बनवावेत, असे मानले असते’, तर काहीच घडले नसते,” असे पंतप्रधान म्हणाले.
अंतराळ क्षेत्राचे आणखी एक उत्तम उदाहरण देत पंतप्रधानांनी नमूद केले की, भारताची अंतराळ परिसंस्था पूर्वी इस्रोपुरतीच मर्यादित होती, आणि या क्षेत्रात प्रवेशाच्या संधी अत्यंत मर्यादित होत्या. प्रत्येक प्रक्षेपण किंवा मोहिमेसाठी एक वेगळी प्रणाली होती, त्यामुळे संस्थेबाहेरील तरुण प्रतिभावंतांना फार कमी संधी मिळत होत्या. तरुण नवोन्मेषकांना संधी मिळालीच पाहिजे, असे आपण मंत्रालयाला सांगितले आणि भारताचे अंतराळ क्षेत्र तरुणांसाठी खुले केले , याची आठवण त्यांनी करून दिली. आयआयटी खरगपूरचे माजी विद्यार्थी पवन यांनी ‘स्कायरूट एरोस्पेस’ची स्थापना करून भारताला पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपित करण्याचा मान मिळवून दिला. त्याचबरोबर, आज अनेक अंतराळ स्टार्टअप्स भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला गती देत आहेत, जे एकेकाळी अशक्य वाटत होते, ते प्रत्यक्षात उतरवत आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. “अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्यात आपल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
पुढील दोन दशके विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात फलदायी आणि भारताच्या विकासातील सर्वात निर्णायक वर्षे असतील, त्यामुळे देशाला विद्यार्थ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत, यावर त्यांनी भर दिला. 2047 पर्यंत त्यांच्यापैकी अनेक विद्यार्थी नेतृत्वाच्या महत्त्वाच्या पदांवर असतील, त्यामुळे त्यांचे प्रत्येक यश राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी स्वतःला नेहमी एक प्रश्न विचारावा की, देशासमोरील कोणते आव्हान सोडवण्यात आपण योगदान देऊ इच्छितो, तसेच ‘राष्ट्र प्रथम’ हा आपला मूलमंत्र नेहमीच लक्षात ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. “जेव्हा तुम्ही या विचाराने पुढे वाटचाल कराल, तेव्हा निश्चितच तुमच्यासाठीही नवीन संधी निर्माण होतील आणि देशालाही मोठा फायदा होईल,” असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 75 वर्षांत संस्थेच्या अद्भुत कार्याची प्रशंसा करत कठोर परिश्रम करण्याचा ठाम निर्धार कायम ठेवून पुढील वाटचाल करावी आणि विकसित भारतात संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. स्वामी विवेकानंद यांच्या ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ या प्रेरणादायी संदेशाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
There are no limits to what young minds can achieve. Speaking at the Platinum Jubilee celebrations of IIT Kharagpur. @IITKgp https://t.co/VkB3UO2Rkn
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2026
आज जब हम विकसित भारत के लक्ष्य के साथ आगे बढ़ रहे हैं तो IIT खड़गपुर का 75 वर्षों का अनुभव देश के विकास में, देश के innovation profile में बहुत बड़ी भूमिका निभाने वाला है: PM @narendramodi at Platinum Jubilee celebrations of @IITKgp
— PMO India (@PMOIndia) November 21, 2026
राष्ट्र भी अपनी क्षमताओं को तभी पहचानते हैं जब वे अपनी सोच की सीमाओं को तोड़ते हैं।
पिछले कुछ वर्षों में भारत ने यही करके दिखाया है।
भारत ने डंके की चोट पर कहा… Break the Limits. Unlock the Possibilities: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 21, 2026
Nation First… जब आप इस mindset से आगे बढ़ेंगे तो निश्चित ही, ये आपके लिए भी नए अवसर लेकर आएगा और देश को भी बहुत लाभ होगा: PM @narendramodi at @IITKgp Platinum Jubilee celebrations
— PMO India (@PMOIndia) November 21, 2026
***
सुषमा काणे/सविता म्हसकर/राजेश शिरभाते/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai