पीएम्इंडिया
स्वयंप्रेरीत प्रशासन आणि वक्तशीर अंमलबजावणी करण्यासाठीचे आयसीटी आधारित बहुआयामी व्यासपीठ असलेल्या ‘प्रगती’(Pro-Active Governance and Timely Implementation PRAGATI) च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पाचव्यांदा संवाद साधण्यात आला.
आपल्या या आढावा कार्यक्रमात पंतप्रधानांनी टपाल कार्यालयाशी संबंधित तक्रारींबाबत चिंता व्यक्त केली. समाजातील गरीब घटकासाठी टपाल सेवा महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी या विभागाला पॉलिसी लाभांची देणी, मनीऑर्डर, बचत खाते आणि टपाल पोहचण्यास होणारा विलंब आदी सेवांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
आंध्रप्रदेश, तेलंगणा, झारखंड, ओदिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यातील रेल्वे, रस्ते, ऊर्जा, दूरसंवाद आणि कृषी-पायाभूत क्षेत्रातील प्रमुख पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. या प्रकल्पांमध्ये पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग (वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) आणि चेन्नई मेट्रो रेल यांचाही समावेश होता. हे प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी कामाची गती वाढवावी असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
नक्षलग्रस्त भागात मोबाईल सेवेच्या तरतूदी संदर्भातील योजनेचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. मागास भागातल्या सामान्य माणसासाठी मोबाईल सेवा अत्यंत महत्वाची असल्याच्या मुद्यावर पंतप्रधानांनी भर दिला. या योजनेच्या अंमलबजावणीत गती आणण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित राज्यांना दिले.
आसाम, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील तीन पोलिस ठाण्यांबरोबर व्हिडिओ वार्तालापच्या माध्यमातून गुनहा आणि गुन्हेगार नियंत्रण नेटवर्क आणि व्यवस्था (Criminal Tracking Network and Systems (CCTNS)) योजनेच्या प्रगतीचा आढावाही सादरीकरणाद्वारे पंतप्रधानांनी घेतला. या योजनेच्या अत्याधुनिकीकरणाची पातळी आणि अंमलबजावणीची गती देशभरात वाढवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
S.Tupe/N.Sapre