पीएम्इंडिया
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
मी सर्वप्रथम त्या सप्त ऋषींना वंदन करतो. शिक्षक तर खूप असतात. चांगले शिक्षक असतात , उत्तम शिक्षक असतात, समर्पित शिक्षक असतात , मात्र जर इतिहासात अमर शिक्षक शब्दाचा वापर करायचा झाला तर या सप्त ऋषींसाठी लागू करावा लागेल. असे शिक्षक १०० वर्षांनंतरही आज या पिढीला शिकवत आहेत , साक्षर करत आहेत. इतिहासात बहुधा कुठेही अशी दुर्मिळ घटना ऐकण्याचे सौभाग्य मिळू शकणार नाही जे या केएलई संस्थेच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे.
मी पाहतोय माझ्या समोर लाखोंच्या संख्येने हे सर्व तरुण बसलेले आहेत. हे सगळे त्या सप्त ऋषींच्या तपश्चर्येचा परिणाम आहे. लोकमान्य टिळक यांच्याकडून प्रेरणा घेतली. संत बसवेश्वर यांनी सामाजिक क्रांतीचा जो बिगुल वाजवला होता त्या सामाजिक क्रांतीला शिक्षणाच्या माध्यमातून केवळ माणसा -माणसांपर्यंत पोचवायचे नाही तर प्रत्येक पिढी पर्यंत पोहचविण्याचे भगीरथ कार्य १०० वर्षांपूर्वी या धरतीवर झाले. संपूर्ण देशासाठी , शिक्षणावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी ही अभिमानाची बाब आहे.
संस्था निर्माण होतात, बिघडतात, बंद देखील पडतात मात्र तुम्ही कल्पना करा त्या सात ऋषींनी किती मजबूत पाया रचला असेल की आज १०० वर्षांनंतरही ती बहरत आहे फुलत आहे आणि संपूर्ण देशाला प्रेरणा देत आहे.
आज जगाच्या कानाकोपऱ्यात कुणी ना कुणी असेल, जो म्हणत असेल की मी केएलई चा विद्यार्थी होतो आणि जगभरात देखील जेव्हा कुणाची मुलाखत होत असेल , नोकरीसाठी चौकशी होत असेल , जेव्हा तो सांगत असेल , सर्व प्रमाणपत्रे दाखवत असेल , आपले मार्क दाखवत असेल , तो सांगत असेल की साहेब हे सर्व ठीक आहे हे गुणांक, , हे प्रमाणपत्र , हे गुण, ही श्रेणी, मात्र माझ्याजवळ सर्वात मोठी गोष्ट आहे , मी केएलई चा विद्यार्थी आहे. आणि ज्या क्षणी मुलाखत घेणारा देखील पाहत असेल की अरे वा केएलई , या ,या .
१०० वर्षे किती पिढ्यानी तपश्चर्या केली असेल , किती-किती लोकांनी योगदान दिले असेल. तेव्हा कुठे अशी जिवंत व्यवस्था जन्माला येते आणि जी चालते.
आज जेव्हा देशभरात शिक्षणाच्या व्यापारीकरणाची चर्चा होत आहे , मोठं-मोठ्या लोकांना इच्छा होते की विद्येच्या व्यापारात सहभागी झाल्यास थोडासा लाभ मिळेल. अशा सर्व लोकांसाठी ते सप्त ऋषी एक शिकवण आहेत. १०० वर्षांपूर्वी त्यांचे वेतन किती असेल. या शिक्षकांचा पगार बहुधा ३० रुपये , ३५ रुपये , ५० रुपये असावा. १०० वर्षांपूर्वी ज्यांचा ३०, ३५, ५० रुपये पगार असेल , वेतन मिळाले असेल त्यांनी समाजासाठी एवढे मोठे योगदान दिले . शिक्षण क्षेत्रात सेवा करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे एक उदाहरण आहे , प्रेरणा आहे.
बंधू-भगिनींनो , राजकीय पक्ष देखील १०० वर्षे चालू शकत नाहीत . कितीतरी तुकडे होतात, कुटुंबे देखील वाचत नाहीत . तुम्ही कल्पना करू शकता की १०० वर्षे एक संस्था चालवणे , सातत्याने विकास होणे ,लोकशाही पद्धतीने त्याच्या व्यवस्थापनाची रचना होणे आणि जनतेच्याच पैशांनी ते पुढे नेणे , आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने ते पुढे वाढवणे हे खरोखरच संपूर्ण देशासाठी एक खूप मोठे उदाहरण आहे.
मी विशेषतः दिल्लीत जे आमचे मोठे विद्वान मित्र आहेत , माध्यमांचे लोक आहेत , त्यांना मी आज सार्वजनिकरित्या विनंती करू इच्छितो की एखाद्या व्यक्तीला ६० वर्षे पूर्ण झाली तर वृत्तपत्रात खूप सुंदर लेख छापून येतात . एखाद्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले तरीही वृत्तपत्रात खूप सुंदर लेख छापून येतात. एखाद्या व्यक्तीला ७५ वर्षे पूर्ण झाली तरीही जयजयकार होतो . बरे होईल , देशभरातील माध्यमांनी या सप्त ऋषींनी जे काम केले आहे , त्यांच्या शताब्दीसंदर्भात देखील काही तरी लिहावे म्हणजे देशाला समजेल. हे अशासाठी सुरु राहावे जेणेकरून देशाच्या काना -कोपऱ्यात जे शिक्षणाला समर्पित लोक आहेत , समाजाला समर्पित लोक आहेत , अशा लोकांना अशा घटनांमुळे प्रेरणा मिळते , बळ मिळते आणि देशाच्या अन्य भागातही अशी एक चळवळ उभी राहू शकते.
बंधू-भगिनींनो, जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरु होती तेव्हा महात्मा गांधींनी देखील स्वातंत्र्याचे सैनिक तयार करण्यासाठी गुजरात विद्यापीठ या नावाने शिक्षण संस्था सुरु केली होती. लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याचे सैनिक तयार करण्यासाठी आणि देशाला स्वतःच्या सामर्थ्यावर उभे करण्यासाठी शिक्षणावर भर दिला होता. २१ व्या शतकात देखील भारताला जगात जर आपला डंका पिटवायचा असेल तर ही आपली तरुण पिढी , त्यांचे कौशल्य , त्यांचे शिक्षणच हे करू शकतात.
बंधू-भगिनींनो , एक काळ होता जेव्हा भारताची ओळख जगात काय होती . हे तर साप -गारुडीवाले लोक आहेत , हे तर जादूटोणा करणारे लोक आहेत . साप आणि उंदीर याव्यतिरिक्त त्यांना कुठलेही ज्ञान नाही , जगात भारताची अशी ओळख होती मात्र काही वर्षांपासून भारताचे १८-२० वयोगटातील तरुण जेव्हा संगणकाच्या की-बोर्डवर आपली बोटे फिरवू लागली , संपूर्ण जग फिरायला लागले, विचार बदलायला लागला . जगाला भारताबाबत विचार करण्याची पद्धत बदलावी लागली , जगाला मान्य करावे लागले की भारताकडे अद्भुत शक्ती आहे , अद्भुत सामर्थ्य आहे आणि त्याचा मूळ आधार शिक्षण आहे . १०० वर्षात इथल्या समाज जीवनात बदल घडवून आणण्यासाठी , शिक्षणाद्वारे संपूर्ण कर्नाटकच्या जीवनाला ताकद देण्यात आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशाला बळ देण्यात तुमचे खूप मोठे योगदान आहे. लोकशाही पध्दतीचे योगदान आहे.
जेव्हा मी गेल्यावेळी आलो होतो तेव्हा आपले प्रभाकर यांनी मला सांगितले की ३२ वर्षांपासून मला लोक हे काम देत आहेत. ही छोटी गोष्ट नाही प्रभाकरजी. मी तुमचे अभिनंदन करतो , तुमच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो. एवढ्या पिढ्यांवर इतक्या लोकांनी काम केले असेल मात्र संस्थेचे कल्याण , शिक्षणाचे कल्याण , विद्यार्थ्यांचे भले ,यामध्ये कोणतीही तडजोड केली नाही ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे . मात्र आज जेव्हा हे उत्तम कार्य आपल्या डोळ्यांसमोर पाहत आहे ,तेव्हा माझी देखील इच्छा होते की मी देखील जाता-जाता तुमच्याकडे काही मागावे. मागू शकतो ना, मिळेल?
तुम्ही म्हणाल, देशाचा पंतप्रधान असा कसा आहे, मागायला आला आहे. हा पंतप्रधान आहेच असा , तो जनतेकडे मागून गुजराण करतो. मी आज तुमच्याकडे काही मागू इच्छितो आणि मला खात्री आहे , त्या सप्त ऋषींवर माझा विश्वास आहे , आजच्या व्यवस्थेवर विश्वास आहे , हे लाखो तरुण माझ्यासमोर बसले आहेत त्यांच्यावर माझा विश्वास आहे , म्हणूनच मागण्याची हिंमत करतो आहे. मागू? जरा जोरात आवाज येऊदे , मागू ,खरेच मागू?
तुम्ही मला सांगा , की या संस्थेचे सव्वा लाख विद्यार्थी आहेत, अनेक संस्था चालू आहेत, आपली केएलई असा संकल्प करू शकते का की २०२० मध्ये जेव्हा टोकियो मध्ये ऑलिंपिक होईल , तेव्हा काही सुवर्णपदके या केएलई ची देखील असतील. करू शकाल,शक्य आहे मित्रांनो , तुम्हाला शक्य आहे . माझ्या प्रिय देशबांधवांनो , मला नावीन्य देखील हवे आहे , नावीन्य हे विकासाचे औषध आहे. जर नावीन्य नसेल तर संशोधन होणार नाही, आयुष्य थांबेल आणि जे संशोधन करतात ते पुढे निघून जातात. आपण केवळ त्यांच्या उत्पादनाचे ग्राहक बनून राहतो. तुमच्याकडे मी गेल्यावेळी येऊन पाहिले होते. उत्तम वैज्ञानिक आहेत तुमच्याकडे, उत्तम संस्था आहेत, उत्तम तांत्रिक ज्ञान असलेले लोक आहेत. दरवर्षी आंतराष्ट्रीय मान्यताप्रप्त असे काहीतरी नाविन्यपूर्ण मनुष्यजातीसाठी केएलई देऊ शकतो , देणार का? नक्की द्याल ?
तिसरी गोष्ट , बंधू -भगिनींनो , आज जगात जी सर्वोत्तम १०० विद्यापीठे आहेत , त्यामध्ये आपण नाही. लाज वाटते. भारत सरकारने या अर्थसंकल्पात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आम्ही म्हटले आहे की ,सरकारची १० विद्यापीठे आणि १० खासगी विद्यापीठांनी संकल्प करावा की आम्हाला जगातील सर्वोत्तम १०० विद्यापीठांमध्ये आपले स्थान निर्माण करायचे आहे. जे या कामासाठी पुढे येऊ इच्छितात , त्यांना सरकारच्या वतीने विशेष आर्थिक मदत दिली जाईल . जे हे काम करण्यासाठी येऊ इच्छितात त्यांना सरकारी नोकरशहांची जी बंधने असतात की ही मंजुरी , ती मंजुरी , हा नियम, तो नियम , यात देखील सूट दिली जाईल, मोकळे मैदान दिले जाईल. मी निमंत्रित करतो देशाच्या १० खासगी विद्यापीठांना , मी निमंत्रित करतो देशाच्या १० सरकारी विद्यापीठांना , हिंमत करा, या. जगात ज्या १०० अव्वल आहेत , त्यांच्यात काय आहे जे आपल्याकडे नाही. आपण करून दाखवू आणि देश तर माझा , आता केवळ देश काल होता आणि आज एक वाढला, एवढ्याने चालणार नाही, हातात तर जगात जे चांगल्यातील चांगले आहे तिथे पोहोचायचा प्रयत्न होणे , हे भारताचे स्वप्न असायला हवे . ते घेऊन वाटचाल करायला हवी.
बंधू-भगिनींनो, आज मी कर्नाटकच्या धरतीवर आलो आहे आणि टीव्हीच्या माध्यमातून देश देखील माझे म्हणणे ऐकत आहे. तर मला आणखी एका विषयाची चर्चा करायची आहे. करू, तुम्हाला ऐकायचे आहे . ८तारखेला रात्री ८ वाजता तुम्ही पाहिले . २०१२,२०१३,२०१४ वृत्तपत्रात बातम्या यायच्या की कोळशात इतके लाख कोटी खाल्ले. टू-जी घोटाळ्यात इतके लाख कोटी खाल्ले आणि ८ तारखेनंतर तुम्ही त्यांची अवस्था पाहिली . ४००० रुपयांसाठी रांगेत उभे राहायला लागले. माझ्या प्रिय देशबांधवांनो, हे सरकार प्रामाणिक माणसाला त्रास देऊ इच्छित नाही , मात्र माझ्या प्रिय देशबांधवांनो, अप्रामाणिक लोकांना सोडायचे देखील नाहीये. १७ वर्षे झाली. तुम्ही मला सांगा ,देशाला लुटले गेले आहे की नाही लुटले गेले? भ्रष्टाचार झाला आहे की नाही झाला आहे. घरात मोठ्या-मोठया नोटांच्या थप्य्या लागल्या आहेत की नाही. मी हैराण आहे की आपले काँग्रेसचे लोक म्हणत आहेत की तुम्ही १००० च्या नोटा बंद का केल्या , ५०० च्या नोटा बंद का केल्या. अरे तुम्ही जेव्हा चार आणे बंद केले होते तेव्हा मी विचारले होते का? तुम्हाला माहित आहे काँग्रेस पक्षाने चार आणे बंद केले होते . या देशाने तर काही आरडाओरडा केला नव्हता. ठीक आहे, तुमची ताकद तेवढीच होती. बंद करण्याबाबत तर तुम्ही देखील सहमत होतात मात्र मोठ्या नोटा बंद करण्याची तुमची ताकद नव्हती . चार आण्याने गाडी चालवायची होती आणि जे लोक आज मला प्रश्न विचारत आहेत की मोदींनी १०००च्या नोटेची जादू केली आहे.
बंधू-भगिनींनो, जे लोक माझे भाषण ऐकतात , माझे म्हणणे ऐकतात , हि गोष्ट मी पहिल्यांदा बोललो नाहीये. पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक सभेत मी म्हटले होते की कॉग्रेस पक्षात दम नाही , चार आणे बंद करत आहेत. माझ्या हातात असेल तर मी १०००ची नोट बंद करेन. आज देखील त्याची ध्वनीफित कुठे दाखवत असतील , तुम्ही पाहू शकता.
बंधू-भगिनींनो, मी देशापासून काहीही लपवलेले नाही. मी पहिल्याच दिवशी , माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, जर मी खोटे बोलत असेन तर तुम्हाला माझ्यावर रागवण्याचा संपूर्ण अधिकार देतो. मी पहिल्याच दिवशी म्हटले होते की या कामासाठी मला ५० दिवस द्या , ३० डिसेंबर पर्यंतचा वेळ द्या. म्हटले होते की नव्हते म्हटले? मी पहिल्याच दिवशी म्हटले होते की ३०डिसेंबर पर्यंत थोडा त्रास होईल , म्हटले होते की नव्हते म्हटले? बंधू-भगिनींनो, मी देशाला विश्वासात घेऊन काम केले आहे. देशात प्रामाणिकपणा , कोट्यवधी लोक आहेत जे प्रामाणिकपणे जगत आहेत , प्रामाणिकपणामुळे सहन करत आहेत. तुम्ही मला सांगा की प्रामाणिक लोकांचे रक्षण करणे हे सरकारचे काम आहे की नाही? प्रामाणिक लोकांचे संरक्षण व्हायला हवे की नको ? जर अप्रामाणिक लोकांना शिक्षा देण्यासाठी ५० दिवस थोडासा त्रास झाला तरी तुम्ही माझी मदत कराल की नाही? दोन्ही हात वर करून सांगा , बंधू-भगिनींनो . टाळ्यांच्या कडकडाटाने सांगा , हा देश पाहत आहे, भारताचा प्रत्येक तरुण , प्रत्येक भारतीय. हे दृश्य पहा, ज्यांना संशय आहे . वातानुकूलित खोलीत बसून अप्रामाणिक लोकांची वकालत करणाऱ्यांनो , पहा ,जनता -जनार्दनाला काय हवे आहे.
बंधू-भगिनींनो, आपल्याला माहित आहे आपल्या देशात निवडणूक होते. मतदार यादी , ही तर काही गोपनीय गोष्ट नाही.नोटेवर प्रतिबंध आणणे माझ्यासाठी खूप गरजेचे होते की ते गोपनीय राहावे. जर ते उघड झाले असते तर या अप्रामाणिक लोकांची ताकद अशी आहे की कुठेही जाऊन आपले काम पूर्ण केले असते. देश आनंदी आहे. ८ तारखेला भारतातील गरीब शांतपणे झोपला होता आणि धनाढ्य झोपेच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते , मात्र कुणी देणारे नव्हते.
बंधू-भगिनींनो, निवडणुकीत मतदार यादी तयार केली जाते, काही गोपनीय नसते. सरकार कामाला लागते, शिक्षक लागतात, आशा कार्यकर्ते लागतात,संपूर्ण सरकारी यंत्रणा लागते. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते देखील कधी कधी लागतात. तरीदेखील , ज्या दिवशी मतदान असते , तक्रारी येतात की नाही येत . माझे नाव राहिले , माझ्या परिसराचे नाव राहिले ,माझ्या कुटुंबाचे नाव राहिले , माझ्या सोसायटीचे नाव राहिले , सांगा असा त्रास होतो की नाही होत? एवढे मोठे काम खुलेपणाने होते तरीही काहींना काही त्रुटी राहून जातात की नाही जात ? तुम्ही पहा, भारतात जेव्हा निवडणूक होते संपूर्ण देशाची , अंदाजे तीन महिने चालते. ९० दिवस सगळा कारभार ठप्प होऊन जातो. सगळे अधिकारी , प्रत्येकाला निवडणुकीचेच काम करावे लागते. कुठल्याही विभागात असला तरीही. बंधू-भगिनींनो, निवडणुकीत सरकारची इतकी ताकद लागते , राजकीय पक्षांची लागते, माध्यमांकडून मदत मिळते तरीही ६०-७० टक्के मतदान होते आणि ९० दिवस सुरु राहते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तर तुमच्याकडून केवळ ५० दिवस मागितले आहेत . माझ्या बांधवांनो देशासाठी मागितले आहेत.
बंधू-भगिनींनो, तुम्ही पाहिले असेल की यावेळी अर्थसंकल्पात आम्ही एक योजना आखली होती. जे लोक माझी ‘मन की बात ‘ ऐकतात , त्यात देखील मी म्हटले होते की भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई लढण्याचा एक उपाय आहे रोकडविरहित समाज , हे रोख रक्कम देण्याचे व्यवहार हळू-हळू कमी व्हायला हवेत. क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड , प्लास्टिक चलन , याचा वापर व्हायला हवा. यासाठी भारत सरकारतर्फे आपल्या अर्थसंकल्पात क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड यावर कर आकारला जायचा, तो आम्ही हटवला आणि सरकारी विभागांना सांगितले होते की तुम्ही देखील तो कमी करा किंवा रद्द करा. अनेक विभागांनी कमी देखील केला आणि काही विभागांनी रद्द देखील केला . हे यासाठी केले कारण मला आज हे करायचे होते. मी जेव्हा पंतप्रधान जन -धन खाती उघडली , गरीबांची खाती उघडली ,त्याबरोबर त्यांना एक क्रेडिट कार्ड दिले आहे, डेबिट कार्ड दिले आहे, रूपे कार्ड दिले. २० कोटी लोकांना दिले आहे जेणेकरून हळू-हळू गरीब व्यक्तीला देखील त्या कार्डाद्वारे आपला व्यवहार करण्याची हळू-हळू सवय लागेल. वेळ लागेल , मात्र हे काम दोन वर्षांपूर्वी केले आहे मित्रानो. मी अचानक नाही केलेले. हि गोष्ट खरी आहे की रोग एवढा मोठा आहे . ७० वर्षे जुना रोग आहे आणि प्रत्येकाला हा रोग जडलेला आहे. बंधू-भगिनींनो, मी औषधाची मात्रा वाढवत होतो , आधी एक डोस देत होतो , मग दुसरा डोस दिला , आता जरा मोठा डोस दिला आहे,आणि अप्रामाणिक लोक आणि त्यांचे संरक्षण करणारे लोक , यांनी देखील कान उघडे ठेवून ऐकावे की ३० डिसेंबर नंतर मोदी थांबणार नाहीये. जे लोक गंगेमध्ये चार आणे देखील टाकत नव्हते ते आज नोटा टाकत आहेत. मी एक दिवस पाहत होतो की कचरापेटी साफ करणारी एक महिला , म्हणतात की ५७ हजार रुपये तिला कचरापेटीत सापडले . ती बिचारी पोलीस ठाण्यात जमा करायला गेली की साहेब एवढे रुपये मिळाले आहेत .
बंधू-भगिनींनो, सफाई करणे गरजेचे आहे आणि यासाठी मला तुमची मदत हवी आहे. त्रास होईल, मी असे कधीही म्हटले नव्हते की त्रास होणार नाही. माझा पूर्ण प्रयत्न आहे. तुम्ही पहा, मी काल पाहत होतो की बँकांमध्ये बँकांच्या कर्मचाऱ्यांनी एका वर्षात जेवढे काम करतात ना त्याहून अधिक काम सध्याच्या दिवसांत केले आहे. आपण सर्वानी बँकांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजविल्या पाहिजेत. एवढे चांगले काम करत आहेत आज आपले बँकेचे लोक , त्यांचे अभिनंदन करूया.
मी पाहिले की ७५ वर्षांचे , ७० वर्षांचे , ६० वर्षांचे जे बँकेतून निवृत्त्त झाले आहेत असे लोक बँकांमध्ये गेले. ते म्हणाले की साहेब, अशा वेळी मोफत देखील आमची सेवा हवी असेल तर आम्ही काम करायला तयार आहोत , आमच्याकडे बँकेचा अनुभव आहे . देशात असे घडले आहे. मी असे तरुण पाहिले , रांगेत जे ज्येष्ठ नागरिक उभे होते , त्यांच्यासाठी आपल्या घरून खुर्च्या उचलून आणल्या , त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली . मी अशा माता-भगिनी पाहिल्या ,ज्या रांगेत उभ्या लोकांसाठी घरून प्यायला पाणी आणत होत्या. बंधू-भगिनींनो, चित्रपटगृहाबाहेर तिकीट घेण्यासाठी देखील कधी-कधी भांडणे होतात. एवढा मोठा भारत शांततेत रांगेत उभा आहे आणि आपला क्रमांक कधी लागतो याची वाट पाहत आहे. देश अप्रामाणिकपणाला कंटाळला आहे. .
बंधू-भगिनींनो, त्रास होत आहे, मला मान्य आहे माझ्या या निर्णयामुळे त्रास होत आहे , मात्र देशाला अधिक लाभ होणार आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की मी तुमच्याबरोबर उभा राहीन. मी प्रामाणिक लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही कुणा अप्रामाणिक माणसाला घाई-गडबडीत आपली ५०० किंवा १०००ची कमाईची नोट देऊ नका. ३० डिसेंबर पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. कुणी ४०० मध्ये घेणारा भेटेल, कुणी ८०० मध्ये १०००ची नोट घेणारा भेटेल. तुमचे ५०० रुपये म्हणजे चारशे नव्व्यानाव रुपये आणि १०० पैसे ,पूर्णपणे ५०० रुपयांचा तुमचा अधिकार आहे आणि सरकार तुम्हाला देण्यासाठी बांधील आहे . १०००ची तुमची इमानदारीची नोट तुमचा अधिकार आहे. ३० डिसेंबर पर्यंत हि प्रक्रिया सुरु राहणार आहे. प्रक्रिया समाधानकारक होणार आहे. असेही होऊ शकते ,काही गंगेत वाहून जातील,काही कचरापेटीत टाकले जातील , हार बनवले जातील. स्वतः कदाचित वाचतील , त्यांच्या नोटा जातील, २०० कोटी-४००कोटी जातील. मात्र दुसऱ्या कुठल्यातरी मार्गाने. बँकेत जमा करून प्रामाणिकपणाचे ढोंग केल्यास देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंतचा सर्व हिशेब बाहेर काढेन. २०० टक्के लावले जाण्यावर २०० टक्के दंड आकारीन . खूप लुटले आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो , लुटणाऱ्यांना तुम्ही पाहिलेच आहे. ७० वर्षे देश लुटला गेला आहे , मला ७० महिने द्या , मी देश स्वच्छ करून दाखवेन. मोदींनी काय केले . जरा ८ तारखेला रात्री ८ वाजता टीव्ही सुरु करून पहा की मोदींनी काय केले.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, माझे कर्नाटकचे बंधू-भगिनींनो, आणि यामध्ये बहुतांश गावातील लोक आहेत, माझी तुम्हाला विनंती आहे की मी जे पवित्र काम हाती घेतले आहे , देशात प्रामाणिकपणासाठी हाती घेतले आहे. जर तुमचा माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास असेल , जर तुमचा माझ्या कामावर विश्वास असेल , हि जी नोटांच्या स्वच्छतेची मोहीम मी हाती घेतली आहे , जर तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास असेल , मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. तुम्हाला माझी विनंती आहे की आपल्या जागेवर उभे राहून दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून मला आशीर्वाद द्या या प्रामाणिक आणि पवित्र कामाला , तुम्ही उभे राहून टाळ्या वाजवून आशीर्वाद द्या. वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून दिवसरात्र आपले केस उखडणाऱ्यानो , हे गावातील लोक आहेत, हे शिकले-सवरलेले लोक आहेत. हे इमानदारीसाठी कष्ट झेलणारे लोक आहेत . ते मला आशीर्वाद देत आहेत. हा तुमचा आशिर्वाद देश स्वच्छ करून दाखवेल. मी तुमचा खूप-खूप आभारी आहे. मी तुम्हाला खूप-खूप धन्यवाद देतो. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. साधारणपणे पत्रकार आपल्या खुर्चीवरून उठून उभे राहत नाहीत . मी आज पाहतोय की पत्रकार देखील उभे राहिले आहेत. मी आज शतशः वंदन करतो , या पत्रकारांना मी आज शतशः वंदन करतो. खूप मोठी गोष्ट केली आहेत तुम्ही. मी खूप आभार मानतो , खूप-खूप धन्यवाद.
B.Gokhale/S.Kane/Anagha
In the 21st century, the youth will take India to new heights. For this, we need skilled youth: PM @narendramodi at Belagavi
— PMO India (@PMOIndia) November 13, 2016
Research and innovation are vital for us: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 13, 2016
What was the news in 2012, 2013 and first half of 2014- the scams, the corruption...did you see their condition after 8th November: PM
— PMO India (@PMOIndia) November 13, 2016
This Government will never trouble innocent citizens & at the same time the Government wants to ensure those who are guilty are punished: PM
— PMO India (@PMOIndia) November 13, 2016
Delighted to join the centenary celebrations of Karnatak Lingayat Education Society in Belagavi. Had a very good interaction with students. pic.twitter.com/lgX3XWPn0j
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2016
Spoke about the importance of education, research, innovation & highlighted NDA’s efforts to eliminate corruption. https://t.co/oO5yYeXm1z
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2016
यह सरकार ईमानदार इंसान को परेशान करना नहीं चाहती, लेकिन बेईमानों को छोड़ना नहीं है। pic.twitter.com/rZJZmv2WPE
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2016
I asked the people to bless me & what they did overwhelmed me beyond words. This is a fight for the poor, against those who are corrupt. pic.twitter.com/bvVhYC8BNN
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2016