Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पेट्रापोल एकात्मिक तपासणी नाका संयुक्तपणे समर्पित केल्यावर पंतप्रधानांनी केलेले भाषण

पेट्रापोल एकात्मिक  तपासणी नाका संयुक्तपणे समर्पित केल्यावर पंतप्रधानांनी केलेले भाषण


बांग्लादेशच्या पंतप्रधान महामहीम शेख हसीना,

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आदरणीय ममता बॅनर्जी,

बांग्लादेश ओ पोश्चिम बंगेर भाई बोनेदर आमार नोमोश्कार,

आज थके आमादेर दुई देशेर मोध्ये आदानप्रदान आरो शोहोज हबे,

आमरा आदो काछाकाछि एलाम,

एई शुभो ओबोशोरे, शोकोलके जानाई ओभिनोंदोन,

कारण हा ईदचा महिना आहे, त्यामुळे सर्वप्रथम बांग्लादेशमध्ये राहणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या तसेच समस्त भारतीयांकडून ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा.

ही माझ्यासाठी आणि सर्व भारतीयांसाठी एक अत्यंत वेदनामय बाब आहे की रमजानच्या पवित्र महिन्यात ढाका आणि किशोरगंज येथे भीषण दहशतवादी हल्ले झाले.

या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

संपूर्ण भारताच्या प्रार्थना आणि संवेदना या हल्ल्यात मृत पावलेल्या निर्दोष लोकांच्या बरोबर आहेत.

महामहीम,

या कसोटीच्या क्षणी संपूर्ण भारत तुमच्याबरोबर आहे.

या कठिण परिस्थितीत पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्या कणखर नेतृत्वाचे मी अभिनंदन करतो. तुमचे नेतृत्व संपूर्ण क्षेत्रासाठी एक उदाहरण आहे.

दहशतवादाविरुध्दच्या या तुमच्या युध्दात तुम्ही स्वत:ला एकटया समजू नका. भारताचा पूर्ण पाठिंबा तुमच्यामागे आहे.

मी पंतप्रधान शेख हसीना यांना हे देखील आश्वासन देतो की दहशतवादा विरोधातल्या या लढयात भारत तुम्हाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे.

महामहीम,

आज आपण अशा एका वळणावर आहेात, जिथे केवळ आपली आव्हानेच समान नाहीत, तर आपले विकासाचे मार्ग देखील जोडलेले आहेत. मी नेहमी हेच म्हणत आलो आहे की भारताचा विकास आमच्या सर्व भारत आणि बांग्लादेश, दोघेही केवळ विकासाच्या मार्गावर चालत नाहीत तर या प्रवासात आपण एकत्र मार्गक्रमण करत आहोत.

यामुळेच, आज पेट्रापोल-बेनापोल हा दोन्ही देशांच्या सामान्य जनतेसाठी समर्पित करण्याचा कार्यक्रम एक खूपच महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. हा केवळ द्विपक्षीय व्यापाराच्या विकासासाठी महत्वपूर्ण नाही, तर दोन्ही देशांच्या आर्थिक समृध्दीचे एक प्रमुख दार आहे.

एका गोष्टीवरुन याचे महत्व लक्षात येईल. आज दोन्ही देशांदरम्यान एकूण व्यापारापैकी 50 टक्के व्यापार पेट्रोपाल-बेनापोल मार्गे होतो. 2015-16 मध्ये 15 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यापार पेट्रापोल-बेनापोल मार्गे झाला होता.

दरवर्षी सुमारे 15 लाख लोक आणि दीड लाख ट्रक येथून जातात.

संपूर्ण दक्षिण आशियाचा हा सर्वात मोठा खुश्कीचा (लॅण्ड पोर्ट) मार्ग आहे.

यापूर्वी पेट्रापोल येथे केवळ 15 एकरचे सीमाशुल्क केंद्र होते ज्यामध्ये मर्यादित सुविधा उपलब्ध होत्या.

मला आनंद झाला आहे की सुमारे 142 कोटी रुपये खर्चून 100 एकरच्या परिसरात एकात्मिक तपासणी नाका बांधून तयार झाला आहे. ज्यामुळे प्रवासी माल आणि वाहतुकीसाठी एकीकृत स्वरुपात सुरक्षा, स्थलांतर, सीमाशुल्क आदी सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतील.

यापूर्वी आम्ही आगरतला येथे एकात्मिक तपासणी नाका बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. आणि आगामी काळाात भारत-बांग्लादेश सीमेवर अशा प्रकारचे आणखी आठ एकात्मिक तपासणी नाके बांधण्याचे काम देखील पूर्ण करु.

महामहीम,

माझे मत आहे की आर्थिक विकास आणि संपर्क एकमेकांशी जोडलेले आहेत.

पेट्रापोल-बेनापोलचा अधिकाधिक वापर केवळ आपल्या अर्थव्यवस्थांना घनिष्टपणे जोडणार नाही तर, आपल्या जनतेचे परस्परांशी संबंध देखील मजबूत करेल.

मला खात्री आहे की हा मार्ग आपल्या सामाजिक विकास आणि समृध्दीचा प्रमुख मार्ग बनेल.

या ऐतिहासिक प्रसंगी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर भारत-बांग्लादेश संबंधांमध्ये त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेचे देखील अभिनंदन करतो.

शेवटी मी पुन्हा एकदा पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाचे, या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीचे आणि भारत-बांग्लादेश संबंधांच्या विकासात त्यांच्या मुख्य भूमिकेचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की, आपल्या उभय देशांमधील आर्थिक विकास आणि विकासाचे संबंध आपल्या दोन्ही देशांच्या जनतेसाठी अत्यंत लाभदायक ठरतील आणि पेट्रापाल-बेनापोल या संबंधांच्या विकासात एक प्रमुख चालकाची भूमिका पार पाडेल.

धन्यवाद !

S.Kane/B.Gokhale