Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील करनपूर स्थित कोब्रा ऑपरेशन्स तळावर सुरक्षा दलांसमवेत दिवाळी साजरी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील करनपूर स्थित कोब्रा ऑपरेशन्स तळावर सुरक्षा दलांसमवेत दिवाळी साजरी केली.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्यातील बस्तर इथल्या करनपूर स्थित कोब्रा ऑपरेशन्स तळाला भेट दिली. बस्तर आणि अबुझमाड भागात नक्षलवादविरोधी मोहिमांसाठीचे प्रशिक्षण केंद्र आणि प्रारंभाचे मुख्य तळ म्हणून वापरला जातो. पंतप्रधानांनी तिथे सुरक्षा दलांच्या जवानांसमवेत दिवाळी साजरी केली. देशभरातील आणि जगभरातील कोट्यवधी भारतीय आपल्या प्रियजनांसमवेत दीपोत्सवाचा पवित्र सण साजरा करत असताना, अशा प्रसंगी जवानांशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी कारगील, हिमालयातील लेपचा, सर क्रीकचा किनारा आणि समुद्रात आयएनएस विक्रांत वर शूर सैनिकांसोबत साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या स्मृतींना उजाळा दिला. मोदी म्हणाले, “सीमेवर आणि देशांतर्गत, राष्ट्राचे संरक्षण करणारे राष्ट्ररक्षक, मां भारतीचे शूर सुपुत्र तुम्ही सर्वजण मला प्रिय आहात, तुम्ही सर्वजण माझ्या कुटुंबाचाच भाग आहात.”

पंतप्रधानांनी 2026ची ही दिवाळी विशेष आहे असे सांगून, माओवादी दहशतवादाविरोधातील अनेक दशकांची लढाई भारताने जिंकल्यानंतर हा पहिलाच प्रकाशोत्सव आहे. प्रत्येक जिल्हा नक्षलमुक्त झाला आहे आणि कोट्यवधी नागरिकही भीतीमुक्त झाले आहेत. असे सांगून यशातील मैलाचा दगड ठरलेल्या विलक्षण यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि हे प्रत्यक्षात आणणाऱ्या लाखो सुरक्षा कर्मचाऱ्यांप्रति 140 कोटी नागरिकांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण बस्तरला आलो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मोदी म्हणाले, “आज, तुमचा त्याग, समर्पण आणि सेवाभाव यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो आहे.”

‘आभ्यंतरं भयं रक्ष्यं, आसारं बाह्यातो भयं’ या प्राचीन संस्कृत वचनाचा संदर्भ देत, ज्या राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा बळकट आहे त्यांना बाह्य शत्रू हानी पोहोचवू शकत नाहीत पण अंतर्गत सुरक्षा कमकुवत झाल्यावर मात्र ते डोके वर काढतात, हे स्पष्ट करताना पंतप्रधानांनी सुरक्षा दलाच्या अंतर्गत भूमिकेची तुलना सीमेवरील सशस्त्र दलांच्या भूमिकेशी केली आणि सीआरपीएफ, कोब्रा, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, आयआरबी, राज्य पोलिस दलं, बस्तर फायटर्स कमांडो आणि महिला फायटर्स यांच्या अमर्याद त्यागाची प्रशंसा केली. त्याचबरोबर, सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही त्यांनी सणासुदीच्या शुभेच्छा दिल्या. “देश तुमच्या सेवेसाठी तुमचा ऋणी आहे आणि कोट्यवधी देशवासियांना तुमचा अभिमान वाटतो,” असे मोदी यांनी ठामपणे नमूद केले.

सुमारे 20 राज्यांमधील बिहार, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह 230 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाने थैमान घातलेल्या त्या भयंकर काळाची त्यांनी आठवण करून दिली. तिथे संध्याकाळनंतर भीतीची संचारबंदी असायची, मतदानाचे हक्क हिरावून घेतले जायचे, वर्षाला 2000 पर्यंत हल्ले व्हायचे, एकट्या छत्तीसगडमध्ये 1000 पेक्षा जास्त जवानांनी प्राणांची आहुती दिली होती, आयईडी  स्फोटांमुळे असंख्य सैनिकांना आपले हातपाय गमवावे लागले होते, आणि 2910 मधील दंतेवाडा येथील वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये सीआरपीएफचे 76 जवान आणि 44 निष्पाप नागरिक मारले गेले होते, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2004  ते 2013 दरम्यान दरवर्षी ठार झालेल्या नक्षलवाद्यांपेक्षा जास्त सुरक्षा जवान हुतात्मा होत होते, त्यामुळे माओवादी नेत्यांचे मनोधैर्य उंचावले होते.

आपल्या शत्रूंबाबत निष्क्रिय दृष्टिकोन ठेवून कोणताही देश प्रगती करू शकत नाही आणि त्याऐवजी उच्च मनोबलाने त्यांचा धोरणात्मकरित्या बीमोड केला पाहिजे यावर भर देत पंतप्रधानांनी सांगितले की, 2014 नंतर सुरक्षा दलांमधील जीवितहानीचे दशकांपासून चालत आलेले प्रमाण उलटवले गेले. याचा परिणाम म्हणून गेल्या 47 वर्षांत पहिल्यांदाच एका ऐतिहासिक टप्प्यावर मागील वर्षभरात कर्तव्यावर असताना एकाही सीआरपीएफ जवानाला आपला जीव गमवावा लागला नाही. “हा देशाच्या योग्य धोरणांचा आणि दृढ इच्छाशक्तीचा विजय आहे, आणि हा तुमच्या पराक्रमाचा, धैर्याचा आणि संयमाचा विजय आहे,” असे मोदी यांनी आवर्जून सांगितले.

यशासाठी योग्य हेतू आणि योग्य धोरण या दोन्हीची गरज असते असे नमूद करत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की सरकारने नक्षलवादी आणि फुटीरतावाद्यांच्या निधीवर प्रहार करणारे आणि बनावट नोटांचे जाळे उद्ध्वस्त करणारे अनेक कठोर आणि जाहीर न केलेले राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतले. “यामुळे केवळ त्यांचा आर्थिक कणाच मोडला नाही, तर संपूर्ण पुरवठा साखळी बंद झाली, ज्यामुळे शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबला आणि नक्षलवाद्यांच्या हालचाली व भरतीवर नियंत्रण आले,” अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने सुरक्षा दलांना प्रत्येक आवश्यक निर्णय घेण्याचे पूर्ण कार्यात्मक स्वातंत्र्य दिले. कोणत्याही मातेने आपले मूल गमावू नये, कोणतेही कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये आणि कोणत्याही तरुणाने हातात शस्त्र घेऊ नये या एकाच ध्येयाने सरकारने प्रसिद्धी किंवा बडेजाव न करता अथक परिश्रम केले. हे स्पष्ट करताना त्यांनी अधोरेखित केले की, माओवादी दहशतवादाचे कंबरडे मोडणाऱ्या संवेदनशील सुरक्षा मोहिमांची लोकसेवेच्या भावनेशी सांगड घातल्याने लोकांचे जीवन बदलले आणि प्रभावित नागरिक सरकार व सुरक्षा दलांच्या पाठीशी उभे राहिले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांचे त्यांनी या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल आभार मानले. “सेवेच्या भावनेने आपण नक्षलग्रस्त भागातील लोकांचे जीवन बदलले,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने काम केल्यास शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित होते, देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचतो आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये गरीब व वंचितांचा सहभाग वाढतो, असे निरीक्षण नोंदवत पंतप्रधानांनी गेल्या 12 वर्षांत देशाने मिळवलेल्या दुहेरी विजयाकडे लक्ष वेधले. “गेल्या 12 वर्षांत देशाने केवळ नक्षलवाद आणि फुटीरतावादाविरुद्धची लढाईच जिंकलेली नाही, तर देशाने गरिबीविरुद्धचे मोठे युद्धही जिंकले आहे,” असे मोदी यांनी स्पष्ट केले. दिवाळीच्या अगदी आधी प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या  अहवालाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या 12 वर्षांत 50 कोटी भारतीय अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत.

गेल्या 12 वर्षांतील भारताच्या कल्याणकारी चौकटीची तुलना दिवाळीच्या रांगोळीशी करत, पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, ज्याप्रमाणे अनेक लहान रेषा एकत्र येऊन एक भव्य चित्र तयार करतात, त्याचप्रमाणे जन धन बँक खाती, पीएम आवास योजनेतून पक्की घरे, विनातारण मुद्रा कर्ज, पथविक्रेत्यांसाठी स्वनिधी योजना, आयुष्मान भारत आरोग्य सेवा, मोफत मासिक रेशन, बाल शिक्षण धोरणे, स्वच्छ भारत आणि हर घर जल यांसारख्या उपक्रमांनी मिळून मोफत औषधे, मोफत शिक्षण आणि मोफत अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित केली आहे. यामुळे कुटुंबांच्या मूलभूत चिंता दूर झाल्या असून, पिढ्यानपिढ्या गरिबीत अडकलेली कुटुंबे आता एका अधिक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहेत.  मोदी म्हणाले, ज्या गरीब कुटुंबांचे संपूर्ण आयुष्य केवळ चिंतेत व्यतीत होत असे, त्यांना आता सरकारकडून खात्री मिळाली आहे आणि त्यांच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

गरिबीवरील हा विजय नक्षलवादाविरुद्धच्या लढ्याशी कसा घट्ट जोडलेला आहे, हे स्पष्ट करताना पंतप्रधानांनी सांगितले की, एकेकाळी नक्षलवाद्यांनी शाळा, रुग्णालये, औषधांची दुकाने, पोलिओ लसीकरण, मोबाईल टॉवर आणि उद्योगांना रोखून धरले होते, तसेच रेल्वे मार्ग उडवून दिले होते, ज्यामुळे लाखो निष्पाप नागरिक गरिबीत आणि अभावग्रस्त स्थितीत अडकले होते. या पार्श्वभूमीवर, नक्षलवादग्रस्त भागांत विशेष विकास मोहीम राबवण्यात आली. याद्वारे 15,000 किलोमीटरहून अधिक रस्ते, 9,500 हून अधिक मोबाईल टॉवर, सुमारे 175 एकलव्य शाळा, 50 आयटीआय, 50 कौशल्य विकास केंद्रे आणि हजारो पोस्ट ऑफिस, बँक शाखा व एटीएम उभारण्यात आले. यासोबतच, शरण आलेल्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्यात आले आणि पीएम जनमन  योजनेद्वारे दुर्गम आदिवासी गावांपर्यंत पहिल्यांदाच पाणी, वीज आणि रस्ते पोहोचवण्यात आले. पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा आम्ही नक्षलवादाविरुद्ध लढा सुरू केला, त्याच वेळी आम्ही नक्षलवादग्रस्त भागांच्या विकासासाठी विशेष मोहिमाही राबवल्या.

सबका साथ, सबका विकास या मोहिमेने गरिबीविरुद्धच्या लढ्याला बळ दिले, नक्षलवादी हिंसाचाराचा अंत केला आणि 50 कोटी लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढले, असे सांगत पंतप्रधानांनी या प्रदेशात होत असलेल्या परिवर्तनाचे प्रतीक म्हणून सुरू असलेल्या बस्तर ऑलिम्पिक्सचा उल्लेख केला. आज याच बस्तरमध्ये बस्तर ऑलिम्पिक्सचे आयोजन होत आहे. येथे मुले बंदुकांऐवजी खेळांमध्ये आपले कौशल्य आजमावत आहेत, असे मोदी यांनी नमूद केले.

आजचे टप्पे हे अंतिम ध्येय नसून एक नवी सुरुवात आहेत, यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, देशाची ही नवी भरारी स्वातंत्र्यसैनिक, सीमेवरील सैनिक आणि नक्षलवाद व दहशतवादाविरुद्ध लढताना बलिदान देणाऱ्या वीरांच्या शतकानुशतकांच्या स्वप्नांना पूर्ण करेल. ‘तेरा गौरव अमर रहे माँ, हम दिन चार रहें ना रहें’ अर्थात हे माते, तुझा गौरव अमर राहो, आम्ही काही काळ राहू किंवा न राहू हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या सुरक्षा दलांना त्यांनी आपल्या या भावनेतून नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन केले. “आता राष्ट्रासाठी जगण्याची आणि देशाला एका नव्या उंचीवर नेण्याची वेळ आली आहे, असे मोदी यांनी सांगितले.

काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे, घरोघरी शौचालये बांधणे आणि लसीकरणाचा विस्तार करणे यांसारखी मोठी आश्वासने पूर्ण केल्याचा देशाचा इतिहास पाहता, पंतप्रधान म्हणाले की, भारत नक्कीच गरिबी निर्मूलनाचे ध्येय गाठेल आणि एक अमली पदार्थमुक्त, आत्मनिर्भर व विकसित भारत घडवेल. त्यांनी सुरक्षा दलांवर आणि नागरिकांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. सर्वांनी मिळून या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तुमचे बलिदान आणि कठोर परिश्रम हे ‘विकसित भारता’च्या भव्य वास्तूचा भक्कम पाया ठरतील, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

***

शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी/नितीन गायकवाड/राजेश शिरभाते/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]