Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन


नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे माजी राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांच्या “ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स” (Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles) या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “आज आपल्याला  रामनाथ कोविंद जी यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली आहे आणि मी या कार्यक्रमाचा एक भाग बनलो याचा मला आनंद आहे.”

माजी राष्ट्रपतींसोबतच्या आपल्या सखोल वैयक्तिक संबंधांची आठवण जागवताना, पंतप्रधानांनी गेल्या अनेक वर्षांतील कोविंद जींचे मार्गदर्शन आणि आपुलकीबद्दल असलेला आपला प्रगाढ आदर अधोरेखित केला. “कोविंद जी यांच्याशी असलेला माझा दीर्घकालीन परिचय, त्यांना जवळून जाणून घेण्याचे भाग्य, राष्ट्रपती म्हणून त्यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांचे माझ्यावरील विशेष प्रेम आणि आपुलकी; ही माझी सर्वांत मोठी संपत्ती राहिली आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.

माजी राष्ट्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाची खोली आणि क्षमतेची प्रशंसा करताना पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की, हे साहित्यिक कार्य देशाच्या लोकशाही मूल्यांची एक चिरंतन साक्ष म्हणून कार्य करेल. “मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की रामनाथ कोविंद जी यांचे हे आत्मचरित्र भारतीय लोकशाही आणि भारतीय समाजासाठी स्वतःच एक अनमोल वारसा बनेल,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

राष्ट्र उभारणीतील कोविंद जी यांच्या आजीवन योगदानाचा आवाका लक्षात घेता, पंतप्रधानांनी जास्त तपशील देण्याचे टाळत, श्रोत्यांना हे जीवनचरित्र स्वतः वाचून अनुभवण्यासाठी प्रोत्साहित केले. “पुस्तकाच्या प्रकाशनात फक्त एका ‘पडदा उघडण्याच्या’  प्रसंगासारखी झलक असायला हवी आणि तुम्ही सर्वांनी हे पुस्तक स्वतः वाचून त्याचा पूर्ण आस्वाद घेतला तरच ते अधिक योग्य ठरेल!” असे  मोदी म्हणाले.

तरुण पिढीसाठी या आत्मचरित्राचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी भावी पिढ्यांनी माजी राष्ट्रपतींच्या शब्दांतून प्रेरणा घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली. “देशाच्या नव्या पिढीनेही त्यांचे लेखन आणि त्यांचे अनुभव वाचले पाहिजेत, ज्यातून प्रत्येकाला खूप काही शिकायला मिळेल,” असे  मोदी यांनी आवर्जून सांगितले.

“ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स” या पुस्तकाच्या शीर्षकाचे विश्लेषण करताना, पंतप्रधानांनी वैयक्तिक संघर्ष आणि देशाच्या लोकशाही यशाच्या संदर्भात त्याच्या दुहेरी महत्त्वाचा अर्थ उलगडून दाखवला. “आयुष्यातील संघर्ष हे त्यांचे वैयक्तिक आहेत, परंतु त्या संघर्षांतून मिळालेला विजय हा भारतीय प्रजासत्ताकाचा आणि येथील लोकशाहीचा आहे,” असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले.

मानवाच्या सामान्य प्रवृत्तींशी माजी राष्ट्रपतींच्या औदार्याची तुलना करताना, पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की, अनेक जण आपल्या अडचणींसाठी समाजाला दोष देतात, परंतु भारतीय मूल्यांमध्ये खोलवर रुजलेले कोविंदजींचे उदार अंतःकरण समाजाला त्यांच्या यशातील समान भागीदार मानते. “जेव्हा हृदय उदार असते आणि भारतीय मूल्ये असतात, तेव्हा व्यक्ती समाजात दोष शोधण्यात वेळ वाया घालवत नाही, तर त्याच्या सकारात्मक बाजूवर लक्ष केंद्रित करते,” असे मोदी यांनी नमूद केले.

आत्मचरित्रातील कोविंद यांच्या बालपणीच्या एका अत्यंत दुर्दैवी प्रसंगाची आठवण सांगताना, पंतप्रधानांनी कानपूर देहात येथे घरातील जीवनावश्यक वस्तू वाचवण्याच्या प्रयत्नात कोविंद जींच्या आईचा आगीत होरपळून झालेला मृत्यू आणि ही हृदयद्रावक घटना उपस्थितांशी सामायिक केली. “ लहान वयात असा अपघात होणे आणि अशा प्रकारे आईचे छत्र हरवणे, हे किती वेदनादायी असेल याची तुम्ही कल्पना करू शकता!” असे  मोदी म्हणाले.

या शोकांतिकेतून निर्माण झालेल्या धैर्याचा आणि सहनशीलतेचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, कशा प्रकारे एका शेजारच्या आईने कोविंदजींच्या संगोपनात मदत केली; ज्या घटनेने सामाजिक सलोख्याबद्दलच्या त्यांच्या आकलनाला एक सखोल आकार दिला. “या प्रसंगातून त्यांना समाजातील एकता आणि सलोख्याची ताकद समजली, आणि अशा अडचणींनी कोविंद जी यांना अधिक मजबूत बनवले,” असे  मोदी यांनी नमूद केले.

या दुर्घटनेनंतर वडिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर देताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, ज्या प्रकारे कोविंदजींच्या वडिलांनी कुटुंबाचा सांभाळ केला आणि आपल्या मुलांवर उत्तम संस्कार घडवले, ते खरोखरच प्रशंसनीय होते. “त्यांनी या पद्धतीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि मुलांवर संस्कार केले, म्हणूनच कोविंद जी आपल्या वडिलांना आपले आदर्श नायक मानतात,” असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले.

साधनसंपत्तीची असलेली वानवा दूर करतानाच कोविन्दजींनी शिक्षणाची कास धरली हे  नमूद करताना, देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंतच्या त्यांच्या अतुलनीय प्रवासाचाही पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. “त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि संसाधनांच्या अभावला कधीही आपली दुर्बलता बनू दिली नाही; आणि अशा पदापर्यंत मजल मारली ज्याची कधीकाळी लोकांनी कल्पनाही केली नसेल.” असे  प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

माजी राष्ट्रपतींच्या ठायी कायम असणाऱ्या विनम्रतेची त्यांनी प्रशंसा केली. याबाबातच्या  एक हृदयस्पर्शी प्रसंगाची आठवण पंतप्रधानांनी सांगितली; जेव्हा कोविन्दजी त्यांच्या ‘परौंख’ या गावी परतले, तेव्हा त्यांनी तिथल्या मातीला कपाळी लावले तसेच त्यांच्या जुन्या शिक्षकांच्या पावलांना स्पर्श करून नमन केले. “त्यांच्या या आचारणामुळे, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे  भारतीय मूल्यांचे चित्र जगासमोर आले” असे पंतप्रधानांनी नमूद केले.

शतकानुशतकांच्या गुलामगिरीमुळे आलेल्या  ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीबाबत भाष्य करताना, पंतप्रधानांनी महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांनी केलेला अथक संघर्ष आणि त्यांनी पाहिलेल्या दूरगामी स्वप्नांप्रती आदर व्यक्त केला. “अशा कितीतरी  महान व्यक्तिमत्त्वांनी अशा भारताच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न पाहिले होते, जिथे अतिशय गरीब व्यक्तीलाही सर्वोच्च स्थानी  पोहोचण्याची संधी मिळेल,” असे मोदी यांनी नमूद केले.

या ऐतिहासिक आकांक्षांची आधुनिक यशाशी सांगड घालताना, कठोर परिश्रमांच्या बळावर समताधिष्ठित समाजाचे  शतकानुशतकांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्रिय आणि मोठे योगदान देणाऱ्या कोविंदजींसारख्या व्यक्तीबद्दल पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले, “कोविंदजींसारख्या व्यक्तींनी केवळ आपल्या कठोर परिश्रमांच्या आणि क्षमतेच्या जोरावर स्वतःचेच आयुष्य बदलले असे नाही, तर शतकानुशतकांच्या त्या स्वप्नाला साकारण्यातही  महत्त्वाची भूमिका बजावली,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

ही कार्य पुढे नेण्यासाठी समर्पित आणि निष्ठावान तरुणांची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन करताना, अडथळ्यांना न डगमगता देश, आत्मनिर्भरतेच्या दिशेने धैर्याने मार्गक्रमण करेल अशी एक पिढी घडवण्याचे आवाहन केले. “या परिवर्तनामुळे सशक्त भारत घडवण्याचा संकल्प पूर्ण होईल आणि आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा मार्ग अधिक सुकर होईल,” असे मोदी म्हणाले.

