पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ग्रीस दरम्यान हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
नागरी उड्डाण क्षेत्रातील घडामोडींसह उभय देशांदरम्यान अधिक व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देण्याची क्षमता या करारात आहे. अधिक संरक्षण आणि सुरक्षा सुनिश्चित करतानाच दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांना व्यावसायिक संधी आणि वेगवान वाढीव संपर्कासाठी पोषक वातावरण या करारामुळे उपलब्ध होईल.
कराराची महत्वपूर्ण वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
१. दोन्ही देशांना एक किंवा त्याहून अधिक विमानकंपन्या नेमता येतील.
२. दोन्ही देशातील नियुक्त विमानकंपन्यांना परस्परांच्या प्रदेशात हवाई सेवेला प्रोत्साहन आणि विक्रीसाठी कार्यालये स्थापन करण्याचा अधिकार असेल.
३. दोन्ही देशातील नियुक्त विमानकंपन्यांना विशिष्ट मार्गांवर निर्धारित सेवांच्या परिचालनाची समान संधी मिळेल.
४. दोन्ही देशातील नियुक्त विमानकंपन्यांना त्याच देशाच्या, दुसऱ्या देशाच्या आणि तिसऱ्या देशाच्या नियुक्त कंपनीबरोबर सहकारी विपणन व्यवस्थेत सहभागी होता येईल.
५. मार्गांच्या वेळापत्रकानुसार, भारतीय विमान कंपन्यांना भारतातून अथेन्स, थेसालोनिकी, हेरॅक्लिओन आणि ग्रीसमधील अन्य ३ ठिकाणी परिचालन करता येईल, तर हेललेनिक रिपब्लिकच्या विमान कंपन्यांना नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नई या सहा महानगरांमध्ये थेट विमानसेवा सुरु करता येईल.
सध्या भारत आणि ग्रीस दरम्यान कोणताही हवाई सेवा करार नाही. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी ६-७ सप्टेंबर २०१६ रोजी नवी दिल्ली येथे भेटून कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले. नागरी हवाई क्षेत्रातील नवीन घडामोडी लक्षात घेऊन दोन्ही देशांदरम्यान हवाई संपर्क सुधारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
N.Sapre/S.Kane/D.Rane