पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026’चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जगभरातून आलेले नवोन्मेषक (इनोव्हेटर्स), या क्षेत्रातील अग्रणी आणि गुंतवणूकदारांचे आपुलकीने स्वागत केले. आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात या कार्यक्रमात सलग तिसऱ्यांदा सहभागी होणे हे राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ‘हॅट्ट्रिक’ केल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. ” विकसित भारतासाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात आणि तुमचे कार्य किती महत्त्वाचे आहे,हे या हॅट्ट्रिकवरून दिसून येत आहे” असे श्री मोदी म्हणाले.
फिनटेक क्षेत्र गतीने विकसित होत असल्याचे अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी या क्षेत्रातील वाढता उत्साह, तरुणांचा सहभाग आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता यांमुळे संधींची क्षितीजे विस्तारत असल्याचे निरीक्षण नोंदवले. या इकोसिस्टमच्या उत्साहवर्धक प्रगतीमुळे देशाच्या भविष्याबाबतचा आपला आशावाद अधिकाधिक बळावत असल्याचे त्यांनी नमूद केले. “म्हणूनच, ‘विकसित भारता’च्या भविष्याबाबतचा माझा विश्वास देखील अधिक बळकट होत आहे,” असेही मोदी यांनी ठामपणे सांगितले.
तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेष आणि सांस्कृतिक सणसमारंभ यांच्यातील सुरेख साम्य विशद करत, पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात आणि देशभरात अत्यंत उत्साहाने साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईत दिसून येत असलेल्या उत्सवी वातावरणाचा दाखला दिला. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी ईश्वराचे आशीर्वाद घेण्याची प्रथा पाळत त्यांनी श्रीगणेशाला वंदन केले. “गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करून, मी तुम्हा सर्वांना ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026’ साठी शुभेच्छा व्यक्त करतो,” असे मोदी म्हणाले.
संघर्ष, व्यापार क्षेत्रातील तणाव तसेच ऊर्जा आणि वस्तूंच्या पुरवठा साखळीवर असलेला प्रचंड ताण यांमुळे जागतिक परिस्थिती गुंतागुंतीची झाली असल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक अनिश्चितता आणि एप्रिल ते जून या आव्हानात्मक तिमाहीतही भारताने नोंदवलेली 7.8 टक्क्यांची जोरदार वाढ यांमधील विरोधाभास विशद केला. भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवलेल्या कणखरपणामुळे जागतिक समुदायाला पुन्हा नवा आत्मविश्वास मिळाला असल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. “आणि हाच आत्मविश्वास मला इथे तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे,” असेही मोदींनी नमूद केले.
भारताच्या आर्थिक वाटचालीवर मोहोर उमटवणाऱ्या अलीकडच्या महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी जपानच्या एका पतमानांकन संस्थेने तीन दशकांनंतर देशाच्या ‘सॉव्हरिन रेटिंग’ (सार्वभौम मानांकन) मध्ये सुधारणा करून देशाचा ‘ए-‘ श्रेणीत समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. देशात करण्यात आलेल्या संरचनात्मक सुधारणा आणि स्थूल-आर्थिक (मॅक्रो-इकॉनॉमिक) स्थिरता यामुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठणे शक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे देशाच्या विकासाची गती अविरतपणे टिकून राहिली आहे. ” भारताची ही ‘सुधारणांची एक्सप्रेस’ यापेक्षाही आणखी वेगाने पुढे जाईल, हे पुन्हा सांगू इच्छितो” असेही मोदींनी ठाम शब्दात सांगितले.
भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या उल्लेखनीय यथोगाथेचे कौतुक करतांना, पंतप्रधान मोदी यांनी या आमूलाग्र बदलाचे निर्विवाद श्रेय, युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट व्यवस्थेला असल्याचे सांगितले. राष्ट्रीय फीनटेक क्रांतीबद्दल, होत असलेली कोणतीही चर्चा, युपीआय प्लॅटफॉर्मच्या प्रभावाशिवाय अपुरी आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. आपला मुद्दा गेल्या वर्षीच्या कार्यक्रमातही सांगितला असल्याचे स्मरण त्यांनी करुन दिले. “कारण हा इतका मोठा आमूलाग्र बदल आहे, की जेव्हा जेव्हा फिनटेक ची चर्चा होईल, त्यावेळी ती युपीआयच्या उल्लेखाशिवाय अपुरीच ठरेल,” असे पंतप्रधान म्हणाले.
