पीएम्इंडिया
नवी दिल्ली,26 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026’ मधील सहभागींशी आभासी पद्धतीने संवाद साधला. यावेळी युवा माय भारत स्वयंसेवकांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाख येथील सीमावर्ती भागातील त्यांचे अनुभव सामायिक केले. सुधारित पायाभूत सुविधा, संपर्कव्यवस्था आणि सार्वजनिक सेवांच्या माध्यमातून या गावांमध्ये झालेला कायापालट तसेच महिलांच्या नेतृत्त्वाखालील विकास, पर्यटन, समुदायाचा सहभाग आणि मजबूत राष्ट्रीय एकात्मतेवर या संवादात भर देण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातील 245 जिल्ह्यांमधील 5,000 पेक्षा अधिक माय भारत स्वयंसेवक आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात करताना दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथील माय भारत स्वयंसेवक दिव्यांश जोशी यांनी विकसित भारत युवा नेते संवाद, विकसित भारत युवा संसद, बजेट ट्विस्ट,मार्गदर्शन आणि स्वयंसेवा कार्यक्रम याबद्दल माहिती दिली. माय भारत उपक्रमाअंतर्गत 2.30 कोटींपेक्षा अधिक युवकयुवतींना लाभ झाला आहे तसेच या देशव्यापी प्रश्नमंजुषेमध्ये 2.86 लाख युवकांनी भाग घेतला होता आणि त्यापैकी 403 स्वयंसेवकांची सीमावर्ती भागातील गावांना भेट देण्यासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील लिओ गावाला दिलेल्या भेटीचे स्मरण करताना त्यांनी त्या गावातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलांशी झालेला संवाद,स्थानिक युवकांसाठी करिअर मार्गदर्शक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम, महिला सरपंचांचे नेतृत्व आणि आयुष्मान आरोग्य मंदिराच्या कामकाज इत्यादी विषयांवर प्रकाश टाकला. त्या ठिकाणी एका घरात केलेल्या वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवावरुन आपलेपणाची भावना ही भाषा आणि राज्यांच्या सीमांच्या पलीकडे आहे असे आपल्याला जाणवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, स्वयंसेवकांनी कारगिल युद्ध स्मारकावर देशाच्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली आणि लवकरच ‘विकसित भारत’च्या संकल्पनेशी कटिबद्ध राहून आपले अनुभव संकलित करून ते पंतप्रधानांना सादर करतील.
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथील माय भारत स्वयंसेवक निकिता प्रवीण सोळंकी यांनी सांगितले की माय भारत प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून झालेल्या तिच्या निवडीमुळे तिला किन्नूर जिल्ह्यातील धार चांगो निचला गावाचा पहिला स्वतंत्र प्रवास करणे शक्य झाले. या गावातील लोकांनी अतिशय आदरपूर्वक केलेल्या स्वागताने आपला आत्मविश्वास दुणावला आणि स्त्रियांबद्दलच्या बदलत्या सामाजिक दृष्टिकोनाचे ते प्रतिबिंब होते. महिला प्रधान, पंचायत प्रतिनिधी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांशी त्यांनी साधलेल्या संवादामुळे ग्रामीण महिलांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेल्या विविध जबाबदाऱ्यांची जाणीव झाले आणि आपल्या या आधीच्या दृष्टीकोनाच्या विरुद्ध दर्जेदार रस्ते, नियमित वीजपुरवठा, पेय जल जोडण्या आणि डिजिटल संपर्क यांसारख्या सुधारणा दिसून आल्या, ज्यांचे श्रेय तेथील रहिवासी प्रामुख्याने प्रधान मंत्री ग्राम सडक योजना, जल जीवन मिशन आणि आयुषमान भारत यांसारख्या योजनांना देत होते, असे त्या म्हणाल्या. त्यांनी स्वच्छता, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला, गावातील मुलांनी त्यांच्या मूळ प्रदेशाबद्दल उत्सुकता दाखवली असे त्या म्हणाल्या तसेच त्या ज्यांच्या घरी राहिल्या होत्या त्या यजमान कुटुंबाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
चांगो प्रदेशाला 2016 मध्ये भेट दिल्याचे स्मरण करुन पंतप्रधान म्हणाले की सोळंकी यांच्या प्रवासातून भारताच्या कन्यांचा वाढता आत्मविश्वास दिसून येतो आणि माय भारत उपक्रमाने वैयक्तिक प्रवासांचे रुपांतर एका राष्ट्रीय कुटुंबात केले आहे. ‘एकट्याने केलेला प्रवास हा जगाला जाणून घेण्याबरोबरच स्वतःला ओळखण्याचाही एक उत्तम मार्ग आहे,’ असे त्यांनी सांगितले.
राजस्थानमधील जालोर येथील मायभारत स्वयंसेवक सुनील कुमार केला म्हणाले की, स्वतः सीमावर्ती गावातील असल्याने त्यांना हिमाचल प्रदेशातील धार चांगो उप्रेला गावातील लोकांशी सहजपणे जोडले जाणे शक्य झाले. भौगोलिक आणि हवामानातील बदल असले तरी दोन्ही प्रदेशांमधील लोक साहस, राष्ट्रभक्ती आणि स्नेहाने जोडलेले आहेत. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबाशी सतत संपर्क ठेवला. या संवादातून त्यांनी त्यांना सतलज नदी, शाळा, जनऔषधी केंद्र, रुग्णालय आणि क्रीडा सुविधा दाखवल्या. त्याचबरोबर, त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समधून त्यांनी मित्रांनाही मायभारत उपक्रमाशी जोडले जाण्यास आणि त्याचा अनुभव घेण्यास प्रेरित केले. तिथे जाण्यापूर्वी तेथील रस्ते, निवासाची व्यवस्था, वीज आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी संदर्भात असलेली त्यांची धारणा तिथे प्रत्यक्ष गेल्यावर मात्र होमस्टे पर्यंत जाणारे उच्च दर्जाचे रस्ते, सौर ऊर्जा संयंत्रे आणि सुधारित पायाभूत सुविधांनी आमूलाग्र बदल झालेल्या दैनंदिन जीवनाच्या अनुभवाने पूर्णपणे बदलली असे ते म्हणाले. आपण तेथील यजमान कुटुंबाच्या संपर्कात असून त्यांना राजस्थान मध्ये निमंत्रित केल्याचे ते म्हणाले.
राजस्थान, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि ईशान्य भारताकडील सीमावर्ती भागातील युवक एक समान भावना किंवा दृष्टिकोन व्यक्त केला आणि तो म्हणजे सीमावर्ती भागातील लोक जरी भौगोलिक दृष्ट्या खूप लांब असले तरी राष्ट्राशी असलेले त्यांचे नाते भावनिक दृष्ट्या घट्ट आहे. ‘पूर्वी ज्यांना प्राधान्यक्रमात सर्वात शेवटी स्थान मिळत होते, तेच आज सर्वप्रथम आहेत,’ असे पंतप्रधान म्हणाले.
अभ्यासाव्यतिरिक्त आणि पुस्तकांपलीकडे जाऊन नवीन गोष्टी शिकण्याच्या ध्यासामुळे आपण ‘माय भारत’ उपक्रमाशी जोडले गेलो आणि उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोऱ्यात दाखल झालो, असे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील ‘माय भारत’ (MYBharat) स्वयंसेवक भव्य श्री हिने सांगितले.
अपरिचित हवामान, अन्न, संस्कृती आणि जीवनशैलीबद्दल त्यांच्या मनात सुरुवातीला असलेल्या सर्व शंका स्थानिक रहिवासी आणि अधिकाऱ्यांच्या आदरातिथ्यामुळे दूर झाल्या. तसेच, इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या (ITBP) जवानांशी झालेल्या संवादाने त्यांच्यातील शिस्त, नम्रता, समर्पण आणि राष्ट्रवादाबद्दलचा आदर अधिकच वाढवला. विविध राज्ये, भाषा आणि संस्कृतींमधून आलेले सहभागी सुरुवातीला अपरिचित म्हणून एकत्र आले होते, परंतु ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेचे प्रतीक बनून एका कुटुंबासारखे परतले, असे तिने सांगितले.
नेलांग आणि जादुंग खोऱ्यांची तसेच सफरचंदांच्या बागांची छायाचित्रे तिच्या मित्रपरिवारामध्ये खूप लोकप्रिय ठरली आणि ती पाहून तिच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी नंतर ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी केली. त्यांनी या वास्तव्यादरम्यान कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी सहभागींना पुरवण्यात आलेल्या साधनांची आणि साहित्याची आठवण काढली. याशिवाय, भूस्खलनाचा फटका बसूनही सर्व हालअपेष्टा सहन करत आपल्या मूळ गावीच राहण्याचा निर्णय घेणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाच्या जिद्दीचे कौतुक केले. आपल्या स्वतःच्या राज्यातील ऊर्जेने भरलेल्या लोकनृत्यांच्या तुलनेत गढवाली नृत्याचे शांत आणि ध्यानावस्थेसारखे स्वरूपही तिने आवर्जून नमूद केले.
उत्तराखंडमधील मुखवा गावाला दिलेल्या भेटीची यावेळी पंतप्रधानांनी आठवण सांगितली. या संवादाने “भारताचे तरुण राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देतात” हा त्यांचा विश्वास पुन्हा एकदा बळकट झाला.. “ज्या पद्धतीने तुम्हा सर्वांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या भावनेची प्रत्यक्ष अनुभूती घेतली आहे, ती इतर अनेक तरुणांना नक्कीच प्रेरित करेल,” असे मोदी यांनी नमूद केले.
अंदमान आणि निकोबार बेटांवरील 21 वर्षांच्या ‘माय भारत’ (MYBharat) स्वयंसेवक सायंतिका मिस्त्री हिने कोट्यवधी तरुणांना राष्ट्रनिर्माणात योगदान देण्यास सक्षम करणारे ‘माय भारत’ हे व्यासपीठ उभारल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.
समुद्रसपाटीपासून लडाखमधील सुमारे 17,000 फूट उंचीवर असलेल्या मान (Maan) गावापर्यंतच्या आपल्या प्रवासाचा अनुभव सांगताना, त्यांनी ‘ॲक्युट माउंटन सिकनेस’ (उंचीवरील थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा त्रास) झाल्याची माहिती दिली. या काळात ‘माय भारत’ टीम आणि इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या (ITBP) जवानांनी घेतलेल्या काळजीचे त्यांनी वर्णन केले. आयटीबीपी च्या डॉक्टरांनी स्वतःच्या सैनिकांवर उपचार करण्यापूर्वी त्यांना अतिथी मानून आधी त्यांच्यावर उपचार केले. हा अनुभव ITBP चे जवान केवळ सीमांचे रक्षणच करत नाहीत, तर नागरिकांचीही तितक्याच आपुलकीने काळजी घेतात हे दर्शवणारा होता, तसेच यामुळे अत्यंत उंच आणि कठीण हवामानात जगण्यासाठी लागणाऱ्या धैर्याचे आणि क्षमतेचे महत्त्व समजल्याचे तिने सांगितले.
नेटवर्क आणि संपर्कव्यवस्थेच्या अभावाबद्दल कुटुंबीयांकडून शंका व्यक्त होत असताना प्रत्यक्षातील चित्र वेगळे होते. या सीमावर्ती भागातही विश्वासार्ह इंटरनेट, QR-कोड आणि UPI पेमेंट सुविधा तसेच वाय-फाय (Wi-Fi) उपलब्ध असल्याचे आढळून आले. या गटाने तेथील स्थानिक मुलांशीही संवाद साधला, ज्यातील एका मुलाने अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. याशिवाय, स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन लग्नसोहळे आणि मठातील कार्यक्रम आयोजित करणे, खराब झालेला मोबाईल टॉवर दुरुस्त करणे आणि त्याच्या बॅटऱ्यांसाठी साठवणूक कक्ष उभारणे यांसारख्या उपक्रमांतून दिसून आलेल्या तिथल्या सामूहिक सामाजिक भावनेकडेही तिने लक्ष वेधले.
इतरांना देशाचे हे भव्य स्वरुप, येथील लोक आणि एकात्मतेची जोडलेली ही भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावी, यासाठी कुमारी मिस्त्री हिला आपले अनुभव लेखांच्या किंवा पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचे प्रोत्साहन देताना मोदी म्हणाले, “जेव्हा तुम्ही आनंद वाटता, तेव्हा तो द्विगुणित होतो.”
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील ‘माय भारत’ स्वयंसेवक आशिष सोनी, जो नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे, त्याने अर्थसंकल्प निर्मिती प्रक्रियेत तरुणांना त्यांच्या सूचना आणि विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. हिमाचल प्रदेशातील स्पिती भागातील ‘काझा खास’ येथील आपला अनुभव सांगताना तो म्हणाला की, अत्यंत दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क मिळणे किती कठीण असायचे तो काळ माहीत असलेल्या त्यांच्या पालकांना, जेव्हा त्यांनी सुमारे 14,000 फूट उंचीवरून व्हिडियो कॉल केला, तेव्हा अतिशय आश्चर्य वाटले.
माय भारत’ उपक्रम म्हणजे संघर्षाचा काळ पाहिलेली पिढी आणि बदलाचा काळ पाहणारी नवी पिढी या दोघांना जोडणारा सेतू आहे , असे सांगत त्याने हिक्किम (Hikkim) येथील जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून पंतप्रधान, त्यांचे कुटुंब, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, संरक्षण मंत्री आणि आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे लिहिल्याची आठवण सांगितली. भारत केवळ मेट्रो आणि विमानतळांनीच जोडला गेला नाही, तर दूरवरच्या दुर्गम भागांत सेवा देणाऱ्या संस्थांद्वारेही जोडला गेला आहे, असे त्याने सांगितले. सुमारे 14,500 फूट उंचीवर होणारे QR-कोड डिजिटल पेमेंट हे ‘डिजिटल इंडिया,’ संपूर्ण देशात विश्वासाचा स्रोत बनल्याचा दाखला असल्याचे त्याने अधोरेखित केले.
महिला बचत गटांशी झालेल्या संवादातून त्यांना होमस्टे, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सी-बकथॉर्नवर (Sea Buckthorn) आधारित उत्पादनांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या उद्योजकतेची माहिती मिळाली; तर ‘पीएम मुद्रा योजना’ आणि ‘दीनदयाळ अंत्योदय योजने’वरील चर्चेत रोजगाराच्या व उपजीविकेच्या संधी वाढवण्यावर भर देण्यात आला. याशिवाय, सीमा रस्ते संघटनेने (BRO) बांधलेला ‘चिचम पूल’ (Chicham Bridge) हा तेथील रस्ते संपर्क, पर्यटन आणि आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी किती महत्त्वाचा ठरत आहे हे सांगतानाच त्यांनी या भागात रात्रीच्या पर्यटनाची असलेली मोठी क्षमताही अधोरेखित केली.
तंत्रज्ञान देशाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचले आहे आणि स्थानिक उत्पादनांची खरेदी केल्याने रोजगारनिर्मिती होईल, उपजीविकेला आधार मिळेल व भारतातील प्रादेशिक ओळख सर्वत्र पोहोचेल, हे अधोरेखित करत मोदी यांनी आवाहन केले,”तुम्ही कुठेही प्रवास करा, तुमच्या प्रवास खर्चाच्या किमान पाच टक्के रक्कम स्थानिक लोकांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी नक्की खर्च करा.”
या संवादाचा समारोप करताना पंतप्रधानांनी उपस्थित युवा सहभागींना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम ‘माय भारत’ उपक्रमाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो; ज्याद्वारे तरुणांना भारतातील सीमावर्ती गावांचा झालेला कायापालट प्रत्यक्ष अनुभवण्याची, जुन्या आणि कालबाह्य समजुती दूर करण्याची तसेच देशाची सांस्कृतिक विविधता, विकासातील प्रगती, लोकसहभाग आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेचे आकलन अधिक चांगल्या प्रकारे करण्याची संधी मिळाली.
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Interacting with the participants of the Viksit Vibrant Village Programme. Great to see that the initiative is instilling a deeper sense of nation-building among the youth.#Youth4ViksitBharat #MYBharat https://t.co/2vCFle03vY
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2026
विकसित गांव, विकसित भारत की भी आधारशिला है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 26, 2026
हमारी सरकार ने, सीमावर्ती गांवों को... देश का प्रथम गांव माना: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 26, 2026
विकसित Vibrant Village की ये यात्रा... सबको जोड़ने, सबसे जुड़ने का ही एक माध्यम है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 26, 2026