Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17-18 जानेवारी रोजी आसामचा दौरा


नवी दिल्ली, 16 जानेवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17-18 जानेवारी 2026 रोजी आसामला भेट देणार आहेत.

17 जानेवारी रोजी, संध्याकाळी अंदाजे 6 वाजता, गुवाहाटी येथील सरुसजाई स्टेडियम मध्ये आयोजित बोडो समुदायाच्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील.

पंतप्रधान 18 जानेवारी रोजी, सकाळी अंदाजे 11 वाजता, 6,950 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या काझीरंगा उन्नत कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमिपूजन करतील आणि नागांव जिल्ह्यातील कलियाबोर येथे नवीन  दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधानांचा गुवाहाटी दौरा

पंतप्रधान गुवाहाटी येथील सरुसजाई स्टेडियममध्ये आयोजित बोडो समुदायाच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवणाऱ्या “बागुरुम्बा द्हू 2026”, या ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील.

यावेळी बोडो समाजातील 10,000 हून अधिक कलाकार ‘बागुरुम्बा’ हे समूह नृत्य सादर करतील. राज्याच्या 23 जिल्ह्यांमधील 81 विधानसभा मतदारसंघातील कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

बगरुंबा हे बोडो समाजाचं एक लोकनृत्य आहे. हे नृत्य निसर्गातून प्रेरणा घेण्यास सांगणारे   आहे. यात फुले उमलणे, माणसाचे आयुष्य आणि निसर्ग यांचे एकत्र नाते दाखवले जाते. हे नृत्य साधारणपणे बोडो तरूणी करतात आणि पुरुष वाद्य वाजवतात. नृत्यात सावकाश , मृदू हालचाली असतात. नृत्यातील हालचाली फुलपाखरे, पक्षी, पाने आणि फुले यांसारख्या नैसर्गिक गोष्टींचे रूप घेऊन दाखवल्या जातात. हे समूह नृत्य आहे.  त्यामध्‍ये कधी वर्तुळात तर कधी रांगेत कलाकार वेगवेगळ्या मुद्रा करीत नृत्य करतात; त्यामुळे नृत्याच्या  सौंदर्य कलेत भर पडते.  

बगरुंबा नृत्य बोडो लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. यात शांतता, सुपीकता, आनंद आणि एकत्र राहण्याचा भाव दिसतो. हे नृत्य खास करून ब्विसागू  (बोडो नववर्ष) आणि दोमासी या सणांबरोबर  जोडले गेले आहे.

पंतप्रधानांचा कार्यक्रम – कळियाबर

पंतप्रधान कळियाबरमध्ये काझिरंगा उन्नत मार्ग प्रकल्पाचे (राष्ट्रीय महामार्ग-715 चा कळियाबर-नुमालीगढ भाग, 4-लेनिंग)  भूमिपूजन करतील. या प्रकल्पासाठी   6,950 कोटी रुपये खर्च अपेक्षित  आहे.

हा प्रकल्प 86 किलोमीटर लांब आहे. यातील 35 किलोमीटर उन्नत वन्यजीव मार्ग काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातून जाईल. 21 किलोमीटर बायपास आणि 30 किलोमीटर जुन्या राष्ट्रीय महामार्ग -715 चे रुंदीकरण करून हा दुपदरी मार्ग चौपदरी केला जाईल.

या प्रकल्पामुळे प्रदेशातील दळणवळण सुधारेल आणि काझिरंगातील जैवविविधतेचे रक्षण होईल. हा रस्ता नागाव, कार्बी आंगलोंग आणि गोलाघाट जिल्ह्यांतून जाईल. अप्पर आसाम – खास करून दिब्रुगड आणि तिनसुकिया – इथेपर्यंत पोहोचणे सोपे होईल.

वन्यजीव उन्नत मार्गामुळे प्राण्यांचा संचार अडथळ्याशिवाय होईल.  माणूस-प्राणी संघर्ष कमी होईल. रस्ते सुरक्षित होतील, प्रवासाचा वेळ कमी होईल, अपघात कमी होतील आणि मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक वाढेल. जाखलाबंधा आणि बोकाखाट इथे बायपास तयार होतील. त्यामुळे शहरातली गर्दी कमी होईल आणि लोकांचं जीवन सुकर होईल.

गुवाहाटी (कामाख्या)-रोहतक अमृत भारत एक्सप्रेस आणि दिब्रुगड-लखनौ (गोमती नगर) अमृत भारत एक्सप्रेस या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या या कार्यक्रमात पंतप्रधान सुरू करतील. या नव्या गाड्यांमुळे ईशान्य भारत आणि उत्तर भारत यांच्यातली रेल्वे जोडणी मजबूत होईल. सुरक्षित आणि सुखकारक प्रवास करता येईल.

 
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai