Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-अमेरिका अंतरिम व्यापार कराराच्या चौकटीचे पंतप्रधानांकडून स्वागत; ‘मेक इन इंडिया’ आणि रोजगाराला चालना मिळणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-अमेरिका अंतरिम व्यापार कराराच्या चौकटीवर झालेल्या कराराचे स्वागत केले असून, तो दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्त्वाची आणि आनंदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दाखवलेल्या वैयक्तिक बांधिलकीबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आणि ही चौकट भारत-अमेरिका भागीदारीतील वाढती सखोलता, परस्पर विश्वास आणि गतिमानता प्रतिबिंबित करते, असे त्यांनी म्हटले.
या करारामुळे शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्ट-अप क्षेत्रातील नवोन्मेषक तसेच मच्छीमार यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील आणि महिलां व युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रम अधिक बळकट होईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
याशिवाय, ही चौकट गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी अधिक सखोल करेल, लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळ्या बळकट करेल तसेच जागतिक आर्थिक वाढीसही हातभार लावेल, असे त्यांनी पुढे सांगितले.
विकसित भारत उभारण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करत, पंतप्रधानांनी सांगितले की, लोकांना सक्षम करणाऱ्या आणि सामायिक समृद्धीला चालना देणाऱ्या भविष्याभिमुख जागतिक भागीदारींसाठी भारत कटिबद्ध आहे. भारत-अमेरिका अंतरिम कराराबाबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल यांच्या ‘एक्स’ या सामाजिक माध्यमांवरील संदेशाला प्रतिसाद देत मोदी म्हणाले की,  “भारत आणि अमेरिकेसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे!”
आपल्या या दोन महान देशांदरम्यान अंतरिम व्यापार कराराच्या चौकटीवर आम्ही सहमती दर्शवली आहे. आपल्या देशांमधील बळकट संबंधांसाठी दाखवलेल्या वैयक्तिक बांधिलकीबद्दल मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो.
आपल्या भागीदारीतील वाढती सखोलता, विश्वास आणि गतिमान स्वरूप या चौकटीतून अधोरेखित होते. शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्ट-अप क्षेत्रातील नवकल्पक, मच्छीमार आणि इतरांसाठी नव्या संधी निर्माण होऊन ‘मेक इन इंडिया’ अधिक बळकट होईल. यामुळे महिलां व युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील. नवोन्मेषाला चालना देण्याबाबत भारत आणि अमेरिका यांची समान बांधिलकी आहे आणि ही चौकट आपल्या दरम्यान गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान भागीदारीला आणखी सखोल करेल. ही चौकट लवचिक व विश्वासार्ह पुरवठा साखळ्या बळकट करेल आणि जागतिक आर्थिक वाढीस हातभार लावेल. विकसित भारताच्या निर्मितीकडे भारत वाटचाल करत असताना, लोककेंद्रित आणि सामायिक समृद्धी वाढविणाऱ्या भविष्याभिमुख जागतिक भागीदारींसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
@POTUS
@realDonaldTrump

अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर