Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पायाभूत क्षेत्राच्या प्रगतीचा पंतप्रधानांकडून आढावा

पायाभूत क्षेत्राच्या प्रगतीचा पंतप्रधानांकडून आढावा

पायाभूत क्षेत्राच्या प्रगतीचा पंतप्रधानांकडून आढावा


डिजिटल, ग्रामीण पायाभूत सुविधांचा तसेच दळणवळण क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी एका बैठकीत घेतला.

स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे विद्युत जोडणीविना असलेल्या खेड्यात 1000 दिवसात विद्युत पुरवठा करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी केलेल्या तयारीचा तपशील पंतप्रधानांनी मागविला. या उद्दिष्टाप्रती सुरू असलेल्या प्रगतीबाबत संबंधित खात्याने देखरेख ठेवावी असे निर्देश पंतप्रधानांनी दिले.

देशभरातल्या मोबाईल संपर्क जाळ्याची माहितीही यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली. दुर्गम आणि मोबाईल संपर्क नसलेल्या भागात मोबाईल संपर्कसेवा पुरविण्यासाठी रेल्वे आणि इतर दळणवळण पायाभूत सुविधांसह विद्यमान साधनसंपत्तीचा लाभ घेण्याच्या शक्यता अधिकाऱ्यां नी आजमाव्यात असेही पंतप्रधानांनी सुचविले. डिजिटल पायाभूत क्षेत्राची उद्दिष्ट आणि डिजिटल इंडिया मोहिमेच्या उद्दिष्टांची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला.

सर्वसामान्यांवर परिणाम करणाऱ्या कॉल ड्रॉप मुद्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत यासंदर्भात अधिकाऱ्यांनी कोणती पावले उचलली आहेत याबाबत पंतप्रधानांनी विचारणा केली या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच व्हाईस कनेक्टिव्हीटीचा प्रश्न भविष्यात डाटा कनेक्टिव्हिटीपर्यंत जाऊ नये याची दक्षता घ्यावी असे पंतप्रधान म्हणाले.

सौर ऊर्जेशी निगडीत प्रकल्प, विशेषत: रेल्वे स्थानके आणि विमानतळांबाबतच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. रेल्वे विद्यापीठ स्थापन करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. नेपाळ, भूतान आणि बांगलादेशला रस्ता मार्गे संपर्क करण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी पुरेसा निधी पुरविण्यात आला असून त्याचा वापर करत योग्य तो परिणाम दिसून यावा याची जबाबदारी आता संबंधित मंत्रालयांवर राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया, पंतप्रधान कार्यालयाचे तसेच निती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते.

N. Chitale/S.Tupe