Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण, 19 डिसेंबर 2019

भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण, 19 डिसेंबर 2019

भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण, 19 डिसेंबर 2019

भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण, 19 डिसेंबर 2019


इथे उपस्थित चित्रपट जगताशी निगडीत मान्यवर. या भव्य स्वागतासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.

आज मला चित्रपट जगतातील मान्यवरांमध्ये येवून, सर्जनशील जगताशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे; माझ्या आयुष्यातील कदाचित ही पहिलीच संधी आहे, कधी कधी कोणाशीतरी उभ्या उभ्या नमस्कार होतो, परंतु भेटण्याची संधी कधी मला मिळाली नव्हती. गुजरात मध्ये दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून काम केले, परंतु तेव्हा देखील संधी मिळाली नाही. परंतु आज ती संधी मिळाली आहे.

तुमच्या दिग्दर्शनामध्ये, मार्गदर्शनाखाली, तुमच्या प्रतिभेमुळे भारतील चित्रपट निरंतर नवीन उंची गाठत आहे. आणि माझी इच्छा आहे की, हे पुढे देखील असचं सुरु राहू दे, विशेषतः या वर्षी सुरु राहू दे. भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

गेल्या दोन दशकांपासून या संग्रहालया संदर्भात कोणत्यातरी स्वरुपात चर्चा सुरु आहे. आज संग्रहालयाच्या लोकार्पणामुळे आपल्या चित्रपटांचा सोनेरी भूतकाळ एकाच ठिकाणी संग्रहित करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आणि माझा हा अनुभव आहे की, अशीच कितीतरी चांगली कामे माझ्या आधीच्या लोकांनी माझ्यासाठी पूर्ण करण्यासाठी ठेवली आहेत आणि अशा संधी मला मिळत आहेत.

आज जेव्हा तुम्ही सर्व नवीन भारताच्या नवीन चित्रपटाची रचना करण्यात गुंतलेले आहात, तेव्हा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे कारण आज इथे सर्व पिढ्यांचे लोक आहेत – अगदी जुन्या पिढीचे  आणि नवीन पिढीचे लोकही आहेत; आणि म्हणूनच माझ्या मनात एक प्रश्न आहे.

उत्साह कसा आहे – उत्साह कसा आहे (हाऊ इज द जोश)

उत्साह कसा आहे – उत्साह कसा आहे

 आजकाल तुमच्या या उत्साहाची देशामध्ये भरपूर चर्चा आहे. नव भारताच्या निर्मितीमध्ये तुमचा हा उत्साह अतिशय महत्वाचा आहे.

मित्रांनो, चित्रपटांचे जग बहुरंगी असते आणि त्याचे अनेक पैलू असतात. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय याच पैलूंचे दर्शन देशवासीयांन किंवा या विषयाची आवड असलेल्यांसाठी एक संधी म्हणून काम करेल. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात मनोरंजन उद्योगाच्या गौरवशाली इतिहासाची सविस्तर माहिती मिळेल, चित्रपटातील प्रसिद्ध व्यक्तींची माहिती मिळेल आणि त्यांच्या संघर्षाचे किस्से सामान्य लोकांना कळतील.

मला वाटते की, आपल्या तरुण पिढीला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात बरेच काही पाहण्याची, शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. काही वेळापूर्वी मी देखील या संग्रहालयाची व्यवस्था पाहिली आहे. पहिल्या दोन मजल्यांवर जायचे होते, पण नंतर इच्छा झाली तर तिसऱ्या मजल्यावर गेलो. मनात सारखं येत होत की, तुम्ही बसले असणार, वाट पाहत असणार; परंतु मनात इच्छा झाली तर शेवटपर्यंत गेलो आणि यामुळे इथे यायला उशीर झाला, तुम्हाला वाट पहावी लागली, यासाठी मी तुमची क्षमा मागतो.

हे संग्रहालय आपल्या चित्रपटांसारखेच समृद्ध आहेत. यामध्ये गौरवशाली इतिहास देखील आहे आणि भविष्याची ऊर्जा देखील आहे. यात प्राचीनतेचा मान देखील आहे, यात आधुनिकतेचा सन्मानही आहे. येथे गुलशन महलचा भाग आपल्या इतिहासाचा साक्षीदार आहे तर दुसरी अत्याधुनिक इमारत आपल्या दूरदर्शीपणाचे प्रतिक आहे. गुलशन महाल इमारतीत चित्रपटांच्या सुरूवातीची गौरव गाथा आहे आणि मला सांगण्यात आले आहे की संग्रहालयाच्या याच भागात 30 तासाचे फुटेज आहे ज्यामध्ये दुसऱ्या विश्व युद्धातील आपल्या सैन्याचे शौर्य दाखवण्यात आले आहे.

मी चित्रपट विभागाचे अभिनंदन करू इच्छितो की, त्यांनी हे फुटेज लष्कराकडून घेऊन त्याचे डिजिटलीकरण केले. आणि या डिजिटलीकरणानंतर, द्वितीय विश्वयुद्धातील आपल्या देशाच्या 20 लाख सैनिक आणि अधिकाऱ्यांचे शौर्य आता आपल्या पुढच्या पिढीला समजेल, ते प्रेरणा घेतील. खूप कमी लोकांना माहित आहे – आपला ना त्या भूमीशी काही संबंध होता, ना कोणत्या झेंड्याखाली मरायचे होते, ना आपल्या देशासाठी प्राण देत होते, परंतु माझ्या देशातील दीड लाख जवान पहिल्या आणि दुसऱ्या विश्व युद्धात शहीद झाले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विसर पडला आहे.

देश त्या गोष्टींना पुन्हा एकदा कदाचित या ठिकाणावरून नवीन स्वरुपात त्याच्या वास्तविकतेला समजू शकेल, नवीन पिढीला प्रेरणा मिळेल आणि जगाला – मी जेव्हा जगातील लोकांशी संवाद साधतो तेव्हा सांगतो की, तुम्ही मला शांती शिकवू नका. जागतिक शांतीसाठी आमचे दीड लाख सैनिक शहीद झाले आहेत, आम्ही ती माणस आहोत. हा आमचा इतिहास, आमची गाथा आहे, आगामी पिढीला प्रेरणा देते.

