Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रमबानान मंदिर संकुलाला दिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रमबानान मंदिर संकुलाला दिली भेट


नवी दिल्‍ली, 8 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योग्यकर्ता इथल्या ऐतिहासिक प्रमबानान मंदिर संकुलाला भेट दिली. हे ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. यावेळी विशेष आदरातिथ्य दाखवत इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी देखील या मंदिर भेटीदरम्यान पंतप्रधानांची सोबत केली. या दोन्ही नेत्यांनी मंदिर संकुलालातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ म्हणून एका कोनशिलेचे अनावरण केले.

प्रमबानान मंदिर संकुल हे 9 व्या शतकात बांधले गेले होते. हे मंदिर संकुल, त्रिमूर्ती म्हणजेच भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित असलेले इंडोनेशियातील सर्वात मोठे मंदिर संकुल आहे. हे मंदिर संकुल भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमधील  प्रदीर्घ काळापासूनच्या परस्पर सामायिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे एक शाश्वत प्रतीक मानले जाते.

इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी 2025 मध्ये भारताला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये प्रमबानान मंदिर संकुलातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी भारताच्या सहकार्याबाबत  चर्चा झाली होती. या चर्चेनुसारच आता या संवर्धन प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

भारताने आग्नेय  आशियातील अनेक जागतिक वारसा स्थळांच्या पुनरुज्जीवन आणि संवर्धनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. यापूर्वी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने इंडोनेशियातील बोरोबुदुर मंदिर परिसराचे तपशीलवार आणि व्यापक दस्तऐवजीकरण देखील केले आहे. प्रमबानान मंदिर संकुलाच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी भारताने दिलेले हे सहकार्य, दोन्ही देशांमधील परस्पर सामायिक सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याप्रति असलेल्या शाश्वत वचनबद्धतेचेच उदाहरण ठरले आहे.

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai