पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि इजिप्त दरम्यान सागरी वाहतूक क्षेत्रात करार करण्याला संमती देण्यात आली.
दोन्ही देशांदरम्यान नौवहन क्षेत्रातील सहकार्यामुळे उभय देशांना होणारा फायदा लक्षात घेऊन सहकार्य वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने हा करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी नौवहन तसेच सागरी मुद्यांबाबत परस्पर सहकार्य कायम रहावे तसेच यासंदर्भात सल्ला देता यावा यासाठीही हा करार करण्यात येणार आहे.
सुयोग्य वेळ आणि स्थळ निश्चित करून दोन्ही देशांना या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील.
या करारामुळे दोन्ही देशातील सागरी वाहतूक संबंध विकसित करून प्रोत्साहन देणे तसेच सागरी वाहतुकीच्या वाढीस मदत होणार आहे. विविध सागरी संस्थातील कर्मचारी आणि विद्यार्थी यांची देवाणघेवाण तसेच त्यांना प्रशिक्षण देणे, बंदरे आणि सागरी मार्गांवर व्यापारी मालाचा ओघ वाढवण्यासाठी आवश्यक त्या माहितीची देवाणघेवाण करणे या करारामुळे सुलभ होईल. सागरी वाहतूक, जहाजबांधणी आणि दुरुस्ती, सागरी वाहतूकविषयी प्रशिक्षण तसेच सिम्युलेटर, बंदर सुविधा आणि त्यांच्याशी संबंधित सागरी वाहतूक घडामोडी आदींच्या संदर्भातील तंत्रज्ञानविषयक माहितीची देवाणघेवाण करणे या करारामुळे शक्य होईल.
J. Patankar/S.Tupe/N.Sapre