आणि मित्रांनो प्रत्यक्षात चित्रपट आणि समाज, दोन्ही एकमेकांचे प्रतिबिंब आहेत. समाजात काय घडत आहे ते चित्रपटांमध्ये पहायला मिळते, आणि जे चित्रपटांमध्ये होत आहे, ते समाजात देखील तुम्हाला दिसून येईल. बऱ्याचवेळा तुम्ही हे पहिले असेल की, समाजात होणारे बदल लोक ओळखत आहेत. त्याआधी त्याची झलक चित्रपटांमध्ये पहायला मिळते आणि मला असे वाटते की ही खूप मोठी गोष्ट आहे. ‘कला जगत’ येणाऱ्या भविष्याला चांगल्या प्रकारे समजतो. आपल्या सर्वांना आठवतच असेल की, स्वातंत्र्यानंतर 60 – 70 च दशक हे मनोज कुमार यांच्या देशभक्तीपर चित्रपटांचा कालावधी होता. यामागे दीर्घकालीन स्वातंत्र्य लढ्याची मुख्य भूमिका नक्कीच असेल.

त्याचप्रमाणे  70 – 80 च्या दशकात अँग्री यंग मॅनचा प्रवेश होतो. पण जेव्हा समाजात खूप सुधारणा झाली, राग कमी झाला तेव्हा आशा आणि आकांक्षा वाढू लागल्या. चित्रपटांमध्ये देखील हे दिसू लागले. समाजातील बदलांसोबत प्रत्येक टप्प्यावर चित्रपट देखील बदलत राहिले. आज आपण एक नवीन कल पाहत आहोत.

एक काळ होता जेव्हा मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये नायक नेहमीच मोठ्या शहरातील, मुंबई, दिल्ली इथला, एकदम राजबिंडा असायचा. परंतु गेल्या काही वर्षांपासून यात बदल घडून येत आहे. द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी शहरातून, वस्त्यांमधून आणि सामान्य कुटुंबातून असे प्रतिभावान तरून येत आहेत जे संपूर्ण चित्रपट उद्योगाला एक नवीन उभारी देत आहेत – आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या कौशल्याच्या माध्यमातून. आणि असेही मी हे जे सांगत आहे द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी शहर, छोट्या छोट्या जागा – यादेखील बदलणाऱ्या भारताचेच एक रूप आहे; जे आपण पहिले आहे आणि आपण अनुभवले आहे.

आज क्रीडा असो, स्टार्टअप असो, एवढेच काय तर दहावी, बारावीचे निकाल असूदे तुम्ही पाहिलंच असेल मोठ्या शहरातील, मोठ्या नावजलेल्या शाळेतील मुलं नसतात; तर छोट्या छोट्या ठिकाणची असतात. म्हणजेच देशातील ती ऊर्जा बाहेर येत आहे. भारताच्या गरीबीबद्दल आपण अनेक चित्रपट पाहिले आहेत, भारताच्या असहायतेवर देखील चित्रपट पाहिले आहेत. आणि माझा असा विश्वास आहे की, हे एका बदलणाऱ्या समाजाचे लक्षण आहे. चित्रपटांमध्ये आता समस्यांसोबातच उपाय बघायला मिळत आहेत; नाहीतर आपला स्वभाव असा आहे ज्यांनी गरिबीला देखील सद्गुण समजला आहे. फाटलेले कपडे असु दे, कारण आपण जेव्हा सत्यनारायणाची गोष्ट ऐकतो तेव्हा सुरवातीलाच, एक बिचारा गावातील गरीब ब्राम्हण, इथूनच सुरवात होते. याचाच अर्थ गरिबीला सद्गुण समजण्याची आपली मनोवृत्ती झाली आहे.

परंतु आता बदलणारा भारत वेगळ्या प्रकारे विचार करत आहे, वेगळ्या प्रकारे बघत आहे, दाखवत पण आहे. आणि हे स्पष्ट आहे – आजच्या काळात समाजा सोबतच चित्रपटांमध्ये देखील हा बदल दिसून येतो. समस्या तर आहेतच आता त्यांच्यावरील उपाय देखील आहेत. अडचणी आहेत त्या दूर करण्याची उत्कटता देखील आहे. भारत बदलत आहे, भारत आपले निराकरण स्वतः शोधत आहे.

जर लाखो समस्या आहेत तर कोट्यावधी उपाय देखील आहेत. आपण बदलू शकतो, हा आत्मविश्वास दिसत आहे. आणि हाच तो आत्मविश्वास आहे ज्यामुळे समाजाला हेलावून सोडणाऱ्या विषयांवर बोलायला आता कोणाला काही संकोच वाटत नाही. आम्ही अडचणींना घाबरत नाही, किंवा त्या लपवत नाही. त्याऐवजी त्या समोर आणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि नव भारताचा हाच तो विश्वास आहे जो एका भारतीयाला गर्व प्रदान करतो.

मित्रांनो, तुम्ही अजून एक कल नक्कीच पहिला असेल. पहिला जेव्हा चित्रपट बनायचे तेव्हा 8 वर्ष, 10 वर्ष, 10 – 10, 15 – 15 वर्ष लागायची. आणि प्रसिद्ध चित्रपटांची ओळख तर त्यांच्या निर्मितीला किती वर्ष लागली यावर व्हायची. म्हणजेच ती त्याची कसोटी मानली जायची की, 8 वर्ष लागली निर्मितीला. 9 वर्ष लागली, 12 वर्ष लागली आणि त्याची चर्चा व्हायची. आता काही महिन्यातच चित्रपट निर्माण होतात.

 आता तुम्ही विचार करा की, याआधी योजनांसोबत देखील असेच तर व्हायचे ना. 30 वर्ष, 40 वर्ष; संग्रहालयाला देखील 20 वर्ष झाली. आणि आता नियोजित वेळेत सरकारी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. आणि तुम्ही हे सर्व बघत आहात. जर मी म्हणालो की देशाच्या तरुण आकांक्षा शोधून तुम्ही आधीच स्वत: ला विकसित केले आहे, तर माझा मुद्दा कदाचित चुकीचा नाही. तुम्ही दोन पावले पुढे आहात, तुमची हीच ताकत राष्ट्र निर्मितीमध्ये खूप मोठे काम करत आहे.

मित्रांनो, आपल्या मनोरंजन उद्योगाच्या संदर्भात बोलायचे तर, मानवी भावना, संवेदना, क्रिया-प्रतिक्रिया, विनोद, शोकांतिकेचा तो प्रत्येक पैलू दिसतो जो आपल्याला जगाशी जोडतो. अखेर देश कोणताही असो, मानवी भावना तर त्याच असतात आणि भारतीय मनोरंजन उद्योगाने ही गोष्ट अनुभवली आहे.

एकदा मी परदेशात जात होतो, विमानात आमचे एक सहकारी प्रवासी बसले होते. त्यांनी मला खूप विचित्र प्रश्न विचरला. म्हणाले- मी भारतात येत असतो, मी भारतीय चित्रपट देखील बघतो. म्हणाले- तुमच्या इथले कलाकार पायावर पडून का रडत असतात. देवळात जाऊन का रडत असतात, ओरडत का असतात? म्हणजे भारतात ही अशी कोणती परंपरा आहे ज्यामुळे माणसाला तातडीने आराम मिळतो त्याच्यासाठी हा एक अजूबा होता. परंतु आपल्या चित्रपटांनी त्या प्राविण्याच्या माध्यमातून सामान्य मानवाच्या भावना अगदी सहजपणे व्यक्त केल्या आहेत. आणि माझा विश्वास आहे की ही छोटी गोष्ट नाही. जेव्हा कला, कलाकार आणि साहित्यकारांची नाळ जमिनीशी जोडलेली असते, तेव्हाच तिथून बीज अंकुरित होते, तेव्हा हे होते.

गोष्ट मग मजा निर्माण करण्याची असो किंवा चाहते बनवण्याची, आम्ही इथे देखील आपली छाप सोडतोच. या यशासाठी मी खरोखरच चित्रपट उद्योगाला शुभेच्छा देतो. आणि आज मी बघत आहे की जर आमचा तरुण बॅटमॅनचा चाहता असेल तर सोबत बाहुबलीचा देखील चाहता आहे. आमच्या चित्रपटातील पात्रांची आता जागतिक स्तरावर देखील दखल घेतली जात आहे.

मित्रांनो, भारताची सॉफ्ट पॉवरची शक्ती, मला असे वाटते की, त्यात आपल्या चित्रपटांची खूप मोठी भूमिका आहे. हे चित्रपटच आहेत जे संपूर्ण जगात भारतीयतेचे प्रतिनिधित्व करतात. भारतीय चित्रपट भारतीयतेचा आरसा आहे. ते जगाला आकर्षित करीत आहे. आमचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घालतातच सोबतच संपूर्ण जगात भारताबाबतची विश्वासार्हता वाढलेली आढळते.

आपल्या सर्वाना माहित आहे की, राज कपूर साहेबांच्या चित्रपटांचे चाहते केवळ देशातच नाही तर अगदी परदेशात देखील होते. आणि जेव्हा मी परदेशात जातो, लोकांना भेटतो तेव्हा मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. मी काही देशांचे राष्ट्रपती पाहिले आहेत जे हिंदी चित्रपटांची गाणी उत्तम गातात.

मी आता इज्रायलला गेलो होतो तेव्हा रात्री भोजनासाठी इज्रायलाच्या पंतप्रधानांच्या घरी गेलो होतो, आम्ही दोघेच होतो. आमची मैत्री उत्तम आहे, दिखाऊपणा कामीच असतो. अशाच गप्पा सुरु होत्या. आम्ही इतका प्रवास करून गेलो होतो, परंतु रात्री दोन अडीच पर्यंत आम्ही बसलो होतो, गप्पा सुरु होत्या, खूप गप्पा मारल्या. तेव्हा त्यांनी मला इचक दाना- बिचक दाना हे पूर्ण गाणं ऐकवलं. इज्रायलाच्या पंतप्रधानांना आपली भाषा माहित नाही,  या गाण्याचा अर्थ काय आहे, हे त्यांना माहित नाही; मला देखील इचक दाना चा अर्थ माहित नाही, आणि हीच तर चित्रपट उद्योगाची ताकद आहे.

मला चांगल लक्षात आहे काही दिवसांपूर्वी जेव्हा मी दक्षिण कोरियाला गेलो होतो, तेव्हा तिथल्या राष्ट्रपतींनी भोजनासाठी बोलावले होते. आणि त्यावेळी मुलांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या शाळेतल्या मुलांनी हाथी मेरे साथी हे गाणं साभिनय म्हंटल. नंतर जेव्हा मी त्या मुलांना भेटलो तेव्हा त्यांना विचारले तुम्हाला माहित आहे का तुम्ही आता काय गात होतात? काही मुलांना हत्तीचा अर्थ माहित होता, बाकीच्यांना माहित नव्हतं. मी म्हणालो, तुम्ही इतकं छान गाणं गायलं, इतक्या कमी वेळात इतकी मेहनत करून हे सर्व कसं केलं?

हा प्रभाव आहे आपल्या चित्रपट उद्योगाचा. मग माझी पण इच्छा झाली तेव्हा मी मायदेशी आल्यावर त्या गाण्याला कोरियन भाषेत डब करून घेतले आणि ते त्या शाळेतल्या मुलांसाठी पाठवून दिले. बघा, ही ताकद आहे तुमची, आणि ह्याचप्रकारे चित्रपटांसोबत सध्या आपल्या टिव्ही मालिकांनी देखील आपली स्वतःची एक विशेष ओळख तयार केली आहे. सास भी कभी बहु थी – आपल्याला वाटत ही मालिका फक्त भारतातच चालत असेल, तर असं मुळीच नाही. मी जगातल्या ज्या देशांमध्ये गेलो आहे आणि विशेषतः मी अफगाणिस्तानात पाहिले- तिथे क्वचितच एखाद कुटुंब असेल जे ही मालिका बघत नसतील.

याचाच अर्थ आपल्या आजूबाजूच्या देशातील लोकांना भारतातील सामान्य जीवन बघण्याची रुची दिसून येते आणि त्यावर ते चर्चा करतात, अगदी मनसोक्तपणे करतात. मी एकदा व्हिएतनामच्या पंतप्रधानांसोबत बसलो होतो तेव्हा मी त्यांना विचारले, तुम्ही एकटे का आलात?तुमच्या कुटुंबाला पण घेऊन यायचे होते. आता ते पूर्णतः कम्युनिस्ट आहे- देश कम्युनिस्ट, नेता देखील कम्युनिस्ट. आणि तुम्हाला माहीतच आहे कम्युनिस्ट कसे असतात, इथे काही लोकं असतील देखील. त्यावेळी त्यांनी जे सांगितले….काही लोकांना ते ऐकून आश्चर्य वाटेल.

मी म्हणालो तुम्ही तुमच्या सौभाग्यवतींना सोबत आणायला हवे होते. 26 जानेवारीला मी सगळ्या देशाच्या लोकांना बोलावले होते, तेव्हा त्यांच्या सोबत बोलणे झाले होते. तेव्हा त्यांनी सांगितले, माझ्या घरी एक समस्या आहे. मी विचारले काय? त्यांचे वय देखील जास्त आहे. तेव्हा ते म्हणाले – रामायण मालिका आमच्या भाषेत डब झाली आहे, माझी पत्नी तासंतास रामायण मालिका बघत असते, उठतच नाही. आणि त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत यायला नकार दिला. तुम्ही विचार करू शकता काय प्रभाव आहे आपल्या लोकांचा. जर आपण आपली ही ताकद ओळखली नाही तर मला असे वाटते की याचा दोष आपण दुसऱ्या कोणाला नाही देऊ शकत.

मित्रांनो, चित्रपटांची एक मूक ताकद ही पण आहे की, ते लोकांना काहीही न सांगता, आम्ही तुम्हाला काही शिकवत आहोत ह्याची जाणीव न करून देता; एक नवीन विचार रुजवण्यात ते आपसूकच एका मध्यस्थाची भूमिका बजावतात. असे अनेक चित्रपट असतात जे बघितल्यावर लोकं आपल्या विचार प्रक्रियेसाठी काही नवीन बीज, काही नवीन कल्पना घेऊन बाहेर पडतात.

तुम्ही बघा, सध्या शौचालयाचा विषय असुदे, महिला सबलीकरणाचा विषय असुदे, क्रीडा असुदे, मुलांच्या समस्येशी निगडीत काही बाबी असुदे, गंभीर आजारां विषयी जागरूकतेचा विषय असुदे, नाहीतर मग आपल्या सैनिकांचे शौर्य – आज एकाहून एक उत्तम चित्रपट तुम्हा सर्वांच्या माध्यमातून देशापर्यंत पोहोचत आहेत. एक विचार पोहोचत आहे, एक आंदोलन पोहोचत आहे.

या चित्रपटांच्या यशाने सिद्ध केले आहे की एका चांगल्या दृष्टीकोनासोबत सामाजिक विषयांवर जर चित्रपट बनवले तर बॉक्स ऑफिसवर ते देखील यशस्वी होऊ शकतात. आणि राष्ट्र निर्मितीमध्ये तुम्ही देखील योगदान देऊ शकता.

मित्रांनो, तुमच्या चित्रपट आणि चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत, ज्याप्रकारे देशाची विविधता, देशाच्या विविधतेचा  आदर केला जातो, यामुळे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना मजबूत होते. आणि मला असे वाटते की, चित्रपट जगतातील लोकांना याच सर्व गोष्टी घेऊन जनजागृती करण्याचे प्रयत्न केले पाहिजे.

आमच्या हिंदी चित्रपटांमध्ये नेपाळी भाषा आणि नेपाळी कलाकारांचा प्रत्येकाने फायदा घेतला आहे, परंतु भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची खासियत आहे. एखाद्या चित्रपटात एखादा कलाकार दोन-चार वाक्य जर दुसऱ्या भाषेतील बोलला तर देशाच्या एकतेचा संदेश सर्वदूर पसरतो, आपुलकी वाटते. जर कोणी नागालँडची व्यक्ती दाखवली आणि ती नागा भाषेत बोलली, ज्या देशात शेकडो भाषा आहेत, सतराशे संवाद आहेत; तर तुम्ही समजू शकता आपण किती समृद्ध आहोत ते.

आपण हे सर्व कसे एकत्र आणू शकतो, एकतेची ताकद कशा प्रकारे दाखवू शकतो. एका कलाकाराने जर एखाद्या राज्याची एखादी म्हण बोलली तर दुसऱ्याने लगेचच त्या म्हणीला आपल्या भाषेत बोलले तर आपसूकच देशाची एकता प्रकट होईल. ही ताकद, ही संवादाची ताकद आहे.

आताच राज्यवर्धनजी सांगत होते, देशात अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना चित्रपटांमुळे ओळख मिळाली आहे आणि आपण देखील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजही तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गेलात, तर लोकं आपल्याला सांगतील, इथे हा चित्रपट बनला होता, इथे ह्या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्याला माहित देखील नसेल, त्यावेळी त्याचा जन्म देखील झाला नसेल, परंतु तो सांगेल की, इथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते आणि देवानंद साहेब इथे आले होते, अमुक एक कलाकार इथे आला होता.

भारताच्या वेगवेगळ्या चित्रांना इतक्या सुंदर पद्धतीने देशातील लोकांच्या समोर ठेवून, आणि मला विश्वास आहे की, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यामध्ये आपला हा चित्रपट उद्योग खूप मोठी भूमिका बजावू शकतो, बजावत आहे.  आणि सध्या भारतातील पर्यटनाचा विकास खूप चांगल्याप्रकारे होत आहे पण असे असले तरीदेखील जगाला ताजमहालपेक्षा अधिक काही माहित नाही, आणि आपला जो एकंदर स्वभाव आहे,आपला देश बेरोजगार आहे. आपला जो हा स्वभाव झाला आहे त्याचेच हे प्रतिबिंब आहे.

आपल्याकडे देखील जगाला दाखवण्यासाठी खूप काही आहे. स्वाभिमानाने डोळ्यात डोळे घालून बोलण्याचे जे धैर्य हवे, ते आणण्यासाठी तुम्ही खूप मोठी भूमिका बजावू शकता. आणि माझा हा विश्वास आहे की, पर्यटनाला प्रोत्साहन दिले तर, पर्यटन हे असे एक क्षेत्र आहे जिथे गरीबातील गरिबाला रोजगार मिळतो, चहा विक्रेता देखील पैसे कमावतो.

आणि मला माहित आहे की, भारतातील वेगवेगळ्या भागात, ही बाब खरी आहे याच्याविषयी राजवर्धनजींनी देखील उल्लेख केला आहे आणि मागील काही दिवसांत मला देखील काही लोकं भेटली होती, त्यांनी देखील काही गोष्टी सांगितल्या होत्या की, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो तेव्हा आम्हाला परवानगी घेण्यासाठी त्रास होतो, खूप फेऱ्या माराव्या लागतात, आमचे वेळापत्रक बारगळते. आम्ही सर्व तयार केले आणि महानगरपालिका आयुक्तांची परवानगी जर मिळाली, आपले सगळे….., एक समस्या आहे. माझ्या समोर विषय आला,  तुमच्या या जगताविषयी मला फार माहिती नाही, परंतु जेव्हा मला सांगितले तेव्हा माझ्या देखील हे सगळे लक्षात आले. मी माझ्या अधिकाऱ्यांना याविषयी काय करता येईल याची विचारणा केली. मी त्यांना विचारले, आणि सांगितले की, याचे काहीतरी समाधान मिळाले पाहिजे.

आज जेव्हा मी तुमच्यामध्ये आलो आहे तेव्हा मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, देशात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानगी मिळण्यासाठी एक खिडकी व्यवस्थेवर काम सुरु झाले आहे आणि त्यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात येत आहे, ज्यात तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे, त्यानंतर एनएफडीसी चे संबधित अधिकारी या कामासाठी नियुक्त केले जातील, ते निश्चित वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला परवानगी देतील; म्हणजे सरकार स्वतः याचा विचार करत आहे. आणि मला असे वाटते की, सरकारच्या या प्रयत्नांमुळे माझ्या समोर आलेली तुमची खूप मोठी समस्या, जी काही तरुणांनी माझ्या समोर मांडली होती त्याचे काही ना काही तरी समाधान निघेल.

मला असे वाटते की, भविष्यात चित्रीकरणाच्या परवानगीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या पन्नास लोकांना रामराम करावा लागणार नाही आणि कधीकधी तर ते सांगत असतील तुमचा जो नायक आहे त्याची भेट घडवून, त्याच्या सोबत एक फोटो काढून द्या, तेव्हा आम्ही परवानगी देऊ, असे देखील घडत असेल. तुम्ही सांगत नसाल, परंतु हे सगळे अनुभव तुम्हाला येत असतील. आणि तुम्हाला वाटत असेल की, हा स्वस्त मार्ग आहे, चला घेऊन जाऊया त्याला. म्हणजेच व्यापार सुलभिकारणासोबतच चित्रीकरण सुलभिकारणाची सुविधा तुम्हाला मिळावी यासाठी सरकार जागृत आहे आणि मी यासाठी सगळे प्रयत्न करेन, तुम्ही विश्वास ठेवा.

मित्रांनो, भारतीय चित्रपटाच्या सशक्तीकरणासाठी, देशामध्ये सकारात्मकतेसाठी, देशात एक व्यापक चर्चा तयार करण्यासाठी सरकार सर्व शक्तीनिशी तुमच्यासोबत आहे. काही काळापूर्वी माझ्या काही सहकाऱ्यांनी जीएसटी बद्दल चिंता राजभवनातच मला जेव्हा भेटले होते, तेव्हा त्यांनी चिंता व्यक्त केली होती की, साहेब आम्ही इतके परिश्रम करत आहोत परंतु कोणी बघायलाच आले नाहीतर काय करायचे? आणि कलाकार जेव्ह एखादे काम करतो, तेव्हा बॉक्स ऑफिस बघणारा एक वर्ग असतो, ज्याने पैसे लावले आहेत, परंतु उर्वरित जे सर्जनशील स्वभावाचे आहेत त्यांच्यासाठी तर लोकांच्या मनात काय सुरु आहे, हेच विचार त्यांच्या डोक्यात सुरु राहतात. किती लोकांनी पाहिले, त्यांना कसे वाटले कारण जो सर्जनशील वर्ग आहे त्यांना पैशांशी काही घेणे देणे नसते.

जेव्हा ही बाब माझ्यासमोर आली तेव्हा मी जी एस टी परिषदेला सांगितले, त्यांना सांगितले की, बघा हा असा विषय माझ्या समोर आला आहे. कारण हे माझ्या हातात नाही ते तर जीएसटी परिषदेच्या हातात आहे, परंतु देशात असा समज आहे की, सर्व काही मी करत आहे. परंतु माझी तयारी आहे असं कोणीतरी पाहिजेच ना, डब्ब्यात सर्वकाही टाकले जावे, नाहीतर साफसफाई कशी होणार. आणि मला आनंद आहे की जी एस टी परिषदेने ही समस्या दूर केली आणि 100 रुपयांच्या वरील तिकीटांवरील 28 टक्के जी एस टी कमी करून 18 टक्के केली आहे.

मित्रांनो, एक विषय माझ्या समोर आला आहे आणि तो आहे पायरसीचा. मी समजू शकतो की, पायरसी बाबतची तुम्हा सर्वांची काळजी स्वाभाविक आहे.पायरसी तुमचे परिश्रम आणि तुमच्या सामर्थ्याचा अपमान आहे आणि याला आळा घालण्यासाठी सरकार चलचित्र अधिनियम 1952 मध्ये बदल करण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलली जात आहेत. आम्ही ज्या सुधारणा करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत, त्या सुधारणानंतर कॅम कार्डीगला केवळ दंडनीय अपराध न मानता त्याच्यासाठी कठोर शिक्षा देखील केली जाईल.

मित्रांनो, गेल्या साडेचार वर्षांत, आमच्या सरकारने 1400 पेक्षा जास्त जुने कायदे रद्द केले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा मी 2013 -14 मध्ये निवडणूक प्रचार करत होतो, जेव्हा माझ्या पक्षाने पंतप्रधान पदासाठी माझ्या नावाची घोषणा केली होती – सर्वसाधारणपणे सरकारची ओळख काय असते, प्रत्येक सरकार आम्ही हे कायदे तयार केले आहेत, ते कायदे केले आहेत, अशा प्रकरचे मुद्दे घेऊन लोकांसमोर येते; काय झाले, ती नंतरची गोष्ट आहे. ते तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, परंतु आम्ही ते तयार केले. तेव्हा मी सांगितले होते की सरकार तयार करणारी सरकारे पाहिली आहेत, मला अशा सरकारची नेमणूक करायची आहे जी कायदे रद्द करेल आणि मी म्हणालो होतो की मी दररोज एक कायदा रद्द करणार आहे; मी असे बोललो होतो. आणि कदचित तुमच्या पर्यंत या गोष्टी पोहोचल्या नसतील कारण देशात अशा खूप गोष्टी आहेत ज्याचे महत्व कोणाला वाटत नाही. आतापर्यंत 1400 कायदे रद्द केले आहेत. चार-साडेचार वर्षांच्या कार्यकाळात 1400 कायदे रद्द केले आहेत जेणेकरून प्रक्रिया सुलभ होतील. सरकारसोबत नागरिकांना दररोजच्या समस्येचा सामना करावा लागतो, मला हे कळतच नाही आणि पटत देखील नाही.

आज मी जेव्हा तुमच्याकडे आलो आहे तेव्हा मला  तुमच्याकडून काही मदत हवी आहे आणि माझा विश्वास आहे की आपणास या संपूर्ण क्षेत्राबद्दल चिंता आहे- आता, तंत्रज्ञान बदलले आहे, आज आपण मोबाइल फोनवर जगातील कोणताही रेडिओ ऐकू शकतो, परंतु रेडिओसाठी परवाना घेणे आवश्यक आहे हा सरकारी नियम आहे.

ठीक आहे मी हा विषय सोडून देतो, पण मला असे म्हणायचे आहे की आज तंत्रज्ञान खूपच बदलले आहे आणि कायदे मात्र 1952 चे आहेत. चित्रपट उद्योगातील लोकांनी याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे की हे कोणते कायदे आहेत जे आजच्या काळात अत्यंत अप्रासंगिक आहेत, निरुपयोगी आहेत, यांचा कोणताही उपयोग नाही. जर तुम्ही तुमच्या तज्ञांशी बोलून, एक-एक शब्द नीट वाचून जर मला तपशीलवार नोंदी करून दिल्यात तर तुमच्या कामात अडथळे निर्माण करणारे आणि बदलणाऱ्या युगाशी अनुकूल नसणारे आणखी काही कायदे मी रद्द करेन.

तेव्हा माझी अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी कोणीतरी यासाठी पुढाकार घ्यावा. आणि मला तुम्हाला सरकारच्या अजून एका निर्णयाविषयी सांगायचे आहे. अॅनिमेशन, आता, राजवर्धन जी याविषयी थोडफार बोलले होते, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्टमध्ये, संपूर्ण जग आपल्या युवकांच्या प्रतिभेचा सन्मान करत आहे.

पहा, जगामध्ये मेक इन इंडियाला एक महत्त्व आहे, तसेच डिझाइन इन इंडियाला देखील महत्त्व आहे. आपल्याकडे जी सर्जनशील प्रतिभा आहे ती जगाला भरपूर काही देऊ शकते. त्याच्या सशक्तीकरणासाठी सरकार नॅशनल सेंटर फॉर एक्सीलेंस फॉर अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग एन्ड कॉमिक्स स्थापन करण्याच्या दिशेने काम करत आहे. आणि माझी पुन्हा इच्छा आहे की, चित्रपट उद्योगाने एकत्र येवून भविष्यात आणि हा विचार मी नेटाने तुमच्यासमोर मांडू इच्छितो, काळाची मागणी नाही आहे का की, जगामध्ये भारताचा चित्रपट उद्योग इतके मोठे सर्जनशील जगत आहे, जगाच्या तुलनेत खूप मोठी ताकद आहे आपली, परंतु मनुष्यबळ विकासाच्या दिशेने काम करता करता आपण शिकू. घरी आधी कोणालातरी गाडी साफ करायला ठेवायचो, मग कालांतराने तो ड्रायव्हर व्हायचा, त्यात किती वर्ष निघून जायची.

मला असे वाटते की, आज देशात संवाद आणि मनोरंजनासाठी एका स्वतंत्र विद्यापीठ हवे. जर चित्रपट उद्योगातील लोकं हा विषय घेऊन पुढे आले की, याच कामासाठी एक पूर्णवेळ विद्यापीठ असावे, ज्यात तंत्रज्ञान असावे, जिथे सर्जनशीलतेला वाव असावा, जिथे जगभरात सुरु असलेल्या नवनवीन पद्धतींचा विचार केला जाईल, जिथे आर्थिक विषय देखील असेल, जर असा कोणता प्रस्ताव घेऊन कोणी आले, आणि माझी अशी इच्छा आहे की सरकारने हे करावे. देशातील सामान्य जनतेला उपयोगी होईल अशी व्यवस्था आपण विकसित केली पाहिजे, जर तुम्ही असा प्रस्ताव मांडलात तर सरकार संपूर्ण सहकार्य करेल.

मित्रांनो, तुमच्या सोबतच्या अशाच एका चर्चे दरम्यान, काही मित्रांकडून एक महत्वाचा सल्ला आला आणि मला ती सूचना आवडली. आणि माझी अशी इच्छा आहे की, आपल्याला या मुंबईच्या दुनियेतून बाहेर पडायचे आहे, हे खूप महत्वाचे आहे. आणखी अजून एक सूचना माझ्या पर्यंत आली होती की, ज्याप्रकारे दावोस मध्ये जागतिक आर्थिक परिषद होते त्याचप्रकारे दर दोन वर्षांनी भारतीय चित्रपट उद्योगाशी निगडीत एक आंतरराष्ट्रीय परिषद आपण देशात आयोजित करू शकतो का? तुम्हा लोकांचे आता जे महोत्सव होतात त्याचा मुख्य आधार हा सर्जनशीलता हा असतो, व्यापाराला मुख्य आधार बनवून, नवीन बाजारपेठेला मुख्य आधार बनवून, जागतिक चित्रपट परिषद व्हावी, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगवेगळी चर्चासत्र व्हावी, या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने कशाप्रकारे वित्तीय सहाय्य येईल यावर चर्चा व्हावी, आपलं लक्ष केवळ कलाकारांपर्यंत मर्यादित न राहता, लाखो लोकांचा उदरनिर्वाह ज्यावर अवलंबून आहे अशा उद्योगाला जागतिक ओळख मिळवून देण्याकडे राहिले पाहिजे.

दावोस सारखी परिषद, त्यावेळी मी सांगितले होते की, सुरवातीला आपण एक-दोन वर्ष भारतातील ज्या वेगवेगळ्या प्रकरच्या चित्रपट व्यवस्था आहेत, वेगवेगळ्या भाषेत आहेत, त्यांच्या एका परिषदेपासून सुरु करू या आणि आपण त्याला जागतिक परिषद करूया आणि ही परिषद दावोसच्या बरोबरीची असेल. मी – काही लोकांकडे सॉफ्टवेअर असते ना, तसेच माझे देखील सॉफ्टवेअर असे आहे की मी जन्माला आलो तेव्हापासूनच छोट्या गोष्टी मला जमतच नाहीत. आणि म्हणूनच वैश्विक शक्ती म्हणून उदयाला येण्याचा हा एक मार्ग आहे. आपले लोक जगासमोर येतील आणि चर्चा करतील; जगाला हे समजले पाहिजे – होय, हा 50-60-100 वर्षांचा जो प्रवास आहे, तो वाया नाही गेला;देशाचे खूप मोठे काम होऊ शकते.

मित्रांनो, बहुतेकदा जेव्हा चित्रपट जगताविषयी बोलले जाते तेव्हा त्यातील फक्त एकच पैलू नेहमी लक्ष वेधून घेतो – ग्लॅमर, चमकणारा, चमचमणारे जग – याच्या आजूबाजूलाच विषय घुटमळत राहतो. परंतु माझा विश्वास आहे की चित्रपटांची दुनिया ही ग्लॅमर आणि झगमगाटापेक्षा मोठी आहे इथे आशा आहे, अपेक्षा आहेत, वेदना आहेत, दुःख आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आज जेव्हा मी संग्रहालय पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या काळात किती अडचणींचा सामना करत चित्रपट बनले असतील- या विषयाबद्दल काही माहिती नव्हते, बघितल्यावर मला कळले की असे काम केले जायचे, इतके परिश्रम घेतले जायचे,  कितीतरी तास उभे राहून काम करावे लागायचे. जगाला फक्त कलाकार दिसतो, बाकी गोष्टी माहितच नसतात. मला समजते आहे की ही वेळेची मागणी आहे आणि मला माहित आहे की आपल्या देशात सगळ गोलगोल फिरून राजकीय नेत्याच्या आसपास येऊन थांबते याने देशाचे खूप नुकसान केले आहे. त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त महत्व मिळाले आहे, त्यांना जितके मिळायला हवे तितके नक्की मिळावे ते मी नाकारणार नाही, परंतु जर मार्ग बनले तर त्यांच्या नावावर चौक बनेल तर त्यांच्या नावाचा आणि इमारतीला देखील त्यांचे नाव दिले जाईल हेच सुरु आहे.

मला माहित आहे तुमच्या उद्योग जगतात देखील अशा व्यक्ती असतील मग त्या तंत्रज्ञानात असो, सर्जनशील विभागात असो, कला क्षेत्रात असो, सादरीकरण करणारे असो; तुम्ही स्वतः एक संस्था आहात आणि तुम्ही स्वतःला असे ठेवण्यासाठी- कलाकार असेल, आपल्याला छान वाटते जेव्हा आपण जितेंद्रजींना इतके सडपातळ बघतो पण त्यासाठी त्यांनी किती परिश्रम घेतले असतील ही गोष्ट सामान्य जनतेला माहित नसते.

मी समजू शकतो तुम्ही तुमच्या आयुष्यात किती संघर्ष केला असेल, तुमच्या मित्रांना या गोष्टी सांगताना तुम्ही संकोच करू नका, आज सोशल मिडिया इतका समृद्ध आहे; तुम्ही सगळ्यांना सांगा तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात कुठून केली, किती अडथळे आले, किती संघर्ष केला, किती हालाखीचे जीवन जगलात, किती तास काम केलं. कधी कधी हिमालयात जाऊन बर्फाच्या डोंगरावर काम करायचे होते, शरीर साथ देत नव्हत परंतु काम करावे लागले.

नाहीतर काय होते, आपल्या नवीन पिढीची दिशाभूल होते, त्यांना फक्त झगमगाट दिसतो, त्याच्या मागील तपस्या, परिश्रम, त्याग, बलिदान त्यांना काहीच समजत नाही. माझी अशी इच्छा आहे की सोशल मिडिया इतका समृद्ध आहे तर तुम्ही तुमच्या संघर्षाचे काही ना काही तरी किस्से त्यावर टाकत रहा जे नवीन पिढीपर्यंत पोहोचतील. त्यांना तेव्हा लक्षात येईल की एखद्या व्यक्तीला सहजासहजी यश मिळाले नाही- त्यांना देखील तुमच्यापासून  प्रेरणा मिळेल.

तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. आज एक मोठा वर्ग आहे ज्यांच्यावर तुमचा खूप मोठा प्रभाव आहे परंतु जर तुमच्या आयुष्यातील सत्यता त्यांना माहित झाली तर तो तुमच्यापासून प्रेरणा देखील घेऊ शकतो. आणि तुमच्यापैकी असे कोणीच नसेल ज्यांला कठीण परिस्थितीतून जावे लागले नसेल; आणि हीच गोष्ट जगाला ताकद देते.

आणि म्हणून मला आज तुमच्याकडून अजून एक गोष्ट पाहिजे आहे की आज आपल्या देशाची तरुण पिढी जेव्हा तुमच्याकडे पाहते, तेव्हा त्यांना हेही कळले पाहिजे की या सर्व गोष्टी अशाच मिळाल्या नाहीत. जन्मापासून मला चांगला चेहरा मिळाला आहे म्हणून मी येथे पोहोचलो नाही, मला खूप कष्ट करावे लागलेत. नवीन लोकांसमोर या सर्व गोष्टी आल्या पाहिजेत, आणि मला असे वाटते की, आयुष्याची जडणघडण आणि चारित्र्याची जडणघडण यासारख्या चर्चांमुळे युवकांना नक्कीच फायदा होईल. तुम्ही यात सहभागी व्हाल आणि तुमचे अनुभव युवकांना सांगाल अशी मी आशा करतो.

जशी या संग्रहालयाची निर्मिती केली गेली आहे, त्याचप्रमाणे  वेगवेगळ्या कालावधीत, कालखंडात, भारतीय सिनेमाची ताकद किती होती, यावर देखील काम केले जावे, माहिती  संकलित केली जावी अशी मी विंनती करतो. जशी, भारतीय चित्रपट उद्योगाची पहिली 25 वर्षे कशी होती? तेव्हा चित्रपट निर्माण करतांना कोणत्या समस्या भेडसावत होत्या? आता त्यात काय बदल आले आहेत? ही सर्व माहिती गोळा करून एक विभाग तयार केला जाऊ शकतो. असे केले तर लोकांना ह्या इतिहासासोबत जगण्याची संधी मिळेल.

आज जेव्हा, 21 व्या शतकात, चित्रपट बनविण्याची पद्धत, तंत्रज्ञानाने सर्व काही बदलले आहे, तेव्हा त्या जुन्या गोष्टींबद्दल माहिती जतन करणे देखील खूप महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे, आगामी पिढीत विज्ञान, नवकल्पना; त्याच्या दिशेने कल वाढवा यासाठी आपण काय केले पाहिजे याबद्दल देखील विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही पाहिलं असेल की, जगात विज्ञानाला आधार बनवून चित्रपट तयार करण्याची एक मालिका सुरु आहे. भारतात त्यावर बरेच काही करण्याची गरज आहे. आमच्या युवा पिढीसाठी, लहान मुलांसाठी, ही गोष्ट खूपच प्रेरणादायी ठरेल. वैज्ञानिक दृष्टीकोन तयार करण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाची भूमिका बजावतात. तुम्ही जीवनपट तर बनवता, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना प्रेरणा देता परंतु मला असे वाटते की, विज्ञान, नवोन्मेश, पर्यावरण हे असे विषय आहेत जिथे आपण बरेच काही करू शकतो.

मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की पद्म पुरस्कारांबद्दल आमच्या सरकारने एक बदल केला आहे. गेल्या चार वर्षात आम्ही देशातील असे अनामिक नायक शोधले आहेत जे निस्वार्थ भावनेने कोणतीही ओळख न दाखवता मानवतेची सेवा करत आहेत. त्या राज्यातील कोणत्याही वृत्तपत्राने देखील त्यांच्यासाठी कधी दोन ओळी लिहिल्या नव्हत्या. आम्ही शोधले, संपूर्ण देशात शोधले आणि मी निरंतर हे काम करत आहे, आणि अशा लोकांना आम्ही पद्मश्री पुरस्कार दिला आहे; ही आश्चर्याची गोष्ट आहे. कोणी पर्यावरणासाठी काम करत होते तर कोणी गरिबांना मोफत उपचार उपलब्ध करून देत होते, कोणी शाळा चालवत होते, म्हणजेच, त्यांनी आपल्या आयुष्यात जे काही तुटपुंजे कमावले होते ते सर्व या गोष्टींसाठी खर्च करत होते. असे लोकं आहेत आपल्या देशात आणि हे लोकं खूप महान आहेत. त्यांचा जितका सन्मान करावा तितका कमीच आहे. पण आमच्या चित्रपट उद्योगाचे त्यांच्याकडे लक्ष गेले आहे का? जेव्हा तुम्ही जीवनपट तयार कराल तेव्हा कोणाचे आयुष्य बघितले असेल, इथे देखील तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी मिळतील, तुम्ही कधी कल्पना पण केली नसेल, अशी लोकं आपल्या देशात काम करत आहेत आणि हे खूपच प्रेरणादायी ठरू शकते.

आपल्या कथांसाठी, आपल्या सिनेमासाठी दूर जंगलात पडलेला एक माणूस देशासाठी कारण बनू शकतो. दशरथ मांझी सारख्या कथेत किती ताकद आहे.

मित्रांनो, एक गोष्ट आहे ज्यावर आपले लक्ष गेले पाहिजे, 1857 चा स्वातंत्र्य लढा, माहित नाही का पण इतिहास जागरूक समाज म्हणून आजही आपण मागासलेले आहोत, परंतु 1857 च्या लढ्याचा ज्याने अभ्यास केला असेल त्यांना हे नक्कीच माहित असेल की, 1857 च्या लढयात आपल्या देशातील आदिवासींनी ज्याप्रकारे इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता, या लढ्याचे नेतृत्व केले होते; प्रत्येक आदिवासी पाड्यात त्याच्या अनेक कथा आहेत. एकाचवेळी 100-100, 200-200 लोकांना फासावर लटकवले होते आणि आजही याच्या नोंदी उपलब्ध आहेत. परंतु देशासाठी त्याग, बलिदान करणाऱ्या या महान लोकांच्या गाथा आपल्याला माहित नाहीत; जालियानवाला बाग आपल्याला लक्षात आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा कथा मिळतील.

सरकार सध्या एक अभियान म्हणून एक काम करत आहे. मी असे ठरवले आहे की ज्या राज्यात आदिवासी समाजात अशी घटना घडल्या आहेत, 1857 च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी योगदान दिले आहे,  त्यांना शोधून त्यांचे एक संग्रहालय बनवायचे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशी संग्रहालये तयार करण्याचे काम चालू आहे. त्या जुन्या घटना शोधल्या जात आहेत. तुमच्याकडे सर्जनशील प्रतिभा आहे, देशासाठी इतका त्याग, बलिदान, सेवा करणाऱ्या. लढणाऱ्या लोकांचे सरकार संग्रहालय बनवत आहे, त्यामध्ये तुम्ही काही योगदान देऊ शकता का? आभासी संग्रहालय  तयार करण्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रतिभेचा काही उपयोग करू शकता का? संशोधन करण्यासाठी, इतर कामांमध्ये सरकार तुम्हाला मदत करेल. आणि मला असे वाटते की अॅनिमेशन चित्रपटाच्या माध्यमातून किंवा आभासी सादरीकरणाच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. या माध्यमातून आपण आपल्या नवीन पिढीला बऱ्याच गोष्टी देऊ शकतो. आणि नक्षलवादाच्या नावावर एक वेगळ जग चालवणारे जे लोकं आहेत, त्यांना जर का आपण त्याहून मोठी गोष्ट दाखवली, त्यांच्या पूर्वजांच्या वीरगाथा त्यांना दाखवल्या तर मला वाटते देशातील शाळा उडवण्याचा कट रचणारी लोकं योग्य मार्गावर येतील.

आणि त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की रंगभूमीचे जे हे एक जग आहे, आपल्यातील बऱ्याच लोकांचे आधीचे आयुष्य रंगभूमीवर गेले असेल. रंगभूमी ही भारताची सशक्त परंपरा आहे. शाकुंतल पासून आजपर्यंत शास्त्रांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे. आता जगाला सांगायला आपल्याकडे बरेच काही आहे. आणि मला असे वाटते की, आपण रंगभूमी आणि चित्रपटांना वेगवेगळे न करता त्यांना एकत्र करून, त्याचा इतिहास देखील, देश आणि जगासमोर आणण्याचे काम आपण करू शकतो, आणि असे झाले तर कला जगताची ही खूप मोठी सेवा असेल आणि येणाऱ्या पिढीला देखील याचा लाभ होईल. आणि आपल्या देशात, बऱ्याच वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याची वेगवेगळी रूप आहेत. आणि मला असे वाटते की, रंगभूमी आणि चित्रपटांना आपण वेगवेगळे नाही करू शकत.

नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपण या दिशेने काहीतरी करू शकलो, तर रंगभूमीला नवीन शक्ती मिळेल आणि नवीन प्रतिभेसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

मित्रांनो, लोकशाहीत जर एखादे सरकार असा विचार करत असेल की सर्व कामे ते एकट्याने करू शकतील तर मला असे वाटते की ते सरकार तुम्हाला देखील मूर्ख बनवत आहे आणि ते देखील चुकीचे काम करत आहे. सरकारला सर्वांच्या विकासासाठी सगळ्यांची साथ देखील पाहिजे.

लोकं सहभाग वाढवण्यामध्ये, देशासाठी असलेली आपल्या कर्तव्यांची लोकांना आठवण करून देण्यासाठी, देशात  जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय चित्रपट उद्योगाने जे योगदान दिले आहे त्याचे मी कौतुक करतो, मी त्या योगदानाला वंदन करतो आणि तुम्ही जी देशाची सेवा केली आहे त्याचे तुमच्यामध्ये उपस्थितीत राहून त्याचे गौरवगान करताना मला देखील धन्य वाटले. या कार्यासाठी मला यायची संधी मिळाली, तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली.

आपण असे लोक आहात ज्यांना सल्ला देण्याचा अधिकार नाही, कारण सल्ला देणे हे देखील स्वातंत्र्याविरूद्ध आहे, असे मानले जाते. परंतु मी जर तुम्हाला जास्त काही बोललो असेल तर मला माफ करा. चला, आपण सर्व एकत्र येवून देशासाठी आणि देशाने जगासाठी काहीतरी करावे यासाठी त्याला तयार करूया, सर्व शक्तीनिशी पुढे येवूया. मला असे वाटते की, हे क्षेत्र सर्वसाधारण नाही, भारताची ही असामान्य पुंजी आहे, तुमच्या 100 वर्षांच्या तपस्येचे हे फलित आहे. जगाचा देखील तुमच्यावर अधिकार आहे, जगाला याची ओळख करून द्यायची जबाबदारी आपली आहे, जगाला प्रभावित करून आणि जगाला प्रेरणा देऊन भारताचा झेंडा पुढे रोवण्यासाठी सर्वांनी पुढे सरसावू या.

याच अपेक्षेसह खूप खूप धन्यवाद!

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D. Rane