पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा क्षेत्रांच्या प्रगतीचा आढावा घेतला. नवीकरणीय ऊर्जा आणि रेल्वेसह काही महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाल्याचे निती आयोगाने केलेल्या सादरीकरणात स्पष्ट झाले.
नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात एकूण स्थापित क्षमतेने 44 गिगा वॅटचा टप्पा ओलांडला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांतर्गत विविध घटक आणि विविध प्रकल्पांची उद्दीष्ट्ये साध्य करण्यात आली आहेत. छतांवरील वीज निर्मितीसह सौर ऊर्जा उत्पादनात वाढ करण्यासाठीच्या योजना आणि धोरणांबाबत यावेळी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षा आणि जोडणी अशा महत्वपूर्ण धोरणात्मक क्षेत्रांच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. आपापल्या प्रवर्गांमध्ये भारतातील आठ विमानतळांचा समावेश, जागतिक क्रमवारीतील पाच सर्वोच्च विमानतळांमध्ये होतो, असे निरीक्षण नोंदवण्यात आले. प्रादेशिक जोडणीला वेग देण्यासाठी तसेच ग्राहकांच्या समाधानात सुधारणा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबतही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
भारतीय रेल्वेने 2 पूर्णांक 25 कोटी इतक्या दैनिक प्रवाशांचे लक्ष गाठले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मानवरहित 240 रेल्वे क्रॉसिंग रद्द करण्यात आली. याच कालावधीत ऊर्जा क्षेत्रात 3 पूर्णांक 5 कोटी एलईडी बल्ब वितरीत करण्यात आले.
बंदर क्षेत्रात नौकांच्या सरासरीत आवागमनात लक्षणीय वाढ झाली.
ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 6 लाख घरे उभारण्याच्या लक्ष्याच्या तुलनेत 6 पूर्णांक 94 लाख घरे उभारण्यात आली.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या टप्प्याच्या प्रगतीबाबत माहिती घेतली. 2016 या आर्थिक वर्षात स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेचा लाभ 15 कोटी कुटुंबांना देण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.
पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित मंत्रालयातील अनेक उच्च अधिकारी तसेच निती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयातील उच्च अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
BG/MP/VD