Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी घेतली इराणच्या राष्ट्राध्यक्षांची  भेट

ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी घेतली इराणच्या राष्ट्राध्यक्षांची  भेट


 

ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत इस्लामिक प्रजासत्ताक इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली. दोन आठवड्यांपेक्षाही कमी  कालावधीत झालेली उभय नेत्यांची  ही दुसरी भेट आहे. बिश्केक इथे 31 ऑगस्ट रोजी झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान त्यांची भेट झाली होती.

उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. आव्हानात्मक परिस्थिती असूनही ब्रिक्स  संबंधित बैठकांमध्ये नियमितपणे उच्च स्तरीय सहभाग घेत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. ‘ग्लोबल साऊथ’ मधील देशांमध्ये अनुकूलन, नवोन्मेष , सहकार्य आणि शाश्वतता यांची भावना रुजवण्याच्या   दृष्टीने ब्रिक्समध्ये असलेल्या क्षमतेचा त्यांनी उल्लेख केला. तसेच, ब्रिक्स बिझनेस फोरमच्या ‘लीडर्स सेशन’ अर्थात नेत्यांच्या सत्रात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे आभार मानले.

पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली. सर्व समस्या संवाद अर्थात चर्चा  आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच  सोडवल्या गेल्या पाहिजेत या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. तसेच, या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करणे, तसेच जहाजवाहतूक आणि  व्यापाराचे स्वातंत्र्य अबाधित राखणे, त्याचप्रमाणे  खलाशांची सुरक्षा आणि  कल्याण जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

ब्रिक्ससह बहुपक्षीय संघटनांमध्ये  परस्पर हिताच्या मुद्द्यांवर उभयपक्षी होत असलेल्या निरंतर सहकार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

***

सुवर्णा बेडेकर/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]