पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात सहभागी झाले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी आसामी भाषेत भूपेन दा यांना आदरांजली वाहिली आणि आसाम, ईशान्येकडील राज्ये, भारतीय कला आणि सामूहिक जाणीवेचा उत्सव अशा शब्दांत या कार्यक्रमाचे वर्णन केले. गुवाहाटीपासून सुरू होऊन राष्ट्रीय राजधानीत शताब्दी सोहळ्याची सांगता ही यापूर्वी दिल्लीत वीर लचित बोरफुकन यांच्या 400 वी जयंतीच्या भव्य आयोजनाप्रमाणे असल्याचा उल्लेख करून, त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेवर प्रकाश टाकला. “हे एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेचे सुंदर उदाहरण आहे” असे मोदी म्हणाले.
देश आपल्या एका महान सुपुत्राला आदरांजली वाहत असतानाच, या शताब्दी वर्षाच्या उद्घाटन आणि सांगता अशा दोन्ही सोहळ्यांना उपस्थित राहाण्याचा मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी भूपेनदा यांच्यासमवेत आपल्या विशेष वैयक्तिक नातेसंबंधाचा उल्लेख करतानाच, भूपेनदा केवळ आसामचे सुपुत्र नव्हते तर गुजरातचे जावई असल्याचे सांगितले. आसामच्या सांस्कृतिक चैतन्याचे जागतिक स्तरावर दर्शन घडवणारा हा सोहळा होता, ज्यात 11,000 कलाकारांनी एकत्रितपणे केलेले बिहूचे सादरीकरण, बोडो कलाकारांनी केलेले बागरुम्बाचे सादरीकरण आणि चहाच्या मळ्यातील हजारो कलाकारांनी सादर केलेले झुमूर नृत्य यांचा समावेश होता. त्याचे स्मरण करताना आसामच्या विविध भागांतून तोच उत्साह आणि सांस्कृतिक रंग दिल्लीत घेऊन आलेल्या कलाकारांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, 11,000 कलाकारांनी एकत्र येऊ सादर केले बिहू नृत्य आणि संपूर्ण जगाने आसामची सांस्कृतिक ताकद अनुभवली होती, तो क्षण अविस्मरणीय आहे.
मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि त्यांचा चमू आणि आसामच्या जनतेचे अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूपेन हजारिका यांच्या स्मरणार्थ एक नवीन पुरस्कार सुरू केल्याबद्दल कौतुक केले. या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्याबद्दल उषा मंगेशकर यांचे पंतप्रधानांनी मनापासून अभिनंदन केले. पंतप्रधान म्हणाले की, आसाम आणि संपूर्ण देशातील अनेक पिढ्या भूपेन दा आणि उषा दीदी यांची गाणी ऐकत मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी असा विश्वासही व्यक्त केला की, लता दीदी आणि आशा दीदी नक्कीच त्यांना आपला आशीर्वाद देत असतील. “उषा दीदींना मिळालेला हा सन्मान म्हणजे भूपेनदा यांचा वारसा आणि संगीतविश्व या दोघांचाही सन्मान आहे.”
मोठेपणा हा अनेकदा नाव, काम आणि यश यांच्या आधारे मोजला जातो, मात्र भुपेनदा सारखी दुर्मिळ व्यक्तिमत्वे या सर्वांच्या पलीकडे असतात, असे नमूद करत पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी गायनातून सुरांना जिवंत केले, त्यांच्या लिखाणातून शब्दांत प्राण फुंकले आणि समाजाला एकत्रित आणणाऱ्या रचना संगीतबद्ध केल्या. गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या विस्तीर्ण प्रवाहाप्रमाणे भूपेन दा यांचे व्यक्तिमत्व व्यापक होते, त्यांनी भाषिक सीमांच्या पलीकडे जाऊन लोकपरंपरा नवीन पिढ्यांशी जोडल्या आणि भारताचा सांस्कृतिक वारसा अत्यंत निष्ठेने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या कलेला गौरवपूर्ण अभिवादन केले. “माझ्या मते, भूपेन दा यांनी केवळ गाणी लिहिली नाहीत तर आपल्या गाण्यांतून एका युगाचे वर्णन केले आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भूपेनदा हे आधुनिक विचारांचे असूनही आपल्या मातीशी घट्ट नाते जपणारे, जागतिक स्तरावरील प्रतिभा लाभलेले आणि भारतीय मनाचे कलाकार होते, असे सांगून पंतप्रधानांनी गेल्या वर्षी गुवाहाटी येथे केलेल्या विधानाची आठवण करून दिली. भूपेनदांनी भारताच्या भावनांना स्वर दिला आणि आपल्या गीतांमधून देशाची स्वप्ने गुंफली, असे त्यांनी तेव्हा सांगितले होते. “भूपेनदांच्या याच वारशाला भारत सरकारने देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान केला, हे आपले भाग्य आहे,” असे मोदी यांनी अधोरेखित केले.
भूपेन हजारिका हे कट्टर राष्ट्रवादी आणि खरे देशभक्त होते. प्रत्येक आसामी व्यक्तीने चांगला भारतीय होण्यासाठी आधी चांगला आसामी असले पाहिजे, असा त्यांचा विश्वास होता. (“आमी आसोमिया, आमी भाल भारोतिया”). भूपेन हजारिका यांनी 1962 च्या युद्धकाळात अंधःकारमय परिस्थितीत मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचे आवाहन युवकांना आपल्या प्रेरणादायी गीतातून केले होते (“बुकू हम हम कोरे, मोर आई”), याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. नद्यांशी त्यांचे असलेले पुत्रवत नातेही त्यांनी अधोरेखित केले. अन्याय आणि शोषण पाहूनही ब्रह्मपुत्रा नदी शांतपणे का वाहते, असा प्रश्न त्यांनी आपल्या गीतातून उपस्थित केला होता (“बिस्तीर्णो परोरे…”). “नद्यांवर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. अन्याय, शोषण आणि भेदभाव पाहूनही ब्रह्मपुत्रा नदी शांतपणे का वाहते, अशी तक्रारही ते नदीकडे करायचे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
नवीन आसाम आणि नवीन भारत घडवण्याचा तरुण भूपेन हजारिका यांचा संकल्प आठवून पंतप्रधानांनी सांगितले की, आजचे युवक स्टार्टअप्स सुरू करून, अंतराळात रॉकेट पाठवून तसेच कृषी, वित्त, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रांत नवे मानदंड प्रस्थापित करून त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहेत. “आज आपल्या डोळ्यांसमोर एक नवीन भारत घडताना आपण पाहत आहोत,” असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.
संपूर्ण मानवजात जीवनरूपी नौकेतील सहप्रवासी असल्याचा संदेश देणाऱ्या भूपेनदांच्या प्रेरणादायी गीताचा (“आमी एकेखोन नाओरे जात्री”) संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की, ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रातून ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे. प्रत्येक भारतीयाचे योगदान हे राष्ट्रीय प्रगतीचे वल्हे बनले असून, कोणीही मागे राहू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अलीकडील जागतिक बँकेच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत 50 कोटी भारतीयांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आले असून, आसाममध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या आहेत. सर्वसमावेशक विकासाचा हा परिणाम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “ही ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राची ताकद आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
‘मनुहे मनुहोर बाबे’ या भूपेनदांच्या गीताचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की, माणसानेच माणसाच्या दुःखाची काळजी घेतली नाही, तर ती कोण घेणार, असा प्रश्न या गीतातून उपस्थित केला आहे. धोरणांमध्ये मानवतेला सर्वोच्च स्थान दिल्याने समाजाची उभारणी होते आणि मने जोडली जातात, असे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या 12 वर्षांत सरकारने आसाम आणि संपूर्ण अष्टलक्ष्मी ईशान्य भारताची सेवा मानवी संवेदनशीलता, सौहार्द आणि सद्भावनेने केली आहे, असे त्यांनी सांगितले. आसाममधील हजारो लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून विकास आणि विश्वासाचा मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रदेशात सुरू असलेल्या परिवर्तनामागे या महान कलाकाराची प्रेरणादायी भावना असल्याचे त्यांनी सांगितले. “आज ईशान्य भारतातील प्रत्येक राज्यात, अष्टलक्ष्मीच्या प्रत्येक रूपापर्यंत आणि या प्रदेशाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचणारी विकासकामे भूपेनदांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने होत आहेत,” असे मोदी यांनी अधोरेखित केले.
Remembering Bhupen Hazarika Ji. A great son of Assam and an extraordinary artist whose music continues to live on in the hearts of people. https://t.co/NV4AGsEAL7
— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2026
भूपेन दा ने केवल गीत नहीं लिखे…उन्होंने अपने गीतों में एक युग लिखा: PM @narendramodi during the closing ceremony of Dr. Bhupen Hazarika Ji’s birth centenary celebrations
— PMO India (@PMOIndia) November 29, 2026
भूपेन दा ने भारत की भावनाओं को अपनी आवाज दी है।
उन्होंने भारत के सपनों को अपने गीतों में पिरोया है।
और इसलिए ये हमारा सौभाग्य है कि उनकी इसी विरासत को भारत सरकार ने भारत रत्न के रूप में देश का सर्वोच्च सम्मान दिया है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 29, 2026
***
शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]