पीएम्इंडिया
या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल, त्याची संकल्पना मांडल्याबद्दल मी सुमित्राजींचे अगदी मनापासून खूप-खूप अभिनंदन करत आहे . पण त्यापेक्षाही जास्त मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करत आहे , कारण मला या ठिकाणी कोणत्या प्रकारची सत्रे झाली, कोणत्या विषयांची हाताळणी झाली, तुम्हा सर्वांचा किती सहभाग होता, सक्रिय भागीदारी किती होती आणि जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित होते, अशी माहिती मिळाली. नाहीतर दिल्लीला आलो आहोत तर आणखीही काही कामे आहेत असे कदाचित फारच कमी घडले. त्यामुळे हा कार्यक्रमच तुमच्यासाठी उत्सुकतेचा एक विषय बनला असेल. ज्या ठिकाणी तुम्ही काम करत असता, त्या ठिकाणी काम करताना येणा-या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे, अशी तुमची इच्छा आहे.
जी स्वप्ने उराशी बाळगून तुम्ही सार्वजनिक जीवनात आला आहात, त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्वतःला कशा प्रकारे सक्षम करता येईल, त्यासाठी कोठून तरी मार्गदर्शन मिळेल, माहिती मिळेल, मार्ग दाखवण्याचे प्रयत्न होऊ शकतील, या सर्व मुद्यांचाच हा प्रभाव होता, ज्यामुळे तुम्ही या दीड दिवसात अनेक विषयांवरील चर्चेत सक्रिय सहभाग घेतलात. पण मला एका तिस-याच विषयाच्या दिशेने तुमचे लक्ष वेधण्याची इच्छा आहे आणि त्याबद्दल मी असे म्हणेन की कधी कधी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये नियोजित मार्गांच्या माध्यमातून ज्या गोष्टी मिळतात, त्यापेक्षा जास्त माहिती तुम्हा सर्वांच्या परस्परांशी होणाऱ्या परिचयाच्या वेळी, चहापाण्याच्या वेळी, जेवताना होणाऱ्या गप्पांच्या वेळी, ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांशी ज्या गप्पा होतात त्यातून तुमच्या आणि त्यांच्या अनुभवांची जी देवाणघेवाण होत असते त्यामधून मिळत असते. नियोजित कार्यक्रमांपेक्षाही अनुभवांची ही देवाणघेवाण जास्त प्रभावी असते आणि याचा अनुभव तुम्ही लोकांनी घेतला आहे आणि त्या अर्थाने देशभरातील महिला लोकप्रतिनिधींचा हा कार्यक्रम भावी काळात तुम्ही आपापल्या भागात ज्या ज्या ठिकाणी जाल, त्या ठिकाणी कुठे ना कुठे सकारात्मक भूमिका निभावण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल आणि तुम्हाला यश नक्की मिळेल.
या ठिकाणी सुषमाजींच्या एका वाक्याचा उल्लेख झाला मात्र त्याचा उल्लेख स्त्री आणि पुरुष यांच्या समानते संदर्भात मला करायचा नाही. मात्र हे जे महिला सक्षमीकरण बोलले जाते, त्या बाबतची मानसिकता बदलण्याची गरज मला वाटत आहे. सक्षमीकरण त्यांचे होते ज्यांचे सक्षमीकरण झालेले नाही पण जे सशक्त आहेत त्यांचे सक्षमीकरण कोण करणार असा प्रश्न आहे आणि ही बाब माझ्या गळी अजिबात उतरत नाही. महिलांचे सक्षमीकरण करण्याचा पुरुषांना अधिकार तरी काय, म्हणूनच आपण स्वतःला ओळखण्याची गरज आहे.
जोपर्यंत आपल्याला आव्हानांना तोंड देण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याची ओळख आपल्याला होत नसते. आतापर्यंत कोणत्याही समाजाच्या विषयी, जीवनाच्या विषयी सर्वेक्षणे केली जातात त्यामध्ये ही एक बाब निश्चित दिसून येत असते. एखाद्याच्या पत्नीचे निधन झाले असेल आणि पुरुष एकटाच कुटुंब सांभाळत असेल तर तो फार जास्त काळ असे कुटुंब सांभाळू शकणार नाही आणि जास्त काळ जिवंतही राहू शकणार नाही. पण एखाद्या कुटुंबात पुरुषाचे निधन झाले आणि महिलेवर कुटुंब चालवण्याची जबाबदारी आली की ती महिला प्रदीर्घ काळ जिवंतही राहते आणि आपल्या कुटुंबाचे पालन पोषण खूप चांगल्या प्रकारे करून दाखवते, त्या वेळी सर्व प्रकारच्या सर्वेक्षणांनी हाच निष्कर्ष काढला आहे. वर्षानुवर्षांच्या वारशाने जे सामर्थ्य आणि शक्ती दैवी देणगी म्हणून तुम्हाला मिळालेली आहे, महिलांना मिळाली आहे, त्या सामर्थ्याची ओळख स्वतःमध्ये निर्माण करून घेणे अतिशय गरजेचे आहे.