हे आत्मचरित्र एक महत्वाचे प्रेरणादायी साधन आहे असे सांगत, कोविंदजींच्या जीवनाचे तपशीलवार लेखन आवश्यक युवाशक्तीला आकार देण्यासाठी एक निश्चित मार्गदर्शक ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. “युवाशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली प्रेरणा कोविंदजींच्या या आत्मचरित्रातून मिळू शकेल आणि हेच  त्या प्रेरणेचे एक महत्त्वाचे स्रोत ठरू शकेल,” असा विचार मोदी यांनी मांडला.

कोविन्दजीच्या राजकीय प्रवासाच्या प्रारंभाबद्दल सांगताना, मोरारजी देसाई यांच्यासोबत काम केल्यामुळे राष्ट्रसेवेची त्यांची आंतरिक इच्छा एका समर्पित राजकीय कारकिर्दीत रूपांतरित झाली असे पंतप्रधानांनी नमूद केले. “कोविन्दजींच्या मनातील राष्ट्रसेवेच्या भावनेला, मोरारजी देसाई यांच्यासोबत काम केल्यामुळे योग्य दिशा मिळाली.” असे मोदी म्हणाले.  

संसद सदस्य, राज्यपाल आणि सरतेशेवटी राष्ट्रपति अशा विविध भूमिकांमध्ये, कोविन्दजींच्या कर्तव्याप्रती असलेल्या अढळ निष्ठेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि त्यांच्या सेवेतील सातत्य अधोरेखित केले. “त्यांनी राष्ट्रसेवा हेच आपले ध्येय मानून काम केले आणि याचाच साक्षीदार संसदेतील त्यांचा कार्यकाळ आहे,” असे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले.

राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही कोविंदजींच्या अथक योगदानाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. “एक देश, एक निवडणूक’ यांसारख्या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मुद्द्यांवर कोविंदजी करत असलेल्या अथक  नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली. या संकल्पनेत देशाच्या लोकशाही चौकटीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. “मला विश्वास आहे की, कोविंदजींची ही कर्तव्यनिष्ठा आणि सेवावृत्ती यांतून देशातील जनता  खूप काही शिकू शकते” असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

सार्वजनिक जीवनात अत्यंत सक्रिय आणि व्यग्र असताना देखील आत्मचरित्र लिहिताना येणाऱ्या अडचणींची पंतप्रधानांनी दखल घेतली आणि हे महत्त्वपूर्ण सामाजिक योगदान पूर्ण केल्याबद्दल कोविंदजींचे  आभार मानले. “कोविंदजींनी आपल्या सर्वांसाठी हे काम केले आहे, कारण त्यांच्या आयुष्यात असे बरेच काही आहे ज्यामध्ये गरीब, वंचित घटकातून येणाऱ्या सर्व लोकांना स्वतःच्याच आयुष्याचे प्रतिबिंब अथवा झलक त्यात पाहायला मिळते,” असे मोदी यांनी नमूद केले.

या आत्मचारित्राच्या लेखनात अंतर्भूत असलेल्या व्यापक नैतिक मूल्यांबाबत सविस्तरपणे बोलताना, अत्यंत कठीण प्रसंगांतही पावित्र्य आणि प्रामाणिकपणा जपण्याचे चिरंतन सामर्थ्य  माजी राष्ट्रपतींच्या अनुभवातून दिसून येते असे पंतप्रधानांनी नमूद केले. “विविध पदांवरील जबाबदाऱ्या पार पाडत असताना, हे पावित्र्य आपल्याला राष्ट्रसेवेसाठी कशा प्रकारे बळ देते, याची प्रेरणा कोविंदजींनी समाजाला सातत्याने दिली आहे,” असे वक्तव्य मोदी यांनी यावेळी बोलताना केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी, हे  पुस्तक ऐतिहासिक मूल्याचे असल्याचे  प्रतिपादन केले;  आणि ही साहित्यकृती वैयक्तिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर महत्वाचा दस्तावेज ठरेल असा विश्वास व्यक्त केला. “कोविंदजींच्या आत्मचारित्राच्या माध्यमातून  केवळ त्यांच्या आयुष्यातीलच नव्हे, तर आपल्या लोकशाहीतील महत्त्वाच्या आठवणींनाही सुरक्षितपणे जतन होतील याची मला खात्री आहे,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले. 

 

 

 

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai