पीएम्इंडिया
नमस्कार!
जपानसारखा देश, ‘आकी’ हंगामाचे हे वातावरण आणि आपल्या सर्वांचा सहवास, खरोखरीच एक अद्भूत संगम बनला आहे.
भारतामध्येही सोमवार असो किंवा इतर कोणताही कामाचा वार असो, त्यातही अगदी सकाळी नऊ वाजता मला निमंत्रण द्यायचे असेल तर, इतक्या सकाळी इतक्या मोठ्या संख्येने आलेले लोक पाहून वाटते की, यापैकी काही मंडळी तर रात्रीच येवून इथे तेव्हापासून थांबली आहेत. आपल्याला माझ्याबद्दल वाटत असलेल्या या प्रेमाबद्दल, आपल्याकडून मिळत असलेल्या या आशिर्वादाबद्दल अगदी मनापासून, हृदयापासून आपले खूप खूप आभार व्यक्त करतो.
आजची आपली ही मुलाखती विशेष मानावी लागेल. जपानमध्ये वास्तव्य करीत असलेल्या आपल्यासारख्या स्वजनांना भेटण्याची संधी मला 2016 मध्ये मिळाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा ही संधी मिळत आहे. यानिमित्त मी सर्वात प्रथम आपले प्रिय पंतप्रधान शिंजो अॅबे यांची पुन्हा एकदा ‘एलडीपी’चे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्यावतीने आणि भारताच्यावतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.
भारतीय जनतेविषयी, माझ्याविषयी पंतप्रधान अॅबे यांचे प्रेम, त्यांचा स्नेह नेहमीच त्यांनी दाखवला आहे. यावेळी त्यांनी आमच्या मैत्रीला एक वेगळे परिमाण दिले आहे आणि हे करतानाच त्यांनी ज्याप्रकारे विशेष सत्कार केला, त्याबद्दल मी पंतप्रधानांचे आणि जपानच्या जनतेचे आभार व्यक्त करतो. याबरोबरच आपणा सर्वांना दीपावलीच्या अनेक शुभेच्छा देतो. ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये लावला जाणारा दीपक जिथं असेल तिथला भाग उजळून टाकतो, त्याप्रमाणे आपणही जपान आणि या दुनियेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपले आणि आपल्या देशाचे नाव उजळून टाकावे, अशी माझी कामना आहे.
मित्रांनो,
भारताचे पंतप्रधान म्हणून माझा हा तिसरा जपान दौरा आहे. आणि ज्या ज्यावेळी मला जपानला येण्याची संधी मिळाली, त्या त्यावेळी इथे मला एका प्रकारच्या आपलेपणाचा, आत्मीयतेचा अनुभव आला आहे. यामागचे कारण म्हणजे, भारत आणि जपान यांच्यामध्ये असलेल्या ऋणानुबंधाची पाळंमुळं ही एकाच पंथाची आणि समान प्रवृत्तीची आहेत. हिंदू असो अथवा बौद्ध मत, आपल्या वारसा समान आहे. आमच्या आराध्यांपासून ते अक्षरांपर्यंत या वारशाची झलक आम्ही प्रत्येक क्षणी अनुभवत असतो.
माता सरस्वती, माता लक्ष्मी, भगवान शिवजी आणि गणेश यांच्याशी साम्य असणारी प्रतीके जपानी समाजामध्येही आहेत. सेवा या शब्दाचा अर्थ जपानी आणि हिंदीमध्ये एकच आहे. ‘होम’ इथं गोमा बनला आहे. आणि तोरण जपानमध्ये ‘तोरी’ बनला आहे. पवित्र ‘माऊंट ओंताके’ येथे जाणारे जपानी तीर्थयात्री जो पारंपरिक शुभ्र-श्वेत पोशाक घालतात त्यावर संस्कृत-सिद्धम् लिपीमध्ये काही प्राचीन वर्णही लिहिलेली असतात. हे लोक ज्यावेळी श्वेत जपानी तेंगुई घालतात त्यावर ‘ओम’ असे लिहिलेले असते.
मित्रांनो, भारत आणि जपान यांच्यातल्या ऋणानुबंधाचे ताणे-बाणे खूप जुन्या काळापासून विणले गेले आहेत आणि ते मजबूतही आहेत. भारत आणि जपानचा इतिहास पाहिला तर दोन्ही देशांना जोडणारे दुवे म्हणजे बुद्ध आणि बोस हे आहेत. त्याचप्रमाणे वर्तमानाचा विचार केला तर आपल्यासारखे नवीन भारताचे राजदूत हा दुवा अधिक दृढ करीत आहेत. सरकारचा एकच राजदूत आहे, परंतु या इथे तर हजारो राष्ट्रदूत उपस्थित आहेत. भारत आणि जपान या दोन्ही देशांच्या लोकांना, संस्कृतीला आणि आकांक्षांना जोडणारा सेतू म्हणजे आपण लोक आहात. आपण सर्वजण आपल्यावर असलेली ही जबाबदारी अतिशय यशस्वीपणाने पार पाडत आहात, हे पाहून मला आनंद होत आहे.
मित्रांनो, मी ज्यावेळी पंतप्रधान श्री. अॅबे यांच्याशी बोलतो, त्यावेळी ते भारतीय समुदायाचे इतकं कौतुक करतात की, माझं मन अगदी भरून येतं. आपण लोकांनी स्वतःच्या कौशल्याच्या बळावर आपल्या सांस्कृतिक मूल्यांनी या परदेशात खूप चांगला सन्मान मिळवला आहे. योग आता जपानच्या जनजीवनाचा एक हिस्सा बनवण्यात आपण यश मिळवले आहे. इथल्या खाद्यपदार्थांच्या सूचीत-मेन्यूमध्ये आता कढी-भात आहे. इतकंच नाही तर आता तर आपण सगळेजण दिवाळी इथल्या जपानी मित्र-स्नेहींच्याबरोबर साजरी करत आहात. मार्शल आर्टस्मध्ये निपुण असलेल्या या देशाला तुम्ही कबड्डीची कला शिकवायला सुरुवात केली आहे. आपली क्रिकेट संस्कृतीही इथं विकसित करण्याचं काम तुम्ही करीत आहात. आपण लोकांनी ज्याप्रमाणे ‘काँट्रीब्यूट, को-एक्झिस्ट टू काँकर हार्टस्’ म्हणजेच लोकांचे हृदय जिंकायचे असेल तर सहअस्तित्व मानून आपलाही सहभाग नोंदवायचा, हा मंत्र जपत तुम्ही जपानी लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे, हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. 30 हजारांपेक्षा जास्त भारतीय समुदाय आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधी या स्वरूपामध्ये जपानमध्ये कार्यरत आहेत, याचा मला आनंद वाटतो.
मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोक भारतामध्ये येत-जात असतील, हे स्वाभाविक आहे. जे लोक गेली काही वर्षे जावू शकली नाहीत, ते वर्तमानपत्रांच्या तसेच प्रसार माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून भारतामध्ये घडून येत असलेल्या परिवर्तनाविषयी नक्कीच जाणून घेत असतील. आज भारत परिवर्तनाच्या महत्वपूर्ण काळातून जात आहे. संपूर्ण जगभरामध्ये मानवतेच्या सेवेसाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचा गौरव करीत आहे. भारतामध्ये जे धोरण, नीती तयार केली जात आहे, जनसेवेच्या क्षेत्रामध्ये ज्या प्रकारचे कार्य केले जात आहे, त्यासाठी देशाचा सन्मान केला जात आहे. अगदी अलिकडेच जगातल्या दोन मोठ्या संस्थांनी भारताच्या या प्रयत्नाचा गौरव म्हणून प्रतिष्ठित सन्मान दिला आहे. हरित भविष्यासाठी भारत देत असलेल्या योगदानासाठी संयुक्त राष्ट्राने ‘चँपियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार देशाला दिला आहे. तर सेऊल शांतता प्रतिष्ठानच्यावतीने ‘सेऊल शांतता पुरस्कार’ देवून भारताचा सन्मान करण्यात आला आहे.
मित्रांनो, हा गौरव सव्वाशे कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून भलेही नरेंद्र मोदी यांना दिला गेला असेल. परंतु यामध्ये माझे योगदान फक्त एखाद्या माळेमध्ये असलेल्या मधल्या धाग्यासारखे आहे. सर्वांना संघटित करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य तेवढे मी केले आहे. आमचा देश आपल्यासारख्या अनेक हिर्यांनी आणि मोत्यांनी जणू भरलेला आहे. फक्त एका संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. हेच कार्य मी गेल्या चार वर्षांपासून करीत आहे. आज पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी, आर्थिक असंतुलन दूर करण्यासाठी, विश्वशांतीसाठी भारताने घेतलेली भूमिका आज अग्रणी ठरली आहे.
सेऊल शांतता पुरस्कारासाठी मी निवड समितीचे आभार व्यक्त करतो. त्यांनी ‘मोदीनॉमिक्स’चे कौतुक केले आहे. त्यांच्या या भावनांचा आदर, सन्मान करून मी ‘मोदीनॉमिक्स’ ऐवजी आता ‘इंडोनॉमिक्स’ हा सन्मान आहे, असे मानतो. सरकारचा प्रमुख या नात्याने भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा यांच्यानुसार मी हे करीत आहे.
वसुधैव कुटुंबकम् आणि सर्वे भवंतु सुखिनाः सर्वे संतु निरामया।
ही आमच्या प्राचीन मूल्यांची परंपरा आहे. आमच्या सरकारने तर फक्त थोडे बदल करून संपूर्ण विश्वाला भारताच्या चष्म्यातून पाहिलं आहे. मात्र इतर कोणत्याही चश्म्यातून भारताला पाहिलं जावू नये. आमचे सरकार ‘इंडियन सोल्युशन, ग्लोबल अॅप्लिकेशन’ या भावनेने सातत्याने कार्यरत आहे. आम्ही सर्वात प्रथम भारतामधल्या समस्यांचे निराकरण करीत आहोत. आणि मग तेच ‘मॉडेल’ वापरून दुनियेतल्या इतर देशांसाठी काम करीत आहोत.
मित्रांनो, जनधन, आधार आणि मोबाईल म्हणजे ‘जेएएम’ या जॅमच्या त्रिसुत्रीमुळे भारतामध्ये सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली आहे, हे ऐकून आपल्याला अभिमान वाटेल. त्यामुळे आता दुनियेतल्या इतर कोणत्याही विकसनशील देशांनाही भारताकडून प्रेरणा मिळत आहे. भारताने बनवलेल्या या कार्यप्रणालीचा अभ्यास केला जात आहे. याशिवाय डिजिटल व्यवहारांसाठी आधुनिक व्यवस्था बनवण्यात आली आहे. भिम अॅप आणि रूपे कार्ड यांच्या माध्यमातून आता कोट्यवधींचे व्यवहार होतात. याविषयीसुद्धा जगभरातल्या अनेक देशातल्या लोकांना उत्सुकता आहे. जपानही आता कमीत कमी रोखीच्या व्यवहाराच्या दिशेने वाटचाल करीत आहे, अशी माहिती मला देण्यात आली आहे. भारताने आता या मार्गावरून खूप चांगली वाटचाल केली आहे, हे जाणून आपल्याला आनंदच वाटेल. गेल्या चार वर्षांच्या काळात यूपीआय, बीएचआयएम आणि आणखी इतर वेगवेगळ्या डिजिटल माध्यमातून देव-घेवीचे व्यवहार भारतामध्ये जवळपास सातपट वाढले आहेत. त्याचबरोबर आर्थिक सहभागीतेमुळे भारताने एक पावूल पुढे टाकले आहे. अगदी गावांगावांमध्ये टपाल कार्यालयाच्या माध्यमातून वित्तीय सेवा घरपोच पुरवली जात आहे. आपण लोकांनी लहानपणी पत्र घेवून येणारा पोस्टमन पाहिला असेल. तोच पोस्टमन आता बँकर बनला आहे.
मित्रांनो, आज भारताने डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अभूतपूर्व प्रगती केली आहे. अगदी प्रत्येक गावांगावांमध्ये ब्रॉडबँडच्या माध्यमातून संपर्क यंत्रणा प्रस्थापित झाली आहे. भारतामध्ये आता लोकसंख्येपेक्षाही जास्त मोबाईल झाले आहेत, असंही कधी कधी म्हटले जाते. भारतामध्ये एक जीबी डाटा शीतपेयाच्या एका लहान लहान बाटलीपेक्षाही स्वस्त आहे. अशी स्वस्त डाटा सेवा आज सव्र्हिस डिलिव्हरीचे सर्वात प्रभावी माध्यम बनत आहे. त्याचबरोबर ‘मेक इन इंडिया’ आज ग्लोबल ब्रँड बनून सामोरा आला आहे. आज आम्ही काही फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण दुनियेसाठी सर्वोत्तम उत्पादने तयार करीत आहोत. विशेष करून इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल उत्पादनामध्ये भारत वैश्विक केंद्र बनत आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनामध्ये तर आता आम्ही प्रथम क्रमांकावर येण्यासाठी आम्ही वेगाने वाटचाल करीत आहोत.
मित्रांनो, गेल्या चार वर्षात जो व्यापार झाला, जी उलाढाल झाली त्याचे यश म्हणजे ‘मेक इन इंडिया’ आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेमुळे जे वातावरण निर्माण झाले, ते महत्वाचे आहे. ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’च्या क्रमवारीमध्ये आम्ही 40 अंकांची झेप घेतली आहे. वैश्विक स्पर्धा क्रमवारीचा विचार केला तर आम्ही यावर्षी पाच टप्पे सुधारणा केली आहे. त्याचबरोबर नवसंकल्पनेच्या बाबतीत तर आज संपूर्ण जगामध्ये सर्वात अग्रणी देशांच्या सूचीमध्ये आमचा सहभाग झाला आहे. यामागे कारण म्हणजे भारतामध्ये ‘स्टार्ट अप’च्या माध्यमातून एक वेगळीच मोठी अर्थप्रणाली बनली आहे.
मित्रांनो, भारतामध्ये ज्या काही नव संकल्पना येत आहेत, जे उपाय योजले जात आहेत, त्या सर्वांची गुणवत्ता पाहिली तर अतिशय उत्कृष्ट आहे. भारताचा अंतराळ कार्यक्रम याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणून देता येईल. भारत आता अनेक देशांचे आणि असंख्य खाजगी कंपन्यांचे उपग्रह अतिशय कमी खर्चामध्ये अंतराळामध्ये पाठवत आहे. गेल्यावर्षी आमच्या अंतराळ शास्त्रज्ञांनी एकाच वेळी शंभरपेक्षा जास्त उपग्रह अंतराळामध्ये प्रक्षेपित केले होते. हा एक अभूतपूर्व विक्रमच भारताने केला. आम्ही सर्वात कमीत कमी खर्चामध्ये चंद्रयान आणि मंगळयान अंतराळामध्ये पाठवले आहे. आता 2022 पर्यंत भारत गगनयान अंतराळामध्ये पाठवण्याची तयारी करीत आहे. हे गगनयान संपूर्ण भारतीय बनावटीचे असणार आहे. विशेष म्हणजे अंतराळामध्ये जाणाराही भारतीयच असणार आहे.
मित्रांनो, जमिनीपासून ते अंतराळापर्यंत अशा अनेक क्षेत्रामध्ये आज भारतात परिवर्तन घडून येत आहे. या परिवर्तनामुळेच आज भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी ठरली आहे. या बदलांकडे पाहता, सर्व जगातल्या अनेक संस्थांच्या मते, आगामी दशकामध्ये जगाच्या वृद्धीकडे पाहिले की, भारताच्या प्रगतीची वाढ ठसठशीत निदर्शनाला येईल. भारताच्या या विकासगाथेमध्ये जपानचे आणि आपल्या सर्वांचे खूप मोठे योगदान असणार आहे. बुलेट ट्रेनपासून ते स्मार्ट शहरांपर्यंत आज नव भारतामध्ये ज्या काही नवीन सोई सुविधा निर्माण होत आहेत, त्यामध्ये जपानची सहभागीदारी आहे. भारतामध्ये असलेले मनुष्यबळ, भारताची युवाशक्ती यांनाही जपानकडच्या कौशल्याचा लाभ मिळत आहे.