सध्या मॅनेजमेंटच्या विश्वात एक शब्द फारच प्रचलित झालेला आहे. मल्टी स्टार ऍक्टिविटी ही मल्टी टास्क ऍक्टिविटी जगातील अनेक देशांमध्ये व्यक्तिमत्वांचा जो विकास झालेला आहे तो एका सिंगल टनेल ऍक्टिविटीच्या माध्यमातून होत असतो. ती व्यक्ती अशा सरळसोट बोगद्यातून वाटचाल करत पुढे जात राहते आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात योगदान देते, मात्र या बोगद्यात जर काही अडथळा आला, दुसऱ्या कोणत्या तरी मार्गावर वाटचाल करायची वेळ आली तर त्या व्यक्तीला ते शक्य होत नाही. जर त्याला रोज लिफ्टने जायची सवय असेल आणि तो दहाव्या मजल्यावर बसलेला असेल आणि अचानक वीजपुरवठा खंडित झाला तर पायऱ्यांनी उतरायला एक तास लागेल आता काय करू, असा विचार करणारे लोक असतात. मल्टी टास्क ऍक्टिविटी आज व्यवस्थापन कौशल्याच्या जगात एक विशिष्ट सामर्थ्याच्या रूपात ओळखली जात आहे, पण आमच्या देशातील महिलांकडे पाहा. कदाचित मल्टी टास्क ऍक्टिविटीमध्ये यांच्यापेक्षा वरचढ दुसरे कोणीही असू शकणार नाही. ती एफएमवर गाणीही ऐकत असेल, मोबाईलवर बोलत असेल आणि त्याच वेळी जेवण तयार करत असेल, आपल्या मुलांना सूचना देत असेल. हे सर्व आपण त्याचे नीट निरखून पाहिले तर लक्षात येते की किती सामर्थ्य दिले आहे, किती ताकद दिली आहे. आपल्याला या शक्तीचा सन्मान करायची जाणीव झाली आहे का, या सामर्थ्याला आपण ओळखले आहे का.
ज्या ज्या ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे, त्या ठिकाणी यशस्वितेची पातळी खूपच उंचावली आहे हे देखील लक्षात घ्या. गेल्या काही वर्षांमध्ये देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण होते, असे आठवण्याचा प्रयत्न करा. नाव देखील आठवणार नाही पण आज सुषमा स्वराज तुम्हाला चटकन आठवतात. सामर्थ्याचा हा अनुभव आपल्याला येतो.
आपल्या संसदेमध्ये अनेक सभापती होऊन गेले. मात्र, जितक्या महिला सभापती झाल्या त्यांची आठवण सर्वांनाच असेल. मीरा कुमार होत्या, सुमित्राजी आहेत. सध्या राज्यांमध्येही मोठ्या संख्येने महिला सभापतींची भूमिका निभावत आहेत. ज्या ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळाली. कोणी या संदर्भात सर्वेक्षण केले आहे की नाही ठाऊक नाही पण जर केले तर कदाचित पुरुषांना मिळालेल्या संधी आणि त्यांचे यशाचे प्रमाण आणि महिलांना मिळालेल्या संधी आणि त्यांच्या यशाचे प्रमाण यामध्ये महिलांच्या यशाचे प्रमाण निश्चितच जास्त असेल असा मला ठाम विश्वास आहे. हे सामर्थ्य आहे यांचे. आपल्या देशात हे पहिले सरकार आहे ज्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने महिला प्रतिनिधी आहेत. माझी अशी धारणा आहे की जर त्यांना संधी मिळाली तर त्या अतिशय उत्तम प्रभाव दाखवू शकतात आणि त्या प्रभाव पाडू शकतात याचा अनुभव आज आपल्याला येत आहे. तुम्ही लोकांनी कदाचित गेल्या शताब्दीच्या उत्तरार्धात आफ्रिका खंडामधील एका लहानशा रवांडा या देशातील घटना तुम्ही ऐकली असेल. त्या ठिकाणी एक महाभयंकर नरसंहार झाला. लाखोंच्या संख्येने लोक मारले गेले आणि त्यात जास्त संख्या पुरुषांची होती. त्यानंतर महिलांनी देशाची धुरा सांभाळली आणि मोठ्या हिमतीने त्या मैदानात उतरल्या. आज त्यांच्या कनिष्ठ सभागृहात 65 टक्के महिला प्रतिनिधी आहेत आणि इतक्या भयंकर संकटातून बाहेर पडलेल्या देशाला महिलांनी नेतृत्व दिले आणि महिलांनी देशाला या संकटातून सावरले. आज रवांडा आपल्या पायांच्या सामर्थ्यावर उभा राहिला आहे. हे खरोखरच एक मोठे उदाहरण आहे की इतक्या संकटांमधून वाटचाल केल्यानंतरही ज्यांना संधी मिळाली त्यांनी केवढे मोठे परिवर्तन केले आहे, केवढा मोठा परिणाम घडवून आणला आहे आणि म्हणूनच एक लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सशक्त बनले पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाला सशक्त बनवण्यामध्ये अतिरिक्त भूमिका निभावता येऊ शकेल. देशाला सशक्त बनवण्यासाठी अर्थसंकल्प उपयोगी ठरत नसतो. देशाला सशक्त बनवण्यासाठी रस्ते, बंदरे, विमानतळ, इमारती, भवन, मनोरे उपयोगी ठरत नाहीत.
देशाला सशक्त बनवतात, देशातील लोक देशाला सशक्त बनवत असतात. देशाला सशक्त बनवतात देशाचे नागरिक आणि नागरिकांना जर कोणी सशक्त बनवत असेल, त्यांना सामर्थ्यवान बनवत असेल, त्याला चारित्र्यवान बनवत असेल तर ती त्याची आई. तिच्याशिवाय दुसरे कोणीही राष्ट्राची निर्मिती करू शकत नाही. तिच्याशिवाय दुसरे कोणी राष्ट्राची निर्मिती, सक्षमीकरण कोणीही करू शकत नाही, हे काम पिढ्यानपिढ्या माता-भगिनी करत आलेल्या आहेत. पिढ्यानपिढ्या उत्तम रत्नांना देऊन समाज, जीवनाचे सशक्तीकरणाचे सर्वात मुलभूत काम तुमच्या द्वारेच झाले आहे. मात्र जे झाले आहे त्याचा कधीही अभिमान बाळगला नाही. आम्हीच न्यूनगंड बाळगून राहिलो, आम्हीच असा विचार केला की नाही त्या लोकांची स्थिती आमच्यापेक्षा चांगली आहे, ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत तर मग पुढे वाटचाल करण्याच्या आपल्या उद्देशाला हे विचार पूरक ठरू शकतील असे मला वाटत नाही. आपण स्वतःच इतके सामर्थ्यवाना आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही ओळखले पाहिजे.
कधी-कधी स्त्रीची दोन रूपे आपल्याला दिसतात. ती चुलीवर जेवण करत असते, चपाती बनवत असते आणि चपाती बनवता-बनवता त्यातून थोडीशी वाफ बाहेर पडली, स्टीम बाहेर आली आणि तिचे बोट भाजले तर ती फूंकर मारते पण तिचे लक्ष जेवणात राहत नाही, स्वयंपाकात राहत नाही. ती पतिदेवांच्या आगमनाची वाट पाहत राहते. तीन वेळा खिडकीकडे जाऊन पाहत राहते, आले तर नाहीत ना आणि ते आल्याबरोबरच त्यांच्या समोर भाजलेले बोट दाखवण्याचे तिचे प्रयत्न असतात. तिला वाटते की आज माझ्या पतिदेवांनी पाहावे की कशा प्रकारे चपाती बनवताना माझे बोट भाजले. ती फूंकर मारेल, पाणी मागतील, अहो देते ना पाणी, दोन तासांपूर्वी बोट भाजले आहे आणि पती येतील, तिला बोटावर काही लावायला सांगतील. तीच स्त्री चपातीमधून वाफ निघते, बोट थोडेसेही भाजले असेल तर पतीची वाट पाहते आणि पतीचे लक्ष वेधते. मात्र, ती राहत असलेल्या गल्लीत आग लागली आहे, आई बाजारात गेली आहे भाजी खरेदी करायला, चांगलासा डिस्काऊंट सेल चालू आहे, 10 टक्के, 20 टक्के, खूप सुंदर साड्या आल्या आहेत आणि ही स्त्री गेली आहे खरेदीला. साड्या पाहत असतानाच तिला समजते की तिच्या भागामध्ये आग लागली आहे. त्या वेळी त्या साड्यांना बाजूला फेकून ती धाव घेते. आजूबाजूचे लोक त्या घराला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असतात. कोण माती टाकत असते, कोणी पाणी मारत असते, ती येऊन किंकाळी फोडते की माझा मुलगा आत आहे. आजूबाजूचे कित्येक पुरुष, मिशांना पीळ देणारे बघत राहतात, आत जाण्याची कोणाची हिंमत होत नाही. मात्र, ती आई जीवावर उदार होऊन आगीत धाव घेईल आणि मुलाला घेऊन बाहेर पडेल. चपातीमधून निघणाऱ्या वाफेने बोट भाजल्यावर तिचे एक रूप असते मात्र संकटांचा सामना करताना जेव्हा तिच्यातील माया उफाळून वर येते तेव्हा तिच्यात वेगळे बळ येते. या सामर्थ्याची देणगी तुम्हाला मिळालेली आहे आणि हेच सामर्थ्य देशाला शक्तिशाली बनवत आहे, राष्ट्राला बळकट बनवत आहे आणि लोकप्रतिनिधी या नात्याने कल्पना करा आपल्या किती भूमिका असतील. आपले काम आहे कायदेमंडळामध्ये कायदे करणे, हा कायदा बनवताना त्याचा जो मसुदा आला आहे, तो मी बारकाईने पाहिला आहे का. माझ्या सक्षमीकरणाचा जो जाहीरनामा आहे त्याचा समावेश त्यामध्ये आहे का, एखाद्या शब्दाची त्यामध्ये कमतरता तर नाही ना. जर असेल तर त्या शब्दाचा समावेश त्यामध्ये करण्यासाठी एक जागरुक प्रतिनिधी म्हणून मी आग्रह धरत आहे की नाही. बघा असा विचार केला तर खूप मोठे योगदान दिले जाईल.
तुमच्या कार्यकाळात एखादा कायदा तयार होतो, ज्या कायद्यामध्ये एखाद्या अशा शब्दाचा वापर होतो, ज्या शब्दामुळे भावी काळात निर्माण होणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात बदल होऊ शकतो. किती मोठे योगदान म्हणता येईल. पण अशा प्रकारे माझे प्रयत्न सुरू आहेत का. लोकप्रतिनिधी या नात्याने माझे हे उत्तरदायित्व ठरते की जे घटनात्मक कार्य आहे त्यामध्ये मुख्यत्वे माझी भूमिका महत्त्वाची आहे आणि इतकेच नाही कोणतेही कुटुंब जेव्हा घर बांधत असते त्यावेळी कितीही वास्तुरचनाकार विविध रचना घेऊन आलेले असले तरी त्या रचनांवर अंतिम शिक्कामोर्तब आई करत असते . नाही नाही स्वयंपाकघर असे पाहिजे, शौचालय या ठिकाणी हवे, देवघर या ठिकाणी असले पाहिजे, चपला ठेवण्यासाठी ही जागा असली पाहिजे, तेव्हा कुठे घर ठीकठाक चालेल. ती आई इंजिनिअर आहे की नाही, ती वास्तुरचनाकार आहे की नाही आहे. पण तिला सर्व काही अनुभवातून समजते. त्याच प्रकारे जेव्हा सदनात कायदा तयार होतो त्या वेळी त्याच ज्ञानाने आपण पाहतो की कोणत्या त्रुटी आहेत, कोणत्या चांगल्या बाबी आहेत. भावी काळातील पिढ्यांवर त्यांचा काय परिणाम होऊ शकतो. तुम्ही थोडा प्रयत्न करा आणि पाहा की तुम्ही खूप मोठे योगदान देऊ शकता तुमच्यामध्ये पाहण्याची, ऐकण्याची आणखी शक्ती आहे. तुम्ही एखाद्या घटनेच्या आधीच तिचा अंदाज लावू शकता. कदाचित पुरुषांना हा अंदाज लावता येणे शक्य होत नाही. त्या घटनेचे परिणाम काय होऊ शकतात याचा अंदाज कदाचित तुम्हाला लवकर येतो. पुरुषांना कदाचित नाही कळत. ही दैवी देणगी तुमच्याकडे आहे याचा उपयोग कायदेमंडळात होऊ शकतो का, आपण जिथे बसलो आहोत तिथे होऊ शकतो का, हे आपण करू यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपली एखादी प्रतिमा तयार झाली आहे का. मला असे वाटते की, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काळजीपूर्वक तुमची विशिष्ट अशी प्रतिमा तयार करण्याचा, तुमची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा असे मी तुम्हाला आग्रहाने सांगू इच्छितो आणि ही एक प्रकारची साधना आहे, एक सातत्य आहे. ते असेल तरच ही प्रतिमा निर्माण होऊ शकते. असे समजा की एखादा लोकप्रतिनिधी आहे आणि मग मंगळवार आणि बुधवारी सकाळी आठ वाजता या ठिकाणी भेटण्याचे त्याने ठरवले आहे. म्हणजे पाऊस असो, ऊन असो काहीही होवो तुम्ही तिथे भेटणार ही तुमची ओळख निर्माण होईल. अरे वा मंगळ आणि बुध म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी असणार म्हणजे असणारच. आम्ही म्हणू या टेलिफोन नंबरवर मेसेज द्या. मी असेन वा नसेन तो टेलिफोन नंबरच तुमच्यासारखा शक्तिशाली बनेल एक लोकप्रतिनिधी या नात्याने.
आपल्या मतदारसंघात आपण आपली एक ओळख निर्माण करू शकतो का आणि तुम्ही पाहा एकदा का जनसामान्यांमध्ये आपल्या कार्यशैलीची, आपल्या बोलण्याची विचारांची, आचरणाची एक विशिष्ट अशी प्रतिमा तयार झाली तर ती बराच काळ उपयोगात येईल आणि हा प्रयत्न करत राहिले पाहिजे. लोकप्रतिनिधी या नात्याने कधीकधी राजकारण म्हणजे एक खेळांची स्पर्धा होते, प्रत्येक क्षणाला स्पर्धा होत असते पण या स्पर्धेमध्ये जेव्हा ईर्षेची भावना जास्त प्रबळ होते तेव्हा आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याला पुढे जाण्याचा अधिकार नाही आणि यामुळे काय होते की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दोन-चार आणखी महिला प्रभावी दिसू लागल्या, ताकदवान वाटू लागल्या की आपला धीर सुटू लागतो, आपल्याला भीती वाटू लागते. पुढच्या वेळेला तिला तर तिकिट नाही ना मिळणार, मग माझे काय होणार. आपल्याला आपल्या स्वतःला सातत्यानं लायक बनवत राहत पुढे चालत राहिले पाहिजे आणि जर आपण असा प्रयत्न केला की मी जी आहे ती आहे पण मी कोणालाही येऊ देणार नाही तर मग हे तुम्ही मनात ठामपणे ठरवून घ्या की येणाऱ्या प्रवाहाची ताकद इतकी असेल की तो प्रवाह तुम्हाला तळाला खेचून पुढे निघून जाईल आणि तेव्हा तुम्ही इतके खाली पोहोचला असाल की पुन्हा वर येणे शक्य होणार नाही. मात्र, जर तुम्ही इतरांना येण्याची संधी देत राहिलात, तर तुम्ही वर जात राहाल, खाली तुमचा भक्कम पाया तयार होत जाईल आणि एखाद्या पिरॅमिडप्रमाणे तुमची ताकद वाढत जाईल.
या सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी या नात्याने माझी स्वतःची ताकद आणि व्यक्तिमत्व यासाठी मला प्रयत्न केले पाहिजेत. आपण हे निश्चित केले पाहिजे, आपल्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये एक तृतीयांश महिला नेतृत्व करत आहेत. कोणी गावाचे नेतृत्व करत आहे, कोणी नगराचे नेतृत्व करत आहे, कोणी शहराचे करत आहे, कोणी मोठ्या शहराचे, कारण एक तृतीयांश अध्यक्षपद कोणत्या ना कोणत्या महिलेच्या हाती आहे. हे एक तृतीयांश प्रतिनिधी, बाकी बाजूला ठेवा, हे एक तृतीयांश प्रतिनिधी जो तुमचा विचार आहे, तुमच्या संकल्पना आहेत, जे तुमच्या हाताखाली काम करत आहेत, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत. जर तुम्ही आमदार आहात आणि 100 गावे आहेत, जर त्या गावात 30-35 महिला आहेत, सरपंच महिला आहेत. या महिलांना तुम्ही सक्षम केले आहे का, त्यांचे सक्षमीकरण केले आहे का, त्यांच्या सोबत कधी एक दिवस घालवला आहे का.
मी तुम्हाला असा आग्रह करतो की जे सुमित्राजींनी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी केले, हेच तुम्ही तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये, त्या ठिकाणी ज्या निर्वाचित महिला आहेत, त्यांच्यासाठी एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित करू शकता का, ही संकल्पना त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता का, बघा ही संकल्पना खाली खाली जात तळापर्यंत पोहोचली तर सक्षमीकरणाच्या दिशेने एका मोठ्या परिवर्तनाचे वातावरण निर्माण होईल आणि ती कोणत्याही पक्षाची का असेना, यामध्ये पक्षवाद येता कामा नये. या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक आहेत हे तुम्ही पाहिले आहे आणि मी तर सुमित्राजींचे अभिनंदन करेन कारण त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी जी समिती तयार केली होती त्यामध्ये सर्व पक्षांचे लोक होते आणि जवळ जवळ सर्व कनिष्ठ खासदार होते. मात्र, त्यांनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमाची आखणी केली. सांगायचे तात्पर्य काय की आम्ही , आमच्या या गटाला सक्षम करायचे कसे, ताकदवान कसे बनवायचे, त्यांच्यात शक्ती कशी निर्माण करायची. हे सामर्थ्य आणण्याच्या पद्धतीनुसार आपण स्वतः नेतृत्व करू शकतो का, जर आपण नेतृत्व केले तर आपण खूप मोठे परिवर्तन आणू शकतो.
आणखी एक विषय आहे ज्या संदर्भात मी तुम्हाला विनंती करेन आणि तो आहे तंत्रज्ञान. व्यक्तीच्या जीवनात, समाजजीवनात तंत्रज्ञानाची अतिशय महत्त्वाची भूमिका असल्याचे सिद्ध झाले आहे. आपल्याला त्यासोबत जुळवून घ्यावे लागत आहे. पुरुषांमध्ये तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची जी क्षमता आहे त्यापेक्षा महिलांमध्ये तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची क्षमता जास्त असते, असे माझे मत आहे. कोणत्याही स्वयंपाकघरामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की स्वयंपाकघरामध्ये सर्वात अत्याधुनिक गॅजेट तंत्रज्ञानाचा वापर महिला अतिशय सहजतेने करत असतात. केवळ इतकेच नाही त्यांच्या घरात, स्वयंपाकघरात मदत करणारी कोणतीही निरक्षर महिला असली तरीही तिला देखील ती उपकरणे कशी चालवायची, काय चालू करायचे आहे याची माहिती असते, सर्व काही तिला येत असते. म्हणजे तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची महिलांमध्ये एक वेगळी क्षमता असते.
तुम्ही पाहिले असेलच ग्राहकोपयोगी उत्पादने जे बनवतात त्यांचे देखील लक्ष्य काय असते तर महिला केंद्रीत उत्पादन. त्यांना माहीत असते की बाजारपेठ लगेचच मिळेल कारण ती लगेच स्वीकार करत असते. तंत्रज्ञान महिलांसाठी काही नवीन नसते, ती स्वीकार करत असते पण लोकप्रतिनिधी या नात्याने जे बदललेले युग आहे त्यामध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करू शकतो. आपल्या परस्पर संपर्कासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर कसा करू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, जनसंपर्कासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे, आपले मुद्दे लोकांना पटवून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पाहिजेत. आज तुमचा कोणताही मतदार असा नसेल जो मोबाईल फोनद्वारे जोडला गेलेला नसेल. त्यांची संख्या दोन टक्के सुद्धा नसेल. पण तुम्ही मात्र त्यांच्याशी कनेक्ट आहात. म्हणजेच समथिंग इज मिसिंग. जर आज या ठिकाणच्या दोन दिवसांचा अनुभव तुम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतला तर देशाला आणि जगालाही समजू शकेल की नक्कीच काही तरी या ठिकाणी होत आहे आणि हे माहिती मिळवण्याचे उत्तम साधन आहे.
