Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कॅनडाच्या लिबरल पक्षाचे नेते जस्टीन त्रुदाँ यांना अभिनंदनपर पत्र


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाच्या लिबरल पक्षाचे नेते जस्टी त्रुदाँ यांना सार्वत्रिक निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदनपर पत्र लिहिलं आहे. पंतप्रधानांचे पत्र पुढीलप्रमाणे-

सार्वत्रिक निवडणुकीत कॅनडाच्या लिबरल पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या वतीने मी आपले हार्दिक अभिनंदन करतो.

तुमच्या दूरदर्शी, तरुण आणि चैतन्यपूर्ण नेतृत्वामुळे देशात आणि परदेशातील कॅनडाचे यश अधिक शाश्वत आणि दृढ होईल यात शंकाच नाही. जागतिक पातळीवरील सध्याच्या आव्हानांच्या काळात, तुमचे नेतृत्व जगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

तुमच्या महान देशाला एप्रिलमध्ये दिलेल्या भेटीच्यावेळी तुमच्यासोबत झालेल्या भेटीच्या सुखद आठवणी माझ्यासोबत आहेत. लोकशाहीची समान चौकट, बहुत्ववाद, कायद्याचा अंमल आणि लोकांचे एकमेकांप्रती असलेले संबंध, हे दोनही देशात समान असलेले बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्याची तुमची इच्छा यामुळे मी विशेष प्रभावित झालो होतो.

गेल्या काही वर्षात भारत आणि कॅनडातील संबंध अधिक दृढ झाले असून माझ्या भेटीदरम्यान, हे संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर पोहोचले. भारताच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत कॅनडा एक महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला आला आहे. आमची भागीदारी ही दोन्ही देशांना हितकारक ठरणाऱ्या अनेक क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृध्दींगत होण्यापुरतीच मर्यादित नाही तर अधिक शांततापूर्ण, समृध्द आणि शाश्वत विश्व घडवण्यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरू शकते. भविष्यात आपल्या दोनही देशांदरम्यानचे संबंध अधिक वृध्दींगत होण्यासाठी तुमच्याबरोबर कार्य करण्यासाठी मी उत्सुक आहे. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी भारताला अधिकृत भेट द्यावी यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला आमंत्रण देतो. तुमचे नवी दिल्लीत स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे.

J.Patankar/S.Tupe/N.Sapre