पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 20 व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 51 हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचे वितरण केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी सांगितले की हा टप्पा हजारो कुटुंबांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असून, उमेदवारांच्या वैयक्तिक मेहनतीबरोबरच त्यांच्या पालकांनी केलेल्या अथक त्यागाचा हा सन्मान आहे. “जीवनातील या नव्या सुरुवातीसाठी तुम्हा सर्वांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
2047 सालापर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्याकडे देशाची वाटचाल सुरू असताना, नव्याने नियुक्त उमेदवारांचे भारत सरकारच्या सेवेत स्वागत करताना पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक प्रशासकीय निर्णयाच्या माध्यमातून विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या दोन्ही अभियानांना सातत्याने बळकटी देण्यात युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे अधोरेखित केले. सहकारी युवकांप्रती त्यांच्या विशेष जबाबदारीवर त्यांनी भर दिला. युवा पिढीच्या प्रतिभा आणि कौशल्याने जगाचा विश्वास संपादन केला असून, त्यामुळे भारतीय नवोन्मेषक, उद्योजक आणि युवा शक्तीकडून जगाच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. “आपल्या नवोन्मेषक, उद्योजक आणि युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.
नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेचा संदर्भ देताना पंतप्रधानांनी सांगितले की पारंपरिक सरकार-ते-सरकार संवादाच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विस्तार करण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. ब्रिक्स कनेक्ट आणि ब्रिक्स एमएसएमई सहकार्य पोर्टल यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून उद्योजक, शेतकरी, महिला आणि युवकांना थेट जागतिक भागीदारीशी जोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. “या भागीदारीमध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभागी व्हावे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
गेल्या काही वर्षांतील आर्थिक राजकीय संबंधांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की सुमारे 40 देशांसोबतचे मुक्त व्यापार करार करिअरच्या अभूतपूर्व संधी उपलब्ध करून देत आहेत. हे करार देशांतर्गत उद्योजकांसाठी नवीन बाजारपेठा आणि गतिमान भागीदारी निर्माण करतात, तसेच तरुणांसाठी व्यवसाय व रोजगाराच्या संधींचा विस्तार करतात, यावर त्यांनी भर दिला. हे मुक्त व्यापार करार आपल्या तरुणांसाठी संधींची नवीन दारे उघडत आहेत, असे मोदींनी सांगितले.
भविष्यासाठी सज्ज कौशल्य विकासावर सरकारच्या सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करण्याबद्दल सविस्तर माहिती देताना, पंतप्रधानांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना यांसारख्या परिवर्तनकारी उपक्रमांची आणि शिकाऊ उमेदवारीला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांची यादी दिली. त्यांनी पीएम-सेतू योजनेवर विशेष प्रकाश टाकला, ज्याअंतर्गत 60,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आणि उद्योगांच्या थेट सहभागाने एक हजार सरकारी आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण केले जात आहे. “तरुणांचे शिक्षण आणि कौशल्ये बदलत्या अर्थव्यवस्थेच्या गरजांशी सुसंगत राहावीत, हा आमचा प्रयत्न आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.
देशांतर्गत स्टार्टअप परिसंस्थेच्या प्रचंड वाढीचे कौतुक करताना, पंतप्रधानांनी भारताच्या जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या स्टार्टअप केंद्राच्या स्थानाचा गौरव केला. त्यांनी नमूद केले की मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी जवळपास निम्मे स्टार्टअप्स आता द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधील आहेत. त्यांनी लहान शहरांतील तरुणांचे कौतुक केले, जे आपल्या कल्पनांवर सक्रियपणे काम करत आहेत, कंपन्या उभारत आहेत आणि आपल्या समवयस्कांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहेत. आज गावे, शहरे आणि लहान शहरांमधील तरुणदेखील भारताच्या नवीन अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावत आहेत, असे मोदी म्हणाले.
खाजगी क्षेत्रातील रोजगाराला चालना देण्याच्या धोरणाची रूपरेषा मांडताना, पंतप्रधानांनी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना यावर प्रकाश टाकला. ही एक लाख कोटी रुपयांची भव्य योजना असून, दोन कोटी तरुणांना प्रथमच औपचारिक कार्यबलात आणण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. त्यांनी सविस्तरपणे सांगितले की ही योजना प्रथमच नोकरी करणाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन देते, तसेच नवीन रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांनाही आर्थिक बक्षीस देते. देशात रोजगार वाढवण्यासाठी सरकार प्रत्येक आघाडीवर काम करत आहे, असे मोदींनी सांगितले.
रोजगार निर्मितीला मजबूत स्थूल-आर्थिक आरोग्याशी जोडून, पंतप्रधानांनी स्पष्ट केले की जेव्हा अर्थव्यवस्था वाढते, गुंतवणूक वाढते आणि नवीन उद्योगांचा विस्तार होतो, तेव्हाच तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतात. त्यांनी देशाच्या प्रभावी 7.8 टक्के विकास दरावर आणि पहिल्या तिमाहीतील गुंतवणुकीतील 12 टक्के वाढीवर प्रकाश टाकला. तसेच, सर्वव्यापी जागतिक अनिश्चितता असूनही रेटिंग एजन्सी देशाच्या आर्थिक दृष्टिकोनात सुधारणा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. “भारताच्या या विकासामागे गेल्या काही वर्षांतील सुधारणांचा मोठा वाटा आहे, असे मोदी म्हणाले.
नवीन अधिकाऱ्यांना सतत प्रशासकीय परिवर्तनाच्या युगाचा स्वीकार करण्याचे निर्देश देताना, पंतप्रधानांनी कर अनुपालन सुलभ करणे, व्यवसाय सुलभता वाढवणे, शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये सुधारणा लागू करणे आणि नवीन क्षेत्रे नवनिर्मितीसाठी खुली करणे याच्या अत्यावश्यक गरजेवर भर दिला. त्यांनी तरुण नोकरशहांना त्यांच्या कार्यकाळात प्रशासकीय सुधारणांची गती अव्याहतपणे कायम राहील याची खात्री करण्याचे काम सोपवले. देशातील सुधारणांची एक्सप्रेस पूर्ण वेगाने सतत धावत राहणे आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
सूर्य, समुद्र, नौका आणि नाविक यांचा उल्लेख करत लाटांवर विजय मिळवण्याच्या धैर्याचे काव्यात्मक वर्णन करत पंतप्रधानांनी नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देशातील युवकांच्या आकांक्षांना पाठबळ देण्यासाठी असेच धैर्य दाखवण्याचे आवाहन केले. प्रत्येक फाईलवरील स्वाक्षरी आणि प्रत्येक प्रशासकीय निर्णय हा अडथळे दूर करणारा, नव्या कल्पनांना वाव देणारा आणि रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या नवोन्मेषाधारित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा असावा, यावर त्यांनी भर दिला. “तुमची प्रत्येक फाईलवरील स्वाक्षरी युवकांच्या आकांक्षांना पुढे नेणारी असली पाहिजे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी त्यांना सरकारी यंत्रणेत मिळालेल्या नव्या अधिकारांचा वापर सखोल संवेदनशीलतेने करण्याचे आवाहन केले. सेवेत दाखल होण्यापूर्वी ज्या प्रशासकीय अडचणींचा त्यांना सामना करावा लागला, त्या अडथळ्यांचे सक्रियपणे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी दिला. “तुम्ही ज्या अडचणींचा सामना केला, त्या अडचणी इतर युवकांसमोर येऊ नयेत, यासाठी तुमचे प्रयत्न असले पाहिजेत,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
वेगाने बदलणाऱ्या जगात आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून सातत्याने आपली कौशल्ये अद्ययावत करण्याचे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे निर्देश दिले. नव्याने सेवेत दाखल होणाऱ्यांना प्रशासकीय यंत्रणेत काम करताना मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘कर्मयोगी प्रारंभ’ हे मॉड्यूल विशेषतः तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आयगॉट प्लॅटफॉर्मवर आधीच सहभागी झालेल्या 1.7 कोटी कर्मचाऱ्यांच्या समूहात नव्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होणार आहे. “तुम्ही स्वतःमध्ये जितकी अधिक सुधारणा कराल, तितकीच चांगली सेवा तुम्ही देशातील नागरिकांना देऊ शकाल,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
कोणत्याही सरकारची खरी ताकद जनतेच्या विश्वासात असते, यावर भर देताना पंतप्रधानांनी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामाचा नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम होत असल्याची जाणीव करून दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्तीवेतनाच्या प्रक्रियेपासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानापर्यंत विविध प्रशासकीय कामांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावर होतो. कर्मचाऱ्यांचे वर्तन, कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता यावरच नागरिकांचा सरकारसोबतचा वैयक्तिक अनुभव अवलंबून असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. “तुमचे वर्तन, तुमची संवेदनशीलता, तुमची कार्यक्षमता आणि तुमचा प्रामाणिकपणा या सर्व गोष्टींवर त्या नागरिकाचा सरकारसोबतचा अनुभव कसा असेल, हे निश्चित होईल,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
आपल्या संबोधनाच्या समारोपात पंतप्रधानांनी प्रभावी प्रशासकीय मंत्र देताना नव्या अधिकाऱ्यांना दैनंदिन सेवेत ‘नागरिक देवो भव’ हे तत्त्व स्वीकारण्याचे आवाहन केले. नागरिकांची सेवा हीच राष्ट्रसेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व विभागांमध्ये नव्याने नियुक्त कर्मचारी पूर्ण समर्पणाने आणि सेवाभावाने आपली कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “तुमच्या कार्यामुळे एखाद्या नागरिकाचे जीवन अधिक सुलभ झाले, तर तुमचे यश आणखी मोठे ठरेल,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
India’s Yuva Shakti is at the heart of our journey towards a Viksit Bharat. The Rozgar Mela reflects our commitment to creating new opportunities for the youth. https://t.co/lHgFkJ6zmM
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2026
हमारे युवाओं के talent और skills ने पूरी दुनिया का भरोसा जीता है।
दुनिया को हमारे innovators… हमारे entrepreneurs… और हमारी युवा शक्ति से बहुत उम्मीदें है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 19, 2026
Free Trade Agreements हमारे युवाओं के लिए संभावनाओँ के नए द्वार बना रहे हैं।
इस तरह के trade agreements से हमारे entrepreneurs के लिए नई partnerships के रास्ते खुलते हैं, नए markets के रास्ते खुलते हैं और हमारे युवाओं के लिए career में नई possibilities बनती हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 19, 2026
भारत आज दुनिया का तीसरा सबसे बड़ा startup ecosystem है।
और भारत की startup story अब केवल बड़े शहरों की कहानी नहीं है।
आज करीब आधे recognised startups
Tier 2 और Tier 3 शहरों में हैं: PM @narendramodi— PMO India (@PMOIndia) September 19, 2026
***
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/राजेश शिरभाते/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
India's Yuva Shakti is at the heart of our journey towards a Viksit Bharat. The Rozgar Mela reflects our commitment to creating new opportunities for the youth. https://t.co/lHgFkJ6zmM
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2026
हमारे युवाओं के talent और skills ने पूरी दुनिया का भरोसा जीता है।
— PMO India (@PMOIndia) September 19, 2026
दुनिया को हमारे innovators... हमारे entrepreneurs... और हमारी युवा शक्ति से बहुत उम्मीदें है: PM @narendramodi
Free Trade Agreements हमारे युवाओं के लिए संभावनाओँ के नए द्वार बना रहे हैं।
— PMO India (@PMOIndia) September 19, 2026
इस तरह के trade agreements से हमारे entrepreneurs के लिए नई partnerships के रास्ते खुलते हैं, नए markets के रास्ते खुलते हैं और हमारे युवाओं के लिए career में नई possibilities बनती हैं: PM @narendramodi
भारत आज दुनिया का तीसरा सबसे बड़ा startup ecosystem है।
— PMO India (@PMOIndia) September 19, 2026
और भारत की startup story अब केवल बड़े शहरों की कहानी नहीं है।
आज करीब आधे recognised startups
Tier 2 और Tier 3 शहरों में हैं: PM @narendramodi