मला तरी याचा अनुभव येत आहे. मी नरेंद्र मोदी ऍपवर पाहत असतो की इतके लोक माझ्या संपर्कामध्ये आहे, मला इतकी माहिती देत असतात, प्रत्येक गोष्टीची माहिती तातडीने मिळत असते. काही घडले तरी लगेच समजत असते. इतक्या चांगल्या प्रकारे कामात असतानाही माहितीने मी सुसज्ज होत राहतो. mygov.in नावाचा एक प्लॅटफॉर्म पंतप्रधान कार्यालयातून चालवत आहे, त्या द्वारे देखील मी सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात राहू शकतो. तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करू शकता आणि मी तर लोकसभा आणि राज्यसभेला एक विनंती करेन की तुम्ही महिला प्रतिनिधींचा एक ई-प्लॅटफॉर्म तयार करू शकाल का आणि त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या अधिकृत स्वरूपात लोकसभा, राज्यसभा यांच्या वेबसाईटवर मांडा. बघा तंत्रज्ञानाची स्वतःची अशी वेगळी ताकद आहे आणि माझा एक वेगळा असा अनुभव आहे. ज्या वेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, कपराडा नावाचा एक तालुका आहे. खूपच आत दुर्गम भागात असलेला हा आदिवासी पट्टा आहे. सामान्यतः कोणत्याही मुख्यमंत्र्याचे जाणे तेथे होत नाही. मात्र, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करताना सर्व भागातील सर्व ठिकाणी जायचे असा माझा आग्रह असायचा, प्रत्येक ठिकाणी स्वतः जायचे हा माझा प्रयत्न असायचा. तरीही या भागात माझे जाणे काही होत नव्हते. अशीच दोन तीन वर्षे उलटून गेली आणि त्या भागात जाणे काही झाले नाही. मग मी म्हटले की या ठिकाणी आपण जायचेच आणि काही नाही करता आले तरी एक झाड लावून परत यायचे. पण जायचे मात्र नक्की, असे ठरवले. असो मग आमच्या अधिका-यांनाही वाटू लागले की यांना जायचेच आहे तर त्यासाठी मग त्यांनी एका कार्यक्रमाचे निमित्त शोधले. एका चिलिंग सेंटरचे उद्घाटन करायचे होते. चिलिंग सेंटर म्हणजे काय, तर दूध येत असते आणि या दुधाला काही काळ साठवून ठेवण्याचे काम करावे लागते आणि 50-60 लाख रुपयांचे असते हे चिलिंग सेंटर. आता या लोकांना संकोच वाटू लागला की 50 लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्याना कसे घेऊन जायचे. मी त्यांना सांगितले की मी जाणार, मला जायचे आहे, त्या भागात मी गेलेलो नाही, मला जायचे आहे. मी त्या ठिकाणी गेलो तर तिथे संपूर्ण जंगल होते. सभा घेण्यासाठी तर मोकळी जागा देखील नव्हती. पण त्या ठिकाणाहून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शाळेच्या मैदानात त्यांनी सार्वजनिक सभा ठेवली होती. मात्र, या ठिकाणी जिथे मी चिलिंग सेंटरवर गेलो , तिथे दूध भरणा-या 30-35 आदिवासी भगिनींना त्यांनी बोलावून आणले होते, चिलिंग सेंटरचे उद्घाटन करायचे होते. तिकडे गेल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तिथे कार्यक्रमासाठी गेल्यावर मी पाहिले तर या सर्व आदिवासी भगिनी सुरक्षेसाठी जे कुंपण घातले होते त्याच्या जवळ उभ्या होत्या आणि प्रत्येकीच्या हातात मोबाईल फोन होता आणि त्या फोटो काढत होत्या. मी त्या भागाविषयी बोलतोय जिथे मुख्यमंत्री जात नव्हते, जंगल होते आणि पूर्णपणे आदिवासी लोक होते, त्या काळातील गोष्ट सांगतोय, 10 वर्षांपूर्वीच्या घटनेविषयी बोलत आहे. सर्व जण फोटो काढत आहेत हे पाहून मी त्यांना विचारले की हे फोटो काढून तुम्ही लोक काय करणार आणि त्यांनी जे उत्तर दिले ते मी आजही विसरलेलो नाही आहे. त्यांनी म्हटले की हे फोटो आम्ही डाऊनलोड करून घेणार. त्या शिकलेल्या नव्हत्या. मात्र, डाऊनलोड शब्द त्यांना माहीत होता. मोबाईल फोनच्या एखाद्या दुकानात जाऊन डाऊनलोड करता येते याची त्यांना जाण होती. सांगायचे तात्पर्य काय तर हे तंत्रज्ञान कुठे-कुठे पोहोचले आहे. मग आपण स्वतःला त्यासोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे का. आपली ताकद वाढवण्याच्या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजेत.
आणखी एक विषय आहे परस्परसंपर्काचा. मी असे म्हणत नाही की तुम्हाला फार चांगला वक्ता बनण्याची गरज आहे, बनलात तर चांगली गोष्ट आहे पण तसे नसेल तर न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. मात्र, आपला मुद्दा योग्य पद्धतीने सांगण्याची क्षमता तर निर्माण होऊ शकेल.
तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही जर टेक्नोसॅव्ही असाल तर एक काम करा, तुमच्या मोबाईलचा वापर करा किंवा एखादा लहानसा आयपॅड वापरू शकता की नाही. नसेल तर डायरीमध्ये लिहू शकता. तुम्ही सातत्याने एक डायरी वापरण्याची सवय करा. वर्तमानपत्रामध्ये एखादी माहिती वाचली तर ती त्यात लिहून ठेवत जा, एक विभागच तयार करा, शिक्षणाचा, सिंचनाचा, शहरी विकासाचा, ग्रामीण विकासाचा आणि त्यामध्ये घडलेल्या घटना लिहित जा, त्यात भर घालत जा. एक वर्षाने तुम्हाला दिसेल, तुमच्या स्वतःच्या ज्ञानाचा साठा इतका मोठा असेल की कुठेही कोणत्याही विषयाला घेऊन काही बोलायचे असेल, तर केवळ दोन मिनिटांत तुमची नजर डायरीवरून फिरेल. त्यानंतर मोठ्या आत्मविश्वासाने वस्तुस्थिती आणि आकडेवारीसहित तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता.
तुम्हाला मी आग्रहाने सांगेन की तुम्हाला स्वतःला प्रभावी देखील बनवावे लागेल आणि जर तुम्ही स्वतःला प्रभावी बनवण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक आहेत ते जर तुम्ही नाही केलेत तर केवळ व्यवस्था बदलून अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. संरचनेमध्ये इकडचे तिकडचे बदल होत राहतील, वेळो-वेळी होतही राहतील. मात्र, या बदलांना सचेतन कसे बनवता येईल, आपल्या ताकदीला त्यात कशा प्रकारे सामावून घ्यावे हे समजून घेण्याची गरज आहे. आपले मुद्दे अतिशय कमी वेळात कशा प्रकारे मांडायचे, अगदी चांगल्या पद्धतीने कसे सादर करायचे, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जर हे करण्यामध्ये तुम्हाला यश मिळाले तर बघा लोक तुमच्या म्हणण्याशी कशा प्रकारे सहमत होत जातील, तुमच्या सोबत येत जातील. तुमचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी तुमचे व्यक्तिमत्व रुबाबदार असण्याची गरज नाही. तुमच्याकडे विषयांची माहिती असण्याची गरज आहे. तुम्ही सभागृहात बोलता. सर्व लोकांना सर्वच विषयांची माहिती असायलाच पाहिजे असे काही नाही. कोणी पंतप्रधान झाले तर त्या व्यक्तीला सर्व विषयांची माहिती असते का, असे काही आवश्यक नाही. मात्र, ज्या विषयांची आवड आहे, अशा एक दोन विषयांवर तुमचे प्रभुत्व असले पाहिजे. प्रत्येक वेळी त्या विषयांशी संबंधित जी वस्तू मिळेल ती जमा करत राहिले पाहिजे. तुम्हाला वाटले की पाण्याच्या विषयामध्ये माझे प्रभुत्व आहे. माझ्या मतदारसंघात पाण्याची समस्या आहे तर मग मी पाण्याच्या विषयावर प्रभुत्व मिळवू. तुम्हाला असे वाटते की नाही मी तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवू शकेन तर तंत्रज्ञानावर मिळवा. तुम्हाला वाटते की मी शिक्षणाच्या विषयावर करेन.
एक विषय निवडा, ज्या विषयावर तुम्ही सर्वाधिक पकड मिळवू शकता, सहजपणे मिळवू शकता, माहितीची जोड देऊ शकता. तुम्ही लक्षात घ्या सभागृहामध्ये कदाचित दैनंदिन कामकाजाच्या वेळी तुमचा पक्ष तुम्हाला बोलू देत नसेल. पण जर एखाद्या विषयावर तुमचे प्रभुत्व असेल तर तुमच्या पक्षाचे लोक तुम्हाला शोधत येतील, नाही-नाही बघा मंगळवारी संसदेमध्ये विधानसभेमध्ये नक्की या. हा विषय आहे तर तुम्हाला बोलावे लागेलच. तुम्ही बोललात तर जरा जोर येईल कारण तुमच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. तुम्हाला कोणाच्या कृपेची गरज पडणार नाही आणि म्हणूनच आपण स्वतःला कसे सज्ज करायचे स्वतःसाठी, त्याचे प्रयत्न करा आणि जर हे प्रयत्न झाले तर त्याचे अतिशय उत्तम परिणाम पाहायला मिळतात. तुमचा बराच वेळ मी घेतला. तुम्हाला जेवायचे देखील आहे आणि तुम्ही लोक फोटोसाठी देखील तयारी करून आला आहात तर मी पुन्हा एकदा सुमित्राजींचे खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचेही अभिनंदन, पण एक गोष्ट माझ्या मनात येते ती ही की संसदेत ज्या समित्या जातात, राज्यांमध्ये जातात, तुम्ही देखील जाता, त्यात तुम्ही प्रयत्न करू शकता का, तुमचा पूर्ण कार्यक्रम जो काही असेल तो असेल पण तुम्ही जिथे जाल तेथील महिला लोकप्रतिनिधींसोबत अर्धा तास, एक तास नक्की ओळख करा, त्यांना भेटा, हे तुम्ही करू शकता का, बघा तुम्हाला इतकी माहिती मिळेल.
दुसरी बाब म्हणजे मी विशेषत्वाने खासदारांना विनंती करतो. या ठिकाणी अनेक राज्यांच्या आमदारांशी तुमची ओळख झाली आहे. सभागृहाच्या आत देशाच्या कोणत्याही कानाकोप-यातील विषय चर्चेला येऊ शकतो. तुम्ही कधी टेलिफोनवर तुमचा ज्यांच्याशी परिचय झाला त्या राज्याच्या एखाद्या आमदाराला विचारले आहे का की सभागृहात हा विषय उपस्थित होण्याची शक्यता आहे. तुमच्या राज्याचे काय झाले आहे, सांगा ना काय झाले आहे, ती सांगेल नाही थांबा एका तासात शोधून सांगते. बघा दोन्ही बाजूंनी फायदा होईल. ती सुद्धा त्या घटनेवर स्वतःचे लक्ष केंद्रित करेल, त्या घटनेचा अभ्यास करेल, एक तासाने तुम्हाला सर्व ताजी माहिती देईल आणि ही माहिती तुम्हाला वर्तमानपत्रातून नाही अगदी ताबडतोब घटनास्थळावरून सर्वात आधी मिळेल. केरळमध्ये तिरुवनंतपुरममध्ये ही घटना घडली आहे आणि तिकडची आमदार मला हे सांगत आहे तर मग मी सभागृहात त्याविषयीची वस्तुस्थिती मांडू शकेन. बघा माहितीचे हे स्रोत अतिशय आवश्यक असतात. या ठिकाणाहून आपण आणखी आपण घेऊन जाऊ न जाऊ . पण या वर्तुळामध्ये तुमच्या ज्या ओळखी झाल्या आहेत, पक्ष कोणताही असू दे, तुम्ही तुमच्या ओळखी वाढवत राहा, तुमचे माहितीचे स्रोत वाढत जातील. म्हणून आपण कुठे दौऱ्यावर गेलो की समित्यांमध्ये हा आग्रह धरा की आम्हाला तिथल्या लोकप्रतिनिधींची अर्धा तास, एक तास सामूहिक भेट नक्की घेऊ द्या. सरकार अशा प्रकारचा कार्यक्रम तयार करेल किंवा नाही. पण आपण हा प्रयत्न केला पाहिजे. हळूहळू आतल्या आतच हा शक्तीचा एक संपुट बनत जाईल. शक्तीचा हा संपुट देशाला बळकट करण्याच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावेल आणि तो दिवस दूर नसेल ज्यावेळी महिला सक्षमीकरण तर होतच राहील. ती प्रक्रिया सुरू राहिल. पण देशात महिला विकासाच्या पुढे जाऊन महिलांनी निश्चित केलेल्या विकासाच्या दिशेने पुढे वाटचाल करतील. याच एका पूर्ण श्रद्धेने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा , खूप खूप आभार
S.Patil/S.Tupe/M.Desai
Want to congratulate Sumitra ji for having envisioned this programme & I congratulate all of you who joined the programme: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 6, 2016
In addition to structural component of programmes like this, experiences shared during personal meets, over tea, meals are invaluable: PM
— PMO India (@PMOIndia) March 6, 2016
It's important to understand ourselves and our strengths. And this happens when we face challenges: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3Nre5
— PMO India (@PMOIndia) March 6, 2016
When it comes to multi task activities, nobody can beat women. Such is the strength and we must be very proud of it: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 6, 2016
We've had many Foreign Minister's but everybody knows about the outstanding work of @SushmaSwaraj: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 6, 2016
Budgets & infrastructure don't only strengthen nations. Every citizen of India strengthens the nation & a Mother strengthens a citizen: PM
— PMO India (@PMOIndia) March 6, 2016
Am going to speak on technology. We will have to cope up with it and I am convinced women can adapt better to technology : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 6, 2016
Through the Narendra Modi App and MyGov I have received so many enriching thoughts and views: PM @narendramodi on why technology matters
— PMO India (@PMOIndia) March 6, 2016
PM emphasises not only on women development but also women-led development.
— PMO India (@PMOIndia) March 6, 2016
Yesterday & today I joined the National Conference of Women Legislators. I congratulate Speaker Sumitra Mahajan ji for this great initiative
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2016
Today, I spoke about women-led development & why women lawmakers must use technology to connect with citizens. https://t.co/rQ3V8qPXwg
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2016