Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्समधील इव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेत “सर्वांसाठी संतुलित, सामायिक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देणे” या विषयावरील सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित

फ्रान्समधील इव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेत “सर्वांसाठी संतुलित, सामायिक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देणे” या विषयावरील सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित


नवी दिल्‍ली, 18 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील इव्हियन येथे G7 (जी-7) शिखर परिषदेत “सर्वांसाठी संतुलित, सामायिक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देणे” या विषयावरील  सत्राला संबोधित केले.

सामायिक आणि शाश्वत विकासाला या परिषदेने दिलेल्या महत्वाची प्रशंसा करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, जग सध्या अनिश्चिततेच्या छायेत असताना शाश्वत विकासाचा हा संदेश जगासाठी अर्थपूर्ण ठरेल. विकास हा केवळ जीडीपी किंवा व्यापारी आकड्यांपुरता मर्यादित न राहता लोकांची समावेशकता आणि कल्याणातून त्याचा खरा परिणाम दिसायला हवा, असे त्यांनी नमूद केले. या संदर्भात, त्यांनी “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या तत्त्वांवर आधारित भारताच्या समावेशक विकास गाथेवर प्रकाश टाकला.

पंतप्रधानांनी नमूद केले की, भारताच्या ‘समावेशक विकासा’च्या मंत्राने त्याच्या आंतरराष्ट्रीय संबंधांनाही दिशा दिली असून, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’, या ब्रीदवाक्यासह भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या G-20 परिषदेत याचे नेमके प्रतिबिंब दिसून आले. ते पुढे म्हणाले की, याच दृष्टिकोनाने, पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी भारत-मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी) च्या संकल्पनेला आकार देण्यात आला. संकटे आणि संघर्षांचा ‘ग्लोबल साउथ’वर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाल्याचे अधोरेखित करून, त्यांनी या देशांवरील हे ओझे  कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकजुटीचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी विकसनशील देशांना आर्थिक लवचिकता प्रदान करण्यासाठी पाठबळ देणारी यंत्रणा विकसित करावी अशी सूचना त्यांनी केली.

आयएमईसी च्या धर्तीवर आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि पॅसिफिक द्वीपसमूह देशांना जोडणाऱ्या संपर्क प्रकल्पांचा विचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. हे स्वप्न साकार करण्यासाठी, पंतप्रधानांनी संपर्क आणि व्यापाराला गती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकत्रीकरण भागीदारी (IMPACT) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला, यात G-7 चे भांडवल, भारताची गुणवत्ता आणि ‘ग्लोबल साउथ’ची मालकी यांची सांगड घालता येईल.

पंतप्रधानांनी स्थिर, विश्वासार्ह आणि समृद्ध जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. एकात्मिकता, भागीदारी आणि सामायिक प्रगतीवरील विश्वासामुळे भारताला G-7 सदस्य देश आणि इतर अनेक देशांशी व्यापार करार करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

* * *

नाना मेश्राम/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai