Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्रात यवतमाळ येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

महाराष्ट्रात यवतमाळ येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

महाराष्ट्रात यवतमाळ येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

महाराष्ट्रात यवतमाळ येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


भारत माता की जय, भारत माता की जय!

महाराष्ट्राचे राज्‍यपाल विद्यासागर राव, राज्याचे लोकप्रिय आणि यशस्‍वी युवा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नीतिन जी, हंसराज अहिर जी, राज्‍य सरकारचे मंत्री मदन येरवारजी, मंचावर उपस्थित अन्‍य मान्यवर आणि विशाल संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले बंधू आणि भगिनी, विशेषतः भगिनींनो,

पांढरकवडाच्या या भूमीवरून मी संत सर्वलाल महाराज, मुख्‍साजी महाराज सारखे अनेक संत आणि महापुरुषांना वंदन करतो. काही महिन्यांपूर्वी या भागातील आदिवासी युवकानी एवरेस्‍ट शिखर सर केले होते. दिल्‍लीत मला या युवकांना भेटायची संधीही मिळाली होती. त्यांचे परिश्रम, त्यांची स्वप्ने याबाबत जाणून घेतल्यावर मला यवतमाळ चंद्रपूरच्या ऊर्जेचा सुखद अनुभव आला होता. येथील कोलाम जमातीचा स्वच्छतेप्रति जो आग्रह आहे, त्याचा उल्लेख मी माझ्या ‘मन की बात ’ कार्यक्रमात देखील केला होता. चंद्रपुरच्या युवकांनी ज्या तऱ्हेने तिथला किल्ला स्वच्छ केला होता, त्यातून देशातील अनेक युवकांना अशा स्वच्छता अभियानाची प्रेरणा मिळाली आहे.

तेव्हा मी चाय पर चर्चा केली होती आणि देशाच्या समस्‍या दूर करण्यासाठी अखंड काम करण्याचे आश्वासन दिले होते. गेली साडेचार वर्षे अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला दिलेलं हे आश्वासन पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही समाधानी आहात का? मी जे काम करत आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? मी जी मेहनत करत आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात ?मी जी आश्वासने दिली होती त्यासाठी मनापासून काम करत आहे, त्यासाठी समाधानी आहात का? तुमचा आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद कायम राहील?

आजही पांढरकवडाच्या , यवतमाळच्या विकासाशी संबंधित शेकडो कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यामध्ये गरीबांसाठी घरे, रस्ते, रेल्वे, रोजगार आणि स्‍वरोजगाराशी संबंधित, शिक्षणाशी संबंधित अनेक प्रकल्प आहेत.

बंधू आणि भगिनींनो, विकासाच्या या सर्व प्रकल्पाखेरीज मी हे देखील जाणतो की आपण सर्व कुठल्या दुःखाला सामोरे जात आहोत. पुलवामामध्ये जे काही झाले, त्याबाबत दहशतवाद्यांच्या त्या कृत्याबाबत तुमचा संताप मी समजू शकतो.महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांनी देशाची सेवा करताना पुलवामा इथे आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ज्या कुटुंबांनी आपला मुलगा गमावला आहे त्यांचे दुःख मी चांगल्या प्रकारे जाणू शकतो. आपण सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.

बंधू आणि भगिनींनो, मी कालही म्हटले होते आणि आणि आज पुन्हा सांगतो, या शहिदांचे बलिदान व्‍यर्थ जाणार नाही. दहशतवादी संघटनांनी , दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यांनी जो गुन्हा केला आहे, त्यांनी कितीही लपण्याच्या प्रयत्न केला तरी त्यांना शिक्षा नक्की दिली जाईल. आम्हाला आपल्या जवानांचा, आपल्या सुरक्षादलांच्या पराक्रमाचा अभिमान आहे , विश्वासही आहे. जवानांमध्ये आणि विशेषतः सीआरपीएफमध्ये जो संताप आहे तो देखील देश जाणतो. आणि म्हणूनच सुरक्षादलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

मित्रांनो , एक असा देश जो भारताच्या विभाजनानंतर अस्तित्वात आला, ज्याच्या देशात दहशतवादाला आश्रय दिला जातो. जो आज दिवाळखोर होण्याच्या वाटेवर आहे, तो दहशतवादाचे दुसरे नाव बनला आहे. मी देशाला पुन्हा एकदा विश्वास देतो की धीर धरा, आपल्या जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना कशा प्रकारे शिक्षा दिली जाईल, कुठे दिली जाईल, केव्हा दिली जाईल, कोण देईल, कशा प्रकारची शिक्षा दिली जाईल हे सर्व आपले जवान ठरवतील.

मित्रांनो , आज आपण पूर्ण सुरक्षेसह आपली स्वप्ने पूर्ण करू शकत आहोत, देशाचा विकास करू शकत आहोत, त्यामागे अगणित बलिदान आहे. मी पुलवामाच्या शहीदांना पुन्हा एकदा वंदन करतो.

मित्रानो, देशाच्या सुरक्षेबरोबरच देशाच्या समृद्धीसाठी देखील आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि म्हणूनच ,विकासाची पंचसूत्री म्हणजे मुलांचे शिक्षण, युवकांना रोजगार, वयोवृद्धांना उपचार, शेतकऱ्यांना सिंचन आणि प्रत्येकाचे म्हणणे ऐकण्यावर भर दिला जात आहे. आजचे लोकार्पण आणि पायाभरणी याच विचारांचा विस्‍तार आहे.

बंधू आणि भगिनींनो, कोणत्याही क्षेत्राच्या विकासात रस्ते जोडणीची खूप मोठी भूमिका असते. यवतमाळची प्रगति देखील येथील रस्ते आणि रेल्वेद्वारे सुनिश्चित होईल. याच भावनेने थोड्या वेळापूर्वी रस्त्यांशी संबंधित सुमारे 500 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. याशिवाय पुणे अजनी पुणे हमसफर एक्‍सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. ही गाडी द्रोणी, मनमाड, भुसावळ आणि बड़नेरा मार्गे जाईल. यामुळे या सर्व ठिकाणच्या लोकांची मोठी सोय होणार आहे.

मित्रांनो, रस्ते आणि रेल्वे सुविधांव्यतिरिक्त यवतमाळच्या साडेचौदा हजारांहून अधिक गरीब कुटुंबांनी आज आपल्या नव्या घरात प्रवेश केला आहे. ज्यांना ही पक्की घरे मिळाली आहेत त्यांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो. आता पक्की घरे आहेत त्यामुळे स्वप्ने देखील पक्की असतील.

मित्रानो, केंद्र सरकारने 2022 पर्यंत प्रत्येक बेघराला पक्के घर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि हे सरकार वेगाने आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्या कुटुंबाना आतापर्यन्त घर मिळालेले नाही त्यांनी देखील यावर विश्वास ठेवावा, हे माझे वचन आहे 2022 पूर्वी प्रत्येक कुटुंबाचे पक्के घर असेल. आतापर्यंत देशातल्या गावे आणि शहरांमध्ये दीड कोटी गरीबांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातही सुमारे अडीच लाख घरे बांधण्यात आली आहेत. फडणवीस सरकारने देखील 50 हजारहून अधिक घरे बांधली आहेत. इथे यवतमाळमध्येही सुमारे 12 हजार घरांचे काम सुरु आहे.

मित्रांनो , प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी घरे बांधली आहेत, ती गरीबांना आत्‍मविश्‍वास तर देत आहेतच, त्याचबरोबर आपल्या भगिनींच्या सबलीकरणाचे देखील साधन आहे. ज्याप्रकारे आपल्या परंपरांमध्ये भगिनींना प्राधान्य दिले जाते, माता कुटुंब आणि समाजाला दिशा दाखवतात, त्याच प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांची नोंदणी घरातील महिलेच्या नावावर व्हावी याला प्राधान्य दिले जात आहे.

बंधू आणि भगिनींनो, महिला सशक्‍तीकरणाच्या बाबतीत यवतमाळ देशातील अव्वल जिल्ह्यांपैकी एक आहे. यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रात महिला बचतगटाचे एक खूप मोठे जाळे आहे. आमच्या सरकारने महिला बचतगटाचाही विस्‍तार केला आहे आणि त्यांना ताकदही दिली आहे. या समूहांना ग्रामीण अर्थव्‍यवस्‍स्थेचा आधार बनवण्यासाठी पूर्वीपेक्षा अडीचपट अधिक निधी उपलब्‍ध करून देण्यात आला आहे.

बंधू आणि भगिनींनो, मला आठवतंय कि गेल्यावेळी मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा शेतकऱ्यांशी खूप वेळ संवाद साधला होता. आता पुन्हा इथे आलो आहे तेव्हा ही माहिती द्यायला आवडेल की अलिकडेच अर्थसंकल्पात प्रांतीय समाजाबरोबरच भटक्या समाजाचे जे लोक आहेत, बंजारा-वगैरे जो समाज आहे, आपला श्रमिक समाज आहे, आपला शेतमजूर आहे या सर्वांसाठी देखील खूप मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

मित्रांनो , पीएम किसान सम्‍मान निधि नावाने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत असे शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये दिल्‍लीतून भारत सरकारच्या वतीने जमा केले जातील. महाराष्ट्राचे सुमारे एक कोटी 25 लाख शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ होईल. हे पैसे दोन-दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात थेट तुमच्या खात्यात जमा होतील आणि एकदाच नाही तर दरवर्षी दिले जातील.

मित्रांनो, या अर्थसंकल्पात सरकारने भटक्या समुदायांसाठी देखील एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यात खूप मोठ्या संख्येने अशी कुटुंबे आहेत जी आपली जीवन शैली आणि अन्य कारणांमुळे एका जागी राहत नाहीत. इतिहासात प्रथमच या समुदायाचा विचार सरकारने केला आहे. आता या लोकांसाठी सरकारने कल्याण विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे., जेणेकरून सरकारच्या विकासकामांचा लाभ त्यांच्यापर्यंत वेगाने पोहचेल.

मित्रांनो, रस्ते आणि घरांच्या बांधकामाशी संबंधित घरांमध्ये काम करणाऱ्या रेह्डी-ठेलेवाले , अशा असंघटित क्षेत्राच्या अशा कोट्यवधी लोकांसाठी प्रथमच एक खूप मोठी योजना आम्ही बनवली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेद्वारे 15 हजार रुपये महिना कमावणाऱ्या कामगार मित्रांना 60 वर्षांनंतर तीन हजार रुपये नियमित निवृत्तीवेतन सुनिश्चित होऊ शकेल. यासाठी सरासरी 100 रुपये योगदान दर महिन्याला द्यावे लागेल. तेवढेच पैसे केंद्र सरकार त्यांच्या पेंशन खात्यात दर महिन्याला जमा करेल.

बंधू आणि भगिनींनो, सामाजिक सुरक्षेसाठी कटिबद्ध आमच्या सरकारने आदिवासी समाजाच्या कल्‍याणशी संबंधित तरतुदीत अंदाजे 30 टक्के वाढ केली आहे. यामुळे यवतमाळसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार आहे. हा निर्णय आदिवासी बांधवांसाठी भाजपा सरकारची निष्‍ठा आणि कटिबद्धता यांचा पुरावा आहे.

मित्रांनो, जमीन असेल, जंगलातील उत्पादने असतील, शिक्षण असेल, खेळाशी संबंधित गुणवत्ता असेल, प्रत्येक स्तरावर आदिवासींच्या कल्याणासाठी व्‍यापक प्रयत्न होत आहेत. जन-धन पासून वन-धन योजनेपर्यंत जन समुदाय, जमाती समुदायातील बंधू-भगिनींसाठी काम केले जात आहे. जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये जवळपास प्रत्येक कुटुंबाचे खाते उघडण्यात आले आहे, ज्यामुळे सरकारची प्रत्येक मदत तुमच्या खात्यात थेट जमा होणे सुनिश्चित झाले आहे. आता कुणीही दलाल तुमच्या पैशांवर डल्ला मारु शकणार नाही, याचप्रकारे वन-धन योजनेच्या माध्यमातून हे सुनिश्चित केले जात आहे की जंगलातून जे उत्पादन तुम्ही घेता त्याचा उत्तम भाव तुम्हाला मिळावा. यासाठी वन-धन केंद्र स्थापन केली जात आहेत. सरकारचा भर वन उत्पादनाच्या मूल्य वर्धनावर आहे, मूल्य वृद्धीवर आहे. जेव्हा मूल्य वृद्धि होते तेव्हा उत्पादनाची जास्त किंमत मिळते. जसे कच्च्या चिंचेची किंमत कमी असते. मात्र जर ती पाकिटातून विकली किंवा चटणी बनवून विकली तर जास्त किंमत मिळते.

मित्रानो, तुम्हाला हे देखील माहित आहे की वन उत्पादनावर जो हमीभाव सरकार देते, त्यात गेल्या साडेचार वर्षात तीनवेळा वाढ करण्यात आली आहे. डिसेंबरमध्येच 23 उत्पादनाचा हमीभाव वाढवण्यात आला आहे. एवढेच नाही, या काळात सरकार द्वारा किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत येणाऱ्या पिकांमध्ये वाढ करण्यात आली आहे.साडेचार वर्षांपूर्वी जंगलातून मिळणाऱ्या 10 उत्पादनांसाठी हमीभाव मिळत होता आता ती संख्‍या वाढून सुमारे 50 झाली आहे.

मित्रानो, भाजपा सरकारने आदिवासींचे उत्पन्न लक्षात घेऊन बांबूंशी संबंधित एका कायद्यात खूप मोठा बदल देखील केला आहे. आता तुम्ही तुमच्या शेतात बांबूचे उत्पादन घेऊ शकता आणि ते विकून आपले उत्पन्न वाढवू शकता.यापूर्वी हे शक्य नव्हते कारण बांबूला वृक्षांच्या श्रेणीत ठेवले होते. केवळ बांबूची शेती करू शकाल एवढेच काम केलेले नाही तर त्यासाठी व्यापक बाजारपेठ मिळावी यासाठी देखील काम केले जात आहे.

मित्रानो, आदिवासी क्षेत्रांमध्ये शिक्षणापासून कौशल्य आणि रोजगारापर्यंत अनेक प्रयत्न केले जात आहेत. आम्ही आदिवासी भागात एकलव्‍य आदर्श शाळा उघडण्याचे व्‍यापक अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत 20 हजारपेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागात शाळा सुरु केल्या जात आहेत. आजच इथे एकलव्‍य आदर्श शाळेच्या नव्या संकुलाचे लोकार्पण देखील करण्यात आले. या नव्य संकुलात चारशेहून अधिक युवा मित्र आपल्या भविष्याला आकार देऊ शकतील.

मित्रानो, आदिवासी समाजाच्या आरोग्याबाबत देखील व्‍यापक प्रयत्न देशात सुरु आहेत. आज यवतमाळसाठी तीन संस्‍थाचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली आहे. आपल्या आदिवासी भागात सिकल सेल आजार सामान्य आहे. विशेषतः विदर्भात या आजाराची समस्या अधिक आढळते. आम्ही या आजारावरील उपचारासाठी उत्तम वैद्यकीय सुविधा, संशीधन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी चंद्रपुरमध्ये संशोधनाशी संबंधित केंद्र स्थापन केले जात आहे.

मित्रानो , आदिवासी बंधू-भगिनींना केंद्र सरकारच्या आयुष्‍मान भारत योजनेचा देखील खूप मोठा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत गंभीर आजाराच्या स्थितीत गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचार सुनिश्चित झाले आहेत. आता काही वेळापूर्वी माझी आयुष्‍मान भारतच्या अनेक लाभार्थ्यांशी भेट झाली.त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तेच या प्रधानसेवकाचे मानधन आहे. मित्रानो, भारताला खेळात महाशक्ती बनवण्यासाठी आदिवासी युवकांचे सामर्थ्‍य खूप मोठी भूमिका पार पाडत आहे. हे लक्षात घेऊन आदिवासी भागात क्रीडा सेवा आणि सुविधांचा विस्तार केला जात आहे. सरकारचे विशेष ध्‍यान दीडशेहून अधिक आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्रीडा सुविधा विकसित करण्यावर आहे. सरकारद्वारा अशा प्रत्येक जिल्ह्याला 2022 पर्यंत पाच हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याची तरतूद केली आहे.

मित्रानो, इतिहास साक्ष आहे कि देशाच्या स्वातंत्र्यापासून देशाच्या विकासात आदिवासी नायकांचे खूप मोठे योगदान आहे. भाजपा सरकार या योगदानाला सन्मान देण्याचे काम करत आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या आदिवासी मुलं-मुलींनी बलिदान दिले त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभर स्मारके बांधली जात आहेत.

बंधू आणि भगिनींनो, देशाची सुरक्षा, महिला सशक्‍तीकरण, आदिवासी कल्‍याण आणि विकास सह अन्य कामे इतक्या वेगाने आज होऊ शकत आहेत कारण साडेचार वर्षांपूर्वी तुम्ही एका मजबूत सरकारसाठी मतदान केले होते. आज सरकार स्वच्छ मनाने स्पष्ट धोरण आखत आहे कारण तुमच्या मतामुळे हे शक्य झाले आहे. तेव्हा जर तुम्ही चूक केली असती तर बहुधा आम्ही आहोत तिथेच राहिलो असतो. विकासाचा हा विश्‍वास तुम्ही आणखी मजबूत कराल. आपल्या या प्रधान सेवकावर आपला आशीर्वाद कायम राहो या विनंतीसह पुन्हा एकदा सर्व विकास प्रकल्पांसाठी मी तुमचे खूप-खूप अभिनंदन करतो. माझ्या बरोबर जोरात म्हणा-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप-खूप धन्‍यवाद.

B.Gokhale/S.Kane/D. Rane