Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरिसमध्ये भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

पॅरिसमध्ये भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 14 जुलै 2023

भारत माता की जय, भारत माता की जय

नमस्‍कार, बोनजोर

वणक्कम, सत श्री अकाल,

केम छो !

हे दृश्यच इतके अद्भुत आहे. हा उत्साह अभूतपूर्व आहे आणि स्नेहाचा हा अविरत  प्रवाह हृदयस्पर्शी आहे. हे आदरातिथ्य खूप आनंददायी आहे. जेव्हा मी देशापासून दूर असतो आणि मला ‘भारत माता की जय’ अशी हाक ऐकू येते किंवा कुणी ‘नमस्कार’ म्हणतं, तेव्हा वाटते की मी घरी आलो आहे.  आणि आपण भारतीय जिथे कुठे जातो, तेव्हा नेहमीच एक छोटा भारत तयार करतो. आणि मला सांगण्यात आले की या समारंभात असे बरेच लोक आहेत ज्यांनी आज येथे येण्यासाठी अकरा-बारा तासांचा प्रवास केला आहे. याहून मोठं प्रेम काय असू शकतं, खरंच!

आणि आपल्याला माहित आहे की तंत्रज्ञानाच्या या युगात, कोणासाठीही घरात आरामात बसून आपल्या मोबाईल फोनवर थेट प्रक्षेपण  ऐकणे कठीण काम नाही.  मात्र, असे असूनही, इतक्या दूरवरून , इतक्या मोठ्या संख्येने लोक आपला वेळ काढून आले, तुम्हा सर्वांना पाहण्याची संधी मिळणे हे माझे खूप मोठे सौभाग्य आहे. येथे आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

मित्रहो,

मी यापूर्वीही अनेकदा फ्रान्सला आलो आहे. मात्र, यावेळची माझी फ्रान्सची भेट खूप खास आहे. उद्या फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस आहे. मी फ्रान्सच्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि या महत्त्वाच्या प्रसंगी मला आमंत्रित केल्याबद्दल मी फ्रान्सच्या लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

आज पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी आल्या होत्या . आणि उद्या, मी माझे मित्र अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या संचलन सोहळ्यात सहभागी होणार आहे.  ही आत्मीयता केवळ दोन देशांच्या नेत्यांमध्ये नाही, तर भारत आणि फ्रान्स यांच्यातील अतूट मैत्रीचे ते प्रतिबिंब आहे. फ्रान्सचे राष्ट्रगीत म्हणते , ‘मार्च ऑन्स , मार्च ऑन्स …’ म्हणजे ‘लेट्स मार्च, लेट्स मार्च’. त्याचप्रमाणे, आपल्या प्राचीन वैदिक धर्मग्रंथांमध्ये, आपल्याला नेहमी प्रेरणा देणारा मंत्र म्हणजे ‘चरैवेति, चरैवेति’ म्हणजे ‘चालत रहा , चालत रहा; लेट्स मार्च, लेट्स मार्च’. आणि उद्याच्या राष्ट्रीय दिनाच्या परेडमध्येही हीच भावना आपल्याला पाहायला मिळेल. जल, थल आणि आकाशात भारताचे रक्षण करणारे भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही सेनांचे सैनिक या संचलनात सहभागी होणार आहेत. आणि आपल्यात असलेली ही एकजूट, खरोखरच विशेष आहे. यात एकता आहे; विविध रंग आहेत आणि सर्वत्र उत्साह आहे. हे खरोखरच अद्भुत आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षे साजरी करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग कोणता?

मित्रहो,

आज जग नव्या जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. भारताचे सामर्थ्य आणि भूमिका झपाट्याने बदलत आहे. भारत सध्या G-20 चे अध्यक्षपद भूषवत  आहे. प्रथमच एखाद्या देशाच्या अध्यक्षपदाच्या काळात 200 हून अधिक बैठका  त्या देशाच्या कानाकोपऱ्यात होत आहेत. संपूर्ण G-20 समूह  भारताची क्षमता पाहत आहे आणि ते पाहून मंत्रमुग्ध झाले आहेत.  हवामान बदल असो, जागतिक पुरवठा साखळी असो, दहशतवाद असो किंवा कट्टरवाद असो, प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताचा अनुभव आणि प्रयत्न जगासाठी लाभदायक  ठरत आहेत.

भारत म्हणतो, ‘एकम सत् विप्रा बहुधा वदन्ति’, याचा अर्थ ‘सत्य एकच  आहे, पण ते व्यक्त करण्याचे मार्ग वेगळे असू शकतात’. भारत म्हणतो, ‘आत्मवत् सर्व भूतेषु‘, याचा अर्थ आपण स्वतःसाठी जी  करुणा आणि आत्मीयता दाखवतो, ती आपण इतरांप्रतिही दाखवली  पाहिजे‘. भारत म्हणतो, ‘समगच्छध्वम् संवदध्वम् सम वो मनांसि जनताम्’, ज्याचा अर्थ ‘आपण एकत्र चालूया, एकत्र बोलूया, आपली मने एक होऊ द्या’. आणि भारत म्हणतो, ‘वसुधैव कुटुंबकम’, याचा अर्थ ‘संपूर्ण जग एक कुटुंब आहे’. या भावनेने आपण एक चांगला समाज, चांगले जग घडवू शकतो. याच भावनेतून भारत आणि फ्रान्स 21 व्या शतकातील अनेक आव्हानांनासामोरे जात आहेत.

त्यामुळे या महत्त्वाच्या काळात फ्रान्स आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आणि तुम्हाला माहित आहे की ही भारत-फ्रान्स भागीदारी कोण सातत्याने मजबूत करत आहे…कोण मजबूत करत आहे… कोण करत आहे… कोण करत आहेदोन देशांमधील  संबंधांना कोण नवा आयाम  देत आहे? तुमचे उत्तर बरोबर नाही. ते मोदी करत नाहीत, हे सर्व तुम्ही  करत आहात. या भागीदारीत दोन्ही देशांमधील लोकांमधील परस्पर विश्वासाचा सर्वात मजबूत पाया म्हणजे आपल्या दोन्ही देशांमधील लोकांमधील संबंध आहेत .

येथे नमस्ते फ्रान्स फेस्टिव्हल होतो आणि भारतातील लोक बोनजोर  इंडिया उत्सव साजरा करतात. आपल्या दोन्ही देशांचा वारसा असो वा इतिहास, कला असो वा सौंदर्यशास्त्र, हस्तकला असो वा सर्जनशीलता, पाककृती असो वा संस्कृती, फॅशन असो किंवा चित्रपट, हे सगळे आपल्याला एकत्र आणतात.  फ्रेंच फुटबॉलपटूंच्या लोकप्रियतेचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही भारतात या. किलियन एम्बाप्पेच्या चाहत्यांची संख्या फ्रान्समध्ये असणार नाही , त्याच्या  कितीतरी पट भारतातील  तरुणांमध्ये तो लोकप्रिय आहे.

मित्रहो,

फ्रान्सप्रति माझा वैयक्तिक स्नेह प्रदीर्घ काळापासून आहे आणि मी ते कधीही विसरू शकत नाही. सुमारे 40 वर्षांपूर्वी गुजरात मधील अहमदाबाद येथे फ्रेंच सांस्कृतिक केंद्र, अलायंस फ्रांसे ची स्थापना झाली. आणि भारतातील त्या सांस्कृतिक केंद्राचा मी पहिला सदस्य होतो जो आज तुमच्याशी संवाद साधत आहे.  विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी फ्रेंच सरकारने त्यांच्या जुन्या नोंदींमधून माझे ओळखपत्र काढले, त्याची झेरॉक्स प्रत बनवली आणि  मला दिली. ती भेट आजही माझ्यासाठी अनमोल ठेवा  आहे.

मित्रहो,

भारत आणि फ्रान्स यांच्यातील ऐतिहासिक संबंधांबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे इतके काही आहे ,त्यासाठी बराच वेळ लागेल … मग तुमचे काय होईल ? 2015 मध्ये जेव्हा मी फ्रान्सला आलो होतो, तेव्हा मी नेव्ह चॅपेलला गेलो होतो. तिथे पहिल्या महायुद्धात प्राणांचे बलिदान देणाऱ्या हजारो भारतीय सैनिकांना मी आदरांजली वाहिली होती. 100 वर्षांपूर्वी फ्रान्सच्या गौरवाचे रक्षण करताना या भारतीय जवानांनी आपले कर्तव्य बजावताना फ्रान्सच्या भूमीवर आपल्या प्राणांची आहुती दिली. मित्रहो, तेव्हा हा खरोखरच एक भावनिक क्षण होता.

ज्या रेजिमेंटमधून त्या सैनिकांनी येथे युद्धात भाग घेतला, त्यापैकी एक पंजाब रेजिमेंट आहे, ती उद्या येथील राष्ट्रीय दिनाच्या संचलनात सहभागी होणार आहे. मित्रहो, हे 100 वर्ष जुने भावनिक नाते आणि इतरांच्या कल्याणासाठी सर्वोच्च त्याग करण्याची परंपरा ही एक मोठी प्रेरणा आहे. भारतात कोणाला याचा अभिमान वाटणार नाही? त्यावेळी भारतीय जवानांनी बजावलेले कर्तव्य आणि त्यांचे समर्पण याचे आज या भूमीवर अभिमानाने आणि आदराने स्मरण केले जात आहे. धन्यवाद, फ्रान्स!

मला विश्वास आहे की भारत आणि फ्रान्समधील संबंध दृढ करण्यासाठी तुम्ही जे योगदान देत आहात…मी तुम्हाला सांगत आहेमी तुमच्यासाठीच सांगत आहे … कर्तव्याच्या भावनेतून तुम्ही आज जे काही करत आहात ते इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल.

मित्रहो,

फ्रान्सची प्रशंसा करताना महात्मा गांधी म्हणाले होते, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तीन शब्दांच्या सामर्थ्य समजावून सांगणारा देश म्हणून फ्रान्सचे वर्णन केले. ज्या काळात बहुतेक देश भारताकडे केवळ वसाहतवादी वर्चस्वाच्या दृष्टीकोनातून पाहत होते, तेव्हा नोबेल पारितोषिक विजेते रोमेन रोलँड यांनी ‘भारत ही आपल्या संस्कृतीची  जननी आहे’ असे म्हटले होते. भारताचा हजारो वर्षांचा जुना इतिहास, त्याचे अनुभव आणि जगाच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांची व्याप्ती खूप मोठी आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि विविधतेचे मॉडेल देखील आहे. ही आपली खूप मोठी ताकद आहे, मोठी शक्ती आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो.

मित्रहो,

आपल्या देशात एक म्हण आहे की दर काही मैलांवर पाण्याची चव बदलते आणि  दर चार मैलांनी भाषा बदलते. म्हणजे भारतात थोड्या अंतरानंतर पाण्याची चव आणि भाषाही  बदलते. भारतात 100 हून अधिक भाषा आणि 1,000 हून अधिक बोली आहेत. दररोज, या 100 हून अधिक भाषांमध्ये 32,000 हून अधिक वेगवेगळी वर्तमानपत्रे छापली जातात. या 100 हून अधिक भाषांमध्ये, 900 हून अधिक वृत्तवाहिन्या आहेत आणि त्यावरून बातम्यांचे प्रसारण केले जाते. याशिवाय , सुमारे 400 रेडिओ चॅनेल 100 हून अधिक भाषांमध्ये प्रसारण सेवा देतात.

आजही भारतात अनेक लिपी आणि लेखन पद्धती वापरल्या जातात. भारताने ही भव्य परंपरा जिवंत ठेवली आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.  भारतीय शाळांमध्ये आणि भारतातील विविध प्रदेशांमध्ये जवळपास 100 भाषा शिकवल्या जातात. आणि तमिळ ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे हे अनेकांना माहीत नसेल. आणि जगातील सर्वात जुनी भाषा तामिळ ही भारताची भाषा आहे,आपल्या भारतीयांची भाषा आहे यापेक्षा मोठा अभिमान काय असू शकतो.

आणि मित्रहो,

आता जग देखील भारतीय भाषांच्या विविधतेचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वीच, तुम्ही  दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला विम्बल्डनमध्ये “थलैवा” असे संबोधताना पाहिले असेल. ही विविधता आपल्या लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. आज या ताकदीच्या जोरावर प्रत्येक भारतीय आपली स्वप्ने पूर्ण करत आहे, देशाला आणि जगाला पुढे नेत आहे. दहा वर्षांत भारत दहाव्या क्रमांकावरून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे हे ऐकून कोणाला अभिमान वाटणार नाही? हा अभिमान केवळ भारतीयांनाच वाटत नाही; आज संपूर्ण जगाला विश्वास वाटू लागला आहे की भारताला 5  ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था व्हायला वेळ लागणार नाही.

तुम्ही नुकताच संयुक्त राष्ट्राचा अहवाल पाहिला असेल. त्या अहवालात, संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की भारताने केवळ 10-15 वर्षातच सुमारे 415 दशलक्ष लोकांना म्हणजे सुमारे 42 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आहे. तुम्ही कल्पना करू शकता, 415 दशलक्ष म्हणजे युरोपच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.  संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही ही संख्या जास्त आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अभ्यास असेही सांगतो की भारतातील गरिबी आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा भारत एवढा मोठा  पराक्रम करतो तेव्हा त्याचा फायदा आपल्यालाच नाही तर संपूर्ण मानवतेला होतो. भारताच्या प्रगतीमुळे जगाचे विकासाचे मापदंड बदलतात. परिणामी सर्वांगीण सुधारणा होते. यामुळे इतर गरीब देशांमध्ये देखील परिस्थिती बदलू शकते आणि गरिबी दूर केली जाऊ शकते असा विश्वास  निर्माण होतो.

मित्रहो,

देशात कोणत्याही परिवर्तनामागे कठोर परिश्रम आणि त्या देशातील नागरिकांचा घाम असतो याला  फ्रान्सची भूमी साक्षीदार आहे. आज भारताची भूमीही एका महत्त्वपूर्ण परिवर्तनाची साक्षीदार होत आहे. या परिवर्तनाची धुरा भारतातील लोकांच्या, भारताच्या भगिनी आणि मुलींच्या, भारतातील युवकांकडे  आहे. आज संपूर्ण जग भारताप्रति नव्या आशा आणि आकांक्षांनी भरले आहे. ही आशा, या अपेक्षेचे ठोस परिणामांमध्ये रूपांतर होत आहे आणि त्यामागील एक निर्णायक शक्ती भारताचे मनुष्यबळ  आहे. हे मनुष्यबळ निर्धाराने, धैर्याने भरलेले आहे. ते भारताच्या लोकशाही मूल्यांसह आणि मानवतेच्या भल्यासाठी खंबीरपणे पुढे मार्गक्रमण करत आहे.

मित्रांनो,

आजचा भारत आपल्या वर्तमान काळातील आव्हांनावर, दशकांपासून सुरू असलेल्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करतो आहे. भारताने हा संकल्प केला आहे की कुठलीच संधी गमावणार नाही आणि वेळेतला एक क्षण देखील वाया घालवला जाणार नाही. आम्ही देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्य उज्वल करण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि माझ्या मित्रांनो, मी आपणाला सांगू इच्छितो, माझ्याकडून सांगू इच्छितो, मी देखील एक संकल्प घेऊन निघालो आहे. शरीराचा कण अन कण आणि वेळेचा प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, देशवासियांसाठी आहे.

मित्रांनो,

आज तंत्रज्ञानाचा प्रभाव आपल्याला पदोपदी जाणवतो. जग हे तंत्रज्ञानाने चालत आहे. आज भारताच्या 25 हजार पेक्षा जास्त शाळांत 80 लाखांहून जास्त मुले अटल टिंकरिंग प्रयोगशाळांमध्ये नवोन्मेशाची बाराखडी गिरवत आहेत. आम्ही 21 व्या शतकाच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन नवे शैक्षणिक धोरण लागू केले आहे. आजचा भारत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला आधार बनवून पुढे जात आहे. आणि असे नाही की भारतात केवळ एक आदिवासी महिला, भारताच्या राष्ट्रपती म्हणून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आपले नेतृत्व करत आहेत. आज भारतात मुली देखील प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करताना दिसत आहेत. उच्च शिक्षणात मुलींचे सक्षमीकरण सातत्याने वाढत आहे आणि मला आनंद आहे की इथे नॅशनल दिनाच्या परेड मध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या तुकड्यांमध्ये अनेक महिला अधिकारी आहेत, महिला वैमानिक सामील आहेत.

मित्रांनो,

21व्या शतकातील जग तंत्रज्ञान आणि कौशल्याच्या बळावरच पुढे जाणार आहे. भारत आणि फ्रांसच्या भागीदारीचा हा खूप मोठा आधार आहे. आपला अवकाश कार्यक्रम याचा पुरावा आहे. थुंबा मध्ये जेव्हा साउंडिंग रॉकेट स्टेशन बनविण्याचा मुद्दा आला तेव्हा फ्रांसच मदतीसाठी पुढे आला. त्यानंतर आम्ही दोन्ही देशांनी अवकाश क्षेत्रात खूप मोठा पल्ला गाठला आहे. आज आम्ही एकमेकांचे उपग्रह अवकाशात सोडत आहोत आणि आपल्याला ऐकून आनंद होईल, जेव्हा मी आपल्याशी बोलत आहे, तेव्हा भारतात चांद्रयान – 3 च्या प्रक्षेपणाची उलटगणती ऐकू येत आहे. काही तासांतच भारताच्या श्रीहरीकोटा इथून हे ऐतिहासिक प्रक्षेपण होणार आहे.

मित्रांनो,

अवकाशाप्रमाणेच अनेक अशी क्षेत्रे आहेत ज्यात भारत आणि फ्रांसची भागीदारी जगाला नवी दिशा देण्यात मदत करू शकते. जगातील सौर सहकार्यात जगाला खूप काही देण्याचे सामर्थ्य आहे. आता अशी भागीदारी आम्ही स्वच्छ उर्जा, महत्वाचे आणि सामरिक तंत्रज्ञान, स्वच्छ दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, चक्राकार अर्थव्यवस्था, आरोग्य आणि पोषण अशा अनेक क्षेत्रांत, प्रत्येक क्षेत्रांत सक्षम करण्याचे काम करत आहोत. फार कमी लोकांना माहीत असेल, भारत आणि फ्रांस मिळून फार मोठ्या काळापासून पुरातत्व मोहिमांवर काम करत आहेत आणि याचा विस्तार चंदीगड पासून लडाख पर्यंत पसरलेला आहे.

मित्रांनो,

भारत – फ्रांस भागीदारी सशक्त करणारे आणखी एक क्षेत्र आहे डिजिटल पायाभूत सुविधा, हा उद्योग 4.0, त्याचा देखील फार मोठा आधार आहे. आज जगाला आणि तुम्हाला देखील ऐकून नक्की अभिमान वाटेल की, आज जगातील 46% रियल टाईम डिजिटल व्यवहार भारतात होतात. आणि मी आपल्याला देखील आव्हान देतो, की पुढच्या वेळी भारतात आल्यावर खिशात एकही पैसा न घेता घरातून बाहेर पडा, रिकाम्या खिशाने, फक्त मोबाईलवर युपीआय ॲप डाऊनलोड करून ठेवा. तुम्ही पूर्ण भारत फिरून याल, एक पैसा देखील रोख खर्च न करता तुम्ही काम चालवू शकता. आज भारतात बँकिंग सेवा 24×7 कुठल्याही वेळी, कुठेही लोकांच्या हातात आहे. थेट लाभ हस्तांतरण प्रशासनाचा भाग बनले आहे. भारताचा युपीआय असो अथवा इतर काही डिजिटल प्लॅटफॉर्म, यामुळे देशात फार मोठे सामाजिक परिवर्तन घडले आहे. आणि मला आनंद आहे की भारत आणि फ्रांस या दिशेने देखील एकत्र काम करतात. फ्रांसमध्ये भारताच्या युपीआयच्या वापरा संबंधी करार झाला आहे. आता मी तर करार करून निघून जाईन, तो पुढे नेण्याचं काम आपलं आहे.

मित्रांनो,

येणाऱ्या दिवसांत याचा शुभारंभ आयफेल टॉवर पासून केला जाईल, म्हणजे आता भारतीय पर्यटक मोबाईल ॲप द्वारे आयफेल टॉवरला रुपयांत व्यवहार करू शकतील. होय, मोदी है तो मुमकिन है, मात्र तुमचा आवाज ठीक करू शकत नाही.

मित्रांनो,

आता थोड्याच वेळात इथे, म्हणजे काही आठवडे – महिने लागू शकतात, इथे क्रेगी पर्फेक्चर मध्ये भारताचे महान संत तिरुवल्लुवरजी यांचा पुतळा उभारला जाणार आहे आणि संत तिरुवल्लुवरजी सांगून गेले आहेत एंडरा पोझ्हुधीन पेरीदुवाक्कुम थानमाकानैच चान्द्रोन एनाक्केट्टा थाई…. तमिळ भाषिक मित्रांना समजलं असेल, मात्र बाकीच्यांना सांगतो. याचा अर्थ फारच मार्मिक आहे आणि तिरुवल्लुवरजींनी अनेक शतकांपूर्वी आपल्याला हे ज्ञान दिले आहे. याचा अर्थ आहे, जेव्हा एक आई आपल्या अपत्याची तारीफ विद्वान म्हणून ऐकते, तेव्हा आईला इतका आनंद होतो, आई इतकी खुश होते, जितकी ती त्याच्या जन्माच्या वेळी देखील होत नाही. म्हणजे अपत्य जन्माला आल्यावर जितका आनंद झाला, त्यापेक्षा जास्त आनंद आपल्या अपत्याच्या यशाचा होतो. आई बद्दल म्हटलं गेलं आहे, आणि म्हणूनच जेव्हा आपण विदेशात नाव लौकिक कमावतो, जेव्हा जग आपली प्रशंसा करते, तेव्हा भारतमातेला देखील तसाच आनंद होतो. परदेशी भूमीवर भारतमातेला आपल्या मनात ठेवणारी, भारतमातेची अपत्ये मला भारताचे ब्रांड अँम्बेसेडर वाटतात.

तुम्ही भारताचे राष्ट्र्दूत आहात. मला माहित आहे, की भारतीय कुठेही असले तरी त्यांच्या मनात भारत असतो. मी आता अवकाशाची चर्चा करत होतो आणि जल्लोष करत होते तुम्ही लोक, चांद्रयान, चांद्रयान, चांद्रयान म्हणजे तुम्ही आहात इथे, मात्र तुमचं मन चांद्रयानमध्ये आहे. म्हणूनच फ्रांस सकट संपूर्ण जगात पसरलेले भारतीय वंशाचे जे लोक आहेत, त्या भारतीय वंशाच्या लोकांनी देशात पैसे पाठविण्याचा नवा विक्रम केला आहे. तुम्ही नवा विक्रम केला आहे. सांगू? सांगू तुम्हाला? तुम्हाला माहित नाही न! काही हरकत नाही, तुमच्या प्रकारांचे पोवाडे देखील मी गातो.

भारत जगातला पहिला देश आहे, जिथे परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांनी वर्षाला 100 अब्ज डॉलर पेक्षा जास्त पैसे देशात पाठवले आहेत आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आपले योगदान सातत्याने वाढत आहे. मात्र माझी तुम्हाला आणखी एक आग्रहाची विनंती आहे. मी आपल्याला आग्रहाची विनंती तर करू शकतो न? हो म्हणायला काय लागतं? हो, मोदी विचारायला थोडीच येणार आहे. माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे, भारतात गुंतवणूक करण्यासाठी देखील तुम्हाला उत्साहाने पुढे यावे लागेल. आता भारत पुढच्या 25 वर्षांत विकसित होण्याच्या ध्येयावर काम करत आहे. यात आपली मोठी भूमिका आहे. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात काम करता, त्याच्याशी संबंधित संधी भारतात नक्की शोधा. आज प्रत्येक अंतरराष्ट्रीय संस्था म्हणत आहे, की भारत पुढे जात आहे. भारत bright spot आहे.

भारतात गुंतवणुकीच्या अभूतपूर्व संधी बनत आहेत. तुम्ही भारतात गुंतवणूक करा आणि आज जे आहे, जेव्हा मी सांगतो आहे, नंतर तक्रार करू नका की मोदिनी हे तर सांगितलंच नाही. आता संधी आहे आणि मी तर लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो, हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे, आणि जो लवकर येईल त्याला जास्त फायदा होईल. जो उशीर करेल, तो वाट बघत बसेल. आता संधीचा लाभ घ्यायचा आहे, किती लवकर घ्यायचा आहे, हे मी तुमच्यावर सोडतो.

मित्रांनो,

म्हणून, या आणि भारतात गुंतवणूक करा. भारत सरकार परदेशांत स्थायिक झालेल्या, काम करत असलेल्या भारतीयांची सुविधा आणि सुरक्षा, यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. युद्ध भूमी असो अथवा नैसर्गिक आपत्ती, भारत आपल्या नागरिकांना या संकटात बघून सर्वात आधी कामाला लागतो. युक्रेन असो अथवा सुदान, येमेन असो अथवा अफगाणिस्तान, इराक असो अथवा नेपाळ, आम्ही भारतीयांच्या सुरक्षेसाठी पूर्ण शक्तीनिशी झोकून दिले आहे. परदेशात रहाणारी प्रत्येक भारतीय व्यक्ती आमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे, जेवढे हिंदुस्तानात राहणारे आमचे देशबांधव. काही वर्षांपूर्वी जेव्हा नीती आयोग स्थापन झाला, त्यावेळी आम्ही त्यात भारतीय समुदायाचे सामर्थ्य आणि योगदानाला उचित स्थान दिले. मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे, की रियुनियन आयलंड मधे OCI कार्ड संदर्भात ज्या अडचणी होत्या, त्या आता दूर झाल्या आहेत. आता तिथे OCI कार्ड जारी केले जात आहे. आता आम्ही असा प्रयत्न करतो आहोत की मार्तीनिक आणि ग्वादेलोप इथल्या देखील समस्या दूर करु शकू.

मित्रांनो,

फ्रान्स सह, अनेक देशांमधे असे अनेक सहकारी आहेत, जे अध्ययन, अभ्यासाशी जोडलेले आहेत, संशोधनाशी जोडलेले आहेत. शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. मी जेव्हा परदेशात अशा अभ्यासक, विचारवंत आणि प्राध्यापकांना भेटतो, तेव्हा ते देखील नेहमीच सांगतात, की त्यांच्याकडे जो अनुभव आहे, ज्ञान आहे, त्याला ते भारताशी कसे जोडू शकतात. आणि मी आता आपल्याला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. त्यांच्या ह्या इच्छेचा आम्हीही मान ठेवला आहे. अशा मित्रांसाठी आता भारतातल्या शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन करणे सोपे झाले आहे.

गेल्यावेळी जेव्हा मी फ्रान्स मधे आलो होतो, त्यावेळी असे ठरले होते की फ्रान्स मधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्ययनोत्तर व्हिजा दिला जाईल. आता हा निर्णय ही घेण्यात आला आहे की फ्रांस मधे पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या भारतीयांना पाच वर्षांच्या दीर्घ कालावधीचा शिक्षणोत्तर व्हीजा दिला जाईल. भारत सरकारने फ्रान्स सरकार च्या मदतीने मार्से इथे नवे वाणिज्य दूतावास सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. यामुळे आपल्या सगळ्यांची सुविधा आणखी वाढणार आहे.

मित्रांनो,

फ्रान्सच्या माझ्या मित्रांना, इथल्या नागरिकांना मी आणखी एक आग्रह करू इच्छितो. भारत इतका विशाल देश आहे, इतक्या विविधतांनी भरलेला देश आहे की आपल्या भारतीयांना सुद्धा हा देश संपूर्ण पणे बघण्यासाठी, समजून घेण्यासाठी एक जन्म कमी पडतो. अशा विशाल भारताला बघण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आज संपूर्ण जग उत्सुक आहे. आपल्याला आपल्या आवडीचे काही ना काही भारतात नक्कीच मिळेल. भारतात पर्यटनाचा विस्तार केवळ सौदर्य स्थळापेक्षा कितीतरी अधिक आहे. आपण जर भारतातील विविधता पाहिली तर आश्चर्याने वेडे व्हाल !

हिमालयातील ऊंच – उंच  पर्वतरांगा पासून ते घनदाट जंगलापर्यंत, तप्त वाळवंटापासून ते सुंदर समुद्र किनाऱ्यांपर्यंत, साहसी खेळापासून ते ध्यान आणि योग केंद्रापर्यंत, भारताकडे प्रत्येकाला देण्यासाठी काही ना काही आहे. भारताची ही विविधता समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपल्या फ्रेंच मित्रांना भारतात आणणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

आपण त्यांना जितकी जास्त मदत कराल, तितके जास्त संख्येने ते इथे येतील. माझ्या भारतातील तुम्ही सगळे माझे बंधू भगिनी, माझे भारतीय समुदायाचे लोक, हे काम उत्तम प्रकारे करू शकतील. ज्याप्रमाणे, मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये ॲक्सेस कोड किंवा पासवर्ड टाकल्यानंतर नवे जग आपल्यासमोर खुले होते, तसेच, भारतीय समुदाय देखील भारताचा ॲक्सेस कोड आहे. पासवर्ड आहे. भारतात पर्यटन वाढावे, हे आपले देखील मिशन असले पाहिजे. भारतात येण्याचा अर्थ आहे, हजारो वर्षांचा वारसा अनुभवणे, इतिहासाचा अनुभव घेणे, आपण भारतात याल, त्यावेळी, भारताच्या वारसा सोबतच, विकासाचा वेगही बघाल.

मित्रांनो,

आपण संकल्प करुया. आपल्या संपूर्ण क्षमतेने,आपल्या अनुभवांच्या बळावर, आपल्या संपर्कातून, संबंधातून, मोठ्या प्रमाणात  फ्रान्सच्या नागरिकांना भारताशी जोडूया. जेव्हा तुम्ही भारतात याल, तेव्हा त्यांनाही घेऊन या. आपण त्यांना भारत जाणून घेण्यासाठी प्रेरणा द्या. दोन्ही देशांमधील लोकांमधले परस्पर सबंध वाढतात, तेव्हा केवळ पर्यटन वाढत नाही, ते तर आपोआप होतेच; मात्र त्यातून आपलेपणाची जी ताकद वाढते, ती पिढ्यान् पिढ्यांसाठी एक अनमोल वारसा ठरते. आणि मला असा विश्वास आहे मित्रांनो, की या कार्यात आपण कधी मागे हटणार नाही. आपण आज इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात, आपल्या सगळ्यांना भेटण्याची संधी मला लाभली, यासाठी मी मनापासून आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद देतो.

माझ्यासोबत म्हणा,

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

धन्‍यवाद!

JPS/ST/Sushama/Radhika/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai