पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत भारत आणि कंबोडिया दरम्यान पर्यटन क्षेत्रातील सहकार्याच्या परस्पर सामंजस्य कराराला कार्योत्तर मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांतील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्दिष्टाने हा करार करण्यात आला आहे.
भारताचे उपराष्ट्रपती 16 सप्टेंबर 2015 रोजी कंबोडिया दौऱ्यावर असताना परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
या कराराची ठळक उद्दिष्टे
i. पर्यटन क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवणे
ii. पर्यटनाशी संबंधित माहिती व तपशील यांची परस्पर देवाणघेवाण करणे
iii. पर्यटन क्षेत्रात भागीदार असणाऱ्या, हॉटेल्स व टूर ऑपरेटर्स यांसह इतर घटकांदरम्यान सहकार्यवाढीला प्रोत्साहन देणे
iv. मनुष्यबळ विकासाच्या सहकार्यासाठी परस्परांमध्ये कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे.
v. पर्यटन व आतिथ्यशिलता क्षेत्रात गुंतवणूक करणे.
vi. दोन्ही बाजूच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी टूर ऑपरेटर्स, प्रसारमाध्यमं, समाजातील प्रभावशाली व्यक्ती यांच्या भेटी घडवून आणणे.
vii. जाहिरात, विपणन, गंतव्य ठिकाणाचा विकास व व्यवस्थापन क्षेत्रात अनुभवांची देवाणघेवाण.
viii. परस्परांच्या देशांमध्ये प्रवासी मेळे, प्रदर्शने यामध्ये सहभागी होणे.
ix. स्वच्छ, सन्माननीय आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणे.
पार्श्वभूमी
भारतीय पर्यटनाच्या दृष्टीने कंबोडिया ही उदयोन्मुख बाजारपेठ आहे. कंबोडियन नागरिकांसाठी भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक टुरिस्ट व्हिसा (eTV) ही सुविधा दिली आहे. दोन्ही देशांच्या पर्यटनव्यवसायासाठी याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. पर्यटन मंत्रालयाला खात्री आहे की, या परस्पर सामंजस्य करारामुळे कंबोडियाहून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.
भारत आणि कंबोडियादरम्यान मैत्रीचे व सौहार्दपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांनी परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी व विकसित करण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
S.Thakur/N.Sapre