ऑगस्ट 25 ला, युपीआयला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, त्यावेळी अर्थतज्ञ असलेल्या लोकांनी, युपीआय विषयी व्यक्त केलेली साशंकता आणि टीका आणि आजची परिस्थिती यातला विरोधाभास उघड केला. एकेकाळी बँकिंग व्यवस्थेच्या परिघाबाहेर असलेले नागरिकच आज डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले. बँकिंग क्षेत्राला, तुमच्या बोटावर आणण्याची आमची दृष्टी, काही विद्वान लोकांना त्या काळी अशक्य वाटत असे, याची आठवणही त्यांनी सांगितली. “जे लक्षावधी लोक, पिढ्यानपिढ्या बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर होते, तेच आज भारताच्या फिनटेक वृद्धीचे वाहक बनले आहेत,” असे मोदी यांनी नमूद केले.
युपीआयच्या यशाची नेत्रदीपक आकडेवारी सांगतांना, पंतप्रधान म्हणाले, की केवळ ऑगस्ट महिन्यात, देशात 24 अब्जांहून अधिक युपीआय व्यवहार झाले, याचा अर्थ, या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या पहिल्या दहा मिनिटांतच सुमारे 50 लाख व्यवहार देशात झाल्याचे त्यांनी सांगितले.
या अभूतपूर्व बदलाचे महत्त्व, तंत्रज्ञानाच्या पलीकडे असल्याचे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या विधानाचा संदर्भ दिला. “युपीआयच्या प्रभावामुळे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांनी म्हटले की, युपीआय ही केवळ तंत्रज्ञानाची कथा नाही, तर ती एका नव्या सभ्यतेची, नव्या व्यवस्थेची कथा आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
भारताच्या या पथदर्शी, डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा विस्तार अधोरेखित करतांना, पंतप्रधानांनी अभिमानाने सांगितले की, युपीआय आता 11 देशांमध्ये वापरले जाते. एकेकाळी जी गोष्ट कल्पनेच्याही पलीकडे होती, ती आज आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी सुद्धा, दैनंदिन आयुष्यातली वास्तव गोष्ट झाली असल्याचे ते म्हणाले. ही आश्चर्यकारक आकडेवारी, देशाने केलेल्या अविश्वसनीय अशा प्रवासाचीच कथा सांगणारी आहे, असे सांगत, ते म्हणाले, “ही अद्भुत आकडेवारी आपल्याला सांगते की, आपण किती मोठा पल्ला गाठला आहे.”
देशाच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षांसाठी दिशा दाखवतांना, पंतप्रधानांनी उद्योग क्षेत्राला सध्याच्या उपलब्धींकडे अंतिम ध्येय म्हणून नव्हे, तर पुढील वाटचालीची केवळ सुरुवात म्हणून पाहण्याचे आवाहन केले. धोरण आणि प्रशासनातील आपल्या 25 वर्षांच्या अनुभवाचा संदर्भ देत त्यांनी सातत्याने प्रगती करत राहण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. “जेव्हा एक ध्येय साध्य होते, तेव्हा त्याहून मोठे ध्येय गाठण्याच्या तयारीला मी लागतो,” असे मोदी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय डिजिटल पेमेंटच्या पुढच्या धोरणात्मक टप्प्याची रूपरेषा मांडतांना त्यांनी सांगितले, की, आता आपल्या भागीदार देशांमधल्या पेमेंट प्रणालीला युपीआय शी संलग्न करणे, यावर आपला भर असायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. सिंगापूरसोबत यापूर्वीच निर्माण झालेल्या सुरळीत सीमापार व्यवहार व्यवस्थेच्या धर्तीवर, इतर देशांशीही अशी जोडणी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ज्या देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक राहत आहेत किंवा ज्या देशांसोबत भारताचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो, तिथल्या वित्तीय प्रणाली भारताच्या युपीआयशी जोडण्याची सूचना त्यांनी संबंधित भागधारकांना केली. “ज्या-ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतीय राहतात, ज्या-ज्या देशांसोबत भारताचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो आणि जगातील ज्या-ज्या देशांना आपल्यासोबत पुढे जाण्याची तयारी आहे, त्या सर्वांना जोडण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत,” असे निर्देश त्यांनी दिले.
परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना मिळणाऱ्या आर्थिक लाभांवर भर देत, पंतप्रधानांनी नमूद केले की, जगात सर्वाधिक भारतीय परदेशातून मायदेशी पैसे (रेमिटन्स) पाठवतात आणि त्यांच्यासाठी व्यवहाराचा खर्च कमी करणे ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जागतिक स्तरावर डिजिटल पेमेंट प्रणालींचे एकत्रीकरण केल्यास मायदेशी असलेल्या कुटुंबांकडे निधी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला लक्षणीय गती मिळेल. “यामध्येही ‘यूपीआय’ मुळे भारतीयांची बचत होऊ शकते आणि पैसे भारतीय कुटुंबांपर्यंत अधिक जलद गतीने पोहोचू शकतात,” असे मोदी म्हणाले .
वित्तीय पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे आवाहन करताना, पंतप्रधानांनी पूर्वीपासून चालत आलेल्या परदेशी बनावटीच्या कार्ड पेमेंट मानकांवर टीका केली आणि स्वदेशी नियम व कार्यपद्धती विकसित करण्यावर भर दिला. जागतिक दर्जाची मानके विकसित करण्याची क्षमता आपल्या देशांतर्गत उद्योगांमध्ये आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आता आपण स्वतःचे नियम आणि मानके तयार करू शकतो आणि त्यांना जगाशी जोडू शकतो,” असे मोदी म्हणाले.
तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण करण्याच्या आपल्या मूळ तत्वज्ञानाचा पुनरुच्चार करत, पंतप्रधानांनी ‘यूपीआय’ची आर्थिक समावेशनाचे एक अत्यंत प्रभावी साधन म्हणून प्रशंसा केली. पारंपरिक बँकिंग व्यवस्था जिथे पोहोचू शकल्या नाहीत तिथे यूपीआयने यशस्वी पोहोच निर्माण केली आहे. नाविन्यपूर्णतेचे खरे लक्षण म्हणजे सेवा थेट व्यक्तीपर्यंत पोहोचवणे यावर त्यांनी भर दिला. “जिथे पारंपरिक बँका किंवा बँकांच्या शाखा पोहोचू शकल्या नाहीत, तिथे ‘यूपीआय’ने बँकिंग व्यवस्था पोहोचवली आहे आणि त्या व्यक्तीपर्यंत नेली आहे,” असे मोदी म्हणाले.
देशांतर्गत फिनटेक बाजारपेठेची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना, केवळ ‘पेमेंट प्रोसेसिंग’पुरते मर्यादित न राहता कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन उत्पादनांचा विस्तार वेगाने करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. या क्षेत्रातील सेवांचा दर्जा वेगाने उंचावून त्या पुढील टप्प्यावर नेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. “आता फिनटेक बाजारपेठेत पेमेंटसोबतच कर्ज-व्यवहारांचा (क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स )वाटाही वाढला पाहिजे,” असे मोदी म्हणाले .
वंचित क्षेत्रांची अद्याप न वापरली गेलेली क्षमता अधोरेखित करत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, पारंपरिक आर्थिक प्रारूपांमध्ये सध्या दुर्लक्षित राहिलेल्या घटकांचा उत्कर्ष साधण्यासाठी अभिनव वित्तीय तंत्रज्ञान महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते. त्यांनी नमूद केले की, या सुप्त शक्तीला मुख्य प्रवाहात आणणे राष्ट्रीय प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. “विकसित भारतासाठी या शक्तीचा उदय होणे अत्यंत गरजेचे आहे,” असे मोदी म्हणाले .
सर्वसमावेशक वित्तपुरवठ्याचा प्रभाव अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी ‘पीएम स्वनिधी’ योजनेचा उल्लेख केला. या योजनेने शहरांचा कणा मानल्या जाणाऱ्या रस्त्यावरील लाखो विक्रेत्यांना औपचारिक कर्ज प्रणालीशी यशस्वीपणे जोडले आणि त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 20 टक्क्यांहून अधिक वाढले. या आर्थिक सक्षमीकरणामुळे त्यांना गृहनिर्माण, पोषण, आरोग्यसेवा आणि मुलांचे शिक्षण यांसारख्या सुविधा उपलब्ध होण्यात लक्षणीय सुधारणा झाली. म्हणूनच सरकारने ही योजना 2030 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. “याचा अर्थ असा की, त्यांच्याकडे आता औपचारिक कर्ज मिळवण्याचे एक साधन उपलब्ध झाले आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.
या सामाजिक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधांचे महत्त्व अधोरेखित करत , पंतप्रधानांनी ‘पीएम स्वनिधी’ उपक्रमाच्या प्रचंड यशामागे ‘यूपीआय’ ची प्रमुख भूमिका असल्याचे सांगितले.
त्यांनी उद्योग क्षेत्राला या अनुभवाचा लाभ घेऊन तळागाळातील आर्थिक उपक्रमांना आणखी चालना देण्याचे आवाहन केले. “या अनुभवातून शिकून, फिनटेकच्या सामर्थ्याचा उपयोग करून आपल्याला आर्थिक उपक्रमांना आणखी गती द्यावी लागेल,” असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.
सूक्ष्म व्यवसायांच्या स्तरावरील पतपुरवठ्यातील तूट स्पष्ट करताना, पंतप्रधानांनी एका छोट्या दुकानदाराचे उदाहरण दिले. तिच्या व्यवसायाची क्षमता डिजिटल व्यवहार इतिहासातून सिद्ध होत असली, तरी पारंपरिक बँक कर्जासाठी तिचा व्यवसाय खूपच लहान ठरतो. यशस्वीपणे सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तिला वस्तू आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी थोड्या अधिक भांडवलाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “अशा प्रकारच्या व्यवसायांच्या गरजांचे विश्लेषण करून, आणि त्यांचा अंदाज घेऊन त्या गरजा पूर्ण करण्याचे काम फिनटेक करू शकते,” असे मोदी म्हणाले.
ही संरचनात्मक पतपुरवठ्यातील तूट भरून काढण्याचे आव्हान उद्योगासमोर ठेवताना, पंतप्रधानांनी सूक्ष्म आर्थिक उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी आणि मोठ्या संख्येने असलेल्या लघु व्यवसायांसाठी गरजेनुसार वित्तीय मॉडेल्स विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. ही तूट भरून काढणेच या क्षेत्राची भविष्यातील दिशा निश्चित करेल, असे त्यांनी सांगितले. “ फिनटेकचा पुढील अध्याय इथेच लिहिला जाईल, असा विश्वास मला वाटतो” असे मोदी यांनी स्पष्ट केले.
सर्वसमावेशक आर्थिक सेवांचे लोकशाहीकरण करण्याचे आवाहन करताना, पंतप्रधानांनी वितरण क्षेत्रातील कर्मचारी तसेच विविध छोटी-मोठी कामे करणाऱ्या व्यक्तींसाठी बचत, पेन्शन आणि विमा योजनांचा सुलभ प्रवेश सुनिश्चित करण्याचे आवाहन उद्योग क्षेत्राला केले.
या आर्थिक सेवा मिळवण्याची प्रक्रिया क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पेमेंट करण्याइतकीच सोपी, सुलभ आणि सहज उपलब्ध असावी, असे त्यांनी सांगितले. “आज क्यूआर कोडद्वारे पेमेंट करणे जितके सोपे, सुलभ आणि सहज उपलब्ध आहे, तितकेच हेही होऊ शकते,” असे मोदी यांनी नमूद केले.
21 व्या शतकाच्या दुसऱ्या तिमाहीतील तांत्रिक प्रगतीचे स्वागत करताना, पंतप्रधानांनी एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यांना वित्तीय क्षेत्रासाठी नव्या संधींची दारे उघडणाऱ्या क्रांतिकारक शक्ती म्हणून अधोरेखित केले. या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष सामाजिक लाभांमध्ये रूपांतर करण्याचे आव्हान त्यांनी उद्योग क्षेत्रासमोर ठेवले. “आता या शक्यतांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतर कसे करायचे, हे आपल्यासमोरील आव्हान आहे,” असे मोदी म्हणाले.
उद्योग क्षेत्रासाठी धोरणात्मक चार-मुद्यांचा आराखडा मांडताना, पंतप्रधानांनी फिनटेक कंपन्यांना सर्वोत्तम सायबर सुरक्षा व्यवस्था, नैतिक डेटा संरक्षण मानके, सक्षम नियामक नवोन्मेष परिसंस्था आणि पारदर्शक फिनटेक ग्राहक संरक्षण निर्देशांक विकसित करण्याचे आवाहन केले. या निकषांचे काटेकोरपणे पालन केल्यास भारताच्या फिनटेक क्षेत्रासाठी असंख्य जागतिक संधींची दारे खुली होतील, यावर त्यांनी भर दिला. “जर आपण या निकषांवर स्वतःचे मूल्यमापन केले, तर भारताचे फिनटेक क्षेत्र असंख्य शक्यतांचे प्रवेशद्वार बनू शकते,” असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.
डिजिटल इंडियाची यशोगाथा घडवणाऱ्या व्यापकता, व्याप्ती, सुरक्षित प्रणाली, लोकशाहीकरण आणि जनविश्वास या मूलभूत मूल्यांचे जतन करताना आधुनिक नवोन्मेषाकडे वाटचाल करण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. या क्षेत्राच्या सातत्यपूर्ण विकासासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. “ही मूलभूत मूल्ये लक्षात ठेवून, फिनटेक क्षेत्राने पुढील पिढीतील नवोन्मेषावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे मोदी यांनी ठोसपणे सांगितले.
India is taking its fintech journey to new heights, with innovation and inclusion at its core. Addressing the Global Fintech Fest 2026 in Mumbai. https://t.co/pMhokoCBjG
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2026
India’s growth gives the world renewed confidence. pic.twitter.com/lPYEwHMPzW
— PMO India (@PMOIndia) September 8, 2026
UPI is a major champion of India’s FinTech story. pic.twitter.com/2ppzcyb7ZF
— PMO India (@PMOIndia) September 8, 2026
UPI is a major champion of India’s FinTech story. pic.twitter.com/2ppzcyb7ZF
— PMO India (@PMOIndia) September 8, 2026
Technologies like Agentic AI, tokenisation and quantum are opening new possibilities in the financial sector. pic.twitter.com/BDIKrCivZK
— PMO India (@PMOIndia) September 8, 2026
FinTech companies should work together on a few key goals… pic.twitter.com/0iifCfffdS
— PMO India (@PMOIndia) September 8, 2026
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/माधुरी पांगे/मंजिरी गानू/राधिका अघोर/सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
India is taking its fintech journey to new heights, with innovation and inclusion at its core. Addressing the Global Fintech Fest 2026 in Mumbai. https://t.co/pMhokoCBjG
— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2026
India's growth gives the world renewed confidence. pic.twitter.com/lPYEwHMPzW
— PMO India (@PMOIndia) September 8, 2026
UPI is a major champion of India's FinTech story. pic.twitter.com/2ppzcyb7ZF
— PMO India (@PMOIndia) September 8, 2026
Technologies like Agentic AI, tokenisation and quantum are opening new possibilities in the financial sector. pic.twitter.com/BDIKrCivZK
— PMO India (@PMOIndia) September 8, 2026
FinTech companies should work together on a few key goals... pic.twitter.com/0iifCfffdS
— PMO India (@PMOIndia) September 8, 2026