Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी य महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाले सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी य महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाले सहभागी


पंतप्रधान  नरेंद्र मोदी  आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आयोजित ‘जनजातीय गौरव दिवस‘ कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी सुमारे 3,000 कोटी रुपये मूल्याच्या 246 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. ‘धरती आबा‘ भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी देशवासीयांना जोहार  करत शुभेच्छा दिल्या. त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आणि सांगितले की, देशभर साजरा केला जाणारा हा उत्सव आदिवासी समुदायांचा अभिमान दर्शवतो. देश जेव्हा आपल्या आदिवासी नायक-नायिकांचे स्मरण करतो, तेव्हा भगवान बिरसा मुंडा यांची प्रेरणा सदैव कायम राहते. महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आयोजित भव्य उत्सवाचा उल्लेख करत, जिथे राघोजी भांगरे, भगोजी नाईक आणि वीर बाबूराव शेडमाके यांच्यासारख्या आदिवासी वीरांच्या शौर्यगाथा जपल्या गेल्या आहेत, त्या सर्व आदिवासी योद्ध्यांना नमन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशभरातून या कार्यक्रमात सहभागी होत असलेले सर्व राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक लोकप्रतिनिधींचेही मी अभिनंदन करतो.

15 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू झालेला जनजातीय गौरव दिवस आता एका राष्ट्रीय उत्सवाचे रूप धारण करत आहे, असे नमूद करत त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दोन लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले गेले, ज्यामध्ये कोट्यवधी नागरिक सहभागी झाले.  पंतप्रधान मोदी म्हणाले, आज भारत आपल्या वारशाची, इतिहासाची आणि आपल्या वीरांचे ‘स्वदेशी‘ स्वाभिमानासह स्मरण करत आहे. हे आपल्या राष्ट्रीय चेतनेत आलेल्या एका मोठ्या परिवर्तनाचे प्रतीक आहे.

वसाहतवादी सत्तेच्या अन्यायाविरोधात आदिवासी समाजाने सातत्याने आवाज उठवला, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. खासी टेकड्यांमधील तिरोत सिंग यांचा संघर्ष, छोटा नागपूरमधील कोल उठाव, सिदो-कान्हू यांच्या नेतृत्वाखालील संथाल क्रांती, मानगड येथे गोविंद गुरू यांच्या अनुयायांनी दिलेले बलिदान, तसेच राणी गाइदिन्ल्यू, तंट्या भिल्ल, अल्लुरी सीताराम राजू आणि राणी दुर्गावती यांनी दाखवलेले धैर्य, या सर्व स्वातंत्र्यलढ्यांचा मोठा वारसा असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भगवान बिरसा मुंडा यांचा उलगुलान अर्थात आदिवासी उठाव आणि त्यांनी अगदी तरुण वयात केलेला संघर्ष, हा आजही कोट्यवधी देशवासीयांसाठी मोठी प्रेरणा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

जनजातीय गौरव दिनानिमित्त विविध राज्यांमध्ये सुमारे 3 हजार कोटी रुपये खर्चाच्या 170 हून अधिक आदिवासी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि 70 हून अधिक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

यामध्ये मिझोराममधील स्वातंत्र्यसैनिक रोपुइलियानी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे आणि अरुणाचल प्रदेशातील आदिवासी संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, आदिवासी उत्पादनांच्या विक्रीसाठी केंद्रे आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांशी संबंधित कामांचाही या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. या सर्व प्रकल्पांबद्दल मी देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, असं पंतप्रधान म्हणाले.

यंदाच्या जनजातीय गौरव दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने देशातील दोन ऐतिहासिक यशांचीही चर्चा होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशातील जवळपास 50 कोटी नागरिकांनी अत्यंत गरिबीतून बाहेर पडण्यात यश मिळवले आहे, तर भारत नक्षलवाद आणि माओवादी दहशतीपासून मुक्त झाला आहे. या दोन्ही यशांचा आदिवासी भागांशी आणि तेथील नागरिकांच्या जीवनाशी जवळचा संबंध असल्याचे मोदी यांनी नमूद केले.

गेल्या 12 ते 13 वर्षांत भारतातील जवळपास 50 कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर पडले असल्याचे जागतिक बँकेच्या अलीकडील अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हे यश केवळ एका सरकारमुळे मिळालेले नसून समाजाची एकजूट, प्रत्येक नागरिकाचे कष्ट, तसेच केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याणासाठीच्या विशेष योजना आणि महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे शक्य झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या यशाबद्दल मी देशातील सर्व नागरिकांचे, विशेषतः माझ्या आदिवासी बंधू-भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्याचा सरकारचा ठाम निर्धार प्रत्यक्षात उतरल्यामुळे लाखो लोक गरिबीतून बाहेर पडू शकले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. मूलभूत सुविधांचाही अभाव असलेल्या अतिमागास आदिवासी भागांच्या विकासासाठी सरकारने सर्व ताकद पणाला लावली आहे. यासाठी पीएम-जनमन योजना आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनांसाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर ज्या कुटुंबांपर्यंत सरकारी सुविधा सर्वात शेवटी पोहोचल्या, त्यांच्यापर्यंत आता या सुविधा सर्वात आधी पोहोचाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मोदी यांनी सांगितले.

गरिबांना प्राधान्य देण्याच्या सरकारच्या भूमिकेचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी सांगितले की, गरीब कुटुंबांसाठी चार कोटींहून अधिक पक्की घरे बांधण्यात आली आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून अंधारात असलेल्या 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. तसेच दुर्गम आदिवासी भागांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी एक लाख 75 हजारांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील स्वच्छतेचाही मोठा परिणाम झाला आहे. गरीब कुटुंबांना शौचालये उपलब्ध झाल्यामुळे आणि स्वच्छतेच्या सुविधा वाढल्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

गरिबी निर्मूलनासाठी गरीब कुटुंबांसाठी उत्पन्नाच्या संधी वाढवणे आवश्यक असल्याचे सांगून पंतप्रधानांनी नमूद केले की, मुद्रा योजनेअंतर्गत लाखो कोटी रुपयांचे विनातारण कर्ज वितरित करण्यात आले असून याचा लाभ गरीब, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला सारखाच मिळाला आहे. “यामुळे त्यांच्यामध्ये पुढे जाण्याचा एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला,” असे मोदी म्हणाले.

विकासात दीर्घकाळ मागे राहिलेल्या प्रदेशांमधील लक्ष्यित उपक्रमांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या असलेल्या 100 हून अधिक आकांक्षी जिल्हे आणि 500 हून अधिक आकांक्षी गटांमधील विशेष मोहीम तसेच शेतकरी, गरीब कुटुंबे आणि आदिवासी समाजासाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी पीएम कृषी धन धान्य योजनेअंतर्गत 100 कृषीदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांमधील विशेष मोहिमेचा उल्लेख केला आणि सामूहिक प्रयत्नांच्या परिवर्तनकारी सामर्थ्यावर भर दिला. “या सामूहिक प्रयत्नांनी आणि सबका साथ, सबका विकास या मंत्राने देशातील गरिबांना नवीन आत्मविश्वास दिला आणि कोट्यवधी गरीब लोकांनी गरिबीवर मात करून ते दाखवून दिले,” असे पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून सांगितले.

गडचिरोली आणि इतर आदिवासी पट्ट्यांमधील आदिवासी समाजाचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या नक्षलवादापासून मुक्ती या देशाच्या दुसऱ्या मोठ्या टप्प्याकडे वळताना पंतप्रधानांनी नमूद केले की, सुमारे 125 जिल्हे नक्षलवादाने प्रभावित होते. त्यावेळी दरवर्षी शेकडो हिंसक घटना घडत होत्या आणि त्यात हजारो निष्पाप लोकांचे, विशेषतः आदिवासी बांधवांचे आणि भगिनींचे बळी जात होते. आज नक्षलवादाचा अंत झाल्यामुळे माता आणि नव्याने सुरक्षित झालेल्या भगिनी सरकारला आशीर्वाद देत आहेत, तर एकेकाळी बालपण हिरावून घेतलेले तरुण शिक्षण आणि रोजगार मिळवत आहेत असे नमूद करून, पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील बस्तर, ज्या भागात जाण्यास एकेकाळी लोक घाबरत असत, तेथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी केल्याची आठवण सांगितली. “गडचिरोलीसह पूर्वीच्या सर्व नक्षलग्रस्त भागांमध्ये यावेळी दिवाळीला मातीच्या पण त्यासोबतच आशेचा प्रकाशही लोकांपर्यंत पोहोचला आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारताच्या प्रगतीमध्ये आदिवासी समाजाच्या उत्साही योगदानावर प्रकाश टाकताना आणि देशाचे सर्वोच्च पद आदिवासी समाजातील एका कन्येने भूषवले असल्याचे नमूद करताना पंतप्रधानांनी देशाचा सामूहिक अभिमान व्यक्त केला. “आपल्या सर्वांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांचा अभिमान आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छांसह आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी नागरिकांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “आज हीच वेळ आहे की आपण भगवान बिरसा मुंडा यांच्यापासून प्रेरणा घेऊन विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली आणखी अधिक ऊर्जा गुंतवली पाहिजे,” असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.

***

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/राज दळेकर/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]