मित्रांनो, नवीन भारताच्या निर्माणामध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे, यासाठी मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो आहे. भारतामध्ये गुंतवणूक आणि नवसंकल्पना यांना आज अतिशय उत्तम संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपण सर्वांनी आपल्या पाळंमुळांशी नाते जोडण्यासाठी सक्रियता वाढवावी, यासाठी हा कार्यकाल, खूप चांगला आहे, म्हणून आपण भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन मी इथे करतो. जपानमध्ये वास्तव्य करणा-या भारतीयांनी आपल्या जपानी मित्रांना बरोबर घेवून आपला देशाच्या कार्यामध्ये नेहमीच खूप मोठे योगदान दिले आहे. भारताच्या स्वांतत्र्य आंदोलनामध्ये स्वामी विवेकानंदजी यांना तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही जपानकडून खूप चांगले सहकार्य मिळाले होते. ही गोष्ट कोट्यवधी भारतीयांच्या मनामध्ये अगदी घर करून बसली आहे. आगामी भविष्यातही उभय देशांचे संबंध असेच अधिक घनिष्ट होत राहतील, सहयोगाने काम करून अधिक चांगले दृढ संबंध कायम ठेवण्यासाठी आम्हाला सातत्याने प्रयत्नशील रहायचे आहे.
मी आज आपल्याला या व्यासपीठावरून पुढच्यावर्षी जानेवारीमध्ये होत असलेल्या प्रवासी भारतीय दिनासाठी आणि अर्धकुंभ मेळाव्यासाठी आमंत्रित करतो आहे. प्रवासी भारतीय दिवस तर यावेळी वाराणसी येथे होणार आहे. वाराणसीची गंगा आरती पाहून जपानचे पंतप्रधान अॅबे अगदी मंत्रमुग्ध झाले होते. खासदार म्हणून मी वाराणसीचे प्रतिनिधित्व संसदेमध्ये करतो. म्हणूनच मी वाराणसीचा खासदार या नात्याने आपल्याला प्रवासी भारतीय दिनी वाराणसीला भेट देण्याचे निमंत्रण देत आहे. आपण सर्वजण माझे पाहुणे म्हणून जरुर यावे, असा माझा आग्रह आहे. आता आणखी दोन दिवसांनी आपल्या भारताची एक वेगळी, नवी ओळख संपूर्ण जगाला होणार आहे. भारताच्या नकाशावर एक नवे स्थान निदर्शित केले जाणार आहे. दि. 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. आता सरदारसाहेबांची जयंती तर आपण दरवर्षी साजरी करतोच. परंतु यंदा या जयंती कार्यक्रमामुळे संपूर्ण विश्वाचे लक्ष आकर्षित होणार आहे. कारण सरदारसाहेबांच्या जन्मभूमीमध्ये गुजरातच्या धरतीवर सरदारसाहेबांचा अतिशय उंच पुतळा बनवण्यात आला आहे. हा पुतळा जगातला सर्वात उंच आहे. आता या पुतळ्याची उंची नेमकी किती जास्त आहे, हे अगदी सोप्या पद्धतीने, सर्वांना समजेल असे सांगतो. अमेरिकेतल्या ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ पेक्षाही ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची उंची दुप्पट आहे. सरदारसाहेब प्रचंड प्रतिभेचे धनी होते, त्यामुळे तशीच त्यांच्या प्रतिमेची उंची ठेवण्यात आली आहे. प्रत्येक भारतीयाला जगातल्या या सर्वात उंच पुतळ्याकडे पाहून गर्व, अभिमान वाटणार आहे. जगातला सर्वात उंच पुतळा आपल्या भारत भूमीवर आहे आणि तोही सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे, हे एक विशेष आहे. दि. 31 ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. आपण सर्वजण ज्यावेळी भारतामध्ये येणार आहात, त्यावेळी सरदार पटेल यांचा हा पुतळा पाहण्यासाठी नक्की याल, असा मला विश्वास आहे. आपल्याबरोबरच आपले जपानी मित्र भारतामध्ये आल्यानंतर त्यांनाही सरदार पटेल यांचा हा संपूर्ण विश्वातला सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे, असा माझा आग्रह आहे.
अखेरीस आपल्या सर्वांना दीपावलीनिमित्त खूप-खूप शुभेच्छा देतो. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिलात, त्याबद्दल अगदी मनापासून, हृदयापासून खूप खपू धन्यवाद देतो.
धन्यवाद!
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
Had a delightful interaction with the Indian community in Japan.
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2018
The accomplishments of our diaspora make us very proud.
Talked at length about the rich history, robust present and strong future of India-Japan relations. https://t.co/9jdURuB6Il pic.twitter.com/BLiYLMepPq