पीएम्इंडिया
आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम 22 मार्च रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होईल. मन की बातचा हा सहावा भाग आहे. ज्याद्वारे पंतप्रधान नागरिकांसमोर आपले विचार मांडतात. शेतकरी आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न यावर पंतप्रधानांचा यावेळी भर असेल.त्यांनी नागरिकांना “माय गव्ह.इन” वर सूचना आणि मते पाठवण्याचे आवाहन केले आहे.
मन की बातच्या यापूर्वीच्या पाच भागांमध्ये पंतप्रधानांनी जनतेशी थेट संवाद साधला होता. स्वच्छ भारत अभियान, खादीला प्रोत्साहन, कौशल्य विकास, अपंग मुलांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक संस्थांसाठी पायाभूत सुविधा आणि अंमली पदार्थांची समस्या यांसारख्या जनतेच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. 22 फेब्रुवारी रोजी प्रसारित झालेल्या भागातून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण आणि चिंता झटकून सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी त्यांच्याबरोबर संयुक्तपणे मन की बात द्वारे जनतेशी अनेक मुद्दयांवर संवाद साधला.
देशभरातून नागरिकांचा या कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वाहिन्यांवरुन एकाचवेळी हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. विविध भारती, एफ.एम. गोल्ड आणि एफ. एम. रेन्बो या आकाशवाणीच्या वाहिन्यांवर देखील हा कार्यक्रम ऐकता येईल. पंतप्रधानांच्या अधिकृत संकेतस्थळावरही या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाते.