पीएम्इंडिया

माननीय जिंबेकोव, किर्गिजस्तानचे राष्ट्रपती
माननीय आदिलबेक उलु शुमकारबेक,संचालक,व्यापार प्रोत्साहन संस्था,
संदीप सोमाणी, अध्यक्ष फिक्की
भारत आणि किर्गिजस्तान मधील व्यापार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर
भारत आणि किर्गिजस्तान व्यापार समुदाया दरम्यान या व्यापार परिषदेचे आयोजन झाले आहे ही खूपच आनंदाची बाब आहे. माझ्या बिशकेक दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात या व्यापार परिषदेने होत आहे हे खूप महत्वाचे आहे. हे आपल्या सामायिक प्राधान्यांचे सूचक आहे. प्राचीन काळापासून भारत आणि किर्गिजस्तान दरम्यान सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. आधुनिक काळानुसार ही ऐतिहासिक भागीदारी पुढे विकसित होण्याच्या अनेक शक्यता आहेत. विविध क्षेत्रात भारत- किर्गिजस्तान संबंध विकसित व्हावेत अशी राष्ट्रपती जिंबेकोव आणि माझी इच्छा आहे. आणि विशेषतः व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात याला विशेष मजबूत करण्याची इच्छा आहे. राष्ट्रपतींनी या परिषदेला मार्गदर्शन दिले आणि व्यक्तिगत रित्या यात सहभागी झाले यासाठी मी त्यांचे आभार मानतो.
मित्रांनो,
जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने बदल होत आहेत. या परिस्थितीत भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेची आर्थिक वृद्धी आणि तांत्रिक विकास, जगात स्थिरता आणि आशेचे प्रमुख कारक आहेत. भारत एक मोठी व्यापारपेठ आहे. आमच्या देशातील तरुण कौशल्य आणि उत्साही नवोन्मेषक 5 ट्रीलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बाजावतील.
मित्रांनो,
हे स्पष्ट आहे की, आपला द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक भागीदारीची जी शक्यता आहे त्यापेक्षा सध्याची आपली भागीदारी खूपच कमी आहे. म्हणूनच, व्यापार परिषदेचा हा उपक्रम अगदी योग्यवेळी राबवला जात आहे. माझ्या मते व्यापार आणि गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्यासाठी तीन मुख्य स्रोत आहेत – उपयुक्त वातावरण, कनेक्टिव्हिटी आणि व्यापार ते व्यापार म्हणजेच बी 2 बी आदानप्रदान. मी सांगू इच्छितो की उपयुक्त वातावरण निर्मितीसाठी आम्ही दुहेरी कर प्रतिबंध कराराला अंतिम स्वरूप दिले आहे. त्याचबरोबर, द्विपक्षीय गुंतवणूक करारावर आम्ही सक्रिय चर्चा करत आहोत. यामुळे गुंतवणुकीत वाढ होईल. द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही पंच वर्षीय पथदर्शक आराखडा तयार केला आहे. किर्गिज युरेशियन आर्थिक संघटनेचा सदस्य आहे. युरेशियन आर्थिक संघटनेसोबत व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अधिमान्य व्यापार करारावर देखील काम करत आहोत. सुलभ व्यापारामध्ये चांगली कनेक्टिव्हिटी महत्वपूर्ण भूमिका बजावते. चाबहर बंदर हे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात संपर्काचे एक नवीन माध्यम म्हणून विकसित होत आहे. भारत आणि मध्य आशिया दरम्यान कनेक्टिव्हिटीचे चांगले पर्याय निर्माण करण्यावर आपण अधिक लक्ष दिले पहिजे. बी 2 बी आदानप्रदान वाढवण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम सुरु केले आहेत. यावर्षी, बिश्केकमध्ये “नमस्कार यूरेशिया” व्यापार कार्यक्रम आयोजित केला जाईल. भारत आणि किर्गिजमधील विविध उत्पादने व्यवसायात एकमेकांना पूरक आहेत. आपण या सर्व संधींचा फायदा घेतला पाहिजे. सेंद्रिय उत्पादनांच्या बाजारपेठांमध्ये कार्गीजची चांगली पत आहे. इथल्या डोंगरांमध्ये मिळणारे मध, अक्रोड आणि दुग्धजन्य उत्पादने शुद्धता आणि नैसर्गिक प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे, भारतातील व्यापारी आणि गुंतवणूकदारांसाठी, किर्गीजमध्ये औषधे, वस्त्रे, रेल्वे, जलविद्युत, खाण आणि खनिजे तसेच पर्यटन या क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
मित्रांनो,
तुमच्या सर्व चर्चा अर्थपूर्ण होवोत अशी इच्छा मी व्यक्त करतो. मी किर्गिजच्या व्यापाऱ्यांना भारतीय उद्योजकांसोबत काम करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
तुम्हा सर्वांचे भारतात स्वागत आहे. आणि भारतातील लोकांना तर इथे विमानतळावर उतरल्यावर आपुलकी जाणवत असेल. आपण जर भाषेवर लक्ष दिले तर आपल्याला लक्षात येईल दोन्ही भाषांमध्ये अनेक शब्द समान आहेत, इतकी जवळीक आहे. उभय देशांनी याचा लाभ घ्यावा आणि दोन्ही देशांच्या विकासामध्ये उद्योग आणि व्यापार जगतातील मित्रांचे योगदान वाढले पाहिजे. या एका अपेक्षेसह तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा.
तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
Addressing the Kyrgyzstan - India business forum. Watch. https://t.co/Y050UD5DsW
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2019